आजच्या लेखामध्ये आपण भारतीय चित्रकला, साहित्य, नाटय़ आणि संगीत या भारतीय वारसा आणि संस्कृतीमधील घटकांतर्गत येणाऱ्या मुद्दय़ांचा परीक्षाभिमुख आढावा घेणार आहोत. भारतातील सांस्कृतिक इतिहासाची सुरुवात आपणाला सिंधू संस्कृतीपासून अभ्यासावी लागते. काही वेळा हे प्रश्न प्रागतिहासिक इतिहासाशी संबंधितही विचारले जातात. पण हे प्रश्न त्यापुढील काळातील घटनांना जोडून विचारले जातात, अर्थात याचे स्वरूप हे तुलनात्मक पद्धतीचे असते. उदा. २०१५च्या मुख्य परीक्षेमध्ये ‘आधुनिक चित्रकलेच्या तुलनेत भारतातील मध्याश्मयुग शिल्प स्थापत्य हे फक्त त्या वेळेचे सांस्कृतिक जीवनच दर्शवीत नसून त्यामधील सुरेख सौंदर्यसुद्धा दर्शविते, या भाष्याचे चिकित्सक मूल्यमापन करा,’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नांचे व्यवस्थित आकलन केल्यास असे लक्षात येते की मध्याश्मयुगातील कलेचा आपणाला सर्वप्रथम आढावा घ्यावा लागतो. या काळातील मानवाने नैसर्गिक गुहामध्ये चित्रकला केलेली आहे व या चित्रकलेच्या माध्यमातून तत्कालीन सांस्कृतिक जीवनाचे रेखाटन केलेले आहे व याचे सद्य:स्थितीत पुरावे उपलब्ध आहेत. या चित्रकलेशी संबंधित वैशिष्टय़े व यातील सुरेखपणा कशा पद्धतीचा आहे यासारख्या पलूचा एकत्रित विचार करून, याची तुलना आधुनिक चित्रकलेशी करून आधुनिक चित्रकलेचीही वैशिष्टय़े नमूद करावी लागतात. या सर्व बाबींचा विचार करून या दोन्ही कालखंडाचे चिकित्सात्मक पद्धतीने मूल्यमापन करून कसे मध्याश्मयुगीन शिल्प स्थापत्य तत्कालीन सांस्कृतिक जीवनाचा इतिहासाव्यतिरिक्त त्यामधील एक सौंदर्यपण दर्शविते याचे उदाहरणासह विश्लेषण द्यावे लागते. अशा पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.

२०१३मधील मुख्य परीक्षेत ‘सुरुवातीच्या भारतीय शिलालेखामध्ये नोंद करण्यात आलेल्या ‘तांडव’ नृत्याची चर्चा करा,’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. हा प्रश्न संकीर्ण माहितीबरोबरच तांडव नृत्याची माहिती या दोन बाबींचा विचार करून विचारण्यात आलेला होता. भारतीय नृत्य आणि नाटय़ याचा अभ्यास आपणाला प्राचीन भारताच्या सांस्कृतिक इतिहासापासून करावा लगातो, कारण या कलांचा उदय आणि विकास हा प्राचीन कालखंडापासून सुरू झालेला आहे आणि या कलांची माहिती आपणाला शिलालेख, स्थापत्यकला, लेणी, मंदिरे यांसारख्या वास्तूमधूनही मिळते व याचे साहित्यक उल्लेखही आपणाला अभ्यासावे लागतात. या प्रश्नाचे स्वरूप तसे वस्तुनिष्ठ प्रकारात मोडणारे आहे आणि ज्या वेळेस आपण या प्रश्नाचे उत्तर लिहितो त्या वेळेस शिलालेखाचा उल्लेख करूनच तांडव नृत्याची चर्चा करावी लागते आणि याची मूलभूत वैशिष्टय़ेही नमूद करावी लागतात. उदा. हा नाटय़प्रकार कोणता आहे, यामध्ये नेमके कोणते भाव मुद्रित आहेत व याचे सादरीकरण नेमके कसे होते इत्यादी बाबींचा उल्लेख करूनच शिलालेखीय पुरावे देऊन चर्चा करावी लागते.

२०१५च्या परीक्षेत ‘भारतीय उपखंडातील प्राचीन संस्कृती ही त्या काळातील इजिप्त, मेसोपोटोमिया आणि ग्रीक संस्कृतींपेक्षा भिन्न होती. तिने संस्कृती आणि परंपराचे जतन सद्य:स्थितीपर्यंत अखंडितपणे केलेले दिसून येते, ‘भाष्य करा,’ अशा आशयाचा प्रश्न विचारलेला होता. सर्वप्रथम या प्रश्नाचे योग्य आकलन करून घ्यावे लागेल. त्यासाठी प्रश्नामध्ये नमूद संस्कृती व त्यांची वैशिष्टय़े आणि याच्या जोडीला प्राचीन भारतीय संस्कृतीची वैशिष्टय़े यांची थोडक्यात तुलनात्मक पद्धतीने चर्चा करावी लागेल. मग नेमक्या कोणत्या वैशिष्टय़ामुळे प्राचीन भारतीय संस्कृती तत्कालीन संस्कृतींपेक्षा वेगळी होती व नेमक्या कोणत्या परंपरांचे जतन सद्यस्थितीमध्ये पाहावयास मिळते अशा सर्व कारणांचा एकत्रित विचार करून या प्रश्नांचे आकलन करणे अपेक्षित होते. थोडक्यात विषयाची र्सवकष समज आणि संबंधित मुद्दे याची सखोल माहिती असल्याखेरीज या प्रश्नाचे उत्तर लिहिता येत नाही.

२०१६मधील परीक्षेत ‘विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय हा फक्त एक कुशल विद्वानच होता असे नाही, हा विद्या आणि साहित्याचाही आश्रयदाता होता. – चर्चा करा’ असा प्रश्न विचारलेला होता. हा प्रश्न एका व्यक्तीच्या कार्याशी संबंधित आहे. या प्रश्नाचे योग्य पद्धतीने उत्तर लिहिण्यासाठी राजा कृष्णदेवराय याचे सांस्कृतिक योगदान नेमके काय होते याची माहिती सर्वप्रथम असणे गरजेचे आहे व तो एक कुशल विद्वान कसा होता आणि याने विद्या आणि साहित्यवाढीसाठी कशा पद्धतीने विद्वानांना राजाश्रय दिलेला होता या सर्वाचा एकत्रित संदर्भ देऊन चर्चात्मक पद्धतीने उत्तर लिहिणे अपेक्षित असते.

वरील प्रश्नाव्यतिरिक्त संगम साहित्य, तक्षशिला विद्यापीठ यांसारख्या साहित्यिक आणि विद्या ज्ञानार्जन घटकाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. या घटकामधील इतर विषय उदा. संगीत, उत्सव, मध्ययुगीन भारतातील या कलांवर अजूनही प्रश्न विचारले गेलेले नाहीत, पण  २०१४च्या परीक्षेत मध्ययुगीन काळातील सुफी चळवळीवर प्रश्न विचारण्यात आलेला होता.

या घटकाची तयारी करताना प्राचीन भारतीय संस्कृती ते आधुनिक भारतीय संस्कृतीपर्यंतची सांस्कृतिक इतिहासाची एक व्यापक समज असणे गरजेचे आहे. हा घटक परीक्षेच्या दृष्टीने तयार करताना सर्वप्रथम या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासावी लागते, ज्यासाठी आपणाला एनसीईआरटीच्या पुस्तकाचा आधार घेता येतो. याच्यानंतर या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी बाजारामध्ये अनेक संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत, ज्यामध्ये द वंडर दॅट वॉज इंडिया – ए. एल. बाशम तसेच भारतीय इतिहासाशी संबंधित संदर्भग्रंथ उदा. आर्ली इंडिया, रोमिला थापर, प्राचीन आणि मध्ययुगीन भारत – उपेंद्र सिंग, मध्ययुगीन भारत-भाग-३-जे. एल मेहता. इत्यादी पुस्तकातील भारतीय संस्कृती संबंधित प्रकरणे,  ठकडर चे भारतीय वारसा आणि संस्कृतीसंबंधित अभ्यास साहित्य इत्यादीचा वापर करणे उपयुक्त ठरते. यापुढील लेखामध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास या घटकाची चर्चा करणार आहोत.