केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे देशांतर्गत विविध संस्था व महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या एमबीबीएस वा बीडीएस या वैद्यक पदवी अभ्यासक्रमाच्या २०१८ सत्रामध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील पात्रता व प्रवेश चाचणी (पदवीपूर्व) नीट प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत-

आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमातील बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या बायोटेक्नॉलॉजी या विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांच्या गुणांची टक्केवारी ५०% (राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी ४५%) असायला हवी.

वयोमर्यादा – अर्जदारांचे वय २५ वर्षांहून अधिक नसावे.

निवड प्रक्रिया – अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांची प्रवेश पात्रता परीक्षा राष्ट्रीय स्तरावर ६ मे २०१८ रोजी घेण्यात येईल. नीटसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र (बॉटनी व झुऑलॉजी) या विषयातून वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या १८० प्रश्नांची एक प्रश्नपत्रिका असेल व परीक्षेचा कालावधी ३ तासांचा असेल.

अर्जासह भरावयाचे शुल्क – अर्जदारांनी आपल्या अर्जासह प्रवेश शुल्क म्हणून खुल्या वर्गगटातील अर्जदारांनी १००० रु. (राखीव गटातील उमेदवारांनी ७५० रु.) भरणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – ‘नीट’ प्रवेश पात्रता परीक्षेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी (यूजी) २०१८ ची जाहिरात पाहावी अथवा www.cbseneet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मार्च २०१८ आहे. बारावी उत्तीर्ण ज्या पात्रताधारक विद्यार्थ्यांना वैद्यक क्षेत्रात प्रवेश करायचा असेल त्यांनी नीट २०१८ चा लाभ अवश्य घ्यावा.