मित्र कोणाला नको असतात? पण ते कार्यालयातील असतील तर काही गोष्टींचे भान राखायला हवे. कार्यालयातील मैत्री आणि नाती सांभाळताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या, याविषयी..

मनुष्य समाजप्रिय प्राणी आहे. तो एकटा राहूच शकत नाही. जिथे जाईल तिथे तो माणसांशी मैत्री करतोच. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिक्रियेची अपेक्षा करतो. कार्यालयातही तुम्ही पहिल्या दिवशी जाता, पण जागा, माणसे आणि पद्धती सर्वच अनोळखी असते. एकदम गोंधळून जाता तुम्ही. त्याच वेळी कार्यालयातील एक अनोळखी पण आनंदी चेहरा तुमचे स्वागत करतो, ‘‘आज जॉइन होताय ना? मी अमुक अमुक.’’ इथेच सुरुवात होते, कार्यालयात नवीन नाती जोडायला. तुम्हालाही बरं वाटतं, नवीन ठिकाणी कोणीतरी बोलायला मिळालं म्हणून.

घरगुती नाती जन्मामुळे आपोआप मिळतात. सामाजिक रीतीरिवाजाप्रमाणे, काही वेळा मनाविरुद्धही सांभाळावी लागतात. पण कार्यालयातील नवीन मित्र व नात्यांचे तसे नाही. कुणाशी किती मैत्री करायची, वाढवायची हे सर्वस्वी आपल्या हातात असते.

कार्यालयातील नवे मित्र, नवीन नात्यांचे कितीतरी फायदे आहेत –

  • सहकारी मित्रांमुळे कामाचा वेळ हसतखेळत व आनंदात जातो.
  • कामाचा ताण कमी होतो.
  • उत्पादकता व सर्जनशीलता वाढते, नवीन कल्पना मिळतात / सुचतात.
  • तुमचे कामाविषयीचे दृष्टिकोन व तुम्ही सुचवलेले बदल सहकारी मित्र खुल्या दिलाने सहज स्वीकारतात.
  • सहकारी मित्र तुम्हाला त्यांच्या गटात सामील करून घेतात.
  • कार्यपूर्तीसाठी तुमच्याकडे एखादे कौशल्य किंवा वेळ कमी असेल तर मित्रांकडून नि:संकोचपणे मदत मागू शकता. तेही त्यांच्या कार्यकक्षेबाहेर जाऊन मदत करतात.
  • तुमच्या वैयक्तिक उन्नतीसाठी उपयोगी पडू शकतील असे काही जिवाभावाचे मित्रही अशा कार्यालयीन मैत्रीमुळे मिळतात.

इतर कुठल्याही नातेसंबंधाप्रमाणे कार्यालयीन मित्र वा नाती जोडताना पुढील घटकांचा विचार नक्की करा.

  • परस्पर विश्वास : सहकाऱ्यांवर सकारात्मक भावनेने विश्वास टाकायला शिका. ते तुमचे व कंपनीचे हितचिंतक आहेत ही भावना सदैव मनात असू द्या.
  • माणसांचा व त्यांच्यातल्या माणूसपणाचा आदर करा. त्यांचे शिक्षण, अनुभव व नैपुण्याचे कौतुक असू द्या.
  • काहीही बोलायच्या आधी विचार करूनच बोला; नंतर शब्द फिरवू नका.
  • वेगवेगळ्या पाश्र्वभूमीतून आलेल्या सहकाऱ्यांची मतभिन्नता मोकळ्या मनाने स्वीकारा. कारण मतभिन्नता तुमच्या विचारांना एक तर्कशुद्ध पाठबळ देते.
  • पारदर्शी, नि:संदिग्ध व स्पष्ट सुसंवाद साधा. तुम्हाला जे म्हणायचे आहे तेच समोरच्याला कळलेय ना, याची खात्री करून घ्या. तसेच त्यांचे म्हणणेही समजून घ्या.
  • कार्यालयीन मित्र व नाती सर्व स्तरावर हवीत. व्यवस्थापनातील तुमचे वरिष्ठ (अगदी अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालकसुद्धा), तुमचे समस्तरीय सहकारी आणि कनिष्ठ (अगदी ऑफिसमधील शिपाई, ड्रायव्हरदेखील) तुमच्या नवीन मित्रांच्या यादीत हवेत. अर्थात ही मैत्री करताना स्वत:चे, स्वत:च्या स्तराचे भान हवेच हवे. घरगुती नातेसंबंधात जी मर्यादा व पथ्ये आपण पाळतो, तीच येथेही पाळणे आवश्यक आहे. विरुद्धलिंगी सहकाऱ्यांसोबत मैत्री करताना परस्परांच्या वैयक्तिक आयुष्याचा संदर्भ टाळाच.

नवे मित्र जोडण्याच्या क्लृप्त्या

  • सुहास्य मुद्रेने संवाद चालू करा. दररोज थोडा थोडा वेळ संवाद चालू ठेवल्यास एकमेकांच्या स्वभावाचे पैलू कळतात.
  • जेवणाच्या किंवा मधल्या सुट्टीत आणि कार्यालयातील औपचारिक व अनौपचारिक प्रसंगांच्या वेळी आपणहून सहकाऱ्यांच्या ओळखी करून घ्या.
  • ऑफिसमध्ये काम करताना मदत व संदर्भ सतत लागतात. ते नि:संकोचपणे द्या व घ्या.
  • तुमची कौशल्ये वापरा. काम सोपे करण्याची संधी शोधा. स्वत:हून इतरांच्या कामात मदत करा.
  • नम्रपणा, कंपनीचे हित पाहणे, सर्वाविषयी आदर असणे, मृदुभाषी, स्वमर्यादांची जाणीव असलेला, ठामपणे-शांतपणे मते मांडणारा, इतरांच्या मतांची कदर करणारा हे गुण जर तुमच्यात असतील तर तुम्हाला अनेक मित्र मिळतील. अर्थात उत्तम श्रोता असणे, हा गुणधर्मसुद्धा महत्त्वाचा आहेच.

dr.jayant.panse@gmail.com