व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमांमधील आशिया खंडातील जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवणारी महत्त्वाची संस्था म्हणून सिंगापूरमधील नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या नानयांग बिझनेस स्कूलला ओळखले जाते.

एका नामांकित वृत्तपत्राच्या जागतिक क्रमवारीतील व्यवस्थापन अभ्यासक्रमांमध्ये पहिल्या तीस विद्यापीठांमध्ये, आशियातील तिसरे तर सिंगापूरमधील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून नानयांग बिझनेस स्कूलने स्थान पटकावले आहे. बिझनेस स्कूलकडून दरवर्षी गुणवंत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना एमबीएसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षीप्रमाणे २०१७ या शैक्षणिक वर्षांसाठीही आंतरराष्ट्रीय पदवीधर विद्यार्थ्यांकडून या अभ्यासक्रमासहित शिष्यवृत्तीसाठी मार्चच्या अंतिम आठवडय़ापर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत.

शिष्यवृत्तीविषयी

सिंगापूरमधील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठ हे त्या देशातील एक प्रमुख विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचा बिझनेस स्कूल हा विभागही आशिया व जगातल्या प्रमुख बिझनेस स्कूल्सपैकी एक आहे. नानयांग बिझनेस स्कूलकडून पदवी, पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रम बहाल केले जातात. या तिन्ही पदवी स्तरांवरील विविध अभ्यासक्रमांसाठी जवळपास सात हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात आशिया खंडातील वेगवेगळ्या देशांमधून आलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. बिझनेस स्कूलचा एमबीएचा अभ्यासक्रम हा जगातल्या नामांकित १०० अभ्यासक्रमांपैकी एक आहे. एमबीएसाठी २००४ पासून सलग तेरा वर्षे नानयांग बिझनेस स्कूल हे सिंगापूरमधील पहिल्या क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून निवडले गेले आहे. या वर्षी तर स्कूलच्या एमबीए अभ्यासक्रमाला ‘टाइम्स ग्लोबल एमबीए रँकिंग’ या संस्थेने जागतिक क्रमवारीतील २४ वे स्थान बहाल केले आहे. नानयांग बिझनेस स्कूलकडून दिली जाणारी ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. या शिष्यवृत्ती कार्यक्रमाद्वारे शिष्यवृत्तीधारकास त्याचा एमबीए अभ्यासक्रम हा पूर्णवेळ पूर्ण करावा लागेल. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. शिष्यवृत्तीधारकाच्या पहिल्या वर्षांतील गुणवत्तेवर दुसऱ्या वर्षांची शिष्यवृत्ती अवलंबून असेल. त्यामुळेच अभ्यासात हयगय करून चालणार नाही. शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला त्याच्या एमबीएच्या तीन ट्रायमेस्टरचे शैक्षणिक शुल्क देण्यात येईल. याव्यतिरिक्त त्याला इतर कोणतीही आर्थिक मदत विद्यापीठाकडून दिली जाणार नाही.

अर्जप्रक्रिया

या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा एमबीएचा अर्ज विहित नमुन्यात ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अंतिम मुदतीपूर्वी जमा करावा. अर्ज जमा करताना अर्जदाराने अर्जाबरोबर त्याचे जीमॅटचे गुण तसेच टोफेल किंवा आयईएलटीएस या दोन्हींपैकी कोणत्याही एका परीक्षेत मिळवलेले गुण किंवा बॅण्डस्, त्याचे एस.ओ.पी., त्याचा सी.व्ही., पदवी स्तरावरील प्रकल्पाबद्दल माहिती देणारा प्रबंध, त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापकांची अथवा तज्ज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती, कार्य अनुभवाचे प्रशस्तिपत्र इत्यादी गोष्टी जोडाव्यात. याबरोबरच अर्जदाराने पूर्ण झालेल्या अर्जाची प्रिंट घेऊन त्याबरोबर वरील सर्व कागदपत्रांच्या प्रती स्वतंत्रपणे आंतरराष्ट्रीय कुरिअरने विद्यापीठास पाठवाव्यात.

आवश्यक अर्हता

ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदवीधर असावा. त्याच्याकडे किमान दोन वर्षांचा पूर्णवेळ कार्यानुभव (Full-time Work Experience) असावा. अर्जदाराचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. अर्जदाराची पदवीपर्यंतची शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्कृष्ट असावी. त्याने एमबीएसाठी आवश्यक असणारी जीमॅट ही परीक्षा अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय भारतीय विद्यार्थ्यांनी इंग्रजीच्या टोफेल किंवा आयईएलटीएस या दोन्ही परीक्षांपैकी एक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. किमान अर्हता जरी अशी असली तरी या एमबीए शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रवेश घेणाऱ्या या विद्यार्थ्यांकडे उत्कृष्ट शैक्षणिक पाश्र्वभूमी, नेतृत्वगुण, आतापर्यंतच्या करिअरमध्ये स्वत:च्या कामाबाबत असलेला जबाबदारपणा, जोखीम घेण्याची प्रवृत्ती, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन, व्यावसायिक मनोवृत्ती इत्यादी गुण असावेत अशी अपेक्षा विद्यापीठ ठेवत असते.

निवडप्रक्रिया

अर्जदाराची त्याच्या अर्जातील एकूण गुणवत्ता व ठरावीक प्रमाणात त्याची आर्थिक निकड लक्षात घेऊन निवड समिती शिष्यवृत्तीसाठी त्याची निवड करील. निवडीनंतर साधारणपणे सहा ते आठ आठवडय़ांत सर्व अर्जदारांना विद्यापीठाकडून त्यांच्या निकालाबाबत कळवण्यात येईल.

महत्त्वाचा दुवा

http://www.ntu.edu.sg

अंतिम मुदत

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत मार्च २०१७ चा अंतिम आठवडा ही आहे.