तिच्याबद्दल कणव उत्पन्न व्हावी हा या लेखाचा उद्देश अजिबातच नाही, पण जे काही तिच्याबाबतीत घडलं यासाठी तिच्याइतकेच इतरही जबाबदार नाहीत का? आपल्याच दु:खांना कुरवाळणारे तिचे आई-वडील, आपल्या नवऱ्यावर नको इतका भरोसा ठेवणारी आणि भाचीला वेळीच न सांभाळणारी मावशी, अल्पवयीन भाचीच्या भोळेपणाचा फायदा घेणारा तो काका आणि तिच्या आयुष्यात आलेले ते सगळे तरुण, ज्यांनी फक्त तिच्या शरीराची गरज ओळखली, मनाची नाही.
 आणि ती.. कसलाही विचार न करता, प्रेमाला मिळविण्यासाठी शरीराचं माध्यम वापरत फक्त वाहात गेली, तिने कधी विवेकाचं ऐकलंच नाही, ना जे घडतंय त्याची कारणं तिला स्वत:ला विचारावीशी वाटली. हे असं ठसठशीत उदाहरण आहे, जे सांगतं, आपली माणसं जवळ असणं का गरजेचं आहे, योग्य वयात चांगल्या-वाईट स्पर्शाची माहिती असणं का गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं, स्वत:च्या आयुष्याचा विविध टप्प्यांवर थांबून विचार करणं का गरजेचं आहे.
मा णूस इतका नियतीच्या हातातलं खेळणं होऊ शकतो? परिस्थिती सगळ्याच बाजूंनी इतकी प्रतिकूल व्हावी, की दिवसेंदिवस ती चिघळतच जावी? विवेकाने त्या काळात तुमच्या आजूबाजूला फिरकूही नये आणि हे सगळं सगळं तिच्या एकटीच्या बाबतीत घडावं आणि एका उमलू पाहाणाऱ्या आयुष्याची अशी शोकांतिका व्हावी?
    ती जेव्हा पहिल्यांदा भेटली तेव्हा तिच्याबद्दल थोडीफार माहिती होती, पण ते सगळं हिच्याबाबतीत घडलंय यावर विश्वास ठेवणं कठीण गेलं. गोरीपान, मध्यम शरीरयष्टीची, पस्तिशीची, इंग्रजी माध्यमात शिकलेली, एका फर्ममध्ये नोकरी करणारी, मात्र आजही चेहऱ्यावर निष्पापपण भरून राहिलेलं! हिच्या आयुष्याची इतकी अधोगती का व्हावी, हा अस्वस्थ प्रश्न कारणं शोधत राहिला. नंतरचे चार तास ती फक्त बोलत होती. तिच्या आयुष्यातली मी केवळ दुसरी व्यक्ती होती, जिला तिच्या आयुष्यातला आता शब्द न् शब्द माहीत होता. हे का घडलं याची कारणमीमांसा करणं तसं सोपं होतं, पण हे इतरांच्या बाबतीत घडू नये म्हणून सगळं इथे सांगणं क्रमप्राप्त आहे. तेच तिच्यावर घडलेल्या अन्यायावर औषध ठरणार होतं.. आहे..
मधु, आपल्याच जवळच्या माणसाच्या लिगक अत्याचाराला बळी पडलेली एक अल्पवयीन मुलगी. तो तिच्या मावशीचा, निधीचा नवरा. तेव्हा तिचं वय होतं, तेरा वर्षे. आठवीत होती ती. शरीर काय काय सुचवू पाहात होतं, पण त्याचा अर्थ कळण्याइतकी प्रगल्भता अद्याप यायची होती. घराचं रंगकाम काढलेलं म्हणून ती, आई आणि भाऊ मावशीकडे येऊन राहिलेले. त्याचा त्या काकाला राग. तो खूप राग राग करायचा आणि भीतीने आई या दोघांना ओरडायची. परिस्थितीचा फायदा कसा घ्यायचा ते त्याच्या लक्षात आलं आणि एका सकाळी त्याने तिला ‘वॉक’ला नेलं. भीतीने ती नाही म्हणू शकली नाही. शिवाय तो चांगला माणूस आहे हे आईने लहानपणापासून मनावर िबबवलेलं. ती गेली. बागेत एका पाळण्यावर बसली. तो हलकेच बाजूला येऊन बसला. हळूहळू त्याचा हात तिच्या खांद्यावर आला. खांद्याकडून गळ्याखाली.. तो अधिकअधिक खाली यायला लागला. ती अस्वस्थ झाली, पण त्याचा अर्थ तिला कळत नव्हता. हात झटकावासा वाटत होता, पण तो तर चांगला माणूस आहे. तो वाईट काही करूच शकत नाही आणि त्याला नाराज करून चालणार नव्हतं. त्यांना अजून त्याच्या घरी राहायचं होतं. काही काळ त्याचा हात तिथेच विसावला..
तिच्या मौनाचा अर्थ त्याने घेतला – तिला चालेल सगळं!
त्याच्यासाठी ही सुवर्णसंधी होती. इतके दिवस कर्दनकाळ वाटणाऱ्या त्या काकाला आता प्रेमाचं भरतं येऊ लागलं. चुंबनाचे अनेक प्रकार समजावून झाले. भीतीपोटी अन् उत्सुकतेपोटीही ती कशालाच विरोध करत नव्हती. त्याची भीड चेपू लागली. हळूच एका रात्री तो तिच्या बिछान्यात शिरला आणि मग ते नेहमीचंच झालं. भररात्री, बायको आत बेडरूममध्ये झोपलेली असताना त्याने तिला सुखाच्या दाराशी आणून ठेवलं. तिचं उत्सुक शरीर प्रतिसाद द्यायला लागलं, कारण तो काका आहे. तो चुकीचं काही करूच शकत नाही..
 घराचं रंगकाम संपलं. ते तिघं स्वत:च्या घरी परतले, पण आता तिलाच चटक लागली. तो आनंद तिला सुखवू लागला. शनिवार आला, की ती मावशीकडे पळू लागली. दरम्यान तिची दहावी झाली. ७५ टक्के पडले. तिने कॉमर्सला अ‍ॅडमिशन घेतली. त्याचाही तोच विषय, मग काय शिकवण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा ‘क्लास’ सुरू झाले आणि त्याने ते सगळं केलं जे एका अपरिपक्व, अजाण, अल्पवयीन मुलीच्या बाबतीत करू नये. जे आपल्या बायकोबरोबर करायला आजही अनेक नवरे तयार होत नाही ते सगळं. त्यानेच तिला ब्लू फिल्मची चटक लावली. इतकी की, ती बिनधास्त गल्लीतल्या व्हिडीयो पार्लरमध्ये जाऊन आणायला लागली. बिल्डिंगमधल्याच एका मोठय़ा मुलीच्या घरी जाऊन बघायला लागली. तिचं दिवसेंदिवस बोल्ड होत जाणारं वागणं पाहून एकदा तो तिला म्हणाला, ‘चल, एक एक िड्रक घेऊ.’ त्याने बायकोला, तिच्या मावशीला मच्छी तळायला सांगितली आणि म्हणाला, ‘बघ बघ, तुझ्या भाचीला दारू प्यायचीय.’ त्याने दोन पेग तयार केले. एक तिला, एक स्वत:ला. मावशीने मच्छी तळूनही दिली, पण ना तिला थांबवलं ना नवऱ्याला.
 मावशीने तिच्या वागण्याचा फक्त अर्थ लावला – मुलगी वाया गेली!
दारू प्रकरण शेकलं. आईने मावशीचं घर बंद केलं, पण कॉलेज सुरू होतंच. त्यातली मुलं अवतीभवती होतीच. काकाने चटक लावलेलं शरीर तर खूप काही मागत होतं. शरीराच्या या मागणीबरोबरच तिच्यातलं भाबडं मन मात्र प्रेमालाही भुकेलं होतं. कुणी तरी आपलं हवं होतं, ज्याला ती मनातलं सारं काही सांगू शकेन. तिला ना कुणी घनिष्ठ मत्रीण होती, ना कुणी नातेवाईक जवळ होते. आईवडिलांच्या संसाराची वाटचाल घटस्फोटाकडे होऊ लागलेली होती. ते दोघंही आपल्या तणावात, नराश्येत. मधुला एक मित्र मिळाला- रवी. त्यालाही ती आवडायला लागली.
पुरुषाच्या वागण्याचा तिने लावलेला अर्थ – पुरुषाला कायमचा आपला करायचा असेल तर त्याला शरीर द्यावं!
तोही तो आनंद लुटू लागला, पण घरातले प्रेमविवाहाला मान्यता देणार नाहीत हे त्याला माहीत होतं. शिवाय एका मुलीने असा पुढाकार घेणं त्याच्या पारंपरिक मनाला खटकायला लागलं.
त्याने तिच्या वागण्याचा अर्थ लावला- ही जरा जास्तच बोल्ड आहे!
त्याने निर्णय घेऊन टाकला. ‘हिच्याशी लग्न? शक्यच नाही.’ पण ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली. तो तिला टाळायला लागला. वर्ष असंच गेलं. नंतर ती एका क्लासला जायला लागली. तिथे एका पंजाबी मुलाशी मत्री झाली. तो तिला मदत करू लागला. नोट्स द्यायचा. घरी परतायला कंपनी द्यायचा. तिला वाटलं हेच प्रेम. त्याच्याशी लगट वाढली, पण काही काळात तोही गायब झाला. कॉलेज पूर्ण होईपर्यंत अजून दोघंतिघं आले-गेले. पुरुष शरीर दिलं की कायम आपले होऊन राहतील, ही अटकळ खोटी ठरायला लागली. कोणत्याही कमिटमेंटशिवाय इतकं पुढे जायचं नसतं, हे तिला कधी कळलंय नाही. तिचा शोध चालूच राहिला..
दरम्यान तिला एक फोन फ्रेंड मिळाला. फोनवरून फक्त गप्पा मारायच्या. तास्नतास. एकदा त्याने बोलावलंच भेटायला. तीही कसलाही विचार न करता त्याच्या बोलण्याला भुलून पोहोचली रेस्टॉरन्टवर. तिथे तो नाही, त्याचा मित्र आला होता. मधुचं निरागसपण त्याच्या लगेच लक्षात आलं आणि त्याने त्या मित्राला तिच्यापासून दूर जायला सांगितलं, पण ती पुन्हा एकदा त्याला भेटलीच. त्या वेळी तो तिला एका ठिकाणी नेणार होता. तिला काय वाटलं कुणास ठाऊक. ती घरी परतली. नंतर कळलं की, ती जर त्याच्याबरोबर तिथे गेली असती तर फार मोठय़ा संकटात सापडली असती. कदाचित घरी परतूच शकली नसती..
सावध होण्याचा हा एक इशारा होता- पण त्याचा अर्थ तिला कळलाच नाही.
कॉलेज झाल्यावर तिला नोकरी लागली. इतकं होऊनही रवी तिच्या मनातून जातच नव्हता. खूप प्रयत्न केले. एकदा त्याच्या घरी फोन केला, तर वडिलांनी सांगितलं, त्याचं लग्न झालं. ती विस्कटली, पण स्वत:ला सावरलं, कारण दरम्यान ऑफिसमध्ये संजय तिची काळजी घेऊ लागला होता. मदत करू लागला. ‘हो हेच प्रेम. याचं खरंखुरं प्रेम आहे माझ्यावर.’ तिची खात्री पटली. आता याला तरी सोडायचं नाहीच. तिनं ठरवलं. तिचं शरीर मदतीला होतंच. घरी तिच्यासाठी स्थळ बघणं सुरू  झालं होतं. तिने याचं नाव जाहीर केलं. तो कोणत्याच दृष्टीने तिच्या लायकीचा नव्हता. आईलाही तो आवडला नाही. मधु सगळ्याच बाबतीत वरचढ होती. मात्र ती काहीही ऐकायच्या पलीकडे गेली होती. ‘मी कमावतेय ना. आम्ही सगळं नीट करू आणि त्याचं प्रेम आहे माझ्यावर, बाकीच्या गोष्टी कशाला बघायच्या.’ तिने आईला समजावलं.
 तिच्या आग्रहाखातर त्यांचं लग्न झालं आणि हळूहळू त्याचे रंग दिसू लागले. त्याने सगळ्याच बाबतीत तिला फसवलं होतं. तो तिच्यापेक्षा वयानेही लहान होता. त्याच्या घरी तो एकटा कमावणारा होता. आई-बाबा-भाऊ-बहीण सगळ्यांची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यांचं स्वत:चं घर नव्हतं. चाळीत भाडय़ाचं घर. तिला तर सेल्फ-कन्टेन्ट घराची सवय. ती उच्चवर्गातली असल्याने साहजिकच त्याच्या घरचे तिला मनापासून सामावून घेऊ शकले नाहीत, पण तिने ते स्वीकारलं. ‘मला प्रेम हवंय. माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेम आहे. मी त्याच्यासाठी वाट्टेल ते करेन.’ तिने स्वत:ला समजावलं. तिच्या आईने तिला घर घ्यायला मदत केली. कर्ज सुरू झालं आणि घरात वाद होऊ लागले. तिची काटकसर घरात कुणालाच आवडेना. भांडणं सुरू झाली. तिचा डॉमिनन्स होताच. आता ती दुरुत्तरेही करायला लागली. भांडणं आता मारामारीपर्यंत आली. संजय तिच्यावरही हात उचलू लागला. तिचं लग्न मोडल्यात जमा होतं.  
या घटनेचा तिने लावलेला अर्थ – आपलं कुणीच नाही!
दरम्यान तिला मुलगी झाली होती. त्याने आणि नंतर तिनेही दुसरी नोकरी पकडली. मुलीला वाढवताना ती सारं विसरून जात होती. दहा बाय दहाच्या रूममध्ये तोही इतक्या लोकांमधला रोमान्स तिला असह्य़ होत होता. त्यात भांडणं होतीच. प्रेमाचा शोध आणि शरीराची भूक तिला अस्वस्थ करत होती. या सगळ्याला नवराच जबाबदार आहे, तिचं मन नवऱ्याच्या विरोधात जाऊ लागलं. तिच्यातला हा कमकुवतपणा ऑफिसमधल्या एकाच्या लक्षात आलाच. त्याने जाळं टाकलं. ती अलगद फसली. एक मन म्हणायचं, ‘आपलं लग्न झालंय.’ दुसरं म्हणायचं, ‘सो व्हॉट?’
तिने या परिस्थितीचा अर्थ लावला- मी एकटी थोडीच आहे. अनेकांचे विवाहबाह्य़ संबंध असतात. हे खूप कॉमन आहे!
पण दोन-तीन महिन्यांतच तिच्या लक्षात आलं, की हा गैरफायदा घेतोय. त्याने ऑफिसमधल्या सगळ्यांना सांगितलं होतं, ‘शी इज अ‍ॅव्हेलेबल.’ सगळेच जण तिच्याकडे विचित्र नजरेने पाहायला लागले, पण तोपर्यंत ती निर्ढावली होती. खाली मान घालून काम करणारी मधू आता नजरेला नजर द्यायला शिकली. थोडंसं गोड बोललं, चहा-कॉफी प्यायला सोबत केली तरी अनेक पुरुष पाघळतात हे तिच्या लक्षात आलं. तिने तेच सुरूकेलं. आपली कामं करवून घ्यायला त्याची मदत झाली खरी, पण खरं प्रेम सापडत नव्हतं आणि आता पैशांचा प्रश्नही बिकट होऊ लागलेला. त्याचीही नोकरी धड नव्हतीच. तिने दुसरी नोकरी मिळवली.
अशा वेळी राघव तिच्या आयुष्यात आला.. आणि तिला आयुष्यात पहिल्यांदा कुणी तरी आपलं ऐकून घेतंय, याची जाणीव झाली. त्याने तिला खूपच मानसिक आधार दिला. हळूहळू ती मोकळी होऊ लागली आणि एके दिवशी त्याने त्याच्या आयुष्यातलं एक कटू सत्य तिच्यासमोर उघड केलं. तो आठ वर्षांचा असताना त्याच्या एका मित्राने त्याचा लैंगिक गैरफायदा घेतला होता. याचमुळे मधुचं आयुष्य असं का झालं ते तो समजू शकत होता. मधुच्या त्याने हे लक्षात आणून दिलं, की ती जी काही आज आहे, त्याला कारण नवरा नाहीए. मुख्य अपराधी आहे, काका. बत्तीस वर्षांच्या काकाने १३-१५ वर्षांच्या मुलीला, तिच्या शरीराला ते शिकवलं होतं, जे ताब्यात ठेवणं तिला खूप कठीण गेलं होतं आणि त्याच वेळी तिला सावरणारं कुणी कुणी नव्हतं..
ना तिची आई, ना वडील!
 तिला आयुष्यात खरं प्रेम कधीच मिळालं नव्हतं. आईचं प्रेम काय असतं ते तिला पहिल्यांदा कळलं जेव्हा सासूला तिच्या नवऱ्यावर प्रेम करताना पाहिलं. तिची आई प्रचंड महत्त्वाकांक्षी होती. उच्चशिक्षित असल्याने तिला करिअर करायचं होतं, पण मधु झाली, नंतर मुलगाही. मग नवऱ्याने नोकरी सोडायला लावली. ‘कशाला नोकरी करायची. मुलांना नीट सांभाळ. त्यांना तुझी गरज आहे.’ नवरा पारंपरिक वळणाचा. नवऱ्याचा आधार तिला कधी मिळाला नाही, त्यातच त्याने तिला नोकरी सोडायला लावल्याने तिच्यातली महत्त्वाकांक्षी स्त्री चवताळली. सासरच्या माणसांशीही तिचं कधी पटलं नाही. त्यामुळे मधु आणि तिचा भाऊ कायम एकटेच राहिले. ना कुणाकडे येणं ना कुणाकडे जाणं. तिच्या आईला नैराश्याने ग्रासून टाकलं. याचं कारण तिच्याही बालपणात होतं. आईच्या आईने म्हणे कधी तिच्यावर प्रेमच केलं नाही. ही मोठी म्हणून फक्त जबाबदाऱ्या लादल्या गेल्या. तिची आई कायम प्रेमाला भुकेली राहिली. नवराही तिच्या अपेक्षा पूर्ण न करणाराच निघाला, त्यामुळे प्रेम कसं करतात हेच तिला कधी कळलं नाही. त्यातच सासरच्या माणसांनी ब्लॅक मॅजिक केलंय असा तिला संशय. तिची मानसिकता ढळू लागली. इतकी की ती मानसिक रुग्ण झाली. ती दर दहा मिनिटांनी घर साफ करायची. कपडे धुवायला घ्यायची. भांडी स्वच्छ करत राहायची आणि आपल्या साऱ्या परिस्थितीला नवऱ्याला आणि सासरच्या माणसांना दोष द्यायची. हळूहळू तिने मधुला नवऱ्याविरुद्ध तयार केलं. निधी नशीबवान आहे, तिच्यावर तिचा नवरा केवढं प्रेम करतो.’ ती सांगत राहायची.
मधुने आईच्या वागण्याचा अर्थ लावला- बाबा दुष्ट आहे.
मधुच्या म्हणण्यानुसार आईने वडिलांवर सूड उगवण्यासाठी तिचा वापर केला. ती वडिलांचा तिरस्कार करू लागली. आईची बाजू घेऊन वडिलांशी भांडू लागली. त्यांना बचावाची संधी न देता ‘आईला त्रास देतो काय, तू चालायला लाग इथून,’ असं बाबाला म्हणण्यापर्यंत तिची मजल गेली. वयात येणाऱ्या या मुलीला समजावणं त्याच्याही आवाक्याबाहेरचं होतं. दरम्यान मावशीने आईला सांगितलं, ‘तू इथे कशाला राहातेस. पटत नाही ना, बाहेर पड. तू शिकलेली आहेस. पैसे कमवू शकशील. मी बघते तुझ्यासाठी घर.’ आईला अत्यानंद झाला. आपण या घरातून बाहेर पडू शकतो या आनंदात तिने लेक बारावीला आहे, याचंही भान ठेवलं नाही. मग घराची शोधाशोध. भाडय़ाचं घर. शिकवण्या सुरू झाल्या. वडील दर महिना पैसे देत होतेच, पण आपण गरीब आहोत असं चित्र आईने निर्माण केलं आणि ती म्हणेल ते ऐकायचं, देईल तेच खायचं, फक्त अभ्यास करायचा, हेच तिच्या आईने तिला सक्तीचं केलं. हळूहळू आजारपणामुळे आईला दोन्ही मुलांना सांभाळणं शक्य होईना तेव्हा तिचे वडील तिच्या भावाला घेऊन स्वत:च्या घरी गेले. आज तिचा भाऊ उच्चशिक्षित आहे.
आईचा तऱ्हेवाईकपणा वाढतच होता. तिने आईची जबाबदारी उचलली, पण तिच्या आयुष्याची मात्र होळी होत होती. जे काही चाललं होतं ते ती कुणालाच सांगू शकत नव्हती आणि ते समजून घेण्याइतपत आई भानावर नव्हती. मात्र तिने पदवी मिळवली आणि नोकरीही. खरं तर तीही खूप हुशार आणि महत्त्वाकांक्षी आहे. सरळ आयुष्य गेलं असतं, तर तिनेही यशस्वी करिअर केलं असतं, पण सगळंच फसत गेलं..
 ..आज ..खूप काही घडून गेलंय तिच्या आयुष्यात. राघवने तिला वास्तवाचं भान आणून दिलंय. आता तिला बाबा तिच्या आयुष्यातला व्हिलन नाही वाटत, उलट आपण याला समजून घेऊच नाही शकलो याची जाणीव तिला झालीय. आता वडिलांशी तिचं नातं मोकळं झालंय. जे काही आयुष्यात घडलं त्यात आईचं मानसिक स्थिर नसणं हा मोठा भाग होताच, पण काकाने तिच्या शरीराशी अपरिपक्व वयात खेळणं तिला या वळणावर घेऊन आलं, हे तिला कळलंय. नवऱ्याची निवड का चुकली तेही तिला कळलंय. दरम्यान, अशा काही घटना घडल्या, की आता नवऱ्यालाही तिच्या आयुष्यात आलेल्या पुरुषांबद्दल पूर्ण नाही तरी बऱ्यापैकी कळलं आहे. तो तिला घटस्फोट द्यायच्याच मन:स्थितीत आहे. तिलाही खरं तर राघवशी लग्न करायचं होतं, पण ते आता शक्य नाही. जे तिच्याबाबतीत घडलं ते स्वत:च्या लेकीच्या बाबतीत तिला घडू द्यायचं नाहीए. मुलीला चांगलं आयुष्य द्यायचंय. आजही ती लग्नबंधनात टिकून आहे, पण त्यांच्यातलं नातं केव्हाच संपून गेलंय. ‘आनंदी, सुखी संसार करण्याचं, प्रेम करणारा नवरा मिळण्याचं स्वप्न पाहाणं मी बंद केलंय, कारण आता मला फक्त आईची जबाबदारी पार पाडायचीय,’असं ती म्हणतेय.
पण त्याही आधी तिला महत्त्वाचं काम करायचंय, तिला त्या काकावर सूड उगवायचाय. तिने भावाला आणि वडिलांना सगळं सांगितलंय. एकदा जाऊन त्याला ते सर्वादेखत मारूनही आलेत ते, पण तरीही तो अजूनही उजळ माथ्याने मिरवतोय, तिच्या मावशीला आणि त्याच्या मुलीलाही ती हे पटवून देऊ शकलेली नाही, याचं तिला दु:ख आहे. ‘जे झालं ते झालं. आता मीही काही करू शकत आणि तूही,’ अशी समजूत तो घालू पाहातोय, पण तिला आता इथे थांबायचं नाहीए. तिच्या आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्या त्या नराधमाला तिला शिक्षा करायचीय. पण कशी, हा तिच्यासमोरचा प्रश्न आहे. ती आता महिला संघटनांना भेटते आहे. पोलिसांत तक्रार नोंदवून आता उपयोग नाही, कारण इतक्या वर्षांनंतर तिच्याकडे कसलेच पुरावे नाहीत. फक्त वर्षे वाया जातील, असा सल्ला तिला मिळालाय. म्हणूनच ती एका एनजीओतर्फे विविध शाळांमध्ये जाऊन मुलींना या विषयावर मार्गदर्शन करते आहे. तिला आता हेच काम करायचं आहे, उमलू पाहाणारी अनेक आयुष्यं तिला शोकांतिका होण्यापासून वाचवायची आहेत!
(लेखातील सगळ्या व्यक्तींची नावे बदलली आहेत.)
पालकांनो,                                   
तुम्ही कितीही तुमच्या आयुष्यात व्यग्र असाल, करिअरमध्ये बिझी असाल, पण तुमच्या मुलांकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवा. त्यांना समजून घ्या. विशेषत: त्यांच्या वयात येण्याच्या टप्प्यावर. ही चार-पाच वर्षे खूपच महत्त्वाची आहेत, अशी शोकांतिका टाळण्यासाठी.

 चतुरंग व्यासपीठ
 मधूची अटळ शोकांतिका झाली, तशी इतर कुणाचीही होऊ नये, असं आपल्या सगळ्यांना वाटत असणार; पण काही गोष्टी या घडतातच, तुमचा दोष असो वा नसो. अशा वेळी गरज असते ती आपल्या माणसांची आणि योग्य मार्गदर्शनाची. म्हणूनच ‘चतुरंग व्यासपीठा’ची स्थापना आम्ही करतो आहोत. तुमच्या बाबतीत किंवा तुमच्या अवतीभवती अशा प्रकारच्या काही घटना घडल्या असतील. त्यासाठी मानसिकदृष्टय़ा किंवा अन्य माहिती हवी असेल तर आमचे दोन पॅनलिस्ट तुम्हाला (फक्त आणि फक्त या विषयावर) मदत करतील.  यासंदर्भात डॉ. हरीश शेट्टी आणि अ‍ॅड. उज्ज्वला कद्रेकर यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता.
डॉ. हरीश शेट्टी हे देशातले नावाजलेले बाल मानसोपचारतज्ज्ञ आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून एम.डी. डी.पी.एम.चे पदव्युत्तर उच्चशिक्षण घेतले असून सध्या ते पवई येथील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी या विषयाशी संबंधित एक हजारांवर कार्यशाळा घेतल्या आहेत. तसेच तरुणांमधील वाढत्या आत्महत्यांची समस्या ओळखून त्यांनी याबाबत जागरूकता पसरवण्यासाठी तीनशेहून अधिक कार्यशाळांचे आयोजन केले आहे. टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स येथेही ते अध्यापनाचे काम करतात. मानसिक आरोग्य व समुपदेशन यात त्यांचा हातखंडा असून ‘जागतिक आरोग्य संघटनेच्या’ १७ ‘तरुण मानसिक आरोग्य कार्यकर्ता’च्या यादीत त्यांचाही समावेश आहे. मानसिक आरोग्य हरवलेल्यांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी ‘मत्री’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापनाही  त्यांनी केली आहे.
डॉ. हरीश शेट्टी यांना ९८१९५९७१०९ या क्रमांकावर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत तुम्हाला संपर्क साधता येईल.
 *  वांद्रेवाला फाऊंडेशनच्या १८६०२६६३४५ या २४ तास चालणाऱ्य़ा मेन्टल हेल्थ हेल्पलाईनवरही बोलू  शकता.
* याशिवाय लेखी संपर्कासाठी coffeetablemumbai@yahoo.co.in या ईमेल आयडी वर पत्र पाठवू शकता.

अ‍ॅड. उज्ज्वला कद्रेकर  यांनी गेल्या २० वर्षांपासून महिलांचे हक्क आणि सुरक्षा या विषयाला वाहून घेतले असून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या विशेष अधिकारी म्हणून त्यांनी  तब्बल १२ वर्षे काम पाहिले आहे. या ठिकाणी त्या समुपदेश विभागाच्या प्रमुख होत्या. महिलांविषयक धोरणे, काही ठराव यांचा मसुदा तयार करणे तसेच काही कायद्यांमध्ये दुरुस्त्या सुचवणेही यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच प्रादेशिक स्तरावर अनेक कार्यशाळांचे त्यांनी आयोजन केले आहे. नुकतीच त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसाठी लिंगाधिष्ठित हिंसेच्या घटनांमध्ये मार्गदर्शक प्रशिक्षण पुस्तिका तयार केली  आहे.
त्यांचे विशेष योगदान म्हणजे, घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा, २००५ चा मसुद्या तयार करणाऱ्या गटामध्ये त्यांचा समावेश होता. लैंगिक हिंसाचाराशी निगडित ६० च्या वर खटल्यांमध्ये त्यांनी वकील म्हणून मोलाची भूमिका घेतली असून हॉस्पिटल्स, पोलीस यंत्रणा व न्याय व्यवस्था यांच्यासह जवळून काम केल्याचा अनुभव हे त्यांचे बलस्थान आहे. तसेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या विविध चौकशी समित्यांवर
त्यांनी काम केले आहे. यात बहुचर्चित खैरलांजी खटला तसेच कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीच्या अनेक प्रकरणांचा समावेश आहे
अ‍ॅड. उज्ज्वला कद्रेकर  यांना तुम्ही ujwalahemant@gmail.com   या ईमेल आयडीवर पत्र पाठवू शकता.   
* तसेच बुधवार आणि गुरुवार या दिवशी संध्यकाळी ७  ते  ८  दरम्यान ९८६९२४४४६२ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
  याशिवाय  तुम्ही तुमची मते chaturang@expressindia. com   यावर ईमेल पाठवू शकता.

—————————————————-