05 March 2021

News Flash

देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : समाजसेवेसाठी पाठय़वृत्ती

२०१७ च्या शटलवर्थ पाठय़वृत्ती कार्यक्रमासाठी पात्र अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

समाजात घडणाऱ्या विविध नकारात्मक घटना अनेकांच्या मनाला  एक प्रकारचे नराश्य देतात. पण काहीजण मात्र अशा घटना होऊ नयेत यासाठी विधायक काम करण्याची प्रेरणा यातून घेतात. या लोकांना बरेचदा मार्गदर्शनाचा किंवा आíथक स्रोतांचा, राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा अभाव जाणवतो. ज्यामुळे त्यांच्या कार्यात अडथळे येतात अथवा ते कार्य मर्यादित होते. सामाजिक बदलांशी स्वत:ला जोडून घेऊ पाहणाऱ्या अशा अनेकांना त्यांची भविष्यातील वाटचाल अखंड राहावी यासाठी शटलवर्थ फाउंडेशन एक वर्षांची पाठय़वृत्ती बहाल करत आहे. २०१७ च्या शटलवर्थ पाठय़वृत्ती कार्यक्रमासाठी पात्र अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

पाठय़वृत्तीविषयी

दक्षिण आफ्रिकेतील शटलवर्थ फाउंडेशनची स्थापना २००१ साली द. आफ्रिकन उद्योजक मार्क शटलवर्थ यांनी केली. त्यांचा हेतू होता, आपल्या नावीन्यपूर्ण कल्पनांची अंमलबजावणी करून राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर काहीतरी विधायक सामाजिक बदल करू इच्छिणाऱ्या चेंजमेकर्सना आíथक पाठबळ मिळावे. ही आíथक मदत या भविष्यातील परिवर्तनकारांना ‘शटलवर्थ पाठय़वृत्ती कार्यक्रम’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाठय़वृत्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली जाते. ज्ञान, शिक्षण व तंत्रज्ञान या तिन्हींना जोडणाऱ्या धाग्याशी संबंधित अपवादात्मक कल्पनांमध्ये फाउंडेशनला अधिक रस आहे. संस्थेचे कार्यालय दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे आहे. शटलवर्थ फाउंडेशनकडून सामाजिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांसाठी किंवा करू इच्छिणाऱ्यांसाठी दरवर्षी शटलवर्थ पाठय़वृत्ती कार्यक्रम राबवला जातो. या पाठय़वृत्तीच्या माध्यमातून निवड झालेल्या प्रत्येक पाठय़वृत्तीधारकाच्या प्रकल्पासाठी फाउंडेशनकडून जवळपास अडीच लाख डॉलर्स एवढी रक्कम दिली जाते. सहकार्याच्या तत्त्वावर चालणारी प्रकल्पातील गुंतवणूक हे या पाठय़वृत्ती कार्यक्रमाचे वैशिष्टय़ं आहे. म्हणजे पाठय़वृत्तीधारकाला बहाल केल्या गेल्या रकमेतील त्याने गुंतवलेल्या प्रत्येकी एका डॉलरला फाउंडेशनकडून अतिरिक्त दहा डॉलर्स त्या प्रकल्पात गुंतवले जातात. या पाठय़वृत्तीअंतर्गत पाठय़वृत्तीधारकाला मासिक वेतन, अनुदानित रक्कम व प्रवास भत्ता यांसारख्या सुविधा देण्यात येतील. पाठय़वृत्तीचा कालावधी एक वर्षांचा असून पाठय़वृत्ती अभ्यासक्रमाची सुरुवात मार्च २०१७च्या दरम्यान होईल. पाठय़वृत्तीधारक त्याचा अभ्यासक्रम कुठेही अगदी त्याच्या देशात राहूनही पूर्ण करू शकतो. मात्र पाठय़वृत्तीदरम्यान तो त्याच्या आवश्यकतेनुसार कधीही शटलवर्थ फाउंडेशनच्या कार्यालयास भेट देऊ शकतो.

अर्ज प्रक्रिया

या पाठय़वृत्तीच्या अर्जप्रक्रियेसाठी आवश्यक माहिती व ऑनलाइन अर्ज प्रक्रिया फाउंडेशनने त्यांच्या वेबसाइटवर स्वतंत्रपणे उपलब्ध करून दिलेली आहे. अर्जदाराने त्याप्रमाणे ऑनलाइन अर्ज पूर्ण करून यादीमध्ये दिलेल्या सर्व कागदपत्रांच्या सॉफ्ट प्रतींसह जमा करावा. अर्जदाराने अर्ज इमेल करू नये. अर्जामध्ये अर्जदाराला काही निबंधवजा प्रश्नांची उत्तरे लिहावयाची आहेत. यातील  प्रत्येक उत्तरासाठी कमाल १५०० शब्दांची मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. याबरोबरच अर्जदाराला अर्जासह सामाजिक किंवा तत्सम क्षेत्रात केलेल्या कार्याचा किंवा या पाठय़वृत्तीसाठी तो सादर करू इच्छित असलेल्या प्रकल्पाचा पाच मिनिटांची एक लघु चित्रफीत बनवून पाठवणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त अर्जासह अर्जदाराने त्याचे एसओपी, सीव्ही, शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती, कार्यानुभवाचे प्रशस्तीपत्र प्रकल्प अहवाल इत्यादी गोष्टी जोडाव्यात. अर्जदारांनी अर्जाबरोबर कोणतीही हार्ड कॉपी पाठवू नये. तसेच अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

निवड प्रक्रिया

अर्जदाराच्या प्रकल्पाची कल्पना नावीन्यपूर्ण असावी. त्याची स्वत:च्या कल्पनेशी असलेली बांधीलकी व प्रामाणिकपणा त्याच्या अर्जातून व लघु चित्रफितीतून दिसावा. अर्जदाराच्या कल्पनेवर इतर कुणाचा असो किंवा नसो पण त्याचा स्वतचा दुर्दम्य विश्वास असावा, या शब्दांत फाउंडेशनने निवडीचा निकष त्यांच्या वेबसाइटवर नोंदवलेला आहे. यावरून कल्पनेच्या अभिनवतेची गरज स्पष्ट होते.

अंतिम मुदत

या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १ ऑक्टोबर २०१६ आहे.

आवश्यक अर्हता

शटलवर्थ पाठय़वृत्ती कार्यक्रम हा सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुला आहे. अर्जदारास कोणत्याही शैक्षणिक पात्रतेचे बंधन फाउंडेशनने घातलेले नाही. अर्जदाराचा सामाजिक किंवा तत्सम क्षेत्रात केलेल्या कार्याचा किंवा या पाठय़वृत्तीसाठी तो सादर करू इच्छित असलेल्या प्रकल्पाची पाच मिनिटांची एक लघु चित्रफीत बनवून पाठवणे, हा एक महत्त्वाचा निकष निवडीकरता फाउंडेशनने ठरवलेला आहे. अर्जदाराने परदेशी विद्यापीठांच्या प्रवेशप्रक्रियेसारखी कोणतीही परीक्षा (जीआरई, जीमॅट,आयईएलटीएस किंवा टोफेल इत्यादी)उत्तीर्ण असावे अशी कोणतीही अट या पाठय़वृत्तीसाठी नाही. मात्र, अर्जदाराचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. या पाठय़वृत्तीसाठी फाउंडेशनने याव्यतिरिक्त कोणतीही किमान आवश्यक अर्हता नमूद केलेली नाही. मात्र अर्जदाराचा सीव्ही अतिशय उत्तम असावा. त्याच्याकडे सामाजिक क्षेत्रातील कार्याचा अनुभव असणे इत्यादी बाबी त्याला अंतिम निवड प्रक्रियेमध्ये निश्चितच प्राधान्यक्रम मिळवून देऊ शकतात.

महत्त्वाचा दुवा

https://www.shuttleworthfoundation.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2016 12:34 am

Web Title: social services studies
Next Stories
1 दुग्ध तंत्रज्ञानातील संधी
2 नोकरीची संधी
3 यूपीएससीची तयारी : सुख म्हणजे नक्की काय असते?
Just Now!
X