आरती अंकलीकर-टिकेकर
‘‘आमच्यातल्या मैत्रीचं लग्नात रूपांतर होणं हे भाग्यच! नवीन लग्न झाल्यानंतर सुनेवर घर चालवायची महत्त्वाची जबाबदारी प्रथा-परंपरेनुसार समाज टाकत असतो. ही नेमकी सासू-सासऱ्यांनी  घेतली. त्यामुळे आम्हा दोघांवर जबाबदारी आली ती, ज्या मैत्रीचं रूपांतर आम्ही लग्नात केलं होतं, ती मैत्री टिकवून ठेवण्याची! ही जबाबदारी तेव्हा जबाबदारी न वाटता सहजपणे पार पाडली जात होती. तशीच ती कायम राहिली.’’ सांगताहेत सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर आपले पती उदय टिकेकर यांच्याबरोबरच्या २९ वर्षांच्या सहजीवनाविषयी.
भारतीय शास्त्रीय संगीतातील गाण्याचा मला असलेला उत्कट ध्यास अन् अभिनयक्षेत्रातील उत्तम कामगिरीची उदयला असलेली उत्कट ओढ यामुळेच बहुतेक आम्ही परस्परांकडे तेव्हा आकर्षित झालो असणार. आकर्षणाचं चिरकाल मैत्रीत रूपांतर होणं हे भाग्याचं ठरलं. मुंबईच्या पोद्दार कॉलेजमध्ये आम्ही होतो. मी खूप गंभीरपणे गाण्यावर मेहनत घेत होते. तो पंडित तारानाथांकडे तबला शिकलेला. कॉलेजमधल्या कितीतरी उपक्रमांमुळे आमची ओळख दिवसेंदिवस गहिरी होत चाललेली होती. त्यावेळच्या काही स्पर्धामध्ये मी गात असताना त्याने तबल्याची साथही केलेली होती.
उदयचे वडील बाळासाहेब टिकेकर हे ग्वाल्हेर घराण्याचे गायक. शिवाय ते उत्तम नटही होते. आई सुमती टिकेकर या जयपूर घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका अन् बहीण उषा (देशपांडे) ही पंडित फिरोझ दस्तरांची शिष्या म्हणजेच किराणा घराण्याची. असा यांच्या घरात त्रिवेणी संगम होता अन् मला त्यात केवळ सूर मारायचा होता. गायक कलावंत म्हणून कारकीर्द करायचं माझं ठरलेलंच होतं. गानसरस्वती किशोरीताई आमोणकरांकडे माझं शिक्षण चालू होतं. या सगळ्यांचं पुरेपूर प्रोत्साहन मला होतं.
तेव्हाचा एक किस्सा आठवतो. लग्न ठरल्यावर एके दिवशी माझ्या माहेरच्या सगळ्यांना टिकेकरांकडे जेवायचं आमंत्रण होतं. छान जेवण झाल्यावर मनसोक्त गप्पा झाल्या. नंतर चहा झाल्यावर मी, उषा आणि माझे सासरे अशी गाण्याची छोटीशी मैफल रंगली. बाहेर रिमझिम पाऊस सुरू झालेला होता, पण गाण्यात आम्ही एवढे रमलो की जराशानं बाहेर कंबरेएवढं पाणी साचलं. मग माझ्या सासूबाईंनी आम्हाला रात्री तिथंच थांबवून घेतलं. दुसऱ्या दिवशीही पाऊस पडतच होता. नाश्ता झाला. जेवण झालं. पार संध्याकाळी पाऊस थांबल्यावर आम्ही तेथून निघू शकलो. हे सगळं घडत असताना उदय आणि मला मात्र पाऊस अजून पडत राहावा, थांबूच नये असंच वाटत होतं.
 लग्न झालं तेव्हा मी गाण्यात अन् त्यानं अभिनयात करिअर करायची हे ठरून गेलेलं होतं. त्या सुमारास कलेचं क्षेत्र आर्थिकदृष्टय़ा आजपेक्षाही अवघड होतं. त्यातलं अस्थैर्य आम्ही जाणून होतो. दोघादोघांनी हे अस्थैर्य पत्करायचं म्हटल्यावर आधी माझ्या पालकांच्या मनाला थोडा घोर लागलेला होता. पण आम्हा दोघांची जिद्द, कठोर परिश्रम करून कला जोपासण्याची, वृद्धिंगत करण्याची तयारी अन् त्यासाठी टिकेकर कुटुंबाची भक्कम साथ यानं माझ्या पालकांना भरवसा दिला.
आमच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी उदयच्या पहिल्या चित्रपटाचं (‘धाकटी सून’) शूटिंग होतं. त्यामुळे लग्न माझ्याशी अन् प्रेमाचे सगळे सिन्स त्या हिरोईनबरोबर, अशी गंमत! आमचा असा संसार सुरू झालेला असताना काही कार्यक्रमांमध्ये किंवा प्रसिद्धी माध्यमांमध्ये माझी ओळख आरती अंकलीकर, काही ठिकाणी आरती टिकेकर तर काही ठिकाणी आरती अंकलीकर-टिकेकर अशी करून दिली जात होती. त्या सुमारास आम्ही एकदा उस्ताद झाकीर हुसेन यांच्या वाढदिवसाच्या समारंभात गेलो होतो. तिथं गुलाम अली गायला आलेले होते. त्यावेळी उदयनं त्याची स्वत:ची ओळख, ‘मी उदय आरती अंकलीकर’ अशी करून दिली. तेव्हा एक वेगळाच उदय मला जाणवला.

     लग्नानंतर माझाही गाण्यासाठीचा पहिला परदेश दौरा झाला. मी अमेरिकेत केलेल्या कार्यक्रमांच्या मानधनापेक्षाही उदयच्या फोनच्या बिलाचा आकडा मोठ्ठा होता. मी दुसरा परदेश दौरा करून येईस्तोवर उदय ‘आव्हान’ या मालिकेतून घराघरात खलनायक म्हणून पोहोचलेला होता. ‘दूरदर्शन’च्या इतिहासातली ही पहिलीवहिली मालिका. यात त्यानं तीन बायकांचा छळ करून, त्यांना जाळून मारलेलं असतं. दोन महिन्यांच्या दौऱ्यानंतर मी आले तर उदयसोबत कुठंही जाताना लोक त्याच्याकडे चमत्कारिक नजरेनं पाहात असल्याचं मी पाहिलं. पडद्यावरची इमेज खरी मानण्याइतका प्रभाव पडलेला पाहून मला त्याचं घराघरात जाऊन पोहोचणं लक्षात आलं.
लग्नाच्या सुरुवातीच्या काळात व्यक्ती म्हणून आपण कसे असतो, कसे दाखवतो आणि प्रत्यक्षात एकमेकांना कसे दिसतो, कसे असायला हवे असतो या सगळ्याची परीक्षाच असते. आम्हा दोघांचं करिअर तेव्हाच फुलत होतं. आम्ही दोघेही व्यक्ती म्हणून, कलाकार म्हणूनही याच काळात फुलत होतो. विविध भूमिकांची जबाबदारी दोघांवरही आलेली होती. करिअरमधला संघर्षांचा काळ सुरू होता. पण या सगळ्यात खूप मोठा पाठिंबा माझ्या सासू-सासऱ्यांचा होता. नवीन लग्न झाल्यानंतर सुनेवर घर चालवायची महत्त्वाची जबाबदारी प्रथा-परंपरेनुसार समाज टाकत असतो. ही नेमकी त्यांनी घेतली. त्यामुळे आम्हा दोघांवर जबाबदारी आली ती, ज्या मैत्रीचं रूपांतर आम्ही लग्नात केलं होतं, ती मैत्री टिकवून ठेवण्याची! ही जबाबदारी तेव्हा जबाबदारी न वाटता सहजपणे पार पाडली जात होती. तशीच ती कायम राहिली. जोडीदाराचं स्वप्न पूर्ण व्हावं, त्याच्या महत्त्वाकांक्षा साकार व्हाव्यात अन् त्यात आपला खारीचा वाटा मन लावून आपण उचलावा असं दोघांनाही वाटत होतं.
लग्नाआधी त्याला अमेरिकेतल्या एका विद्यापीठात चित्रपट अभ्यासविषयक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेला होता. पण शास्त्रीय संगीतात करिअर करण्यासाठीच्या माझ्या तयारीसाठी मला भारतात राहाणंच चांगलं होतं. तेव्हा मी तसं सुचवल्यावर त्यानं क्षणाचाही विलंब न लावता तिथं जाणं रद्द केलं.
आम्ही दोघे तसे स्वभावानं तापटच. मी पूर्णपणे शाकाहारी अन् तो मांसाहारी. पण असे आमच्यातले काही साम्य-भेद परस्परांना समजून घेतल्यामुळे जागच्या जागी ठेवता आले. सहजीवनात कधी स्वच्छ ऊन असतं, कधी मळभ, कधी थोडेसे ढग, कधी पाऊस, कधी विजांचा कडकडाट तर कधी रमणीय इंद्रधनुष्य. एकमेकांना समजून घेणं आणि त्यांची काळजी घेणं, या दोन गोष्टी जगातल्या कुठल्याही नात्यात महत्त्वाच्या. समजून घ्यायला आपण समजा काही वेळा कमी पडलो तरी समजून घ्यायचा प्रयत्न मात्र प्रामाणिक असला पाहिजे. समजून घ्यायची गरज वाटली पाहिजे. ती असली तर वेळप्रसंगी उद्भवलेल्या शंकेचा चर्चेनं निचरा करता येतो. हे सगळं आमच्यात असल्यामुळे आम्ही दोघेही एकमेकांचे छान मित्र आहोत. आत्मकेंद्रित नसल्यामुळे दोघेही स्वतंत्रपणे विचार करतो. एकमेकांवर कुठल्याच प्रकारचा दबाव नाही. कारण आपल्यातला कलाकार फुलत राहण्यासाठीच्या परस्पर सामंजस्याचा तो गाभाच आम्हाला वाटतो.
लग्नानंतर चार वर्षांनी आम्हाला मुलगी झाली. या आमच्या स्वानंदीकडे पूर्णपणे लक्ष दिलं ते माझ्या सासूबाईंनी! कारण आम्ही दोघेही आपापल्या करिअरच्या ऐन भरात अतिशय व्यग्र होतो. तरीपण त्या-त्या वेळी आम्हा दोघांपैकी जो कुणी तिच्यापाशी असे तो आई-बाबा या दोन्ही भूमिका निभावत असे. हल्लीच्या काळात नवरा-बायको दोघेही खूप व्यस्त असतात. दोघांचीही कामं खूप वेळ खाणारी असतात. अशा वेळी पारंपरिक नात्यापेक्षा त्या-त्या वेळेला साजेशा नात्यात पटकन् शिरता आलं पाहिजे. तेच आम्ही करत गेलो.
स्वानंदी सर्वार्थानं मोठी होताना आमच्या एकत्र कुटुंबामुळे सारं सोपं झालं. माझ्या सासू-सासऱ्यांनी पूर्वी मराठी आणि संस्कृत नाटकांमध्ये भूमिका केलेल्या. त्यांच्या गाण्याचा अन् अभिनयाचा वारसा जसा घरातल्या वातावरणातून उदयला मिळाला तसाच तो पुढं स्वानंदीलाही मिळाला. अभ्यासात हुशार; त्यातून गाणं, नृत्य अन् अभिनयाकडेही तिचा ओढा पाहून, तिला जास्त पोषक वातावरण मिळावं म्हणून मी पुण्याला राहण्याचा प्रस्ताव मांडला. उदयनंही स्वानंदीच्या हिताचा म्हणून तो त्वरित मान्य केला. पुण्यात तिला यातलं सगळं भरभरून घेता आलं. विविध नाटय़स्पर्धामध्ये बक्षिसं मिळवून तिनं स्वत:ची ओळख स्वत:च निर्माण केली. आम्हा दोघांचं नाव कुठंही वापरलं नाही. नुकतंच तिला झी गौरवतर्फे प्रायोगिक नाटकासाठी (प्राइस टॅग) उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आलं. नामांकन जाहीर झालं तेव्हा उदयला संजय जाधव म्हणाला, ‘आज तुझ्या डोळ्यांत बाप दिसला.’ उदय बाप म्हणून भन्नाट आहेच.
हाच उदय माझ्या आई-बाबांनासुद्धा जावई न वाटता त्यांचा लाडका मुलगाच कायम वाटत राहिलेला आहे. माझा गतिमंद भाऊ जेव्हा जेव्हा आमच्या घरी राहायला येतो तेव्हा उदय त्याच्या औषधांच्या वेळेची अन् काय हवं-नको याची अत्यंत प्रेमानं काळजी घेतो. एकमेकांची परवानगी किंवा गृहीत धरणं असं कधी आमच्यात घडलं नाही. सल्ला विचारणं वेगळं. त्याच्या मालिका, चित्रपट मी अत्यंत बारकाईनं पाहते. त्यावरचं माझं स्पष्ट मत सांगते. तोही माझ्या कित्येक कार्यक्रमांना येतो. तिथली साऊंड सिस्टीम वगैरे ठीक आहे ना, याचा अंदाज घेत माझ्या ‘कम्फर्ट’ची काळजी घेतो. एकदा आम्ही पुण्याहून मुंबईला ‘उगवली शुक्राची चांदणी’ या माझ्या गाण्याच्या रेकॉर्डिगसाठी गेलो होतो. उदय जरा वेळासाठी बाहेर पडला. तेवढय़ात रेकॉर्डिग झालेलं होतं. परतल्यावर त्यानं ते ऐकलं आणि म्हणाला, ‘तू याच्यापेक्षा आणखी जास्त चांगलं नक्कीच गाऊ शकतेस.’ त्यानंतर आम्ही पुन्हा रेकॉर्डिग केलं आणि ते खरंच पहिल्यापेक्षा उत्तम झालं.
   अशीच त्याची एक अविस्मरणीय आठवण, पावसाशीच संबंधित. मी बडोद्याला कार्यक्रम करून ट्रेननं येत होते. मुंबईला प्रचंड पाऊस झालेला होता. रुळांवर पाणी साचलेलं होतं. ट्रेनला १२ तास उशीर झालेला होता. आमचं ताडदेवचं घर उताराशी. तिथं कंबरेएवढं पाणी साचतं. उदयनं रात्री दोनला गाडी काढली. स्टेशनवर आला. मला आणि माझ्या साथीदारांना त्या पाण्यातून काढत सुखरूप घेऊन निघाला. प्रत्येकाला त्याच्या-त्याच्या घरी सोडून आम्ही घरी यायला सुमारे पाच तास लागले. त्याची ही न बोलता केलेली ही सोबत खूप आत्मीय आहे.
आम्ही दोघांनी एकमेकांच्या व्यवसायातले चढउतारही अनुभवले आहेत. कधी माझे भरपूर कार्यक्रम असतात. कधी फार थोडे. कधी त्याचीही प्रचंड कामं चालू असतात. कधी तेवढीशी नाहीत. पण जसजशी वर्षांमागून र्वष जाऊ लागली तसतसं आम्हाला एकमेकांच्या व्यवसायातल्या गरजा आणि त्यातले बदलते प्रवाहही कळू लागले. आज त्याच्या क्षेत्रात तो नामवंत असल्यानं मी तिथं आरती उदय टिकेकर असते. माझ्या क्षेत्रात अजूनही कधीतरी तो स्वत:ला उदय आरती अंकलीकर म्हणवत असला तरी तिथं त्याला स्वतंत्रपणे सगळे ओळखत असतातच.
मला सुरुवातीचे दिवस आठवतात. नवंनवं लग्न झालं होतं तेव्हा तो वेळीअवेळी शूटिंगला जाई, तिथून फार उशिरानं घरी येई तेव्हा माझ्या मनात बेचैनी दाटून येत असे. काळाच्या ओघात मला त्याच्या कामाचं स्वरूप कळत गेलं तसा शांतपणा आला. त्यानं अनेक चित्रपट आणि मालिकांप्रमाणेच पूर्वी अनेक नाटकांतूनही कामं केलेली आहेत. काही हिंग्लिश नाटकांतूनही तो झळकलेला आहे.
माझा गाण्याचा रियाझ, गाण्याचं शिक्षण, गाणं ऐकणं, त्यासाठीचा प्रवास किंवा चिंतन असा माझा दिवसातला बराच वेळ गाण्यात जाई. उदयनं ते सारं नीट समजून घेतलं.
   माझा अतिशिस्तप्रिय स्वभाव त्याला खटकतो. मी दौऱ्याहून घरी आले, की जिकडेतिकडे पडलेले त्याचे कपडे बघून माझा हिरमोड व्हायचा. एके दिवशी त्यानं स्वत:चे कपडे स्वत: नीट आवरून ठेवायची सुरुवात करत मला सुखद धक्का दिला. तशा त्यानं मला आतापर्यंत अनेक सरप्राइझ गिफ्ट्स दिलेल्या आहेत. मी नेमकं काय घेण्याच्या विचारात आहे, हे तो माझ्या नकळत बेमालूमपणे काढून घेत असे. ते हेरून अनेक भेटींनी त्यानं मला आनंदित केलेलं आहे. पुण्यातल्या घराच्या टेरेसवर बाग फुलवायची गोडी मला लागली. ती त्यालाही लागावी म्हणून मी त्याच्या एका वाढदिवशी त्याला तुळशीचं रोप दिलं. सुरुवातीला तो जरा खट्टू झाला. त्यानंतर मात्र तो मला इतर गिफ्ट्स न देता फक्त विविध रोपंच देत आलेला आहे. ते रोप कसलं असेल, हेच फक्त सरप्राइझ असतं. तसं तर प्रत्येक क्षणात सरप्राइझ भरून राहिलेलं असतं. आपल्याला ते कळलं पाहिजे. त्यातलं सौंदर्य टिपता आलं पाहिजे. मला जसं घरात इकडेतिकडे उगीच काहीतरी भरून टाकण्यापेक्षा मध्येमध्ये मोकळी स्पेस आवडते, तशीच ती सहजीवनातही हवीशी वाटते.
आम्ही दोघे कलावंत असलो तरी क्षेत्रं वेगवेगळी आहेत. त्यामुळे कुणीही कुणावर अतिक्रमण करण्याचा प्रश्न आला नाही. त्याच्या अभिनयाबद्दल काटेकोरपणे सांगत असले तरी मी अभिनेत्री नाही. तसंच गाण्यातलं बारीकसारीक ऐकून तो वेळोवेळी टिकेकर या नावाला जागून टीका करत असला तरी तो स्पर्धक गायक नाही. कुणीच कुणावर कुरघोडी करायचा प्रश्नच आला नाही. ‘इगो’ आड आला नाही. सखा आणि सखी या भूमिकाच सतत परस्परांना वाढविणाऱ्या ठरल्या. स्वत:तलं माणूसपण जपत, एकमेकांच्या गुण-दोषांसकट आमची कला, आमच्या संसाराची मैफल रंगत चालली आहे.