भारतीय इतिहासाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक पलूंचा अभ्यास कशा प्रकारे करावा याबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर राजकीय इतिहासाचा अभ्यास कसा करावा याबाबत चर्चा करण्यात येत आहे.

भारतीय राष्ट्रवादाचा उदय

* काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या राजकीय संस्था, ग्रामीण भारतातील उठाव यांचा आढावा टेबलमध्ये घेता येईल.

* भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या दोन (मवाळ व जहाल) कालखंडांतील स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे करता येईल.

* स्थापनेची सामाजिक, राजकीय, आर्थिक पाश्र्वभूमी व त्याबाबतचे सिद्धांत

* दोन्ही कालखंडांतील नेत्यांच्या मागण्या दोन कॉलममध्ये तौलनिक पद्धतीने

* दोन्ही कालखंडांतील महत्त्वाचे नेते व त्यांचे वैशिष्टय़पूर्ण कार्य

* दोन्ही कालखंडांतील यशापयश, ब्रिटिशांची प्रतिक्रिया

* सुरत विभाजन, होमरूल आंदोलन, लखनौ करार, सांप्रदायिकतेचा उदय

* क्रांतिकारी विचार आणि चळावळींचा उदय हा मुद्दा उदयाची पाश्र्वभूमी, स्वरूप, कार्ये, ठळक विचार, घडामोडी, महत्त्वाचे नेते व त्यांचे योगदान, भारताबाहेरील कार्ये आणि त्याचे सरूप, महिलांचा सहभाग, वृत्तपत्रे, साहित्य, खटले अशा मुद्दय़ांच्या आधारे करावा.

गांधीयुग

* गांधीयुगातील असहकार, सविनय कायदेभंग, चलेजाव इ. चळवळी अभ्यासताना त्यातील संघर्षांचे स्वरूप व त्यामागील विचारसरणी समजून घेऊन मग महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास करणे उपयुक्त ठरेल. या प्रत्येक आंदोलनानंतर ब्रिटिशांच्या प्रतिक्रिया, भारतीयांना देऊ करण्यात आलेल्या बाबी, समकालीन भारतीय नेत्यांच्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया व यशापयश या गोष्टी अभ्यासणे आवश्यक आहे. या चळवळींचा भाग म्हणून किंवा त्यांना समांतरपणे सुरू झालेले वैशिष्टय़पूर्ण संघर्ष (झेंडा सत्याग्रह, जातीय सरकार इ.) यांचा अभ्यास बारकाईने करावा.

* गांधीजींच्या कालखंडातील महिलांचा स्वातंत्र्यसंग्रामातील सहभाग तसेच स्त्रीवादी चळवळी यांचा अभ्यास वस्तुनिष्ठ पद्धतीने टेबल फॉरमॉटमध्ये करता येईल. याच कालखंडातील शेतकरी, आदीवासी बंडे आणि कामगार चळवळी यांचा अभ्यास त्यांचे स्वरूप, पाश्र्वभूमी, कारणे, महत्त्वाचे नेते, परिणाम, यशापयशाची कारणे, फलनिष्पत्ती या मुद्यांच्या आधारे करावा.

* याच काळात वाढलेली सांप्रदायिकता, त्याची कारणे, स्वरूप, परिणाम आणि इतर राजकीय पक्षांची वाटचाल अभ्यासणे अत्यंत आवश्यक आहे. काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशने, ठराव, साल, ठिकाण व अध्यक्ष अशा मुद्दय़ांच्या आधारे टेबलमध्ये अभ्यासता येतील.

* सामाजिक इतिहासामध्ये अभ्यासलेल्या दलित चळवळींमधील गांधीजींचे योगदान तसेच मुस्लीम सुधारणा चळवळींबाबत गांधीजींची भूमिका व विचार यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.

* भारताच्या घटनात्मक विकासाचा अभ्यासक्रमात वेगळा उल्लेख नसला तरी बिटिशांच्या कायद्यांचा व स्वातंत्र्याच्या योजनांचा कालानुक्रमे अभ्यास महत्त्वाचा आहे. या कायद्यांची पाश्र्वभूमी, तरतुदी, परिणाम, भारतीयांच्या प्रतिक्रिया, संबंधित व्हाइसरॉय, भारतमंत्री इ. मुद्दे एकत्रित अभ्यासता येतील.

स्वातंत्र्योत्तर भारत

* स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात फाळणीचे स्वरूप, परिणाम व उपाय आणि संस्थानांचे विलीनीकरण विशेषत जुनागढ, हैदराबाद व काश्मीरबाबतीत परिपूर्णपणे अभ्यासायला हवे. तसेच उशीरा विलीन झालेल्या संस्थानांबाबत महत्त्वाच्या घडामोडी लक्षात घ्यावात.

* भारताचे परराष्ट्र धोरण, आण्विक धोरण या बाबी नेहरू व इंदिरा गांधींच्या कालखंडापर्यंत बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. धोरणाची आंतरराष्ट्रीय पाश्र्वभूमी, धोरणाची राष्ट्रीय गरज, कारणे, धोरणाचे नेमके स्वरूप, तत्त्वे, कालपरत्वे त्यामध्ये झालेले बदल व त्यांची कारणे, धोरणाची अंमलबजावणी करताना घडलेल्या ठळक आंतरराष्ट्रीय घडामोडी, धोरणाचे परिणाम व आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया आणि मूल्यमापन असे मुद्दे विचारात घ्यावेत.

* नेहरू व इंदिरा गांधी यांचे महत्त्वाचे निर्णय, कारणे, परिणाम इ. बाबी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी अभ्यासताना महत्त्वाच्या ठरणार आहेत.

* आणीबाणी कालखंडातील महत्त्वाच्या घडमोडी, नेते, त्यांचे कार्य, विचार यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.

* इंदिरा गांधींच्या कालखंडापर्यंत अंतर्गत राजकीय घडामोडींचा अभ्यासही महत्त्वाचा आहे. यामध्ये राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या प्रादेशिक राजकीय चळवळी उदा. जयप्रकाश नारायण यांचे विद्यार्थी आंदोलन, आनंदपूर साहिब प्रस्ताव, भाषावार प्रांत रचनेबाबतचे संघर्ष अशा मुद्यांचा अभ्यास आवश्यक आहे. या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींमधील महत्त्वाचे नेते, त्यांचे महत्त्वाचे व प्रभावी समर्थक, पाश्र्वभूमी, स्वरूप, घोषणा, कारणे, परिणाम, यशापयशाची कारणे, इतिहासकारांची मते अशा मुद्दय़ाच्या आधारे त्यांचा बारकाईने अभ्यास करावा.

* भाषावार प्रांतरचनेची मागणी, त्यासाठीचे आयोग व शिफारसी, संघर्ष, विशेषत: संयुक्त महाराष्ट्राबाबतच्या शिफारसी हा भाग काळजीपूर्वक अभ्यासायला हवा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अभ्यास महत्त्वाचे नेते, विविध विचार प्रवाह, राजकीय पक्ष व त्यांच्या भूमिका, महत्त्वाच्या घडामोडी अशा मुद्दय़ांच्या आधारे करता येईल.

* पहिल्या सहा पंचवार्षिक योजनांचा अभ्यास या पेपरमध्येही मदतगार ठरणार आहे. या आधारे नक्षलवाद, माओवाद, विकासाचा असमतोल इ. बाबींचा संकल्पनात्मक अभ्यास शक्य होईल.