विद्यापीठात एम.ए.च्या पहिल्या वर्षांत असताना मला माझी सगळ्यात जवळची मैत्रीण भेटली. स्टेफी. कॅनडाहून भारतात एम. ए. करायला आली होती. आमच्या तत्त्वज्ञानाच्या वर्गात विविध देशांमधून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या खूप असे. देशातल्याही वेगवेगळ्या प्रांतांतून आलेले लोक असत. अर्थात वर्ग छोटासा होता. जेमतेम वीस जणांचा. पण त्यामुळे आमच्यातली मैत्री, विषयावरच्या गप्पा आणि एकत्र अभ्यास करणंही व्हायचं.

सेमिस्टर पूर्ण होत असतानाचा आमचा अभ्यासाचा भार वाढे – असाइन्मेंट्स, सबमिशन्स, थेसिससंदर्भातल्या मीटिंग्स वगैरे. असे दोन आठवडे जयकर ग्रंथालयात, अनिकेत कॅन्टीनमध्ये खूप चहा पिऊन मग पुन्हा वर्गात, कोणाच्या घरी, एकटय़ा – एकटय़ाने काम करत गेले होते.

bhuvan bam comments on prathamesh parab recent video
प्रथमेश परबच्या व्हिडीओवर लोकप्रिय अभिनेत्याची कमेंट; म्हणाला, “क्षितिजा तुझा नवरा खूप…”
star pravah man dhaga dhaga jodte nava jogwa fame smita tambe entry
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत ‘जोगवा’ फेम अभिनेत्री घेणार एन्ट्री, साकारणार ‘ही’ भूमिका, जाणून घ्या…
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
ice cream rice
सई ताम्हणकरप्रमाणे तुम्ही खाऊ शकता का आईस्क्रिम भात? विचित्र खाद्यपदार्थाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

आम्ही आदर्श कॅन्टीनच्या मोठय़ा वडाच्या झाडाखाली दमून असेच शांतपणे चहा पीत होतो. मी आणि स्टेफी टेबलावर डोकं ठेवून थोडेसे कंटाळून गप्पा मारत होतो. मी सहज म्हणाले, ‘‘चार- पाच दिवस कुठेतरी प्रवासाला जायचं आपण?’’  स्टेफी पटकन खुर्चीत उठून बसली आणि म्हणाली ‘‘चल’’ ‘‘अगं पण कुठे, कसं?’’ ‘‘चल तर माझ्या खोलीत जाऊ, बजेट ठरवू आणि खरंच जाऊ. वी डिझर्व इट.’’  आमचे आणखीन काही मित्र- मैत्रिणी बसले होते- ते म्हणाले तुम्हीच जा. खरंतर मीही सहज बोलून गेले होते. इतक्या पटकन त्यावर आम्ही काहीतरी करू असं वाटलंच नव्हतं.

पण स्टेफीचं हेच मला अजूनही खूप आवडतं. काहीतरी मनापासून करावंसं वाटलं तर त्याला आधी ‘नको’, ‘जमेल का?’ असं तिचं कधीच नसतं. आता ती ‘एज्युको’ नावाच्या कॅनडातल्या एका ‘एक्स्पीरेन्शिअल अ‍ॅण्ड आउटबॉण्ड लर्निग’च्या संस्थेत काम करते. मी मागच्या वर्षी इतर काही कामांसाठी टोरोटोमध्ये गेले होते. तेव्हा होते- नव्हते ते पैसे साठवून मला भेटायला ती व्हॅन्कोव्हरहून टोरेन्टोमध्ये आली! म्हणजे समजा एखाद्या मैत्रिणीला तीन दिवस भेटण्यासाठी कलकत्त्याहून केरळला येण्यासारखं आहे ते.

तर आम्ही ठरवलं हंपीला जायचं. माझे वडील नुकतेच हंपीत राहून आले होते. त्यांच्या प्रवासामुळे मलाही कुतूहल वाटलं होतं त्या जागेचं. म्हणून मग मी आणि स्टेफीने त्या दुपारी हंपीला जाण्याचं बसचं तिकीट काढलं.

यापूर्वी मी खूप प्रवास केला होता. मनाली, टेक्सा, बल्गेरिया, आई-बाबांबरोबर सुट्टीतल्या ट्रिप्स, पण स्टेफीबरोबर हंपीला जे पाच दिवस घालवले, त्यात आम्ही इतकं मनसोक्त जगलो! आमच्याकडे स्लीपिंग बॅग्स, अगदी मोजके कपडे आणि किरकोळ पैसे होते. हंपीच्या पाच दिवसांत होते ते पैसे संपल्यामुळे आम्ही येताना चक्क ट्रकने आलो. दोन तास ट्रकमध्ये त्या मस्त ट्रक चालकाशी आयुष्याच्या गप्पा मारत आम्ही आनंदात परत आलो. त्याने मध्ये एका ढाब्यावर गाडी थांबवली. उंच गोरी स्टेफी आणि मला बघून तिकडचे लोक थोडेसे आम्हाला निरखत होते, पण आम्ही हसून मांडी घालून जेवायला लागल्यावर त्यांनाही गंमत वाटली. भारतात दोन तरुण मुलींनी असं फिरायला जायचं म्हटल्यावर कोणीही आधी काळजी, नको, सुरक्षितता इत्यादी गोष्टी आणून आम्हाला परवानगीच दिली नसती. पण प्रवासाला बाहेर पडल्यावर मी शिकले ते लोकांवर विश्वास ठेवणं. चांगले लोक नक्की खूप आहेत. आपण सावध असणं वेगळं आणि भयभीत असणं वेगळं. आताच्या आपल्या वास्तवातसुद्धा चांगूलपणा असतोच आणि त्याच चांगूलपणाच्या निष्ठेवर मी आजवर प्रवास केला आणि खूप खूप  शिकलेच की!

तर हंपी हे कर्नाटकातलं सगळ्यात जुनं शहर. युनेस्कोच्या अंतर्गत हंपीला वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये गणलं जातं. त्या शहराचं वैशिष्टय़ म्हणजे तिथे असलेल्या पडक्या जुन्या राजवाडय़ांचे आणि मंदिरांचे अवशेष, एका अतिशय सुंदर, उज्ज्वल, विशाल काळाची आठवण करून देणारे. तिथे पहिल्या दिवशी गेलो तेव्हा आधी एक छोटं हॉटेल शोधलं. एका रात्रीचे पैसे भरले आणि भाडय़ाने सायकली घेऊन पूर्ण हंपी शहर बघायला निघालो. आमच्या दोघींनाही ‘माणूस’ या प्राण्याबद्दल प्रचंड कुतूहल असल्यामुळे आम्ही ते अवशेष बघत असताना एक वेगळा काळ डोळ्यासमोर उभा राहात होता आणि ही माणसं कशी जगली असतील या विचारात आम्ही गप्पा मारत भटकत होतो. हंपीच्या ऐतिहासिक आणि पौराणिक गोष्टी पुस्तकात वाचून अधिक शिकण्यासारख्या वाटल्या, पण माणूस असण्याचं अद्भुत भाग्य वाटावं असा तो परिसर होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी ठरवलं की तुंगभद्रेच्या पलीकडे जाऊन ‘अनेगुंडी’ नावाचं गाव आहे. तिथे केळीच्या बागा, शेती, अंजनाद्री डोंगर आहे. तिथे जावं. आम्ही दोघी केळीच्या पसरलेल्या बागांमधून चालत जात होतो. कोवळा सूर्यप्रकाश अनुभवत, शेतीचा सुवास आणि वाऱ्याची गाणी ऐकत. गप्पा मारत चालत असताना एक सुंदर तळं समोर दिसलं. आम्ही हंपी सोडल्यापासून वर्दळ खूपच कमी झाली होती. पर्यटकांची गर्दी केळीच्या बागा बघायला नक्कीच नव्हती! आम्ही दोघीच त्या निळ्याशार पाण्याकडे बघत होतो. स्टेफी म्हटली ‘‘चल पाहू!’’ आणि मी काही म्हणायच्या आत स्टेफी पाण्यात. तिचं ते रूप बघून मला तिच्यातल्या जगण्याच्या ऊर्मीबद्दल प्रचंड प्रेम वाटलं. मी खरंतर पाण्याला थोडीशी घाबरते. पण तरीही उन्हात, निळ्या पाण्यात, जगात दुसरं काहीच नसल्यासारख्या वातावरणात त्या दिवशी पोहत असताना आम्हाला दोघींना मासोळी झाल्यासारखं वाटलं होतं. एक तास पाण्यात डुंबलो आणि जरा वेळ खडकावर बसून तो आसमंत प्रत्येक श्वासातून आत घेतला आणि पुन्हा चालायला सुरुवात केली.

थोडंसं पुढे गेल्यावर मात्र आम्ही एक पाटी पाहिली. ‘क्रोकोडाइल्स इन द रिझर्व्हॉयर’!  बापरे! आम्ही स्तब्ध झालो. घाबरलोच! आम्ही मनसोक्त पोहत असताना मगरी होत्या त्या पाण्यात! आम्हाला बघितलं असेल त्यांनी? आम्ही खूप हसलो, घाबरलो, आपलं चुकलं असं वाटलं पण त्या दिवशी रात्री अंजनाद्रीच्या डोंगरावर बाहेर स्लीपिंग बॅग्समध्ये झोपून चांदण्या बघत असताना वाटलं की आपल्याला नवीन आयुष्य मिळालंय.

मी आणि स्टेफीने पुढचे सगळे दिवस असेच भरपूर चालून, वेगवेळ्या लोकांशी मैत्री गप्पा करत घालवले. उगाच एकदा एका ट्रॅक्टरला लिफ्ट मागितली. अंजनाद्रीच्या मंदिरातल्या त्या बाबांनी (आम्ही त्यांना बाबाच म्हणायला लागलो.) आम्हाला मंदिरात राहण्याची परवानगीही दिली. ते बाबा तर फारच गमतीदार होते. सुटलेल्या पोटावर लुंगी बांधून पूजा करून दिवसभर टी.व्ही.वर हिंदी सिरियल्स बघत बसायचे. पण खूपच प्रेमळ होते. त्यानंतर कित्येक र्वष त्यांचा फोन यायचा मध्येच, त्या ट्रक चालकाचासुद्धा! मध्यरात्री कुठली तरी आरती असायची त्या मंदिरात. सगळे मंदिरात जमायचे आणि जोरजोरात घंटा वाजवत कुठला तरी मंत्र म्हणायचे. मी आणि स्टेफी झाडावर बसून खाली दरीत बघायचो, त्या आरतीचा आगळावेगळा आवाज त्या अंधाऱ्या थंड रात्रीतली शांतता दूर करायचा आणि नंतर उरायची ती गडद शांतता. मी आणि स्टेफीने एकमेकांना वचन दिलंय की ऐंशी वर्षांच्या आज्ज्या झाल्यावरही असाच प्रवास करत राहायचा!

प्रवास कशासाठी करायचा? नवीन बघणं, अनुभवणं, वेगळ्या लोकांची राहणी, भाषा, अन्न- वस्त्रांची पद्धत बघणं हे तर आलंच. पण मी कोण आहे? या प्रश्नापासून दूर कसं जाणारं?

असंच एकदा झी टॉकीजवरच्या ‘टॉकीज लाइटहाऊस’ या कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान महाराष्ट्रातल्या एका छोटय़ा गावात गेले होते. कॅमेरा लागेपर्यंत मी एका कट्टय़ावर बसून डोंगर, पक्षी, झाडं आणि समोर वाहणारा सुंदर ओढा बघत होते. माशांची शिकार करायला रंगीबेरंगी खंडय़ा बसला होता समोर. रस्त्याच्या बाजूला एक गाडी येऊन थांबली. त्यातून एक माणूस उतरला आणि फोन हातात धरून फोटोच काढू लागला. त्याच्या पाठोपाठ त्याचं कुटुंब उतरलं- दोन बायका, एक त्याचा भाऊ किंवा मित्र असावा, एक आज्जी आणि दोन लहान मुलं. सगळे उतरून फोटोच काढत होते. एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून सेल्फी, पाण्यात खेळतोय आपण आणि किती मज्जा येतेय अशी पोझ देऊन ती दोन छोटी मुलं मात्र पाण्यात खरंच खेळत होती. वरती उडणाऱ्या पक्ष्यांच्या आवाजात त्यांचाही आवाज मिसळत होता, त्यांनी तिकडले दगड पाहिले. एकमेकांना दाखवले, पाण्यात उतरले आणि ह्य मोठय़ा लोकांचे फोटो काढून झाल्यावर तिसऱ्या मिनिटाला ते निघाले. त्या दोघा मुलांना अजून थांबायचं होतं. पाण्याकडे नजर वळवून ते परतले. आणि मीही त्या सुंदर ओढय़ाचा फोटो न काढायचंच ठरवलं.

माझं तर कामही असं आहे की त्यात प्रवास आलाच! अभिनेत्री म्हणून तर प्रवास करणं मला आणखीन आवडतं. सुमित्रा भावे, सुनील सुकथनकरांबरोबर मी माझी पहिली फिल्म केली- ‘बेवख्त बारीश’. त्यांच्या शूटिंगसाठी आम्ही राजस्थानात चकसामरी नावाच्या छोटय़ा गावात गेलो होतो. मी ‘अंगुरी’ नावाच्या एका साध्या गावातल्या, लाजाळू मुलीचं काम करत होते. सुमित्रा मावशींनी पहिल्या दिवशीच मला घेऊन तिकडच्या लोकल बाजारात जाऊन, माझ्यासाठी तिकडच्या मुलींसारखा साधा परकर-पोलका घेतला. आणि मला त्या गावात फिरून यायला सांगितलं. मी परकर-पोलका घातला, वेणी बांधली आणि गेले. त्या मुलींसारखा पदर ओठात पकडला, त्यांच्याचबरोबर उकिडवं बसून त्यांच्या आयुष्याला जवळून बघायची संधी मिळाली. सुमित्रा मावशींबरोबर असंच एका ओरिया फिल्मसाठी आम्ही ओरिसातल्या सुंदर आदिवासी जंगलात राहिलो होतो. सूर्यास्त झाला की त्या दरीतल्या जंगलातला प्रकाश गायब- फक्त उरतो तो कंदील आणि शेकोटीचा प्रकाश. ते सगळे आदिवासी लोक त्या शेकोटीभोवती अनेक तास नाचत. मीही नाचले त्यांच्यात. ‘जीबोन संबाड’मध्ये आहे तो नाच.

आणि मागच्याच वर्षी ‘वन- वे -तिकीट’च्या चित्रीकरणासाठी मी गेले. इटली, फान्स, स्पेनमध्ये जाणाऱ्या एका मेडिटेरियन क्रूझवर. तिथे माझाही वेश बदलला. मी आता ओरिसातली किंवा चकसामरीतली गावंढळ मुलगी नसून या क्रूझची सवय असणारी नायिका झाले! मग काटय़ा-चमच्याने खाणं, अतिशय अदबीने दुसऱ्याला ‘‘गुड मॉर्निग!’’ म्हणणं, आपल्या शरीराविषयी प्रचंड कम्फर्ट असून पोहायला जाणारी माणसं बघणं, यात मी शोधत राहिले एका मस्त वेगळ्या संस्कृतीचा विचार. चकसामरी, ओरिसा, इटली, अमेरिका असो वा कॅनडा- माणसं तर सगळीकडेच आहेत. पण किती वेगळेपणा आहे त्यांच्या प्रत्येक सवयीत.

मला वाटतं या अनुभवांमुळे एक सतत आठवण होत राहते की आपल्या आयुष्याखेरीज या पृथ्वीतलावर शेकडो अशीच माणसं राहतात. निसर्ग, प्राणी, वेगळेपणा याला अंत नाही. आणि त्यामुळेच जितका प्रवास करू तितके आपण ‘माणूस’ होऊ- या त्या जातीचे, धर्माचे, गावाचे, शहराचे, देशाचे न राहता- एक परिपूर्ण माणूस. दुसऱ्याबद्दल मनात प्रेम आणि आस्था असलेला.
नेहा महाजन

response.lokprabha@expressindia.com