News Flash

यूपीएससीची तयारी : प्रभावी निबंध कसा लिहावा?

‘निबंधात काय लिहावे?’ या प्रश्नाचे उत्तर सखोल वाचनात व ताíकक विचारात दडलेले आहे.

महान व्यक्तींचे सुविचार व त्याच्या अवतीभवती लिखाण या सगळ्यातून आपली वैयक्तिक मते व विचार झाकोळले जातात याचे उमेदवाराने कायम भान ठेवणे आवश्यक आहे. निबंध हा विशेष लेखन प्रकार आहे हे लक्षात ठेवले पाहिजे आणि म्हणूनच निबंधासाठी लेखनाचा सातत्याने सराव केला पाहिजे. हे केवळ निबंधाच्या पेपर करता लागू नसून मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनाच्या इतर सर्वच पेपरसाठी लागू आहे. म्हणूनच योग्य शब्दमर्यादेत व कालमर्यादेत लिखाणाचा नियमित सराव करावा. बऱ्याच वेळा विद्यार्थी वाचनावर व वाचलेले लक्षात ठेवण्यावर बहुतेक वेळ खर्च करतात. परंतु लिखाणदेखील अभ्यासाचा नियमित भाग बनले पाहिजे. एकूण अभ्यासाचा साधारण ३०% वेळ लिखाणासाठी राखून ठेवला पाहिजे. तसेच या लिखाणामध्ये विचारपूर्वक केलेल्या, सर्जनशील लिखाणाचादेखील समावेश असावा. तयारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात निबंधाची शब्द संख्या मर्यादित असू शकते. अगदी सुरुवातीला २०० शब्द, नंतर ६०० शब्द आणि त्यानंतर १००० ते १२०० शब्द लिहिण्याचा सराव करावा. लिखाण सुवाच्य अक्षरात, कागदाच्या एकाच बाजूला आणि पुरेसा समास सोडून करावे. अशाप्रकारे केलेले लिखाण शिक्षकांकडून, जाणकारांकडून अथवा स्वत: तपासावे. लिखाणातील आवश्यक सुधारणा कोणत्या हे लक्षात घेऊन योग्य ते बदल करावेत. अशा सरावामधून लिखाणाचा वेग, शैली, अर्थपूर्ण शब्दांचा लिखाणातील समावेश व अचूक मजकूर मांडण्याची कौशल्ये विकसित होतात. या सर्वातून निबंध लेखनावर सकारात्मक प्रभाव पडतो. दिलेल्या शब्दमर्यादेत अर्थपूर्ण लिखाण करणे सरावानेच जमते. या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केल्यास आपल्या अंगी क्षमता व प्रतिभा असली तरीदेखील मोठा फटका बसू शकतो. शब्दमर्यादेपेक्षा निबंधाची गुणवत्ता अर्थातच प्राधान्याची आहे. पण तरीही शब्दमर्यादेचे भान सरावाने येणे गरजेचे आहे.

‘निबंधात काय लिहावे?’ या प्रश्नाचे उत्तर सखोल वाचनात व ताíकक विचारात दडलेले आहे. सामान्य अध्ययनाच्या इतर पेपरपेक्षा हा पेपर वेगळा ठरतो कारण याकरता कोणताही ठरावीक अभ्यासक्रम निश्चित केलेला नाही. तसेच निबंधाचे कोणते विषय येऊ शकतील याचा तंतोतंत अंदाज कुणीही वर्तवू शकत नाही. परंतु देशभरातील तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील नुकत्याच घडून गेलेल्या घटनांवरून अपेक्षित निबंध विषयांचा साधारण अंदाज येऊ शकतो. याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय वर्तुळातील घडामोडीदेखील यादृष्टीने महत्त्वाच्या ठरतात. वरील सर्व बाबी लक्षात घेऊन आपल्याला प्रगल्भ लिखाणाचा सराव करावयाचा आहे. निबंधाच्या विषयांचे वैविध्य व भिन्न दृष्टिकोन पाहता चौफेर वाचन असणे आवश्यक आहे. मात्र बाजारात निबंधलेखनासाठी उपलब्ध असणारी पुस्तके याकरता विशेष उपयोगी ठरत नाहीत. प्रभावी निबंधलेखनासाठी उत्तमोत्तम पुस्तके, लेख वाचणे, रेडिओ व टीव्हीवरील दर्जेदार चर्चा ऐकणे ही प्राथमिक गरज आहे. एकाच मुद्याचे अवलोकन विविध दृष्टिकोनातून केले जाऊ शकते. अनेक विद्यार्थी निबंधाच्या विषयाकडे केवळ दोनच दृष्टिकोनातून पाहू शकतात. परंतु कोणत्याही विषयाला अर्थाचे अनेक कंगोरे असतात आणि म्हणूनच उमेदवारांनी स्वत:ला मर्यादित दृष्टिकोनांमध्ये अडकवून ठेवू नये. परंतु याचा अर्थ असा नाही की दिलेल्या विषयावर अनेक दृष्टिकोनातून वरवरचे लिखाण केले जावे. प्रत्येकाने एक ठरावीक दृष्टिकोन, त्यातून निर्माण होणाऱ्या भूमिका यांचा समतोल साधत स्वत:चा ठसा असणारे लिखाण करणे अपेक्षित आहे.

अनेक वेळा निबंधाच्या विषयासंदर्भातील काही मुद्दे आपल्याला पटत नसतात. परंतु आपले लिखाण ‘योग्य’ व ‘तटस्थ’ असावे या हट्टापायी आपण त्या मुद्यांचेदेखील समर्थन करतो. यामुळे लिखाणात कच्चे दुवे तयार होतात आणि असे लिखाण निबंध तपासणारी व्यक्ती लगेचच ओळखू शकते. म्हणूनच जे आपल्याला पटत नाही ते पटवून देण्याचा अनाठायी प्रयत्न करू नये. याचबरोबर जे मुद्दे आपण पटवून देत आहोत ते नीति नियमांना, सांविधानिक विचारप्रणालीला व तर्काला धरून असावेत. कोणत्याही निबंधासाठी लिखाणाची शैली व भाषा हे महत्त्वाचे घटक आहेत. प्रत्येकाने आपली स्वतंत्र लेखन शैली विकसित केली पाहिजे. लिखाण सुटसुटीत, अर्थवाही आणि मुद्देसूद असावे. हे लिखाण विचारपूर्वक व ठाम असावे. मात्र ठामपणे मते मांडत असताना त्यात उद्धटपणा नसावा. निबंधामधून ठामपणे व्यक्त केलेल्या मतांचे व विश्लेषणाचे जाळे असावे. आक्रमक अथवा अलंकारिक भाषा वापरून वाचणाऱ्यावर प्रभाव पडतोच असे नाही. तसेच अशी भाषा वापरल्याने चांगले गुण मिळतात हा समजदेखील चुकीचा आहे. निबंधाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ठरावीक लयीत लिखाण होणे अपेक्षित आहे. भावनांच्या आहारी जाऊन केलेले लिखाण अथवा केवळ माहितीची जंत्री असणारे लिखाण टाळावे. अर्थपूर्ण व प्रभावी निबंध लिहिण्याची प्रक्रिया अनेक वेळा थकवा आणणारी किंवा कंटाळवाणी असू शकते. मात्र कोणत्याही प्रकारच्या अभ्यासपूर्ण लिखाणाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असे वाटणे साहजिक आहे. त्यामुळे खचून न जाता सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 4:45 am

Web Title: upsc preparation 4
Next Stories
1 तुलना नकोच!
2 वेगळय़ा वाटा : मॉडेलिंगच्या विश्वात..
3 करिअरनीती : हुन्नर
Just Now!
X