गेल्या दोन दशकांत इंटरनेटचे तंत्रज्ञान कमालीचे बदलले आहे. या अफाट प्रगतीमुळे समाजजीवनाचे सगळे आयामच बदलले आहेत. काम करायच्या पद्धती, संपर्क साधनांचा वाढता वेग व त्यामुळे व्यक्ती-व्यक्तीमधील परस्पर संबंधांवर होणारा परिणाम याचा आवेग आपण सगळेजणच अनुभवतो आहोत. तंत्रज्ञानाच्या ओघवत्या प्रवाहाला अनुसरण्याच्या नादात आपण स्वत:च वाहून जात नाही ना याचे भान ठेवायला हवे.

इंटरनेटच्या जमान्यात एकेकाळी अप्राप्य असणाऱ्या अनेक गोष्टी एकत्र आल्यात. हातातल्या स्मार्ट मोबाइल हँडसेटमध्ये नुसत्या फोनशिवाय आता फेसबुक, यूटय़ूब, ई-मेल, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम, गेम्स, मायक्रॉसॉफ्ट ऑफिसमधील सर्व प्रोग्राम, मोबाइल अ‍ॅप्स, लिंक्डइन अशा अनेक गोष्टी सामावल्या आहेत. जणू काही एक जादूची पेटीच आपल्याला गवसली आहे. या सगळ्यात गुंतून पडायचा मोह काही आपल्याला आवरता येत नाही.

नोकरी-व्यवसाय करताना इंटरनेटवर सारखी काही ना काही करण्याची चटक महागडी पडू शकते. जर पुढे दिलेल्यापैकी काही किंवा सर्व लक्षणे वागणुकीत दिसायला लागली, तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा वाजते आहे असे समजायला हरकत नाही.

अतिशय कमी कालांतराने नवीन काही पोस्ट, ई-मेल, व्हिडीओ, फोटो आला तर नाही ना यासाठी सतत मोबाइल पाहणे.

तुमचे इंटरनेट कनेक्शन काही काळ चालत नसेल तर भयंकर अस्वस्थ वाटून काम न सुचणे किंवा तुम्ही पाठविलेला व्हिडीओ / छायाचित्र अपलोड न झाल्याने चिडचिड होणे.

स्वत:च्या सर्व उद्योगांबद्दल सतत पोस्ट करणे व त्यांच्याकडून पोचपावती, प्रतिक्रिया किंवा कमीत कमी ‘लाईक’ आले की नाही हे मोबाइलवर सतत तपासणे.

अनोळखी, कुठलीही समान आवड नसलेल्या लोकांचा इंटरनेटवर शोध घेऊन त्यांना निरुद्देश ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ टाकणे.

खऱ्या आयुष्यातील मित्र व कुटुंबीयांबरोबर सुखदु:खाच्या गप्पागोष्टी करण्याऐवजी इंटरनेटच्या आभासी जगातील मित्रांबरोबर आणि कुटुंबीयांबरोबर दिवसातील अनेक तास घालविणे.

कुठल्याही दैनंदिन कार्यक्रमात, अगदी मध्यरात्रीसुद्धा मध्येच जाग आल्यास डोळे उघडल्यावर प्रथम मोबाइल पाहणे.

थोडा जरी वेळ मिळाला तरी मोबाइलवर नवनवीन गेम्स डाउनलोड करून देहभान विसरून खेळणे.

थोडक्यात म्हणजे इंटरनेटच्या आभासी भवतालात हरवून जाणे.

नोकरीच्या पहिल्या वर्षांतच असे इंटरनेटचे व्यसन लागले तर निश्चितच तुमच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. ज्याप्रमाणे एखाद्या नशा करणाऱ्या माणसाचे तारतम्य हरवते आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्य व कार्यालयीन जबाबदाऱ्यांमधील सीमारेषाच नष्ट होते. तसेच काही वेळा या इंटरनेटच्याही व्यसनाचे होते. तुमच्या हाती असलेले कंपनीचे एखादे गुपितही जर अजाणतेपणी इंटरनेटवर पाठवले गेले तर त्याचे परिणाम भयंकर होतात. अशा वेळी त्या कर्मचाऱ्याची नोकरी जाण्यासोबतच त्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊन तुरुंगवास झाल्याचीही उदाहरणे आहेत.

इंटरनेट हे वरदान आहे. त्याचा विधायक वापर केल्यास आपल्या ज्ञानात भर पडतेच शिवाय कार्यालयात आपली प्रगतीही होऊ शकते. त्यासाठी पुढे दिलेल्या बाबी लक्षात ठेवायला हव्यात.

कार्यालयीन वेळेत सुट्टीव्यतिरिक्त कधीही मोबाइल फोन किंवा संगणकाचा वापर वैयक्तिक कामासाठी करू नका.

इंटरनेटच्या साहाय्याने चालणाऱ्या विविध अ‍ॅप्लिकेशन्समुळे दूरच्या माणसांबरोबरचा संवाद आता क्षणार्धात होऊ  शकतो. मग तो चॅटिंगमुळे असो किंवा ई-मेलव्दारा असो. कमीत कमी पण अर्थवाही शब्दात आपले म्हणणे मांडायच्या पद्धतीवर प्रभुत्व मिळवा.

बातमी, छायाचित्रे किंवा व्हिडीओ पाठविताना कुणाला, कुठल्या समूहावर व का पाठवितो याचा विचार करा. चुकीच्या व्यक्तींना असे संदेश गेले आणि त्यांच्या भावना दुखावल्या तर सध्याच्या सायबर कायद्याप्रमाणे तुमच्यावर फौजदारी कारवाई होऊ  शकते.

पुढे पाठविलेले (forwarded) संदेश दर्जाहीन असतील तर वाचणाऱ्याच्या मनात तुमच्याबद्दल चांगली प्रतिमा निर्माण होत नाही.

यापेक्षा तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी इंटरनेटचा वापर संशोधन, शिक्षण, तांत्रिक विषयाबद्दल अद्ययावत राहणे, आवडीचे मनोरंजन, ऑन-लाइन बुकिंग व पेमेंट, खरेदी, लेखनाची आवड असल्यास ब्लॉग लिहिणे, नवीन ग्राहक व स्पर्धक शोधणे, तुमच्या क्षेत्रातील वरिष्ठांचा सल्ला घेणे आणि नवीन नोकरी शोधणे अशा अनेक विधायक कामासाठी होऊ  शकतो. याद्वारे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये भरघोस प्रगती करू शकता.

dr.jayant.panse@gmail.com