18 September 2020

News Flash

जळजळीत जखमेवर हळुवार फुंकर

अॅसिड हल्ल्यातील जखमींच्या पुनर्वसनाचं काम ती करते आहे. आज हे काम मोठी चळवळ होते आहे.

रिया शर्माच्या मनातही असंच काहीसं होतं जोपर्यंत तिच्या आयुष्यात ‘तो’ आला नव्हता.

कोणी तरी सूड म्हणून चेहऱ्यावर, शरीरावर जळजळीत अॅसिड फेकतो आणि त्या दाहात त्या स्त्रीच्या आयुष्याची राख होते. पण त्या राखेतून त्यांना उठवण्याचं पुण्यकर्म करते आहे रिया शर्मा! ‘मेक लव्ह नॉट स्कार्स’ या संस्थेमार्फत अॅसिड हल्ल्यातील जखमींच्या पुनर्वसनाचं काम ती करते आहे. आज हे काम मोठी चळवळ होते आहे.
फॅशन विषयात पदवी घेतलेल्या एखाद्या मुलीची महत्त्वाकांक्षा काय असू शकते? त्यातही इंग्लंडमधील ‘आर्ट अॅण्ड डिझाइन’ महाविद्यालयात शिकणाऱ्या एका भारतीय मुलीची? कोणती स्वप्न असतील तिची? तर फॅशनच्या दुनियेत खूप मोठं नाव कमवायचं किंवा मग स्वत:चा ब्रॅण्ड निर्माण करायचा.
रिया शर्माच्या मनातही असंच काहीसं होतं जोपर्यंत तिच्या आयुष्यात ‘तो’ आला नव्हता. महाविद्यालयात एका प्रोजेक्टवर काम करताना तिने ‘तो’ पाहिला आणि तिच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली.
तो होता, ‘सेव्हिंग फेस’ नावाचा एक ऑस्कर विजेता माहितीपट! अॅसिड हल्ल्याची शिकार झाल्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या स्त्रियांच्या जीवनावर तो माहितीपट बेतलेला होता. त्याचबरोबर भारतात अशा हल्ल्यांचे प्रमाण कसे धोक्याच्या पातळीपर्यंत येऊन पोहोचले आहे याची माहितीही त्यात होती. अशा पीडित स्त्रियांना आयुष्यात पुन्हा उभं करण्याचा एक जगावेगळा विचार आणि आयुष्याला कलाटणी देणारा नवा दृष्टिकोन रियाला खुणावत होता. एक लघुपट एवढा परिणाम करू शकतो? पण रियाच्या बाबतीत हे खरं ठरलं.
‘मलासुद्धा हे सुरुवातीला खरं वाटलं नव्हतं.’ रिया म्हणते, ‘खरं तरं तो लघुपट पाहून मी दुसऱ्या दिवशी तो विसरून जायला हवा होता, पण तसं झालं नाही. हा विषय विसरणं किंवा पाहून सोडून देणं शक्य नाही हे मला कळून चुकलं आणि भारतात घडलेल्या अशा दुर्दैवी घटनांवर संशोधन करायचं मी ठरवलं.’
महाविद्यालयातील एका प्रोजेक्टवर रिया काम करीत होती. अर्थात तो तिच्या अभ्यासक्रमाचाच एक भाग होता आणि प्रोजेक्ट करणं हे रियासाठी नेहमीच्या अभ्यासासारखंच होतं. हे प्रोजेक्ट अॅसिड हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या स्त्रियांवरचं होतं आणि म्हणून रियाने त्या विषयाशी संबंधित असलेला ‘तो’ माहितीपट पाहिला.. आणि तिची झोपच उडाली. तिच्या आयुष्यात एक लक्षवेधी वळण आलं. तिची महत्त्वाकांक्षाच बदलली. ज्या मुली-महिला अॅसिड हल्ल्यामुळे जगण्याची जिद्द हरवून बसल्या आहेत अशा मुली आणि स्त्रियांसाठी इथून पुढे सगळं आयुष्य वेचायचं तिनं ठरवलं.
फॅशनच्या जादूई, झगमगाटी दुनियेत नशीब आजमवायचा विचार करणाऱ्या रियाची इथे दिशाच बदलली आणि तिची एक वेगळीच लढाई सुरू झाली. रिया म्हणते त्याप्रमाणे तिला तिच्या आयुष्याचं ध्येय सापडलं होतं. त्या दिशेनं तिनं संशोधन करायला सुरुवात केली. महाविद्यालयातील शेवटचं सेमिस्टर ऑनलाइन देण्याचं ठरवून आणि प्राचार्याकडून त्यासाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेऊन रिया भारतात परतली.
रिया म्हणते, ‘भारतात आल्यावर मी घरच्यांना माझा विचार सांगितला. त्या प्रश्नाचं गांभीर्य त्यांनासुद्धा कळलं आणि त्यांनी मला पाठिंबा दिला.’ घरच्यांचा होकार मिळताच रियाने आपला प्रवास सुरू केला. अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या मुली-स्त्रियांचा प्रचंड मेहनतीनं शोध घेतला. त्यांना भेटल्यावर, त्यांच्याशी बोलल्यावर रियाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. ‘माणूस माणसाशी असा कसा वागू शकतो? हे क्रौर्य, ही दाहकता का आहे समाजात? स्त्री-मुलींच्या बाबतीत समाज अशी पाशवी कृत्यं कशी घडू देतो? या आणि अशा अनेक प्रश्नांनी रिया अधिकच अस्वस्थ झाली. कोण आहे या मुलींच्या पाठीशी त्यांना आधार द्यायला, या प्रश्नाचं उत्तर मात्र तिला समाधानकारक मिळालं नाही. मग तिनंच त्यांच्या दिशेनं एक हात पुढे केला.. त्या स्त्रिया तर समाजापासून दूर राहू पाहत होत्या. त्यामुळे त्यांच्याकडून सहकार्य मिळणं कठीणच होतं. पण रियानं आधी एक हात पुढे केला तो त्यांच्या पुनर्वसनासाठी आणि मग दुसरा हात पुढे केला तो त्यांना स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभं करण्यासाठी. पहिलं आव्हान होतं ते, त्या मुलींमध्ये लढण्याची जिद्द, आत्मविश्वास आणि धाडस पुन्हा निर्माण करण्याचं; कारण त्यांच्याबाबतीत जे घडलं होतं त्यामुळे त्या या गोष्टी हरवून बसल्या होत्या. अॅसिड हल्ल्यामुळे झालेल्या जखमा, चेहऱ्यावर आलेली विद्रूपता आयुष्यभर पुसली जाणार नव्हती. या भयानक वास्तवामुळे त्या जगणंच हरवून बसल्या होत्या. कुणी डोळे गमावले होते तर कुणी एखादा अवयव. पण त्या जिवंत होत्या, ही एकच बाब रियाला सकारात्मकतेकडे नेत होती. असे असले तरी काही जणी खूप खमक्या होत्या. त्यांच्यातील प्रत्येक जण रियाला जणू काहीना काही संदेश देत होती. या स्त्रियांकडे आता केवळ ‘दुर्दैवी घटनेच्या बळी’ म्हणून सहानुभूतीपूर्वक नजरेनं पाहून चालणार नाही तर त्या ‘एका मोठय़ा आपत्तीतून वाचलेली व्यक्ती’ आहे या दृष्टीनं पाहिलं पाहिजे आणि त्यांना त्यांचा जगण्याचा हक्क पुन्हा मिळवून दिला पाहिजे याची रियाला जाणीव होत गेली. यातूनच त्यांच्या पुनर्वसनाचा विचार पुढे आला आणि ‘मेक लव्ह नॉट स्कार्स’ या तिच्या संस्थेचा जन्म झाला.
रियाच्याच शब्दात सांगायचं तर तिच्या या पहिल्या बाळाचा जन्म झाला आणि एक स्वप्न प्रत्यक्षात अवतरलं.. संस्थेच्या रूपानं. या संस्थेत अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या अनेक स्त्रियांच्या पुनर्वसनाचे काम जोमानं सुरू झाले. रियानं एकेक करून माणसं जमवली आणि संस्थेचे www.makelovenotscars.org हे संकेतस्थळ सुरू करून अनेक लोकांपर्यंत पोहोचायचा मार्ग शोधला. लंडनमधील एका कला महाविद्यालयात शिकणारी रिया वेगळ्याच ध्येयानं प्रेरित होऊन भारतात परतते काय आणि इथे येऊन पीडित स्त्रियांच्या पुनर्वसनात स्वत:ला झोकून देते काय. हे सगळं एखाद्या चित्रपटात शोभावं असं, पण रिया हे वेगळेपण जगली आहे आणि जगते आहे.
रियाला या स्त्रियांवर लघुपट बनवायचा होता, पण त्याचा पुरेसा अनुभव नव्हता. संकेतस्थळ सुरू केल्यानंतर मात्र रियाने छोटे छोटे व्हिडीओ तयार केले आणि संकेतस्थळावर टाकले. ते पाहून लोकांनाही वास्तवाची भीषणता जाणवली आणि मग आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला. रिया आता थांबायला तयार नव्हती. तिनं तिच्या संस्थेत अशा स्त्रिया आणि मुलींना सामावून घ्यायला सुरुवात केली ज्या कुठल्या ना कुठल्या प्रकारे पुरुषी अत्याचाराला बळी पडल्या होत्या. आता रियाला गरज होती ती तिच्याबरोबर काम करणाऱ्या एका चांगल्या टीमची. तिनं तसं आवाहन केलं आणि अनेक स्वयंसेवक तरुणी आपणहून पुढे आल्या. ‘चांगल्या स्वयंसेवक मिळाल्यामुळेच आमची आर्मी तयार झाली,’ असं रिया अभिमानानं सांगते. ‘ज्योत से ज्योत जलाते चलो..’ या उक्तीला अनुसरून रियाचा संघ तयार झाला आहे. अॅसिड हल्ल्यात जबर जखमी झालेली पण त्यातून वाचल्यावर रियाच्या मदतीने पुन्हा उभी राहिलेली दिल्लीतील शीला असो किंवा दिराने अॅसिड हल्ला करून आयुष्य उद्ध्वस्त केलेली मुंबईतली रेश्मा असो. या आणि अशा आणखी काही स्त्रिया आज पुन्हा मोठय़ा धीराने उभ्या राहिल्या असून त्यांच्यासारख्या इतर स्त्रियांना आयुष्यात उभं करण्यासाठी रियाच्या बरोबरीने काम करीत आहेत. ‘त्यांना पाहिलं की मला दहा हत्तींचं बळ येतं. यांच्यासाठी आणि यांच्यासारख्या इतर स्त्रियांसाठी किती करू आणि किती नको असं होऊन जातं..’ रिया सांगत असते तेव्हा एक आनंद तिच्या बोलण्यातून प्रतीत होत असतो.
पण ती समाधानी नाही.. नसते. रिया म्हणते, ‘आमचं काम इथे थांबत नाही, कारण अशा पीडित स्त्रियांचे पूर्णपणे पुनर्वसन करून त्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनवणं, त्यांना सर्वतोपरी वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणं, त्यांना पुन्हा आयुष्यात उभं राहण्याचं बळ देणं या गोष्टी आम्ही आमच्या संस्थेच्या मार्फत करतोच. पण जेव्हा समाज या स्त्रियांना स्वीकारेल, समाजात त्यांना त्यांचं हक्काचं स्थान मिळेल तेव्हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस असेल.’ या दृष्टीने समाजात जागृती निर्माण करण्याचं काम रिया आणि तिची टीम करते आहे. पण मुळात अशा घटना घडायलाच नकोत यासाठी जनमानसात प्रबोधन करण्याचा आणि स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन आता तरी बदलावा यासाठी आता रिया पाऊल उचलत आहे. त्यासाठी तिने संकेतस्थळ, हेल्पलाइन, लघुपट, माहितीपट अशी अनेक माध्यमे निवडली असली तरी हा बदल मुळापासून व्हायला हवा, असं तिला वाटतं.
रिया म्हणते, ‘एका लघुपटानं माझं आयुष्य बदललं पण प्रत्येकाच्या बाबतीत हे होईल असं नाही. त्यामुळे हा विषय केवळ एका लघुपटापुरता मी मर्यादित ठेवू शकत नाही.. ही एक चळवळ आहे. माणसातल्या राक्षसाविरुद्धची, क्रौर्याच्या विरोधातली म्हणूनच यात सगळ्यांचा सहभाग अपेक्षित आहे.’
माणुसकीला कलंक लावणारे असे गुन्हे समाजात घडूच नयेत यासाठी रियानं एक पाऊल उचललं आहे आणि ‘हाथ से हाथ मिलाते चलो’ या न्यायाने इतरांनी मदतीचा हात पुढे करावा, असं रियाला मनापासून वाटतं.

– मनीषा नित्सुरे-जोशी
manisha.nitsure@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2015 1:06 am

Web Title: articles on women problems
Next Stories
1 एक लढा हत्तींसाठीचा
2 आसामची मर्दानी
3 टेनिस सूत्रधार
Just Now!
X