News Flash

एमपीएससी मंत्र : भूगोल : संज्ञा, संकल्पनांचा अभ्यास

सामान्य अध्ययन पेपर- १ मध्ये इतिहास व भूगोल अशा दोन घटकांचा समावेश होतो.

सामान्य अध्ययन पेपर- १ मध्ये इतिहास व भूगोल अशा दोन घटकांचा समावेश होतो. यातील भूगोल या घटकामध्ये कृषी व पर्यावरण या उपघटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच भूगोल विभागाला अधिक महत्त्व देणे अपेक्षित आहे. अर्थव्यवस्था आणि पर्यावरण या दोन विषयांच्या अभ्यासामध्ये भौगोलिक
आयाम व संबंधित भौगोलिक पायाभूत संकल्पना माहीत असणे आवश्यक ठरते. त्यामुळे पूर्व व मुख्य अशा दोन्हीही परीक्षांच्या तयारीसाठी भौगोलिक संज्ञा व संकल्पना पक्क्या करून घेणे महत्त्वाचे आहे. या विषयाची तयारी नेमकी कशी करता येईल ते
जाणून घेऊयात..
पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमात आयोगाने भूगोल विषयाचे भौतिक, सामाजिक व आर्थिक असे ठळक तीन उपविभाग केले आहेत. पर्यावरणविषयक बाबी भौतिक भूगोलामध्ये व कृषीविषयक बाबी आर्थिक भूगोलामध्ये समाविष्ट करता येतात. मुख्य परीक्षेच्या तयारीतही भूगोलाचे हेच तीन उपविभाग करून अभ्यास केल्यास पूर्व व मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातील एकत्रित मुद्दे आधी तयार करता येतील.
विज्ञानाप्रमाणे भूगोलाचा अभ्यासही व्याख्यांच्या व प्रक्रियांच्या संकल्पनांच्या आधारे केल्यास कमी वेळेत विषयाचे चांगले आकलन होण्यास मदत होते. अभ्यासामध्ये काही ठळक बाबींचा क्रम लावावा. सर्वात आधी महत्त्वाच्या संज्ञा व संकल्पना समजावून घ्याव्यात. त्यानंतर निरनिराळ्या भौगोलिक प्रक्रिया (उदा. भूरूप निर्मिती, भूकंप/ वादळ आदींची निर्मिती) समजून घेणे आवश्यक ठरते.
प्राकृतिक भूगोल व हवामान
* भूगोलाच्या शाखा, पृथ्वीची उत्पत्ती, रचना, पृथ्वीचे कलणे, वातावरण, अक्षांश, रेखांश, हवामानाचे घटक, प्रमाणवेळ इत्यादी पायाभूत संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात.
* भूरूपांपकी केवळ प्रसिद्ध नद्या, पर्वत, सरोवरे इत्यादींचा अभ्यास केल्यास अभ्यासाचे ओझे हलके होईल.
* भारतातील हिमालयीन व द्विकल्पीय नदीप्रणालींचा तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे. नदीप्रणालींच्या अभ्यासातच जल व्यवस्थापनातील- पाण्याची गुणवत्ता, भूजल व्यवस्थापन, नदीजोड प्रकल्प, पर्जन्य जलसंचय अशा महत्त्वाच्या संकल्पना अभ्यासायला हव्या. यामुळे पाणी या नसíगक संसाधनाचा मूलभूत अभ्यास पूर्ण होईल. कृषी व इतर कारणांसाठी वापर, व्यवस्थापन इत्यादी मुद्दे कृषीविषयक घटकाच्या तयारीमध्ये समाविष्ट करता येतील.
भौगोलिक घटना/ प्रक्रिया
* मान्सूनची निर्मिती, वितरण, देशाच्या/ राज्याच्या दृष्टिकोनातून महत्त्व, ऋतू निर्मिती, मृदा निर्मिती, समुद्री प्रवाह, भूकंप, ज्वालामुखी इत्यादी प्रक्रिया पूर्व, मुख्य परीक्षेतील इतर घटक विषयांच्या तयारीसाठीही महत्त्वाच्या आहेत.
* कोणत्याही भौगोलिक घटना/ प्रक्रियेच्या अभ्यासामध्ये पुढील मुद्दे समजून घ्यावे लागतात-
भौगोलिक व वातावरणीय पाश्र्वभूमी, घटना घडू शकते/ घडते ती भौगोलिक ठिकाणे, प्रत्यक्ष घटना/ प्रक्रियेचे स्वरूप, घटनेचे/ प्रक्रियेचे परिणाम, पर्यावरणीय बदलांमुळे घटनेवर/ प्रक्रियेवर होणारे परिणाम, असल्यास आर्थिक महत्त्व, देशातील- राज्यातील उदाहरणे, अलीकडेच घडलेल्या महत्त्वाच्या घटना/ प्रक्रिया, चालू घडामोडी.
भूरूप निर्मिती
* भूरूप निर्मिती हा घटक पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. भूरूप निर्मिती घटकाची टिपणे वारा, नदी, हिमनदी व समुद्र या चार कारकांच्या शीर्षकाखाली मुद्दय़ांच्या अथवा तक्त्याच्या स्वरूपात काढता येतील. अपक्षयामुळे होणारी भूरूपे व संचयामुळे होणारी भूरूपे असे त्यांचे विभाजन करता येईल. अपक्षयामुळे होणाऱ्या भूरूपांमधील साम्यभेद आणि संचयामुळे होणाऱ्या भूरूपांमधील साम्यभेदांचीही नोंद घ्यावी लागेल. प्रत्येक भूरूपासाठी उपलब्ध असल्यास जागतिक स्तरावरील तसेच देशातील अथवा राज्यातील प्रसिद्ध उदाहरणाची नोंद करावी.
* देशातील व राज्यातील खडकांचे प्रकार आर्थिकदृष्टय़ा महत्त्वाचे असल्याने या भागाचा परिपूर्ण अभ्यास करायला हवा. हा अभ्यास खडकांचा प्रकार, निर्मिती, कुठे आढळतो, भौगोलिक व वैज्ञानिक वैशिष्टय़े, रचना, आर्थिक महत्त्व या मुद्दय़ांच्या अनुषंगाने करावा.
भौतिक भूगोल
* भौतिक भूगोलामध्ये नकाशावर आधारित किंवा बहुविधानी किंवा जोडय़ा लावणे अशा प्रकारचे संकल्पनात्मक प्रश्न विचारले जातात. यासाठी भूगोलाचा अभ्यास नकाशा समोर ठेवून करायला हवा. नदीप्रणाली, पर्वतप्रणाली, प्राकृतिक विभाग, मान्सूनचे वितरण इत्यादींबाबत भौतिक भूगोलातून प्रश्न विचारले
जाऊ शकतात.
* प्रसिद्ध भूरूपे व वैशिष्टय़पूर्ण भौगोलिक व पर्यावरणीय स्थळे यांचे आकार लक्षात ठेवता आल्यास एखादा बोनस गुण मिळू शकेल. मात्र, यासाठी फार वेळ खर्च करू नये.
* जागतिक भूगोलाचा भाग केवळ पूर्वपरीक्षेत असल्याने फक्त प्रसिद्ध नद्या, पर्वत, प्राकृतिक विभाग इत्यादींचा तक्त्यांच्या रूपात तथ्यात्मक अभ्यास करणे पुरेसे ठरते.
* देशातील पर्वतप्रणालीचा नकाशावरील अभ्यास करतानाच त्यांचे आर्थिक महत्त्व, पर्जन्यनिर्मिती व हवामान इत्यादीमधील महत्त्व या बाबींचाही
अभ्यास आवश्यक आहे. या नदी व पर्वतप्रणालीची उत्तर ते दक्षिण क्रमाने सलगता समजून घ्यायला
हवी.
या सर्व भौगोलिक संकल्पना समजून घेतल्यानंतर पर्यावरणीय भूगोलाच्या संकल्पनांचा अभ्यास करणे सयुक्तिक ठरते व त्यानंतर भौगोलिक चालू घडामोडी समजून घेणे सोपे जाते. याबाबतची अभ्यासाची रणनीती पुढच्या लेखामध्ये जाणून घेऊयात.
रोहिणी शहा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2016 1:45 am

Web Title: mpsc preparation tips
Next Stories
1 करिअरमंत्र
2 फुलब्राईट नेहरू मास्टर्स फेलोशिप
3 शारीरिक शिक्षणविषयक अभ्यासक्रम
Just Now!
X