विद्यार्थीहो, आपण गेल्या सुमारे वर्षभरात यूपीएससी पूर्वपरीक्षेपासून ते मुलाखतीपर्यंतच्या शेवटच्या टप्प्याची तयारी कशी करावी याविषयी सविस्तर चर्चा केली. आज प्रस्तुत लेखमालेचा शेवट करताना एका बाजूला विविध क्षमतांची उजळणी तर दुसऱ्या बाजूला या परीक्षेसाठी आवश्यक मानसिकतेविषयी जाणून घेणार आहोत.

एकतर या परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला आपण प्रशासकीय/नागरी सेवा करिअर म्हणून का निवडत आहोत याबाबत स्पष्टता हवी. याचा विचार करता विविध पदावर कार्यरत अधिकारी, त्यांचा अनुभव, नुकतेच यशस्वी ठरलेले विद्यार्थी, मार्गदर्शक यांच्याशी चर्चा करणे अत्यावश्यक ठरते.

त्याचप्रमाणे या परीक्षेचा अभ्यासक्रम, स्वरूप, विविध टप्पे लक्षात घेता या परीक्षांची तयारी जाता जाता ‘टाइमपास’ म्हणून करता येत नाही. कारण या परीक्षेची व्याप्ती आणि स्पर्धा पाहता जाता जाता केलेली तयारी पुरेशी ठरणार नाही हे नक्की! म्हणूनच या परीक्षेची तयारी ही एक गंभीर बाब आहे. त्यासाठी किमान वर्षभर दररोज सुमारे १० तास अभ्यास अत्यावश्यक ठरतो. त्यानंतर मात्र तुम्ही नोकरी सांभाळत या परीक्षेची तयारी करू शकता. थोडक्यात पर्याप्त काळासाठी पूर्ण वेळ करावयाची बाब म्हणूनच या स्पर्धा परीक्षांकडे पाहणे जरुरीचे आहे.

यूपीएससीचे स्वरूप, विविध टप्पे आणि व्यापक अभ्यासक्रम यामुळे नियोजनाची आखणी आणि महत्त्वाचे म्हणजे त्याची योग्य अंमलबजावणी हा घटक या परीक्षेत मध्यवर्ती ठरतो. म्हणूनच आपण या परीक्षेतील कोणत्या टप्प्याचा केव्हा व किती काळ अभ्यास करणार आहोत, अभ्यासक्रमातील कोणत्या घटकाचा अभ्यास करणार आहोत याचे १ वर्ष, ६ महिने, ३ महिने, १५ दिवस, १ आठवडा, १ दिवस व तासांचे असे सखोल व सविस्तर नियोजन करावे. या वेळापत्रकाची आणि नियोजनाची ठरल्याप्रमाणेच अंमलबजावणी व्हावी यावर कटाक्ष ठेवावा. कधीकधी नियोजनात काही बदल करावे लागतात, तेव्हा त्यामध्ये लवचीकताही राखायला हवी. त्यादृष्टीने प्रत्येक विद्यार्थ्यांने वेळेचे भान ठेवणे अगत्याचे ठरते. एकूणच विद्यार्थ्यांला एक नियोजनबद्ध प्रक्रियाच हाती घ्यावी लागते. सभोवताली वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभने असतात. त्या सर्वाचा त्याग करून विद्यार्थ्यांला अत्यंत निर्धारपूर्वक अभ्यास व वेळेचे नियोजन अमलात आणावे लागते.

यूपीएससी परीक्षेच्या तयारीतील एक कळीची बाब म्हणजे ‘अभ्यासातील सातत्य’. काही दिवस भरपूर अभ्यास, त्यानंतर खंड अशी मानसिकता उपयोगाची नाही. वेळेचा आलेख हा संतुलितच हवा. हे सातत्य टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांची जिद्द व चिकाटीच कामी येते. सातत्यपूर्ण व चिकाटीने अभ्यास करून अभ्यास व वेळेचे नियोजन काटेकोरपणे पाळल्यासच या परीक्षेत अनन्यसाधारण ठरणारा ‘आत्मविश्वास’ विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतो. विद्यार्थ्यांत आत्मविश्वास नसेल तर चांगला अभ्यासदेखील अपुरा ठरतो. या उलट आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक विद्यार्थी कठीण परिस्थितीतून सहीसलामत यशस्वीपणे बाहेर पडू शकतात. म्हणून अभ्यासाला आत्मविश्वासाची जोड ही हवीच.

यूपीएससीची परीक्षा अनेक टप्प्यांची आहे. त्यात अनेक अभ्यासघटक आहेत. त्यातही चालू घडामोडीचा भाग महत्त्वाचा. त्यामुळे एखादी बाब परीक्षेच्या कोणत्या टप्प्यासाठी (पूर्व, मुख्य वा मुलाखत) तयार करत आहोत याचे भान हवे. त्यामुळे परीक्षेच्या स्वरूपानुरूप अभ्यासाला दिशा द्यावी लागते. वर्तमानपत्रे, मासिके वाचत असताना एखादे लेखन सामान्य अध्ययन, वैकल्पिक विषय, निबंध अथवा मुलाखत यापकी कोणकोणत्या बाबींसाठी उपयुक्त ठरेल याचा सतत विचार करायला हवा. म्हणजेच विद्यार्थ्यांचा अभ्यास हा योग्य दिशेने व नेमकेपणाने होत आहे असे म्हणता येते. त्यादृष्टीने वेळोवेळी सराव चाचण्या देणे अत्यावश्यक ठरते. त्यातून स्वतच्या तयारीचा दर्जा, पातळी तपासता येते. स्वत:च्या उणिवा शोधून त्यावर मात करता येते. म्हणजेच विद्यार्थ्यांने स्वत:च्या तयारीकडे सजगपणे पाहून त्याचे वेळोवेळी मूल्यांकन करण्यावर भर द्यावा. थोडक्यात सतत सुधारणा व उत्तम तयारी कशी करता येईल याचा ध्यास हवा.

यूपीएससी परीक्षेद्वारा प्रशासक निवडले जातात. या प्रशासकांना निरनिराळ्या प्रकारच्या समस्या हाताळाव्या लागतात. स्वाभाविकच त्यांच्याकडे निर्णयक्षमता ही असलीच पाहिजे. एखाद्या समस्येकडे सर्वागीण पद्धतीने पाहून त्याविषयी समन्यायी, संतुलित निर्णय घ्यावा अशी अपेक्षा असते.

यूपीएससीची मुख्यपरीक्षा व मुलाखतीत विद्यार्थ्यांच्या नेमक्या याच क्षमतेची व कौशल्याची चाचपणी केली जाते. म्हणजे विद्यार्थ्यांला सभोवताली काय चालले आहे याचे भान तर हवेच, मात्र त्याविषयी स्वत:चा एक व्यापक, समन्यायी दृष्टिकोनही हवा. म्हणूनच संपूर्ण परीक्षेच्या तयारीत बंदिस्त पद्धतीने अभ्यास न करता आपली विचारशक्ती सतत सजग व विकसित होत जावी याची काळजी घेणे गरजेचे ठरते. मुख्य परीक्षेतील ‘मत अजमावणारे प्रश्न’, निबंधाचा स्वतंत्र पेपर आणि ‘व्यक्तिमत्त्व चाचणी’ या टप्प्यात ही क्षमता निर्णायक ठरते.

यूपीएससीसारख्या स्पर्धात्मक परीक्षेत पहिल्या प्रयत्नातच यश मिळेल याची खात्री नसते. त्यामुळे दुसऱ्यांदा कधी कधी तिसऱ्या-चौथ्यांदा परीक्षा द्यावी लागते. आपल्या नातेवाईकांच्या, मित्रमंडळीच्या अपेक्षांमुळे आणखीनच दडपण येते. इतर मित्र यात यशस्वी होताना स्वतला मात्र अपयश पदरी आल्याने निराशाजनक विचारही मनात येतात. अशा वेळी अपयशाने खचून न जाता त्याची योग्य ती कारणमीमांसा करणेच उपयुक्त ठरते. म्हणूनच सहनशीलता, उच्च मनोधर्य व ‘संयम’ ही गुणवैशिष्टय़ेच विद्यार्थ्यांच्या मदतीस धावून येतात. उपरोक्त क्षमतांचा विकास करून ती आपल्या व्यक्तिमत्त्वात रुजवणारी कणखर व दृढनिश्चयी मानसिकताच विद्यार्थ्यांना या परीक्षेत अत्यंत उपयुक्त ठरते, असे म्हणता येईल.