वंदना कुलकर्णी – vankulkvx@gmail.com

पुरुषी आक्रमकता या विषयाचे अनेक पैलू चर्चिले गेले आहेतच.  मुळात सगळे पुरुष कायम आक्रमक असतात का? तर नाही. करोनाच्या काळात सगळ्याच पुरुषांनी हिंसाचार के ला का? नाही.  हे मान्य असलं तरी काही महिने २४ तास सतत एकत्र राहाण्यातून पुरुषांच्या वागण्यात काही बदल दिसला का ? की आजही पुरुषप्रधान सत्ताच आपला अधिकार बजावते आहे ?  काय आहेत नवरा-बायकोंचे अनुभव ? आणि त्यातून समाजाची मानसिकता कशी प्रकट होते हे सांगणारा लेख.

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
Bacchu kadu and navneet rana
“मोठे भाऊही म्हणता, माफीही मागता, तुमच्या एवढा लाचार माणूस…”; बच्चू कडूंची रवी राणांवर बोचरी टीका
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

पुरुषी आक्रमकतेविषयी प्रसिद्ध झालेले अंजली चिपलकट्टी (११ जुलै) आणि मंगला सामंत (२५ जुलै) यांचे लेख अभ्यासपूर्ण होते, परंतु या विषयाला आणखीही काही पैलू आहेत. ते म्हणजे सर्वच पुरुष सरसकट आक्रमक होत नाहीत. सध्याच्या ‘करोना’च्या कठीण काळात सर्वच घरांमधल्या पुरुषांनी कौटुंबिक हिंसाचार केलेला नाही. आक्रमकता ही पुरुषांची सर्वसाधारण प्रवृत्ती असेल, तर काही पुरुष इतर पुरुषांपेक्षा वेगळे का वागतात? करोनाच्या पाश्र्वभूमीवर या बाजूचा आणि एकूण सध्याच्या परिस्थितीत मानवी वर्तनाला कारणीभूत असणाऱ्या काही घटकांचा विचार नक्कीच करायला हवा. निदान माझ्याकडे येणाऱ्या नवरा-बायकोच्या नात्यातील सध्याच्या प्रश्नांना समोर ठेवून तरी करायलाच हवा.

मंगला सामंत यांनी म्हटल्याप्रमाणे सध्या सुरू असलेल्या टाळेबंदीमधील शारीरिक आक्रमकता ही मानसिक स्थितीचं प्रकटीकरण आहे. काळाच्या प्रवासात स्त्री घराबाहेर पडू लागली, तरी पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत तिच्यावर अनेक मर्यादा होत्या. पुरुष मात्र त्यांचं सर्व स्वातंत्र्य घेत होते. ‘सार्वजनिक उत्सवांच्या प्रसंगीही मुलींनी रात्री उशिरा घराबाहेर पडायचं नाही; वाह्य़ात मुलांचा त्रास होतो.’ हे कारण सांगितलं जाई, पण मग त्या वाह्य़ात मुलांना घरी का बसवायचं नाही? म्हणजे कुणालाच त्यांचा त्रास व्हायला नको. असा विचार कु णीच करत नाही.  पुरुषप्रधान व्यवस्थेनं वाह्य़ात असले, तरी त्या पुरुषांनाच झुकतं माप दिलं. घराबाहेर फिरत राहणं, कोपऱ्यावर टोळक्यानं उभं राहून चहा, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन आणि त्याबरोबर चेष्टामस्करी, विनोद (‘नॉनव्हेज’?), खिल्ली उडवणं असा इतरांना कधी उपद्रवी ठरणारा, तर कधी अनुपद्रवी ‘टाइमपास’ आजही सुरू असतो. त्यांच्या कोंडाळ्यात मद्यपान, पत्ते, सहली वा इतर अनेक प्रकारचे करमणुकीचे (?) उद्योगही चालतात. स्त्रीही मिळवती झाली, तरी ‘गृहकृत्यदक्ष’ असण्याच्या तिच्याकडून असलेल्या कौटुंबिक आणि सामाजिक अपेक्षांमधून तिची कधीही सुटका झाली नाही. आजही नाही. उलट पुरुषांची जीवनशैली बहुतांशानं तशीच राहिली आहे. टाळेबंदीच्या काळातही आमच्याकडे येणाऱ्या प्रकरणांमधून (बहुतांश तक्रारीच) हेच पुढे येत आहे. व्यवधान ठेवून, जबाबदारी घेऊन काम करणं आणि सांगितलेलं तेवढं काम करण्याची मदत करणं यात फरक आहे. शिवाय करण्याची इच्छा असली, तरी किती कुटुंबांनी पुरुषांना यासाठीची कौशल्यं शिकवली? त्याचा सराव करवला? आता तर हे हळूहळू मुलींनाही लागू होत असल्यानं ‘गृहव्यवस्थापन’ हा वादाचा, भांडणाचा नवीन मुद्दा बनतो आहे.

सध्याच्या ‘करोना’ काळात बाहेर पडण्यावर मर्यादा आल्या. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे स्त्री-पुरुष घरात बंदिस्त झाले. हिंडण्यावर बंधनं आली. प्रत्यक्षातला सामाजिक संपर्क, सांस्कृतिक गरजा भागवणारे कार्यक्रम रद्द झाल्यानं विशेषत: भारतासारख्या समाजप्रिय आणि उत्सवप्रिय जनतेला अधिकच घुसमटल्यासारखं झालं. मित्रमैत्रिणी, कामावरील इतर सहकारी या साऱ्यांबरोबर प्रत्यक्ष प्रतिसादासह होणाऱ्या विविध विषयांवरच्या गप्पा, मन मोकळं करणारं हितगुज, हे सारं थांबलं. आभासी समाजमाध्यमं आणि टीव्ही, मोबाइल आदी स्क्रीन्स सुरुवातीला छान वाटले. अजूनही माणसं त्यावरच मन रमवत असली, तरी त्याला मर्यादा आहेतच. प्रत्यक्ष गाठीभेटींची मजा त्यात कशी असेल? त्यात भारतात मुळातच मर्यादित असलेला सकारात्मक स्पर्शाचा उपयोग ‘करोना’नं निषिद्ध ठरवला. त्यामुळे माणूस पाठीवर हात ठेवून दिलासा देणाऱ्या स्पर्शाला, शब्दांना वंचित झाला. त्यातच चहूबाजूंनी अस्थिरतेची आव्हानं निर्माण झाली. हा सर्व अनुभव नवीन असल्यानं ही परिस्थिती नेमकी कशी हाताळायची हेही कळत नाही. नेहमी हातात पैसे येण्याची, ते स्वत:च्या मनासारखे खर्च करण्याची वर्षांनुवर्षं सवय असलेल्या पुरुषाला आर्थिक परावलंबन पेलणं जड जातंय. आर्थिक सत्तेतून मनमानी करण्यावर प्राप्त परिस्थितीत आलेली बंधनं, नीट हाताळता येत नाहीत, मग या साऱ्या हतबलतेचा एकदम स्फोट होतो.

अनेक घरांत आपल्यासोबत राहणाऱ्या घरच्या माणसांबरोबरच मुळात संवादाचा, भावनिक, वैचारिक देवाणघेवाणीतून निर्माण होणाऱ्या सकारात्मक बंधांचा (‘बाँडिंग’चा) आपल्याकडे अभाव असतो. त्यातून तंत्रज्ञानानं प्रत्येकाचं वैयक्तिक विश्व इतकं व्यापलं आहे, की जवळ असलेल्या व्यक्तीपेक्षा कुणा दूरस्थाबरोबर आभासी बंधच अधिक निर्माण झाले, ज्यांच्याशी आता तर भेटता-बोलता येणं दुरापास्त झालं. त्यातून पती-पत्नीची व्यक्तिमत्त्वं, स्वभाव, आवडीनिवडी, सवयी, पूर्णत: भिन्न असतील, तर आता शब्दश: चोवीस तास एकत्र राहताना एकमेकांशी जुळवून घेणं अधिकच अवघड झालं. मुळातच सध्या मनासारखं वागता येत नाही; त्यात अनेक नकार ऐकावे लागत आहेत (जसं- प्रमोशन नाही, पगार कपात, नोकरी गमावण्याची टांगती तलवार, खर्चावर बंधनं आदी)  या साऱ्या वैफल्यामुळे आधीच चिडचिड होत असताना छोटय़ा वादांमधून मोठी भांडणं होतात. मतभेद, वादविवाद झाले की सोक्षमोक्ष लावायचा अशी विचारधारा असेल, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही तर मग कडेलोट होतो. ‘आधी एवढय़ा कटकटी, त्यात तुझी कटकट नको.. आधी तुझी बडबड बंद कर,’ इथून सुरू होऊन क्रमाक्रमानं वाढत जाणारी शाब्दिक हिंसा वेळप्रसंगी शारीरिक हिंसेकडेही जाते. आपल्यापेक्षा जी व्यक्ती कमजोर, हतबल, तिच्यावर राग काढणं सोपं जातं. घरातील स्त्रीची प्रतिकार करण्याची मानसिक आणि शारीरिक ताकद अनुभवलेली असेल, तर मग मुलं ‘सॉफ्ट टार्गेट’ बनतात. अनेकदा बायका भिडेखातर (घरातला तमाशा बाहेर जायला नको), संस्कारांच्या (ऐकून घेण्याच्या) दबावाखाली किंवा शारीरिक अशक्तपणामुळे विरोध करू शकत नाहीत. याची पुरेपूर जाणीव असलेला पुरुष कौटुंबिक हिंसाचार करताना मागे-पुढे बघत नाही. आपल्या ताणांचा निचरा यथायोग्य पद्धतीनं कसा करायचा याचं कुठलंही शिक्षण त्याला मिळालेलं नसतं, ना त्याला त्याची गरज वाटलेली असते. त्यामुळे एरवी मित्रमंडळींत रमून, व्यसनं करून रिचवलेला ताण, बंद घरात आपला मार्ग बदलतो.

मुलांसमोर, घरातल्या ज्येष्ठांसमोर व्यक्त होण्याला येणाऱ्या मर्यादा, जागा लहान असतील तर मोकळ्या लैंगिक संबंधांवर येणारी बंधनं, त्यामुळे होणारी कुतरओढ किंवा भावनिक स्फोटात होणारं त्याचं पर्यवसान हे सारं हाताळायला सोपं नाही. आपल्याला आपल्या भावना, व्यक्तिमत्त्व (वर्तन) ओळखणं, भावना आणि वर्तनाचं व्यवस्थापन करणं, याचं कोणतंही प्रशिक्षण आपल्या शिक्षण वा कुटुंब व्यवस्थेत दिलं जात नाही. रोजच्या जगण्यात जे ठोस असतं, ते जगणं, करणं, सोपं असतं- जशी रोजची कामं. परंतु भावना, मन ही जाणवायची गोष्ट (अमूर्त) आहे, ठोस काम नाही. आणि डोकं वा मन रिकामं असेल, आणि ते सकारात्मक पद्धतीनं कसं गुंतवायचं, सावरायचं याचं प्रशिक्षण नसेल, तर असा अनियंत्रित राग, चिंता, आपल्या वर्तनातून व्यक्त व्हायला लागते. नात्यांवर त्याचे थेट परिणाम होतात.  हिंसा हे त्याचं टोक.  सामाजिक बंधनं नसल्यानं अनेक पुरुषांना पुरुषप्रधान व्यवस्थेत, लायकी असो वा नसो, केवळ पुरुष असल्यामुळे ‘वरचं’ स्थान, मान मिळत गेला. अशा वेळी स्वत:च्या मनासारखं होण्याची, करून घेण्याची सवय झालेली असते. संयमी वर्तनाची सवय नसते. घराबाहेर, कामावर, वरिष्ठांकडून दडपशाही झाली तर तो राग, अपमान बाहेर काढण्याची ‘सुरक्षित’ (?) जागा म्हणजे घर! आपल्या मेंदूतली स्वसंरक्षण व्यवस्था स्वत:चं संरक्षणच प्रथम बघत असल्यानं, कुठं नमतं घ्यायचं आणि कुठे आक्रमक व्हायचं हे त्या यंत्रणेला बरोबर कळतं. आपला हक्क कुठे आणि कसा वाजवून घ्यायचा हे उपजतच असतं. अशा वागण्याला ‘पुरुषार्थ’ असा वर सन्मान मिळाल्यामुळे त्यात काही गैर वाटणं अवघडच. त्यामुळे सामाजिक आणि कुटुंब व्यवस्था या सगळ्या ‘पुरुषार्था’च्या संकल्पनांना खतपाणी घालतात की वेसण घालतात, यावर या पुरुषी ‘वृत्ती’ किती पोसल्या जाणार, हे अवलंबून असतं.

आक्रमक वर्तन आणि हिंसाचार हा पुरुषानं केलेला असो वा स्त्रीनं.. तो समर्थनीय नाहीच. मात्र, ‘करोना’काळात कौटुंबिक हिंसाचाराची जगभरातून येणारी जी आकडेवारी आहे, त्यामध्ये पुरुषांनी केलेल्या अशा हिंसाचाराची आकडेवारी खूपच जास्त आहे. देशा-परदेशातून आमच्याकडे येणारी प्रकरणंही बहुतांशी तशीच आहेत. अलीकडे आलेली काही प्रकरणं इथे उदाहरणादाखल नमूद करते. त्यात हिंसाचाराची कारणं दिसतील.

नोकरी करणारं जोडपं. स्त्रीची नोकरी व्यवस्थित सुरू आहे, पुरुषाची नोकरी गेली; नवीन नोकरी मिळत नाहीए. हे सहन होत नाही.

‘‘माझ्या कामाचे ताण तुला समजत नाहीत. ते समजून घेण्याऐवजी माझ्याकडून घरकामात मदतीची अपेक्षा करतेस? माझ्या आईनं माझ्या वडिलांना कधी घरकाम सांगितलं नाही; मला माझ्या आई-वडिलांनी कधी घरकाम सांगितलं नाही. आमच्या घराण्यात पुरुष असली हलकी कामं करत नाहीत.’’

‘‘मी घरातून काम करतोय, मीटिंग्ज सुरू असतात, तुला मुलांना आवरता येत नाही? किती त्यांचा दंगा आणि आरडाओरडा! आधी त्यांना आवर, मग तुझं काम कर. किती वेळा सांगितलं, तरी समजत कसं नाही तुला?’’

‘‘त्याच त्याच गोष्टींसाठी मागे लागू नकोस.  तुझ्यासाठी महत्त्वाच्या आणि अग्रक्रमाच्या असतील त्या, माझ्यासाठी नाही.’’

बायकोनं नवऱ्याला अनेक र्वष सहकार्य केलं आहे, आधार दिला आहे. ‘करोना’ काळातल्या पडझडीत तिच्या नोकरीतल्या कामाचं स्वरूप बदललं आहे. त्याच्याशी जुळवून घेण्यात तिचे जास्त तास, खूप ताकद खर्च होते. ताण असतो. नवऱ्याच्या कामावर असा कोणताही परिणाम झालेला नाही. परंतु आता बदललेल्या भूमिकेत बायकोची मन:स्थिती समजून घेऊन तिला आश्वस्त करण्याऐवजी, तिला कामाच्या तासांवरून, सतत ‘स्क्रीन’वर असण्यावरून बोलणं. तिच्याकडून प्रतिक्रिया म्हणून एखादा शब्द उलट किंवा रागात बोलला गेला, तर थेट हात उचलून मारणं.

‘‘तुझ्यामुळे नोकरी गेली. तुझी इथे नोकरी होती, म्हणून माझी तिथली नोकरी सोडून मी या गावी आलो. आता तुझी नोकरी छान चालली आहे; माझी गेली. तुला आनंदच होत असेल!’’ असं म्हणत संतापानं, असूयेनं थेट अंगावर चाल करून येणं..

आपल्या ताणांचा निचरा होण्यासाठी लैंगिक जबरदस्ती, लैंगिक क्रियांमध्ये राग काढणं, छळणं.

‘करोना’चं वैश्विक संकट असो, वा इतरही येऊ घातलेली आव्हानं.. आपण मानवता धर्म अशा अडचणीच्या, धकाधकीच्या, परीक्षा बघणाऱ्या काळातही पाळणार नाही तर केव्हा?

परंतु, आपण बघतोच, की सगळे पुरुष असे नसतात. अनेक पुरुष सौम्य, शांत, भावनिकदृष्टय़ा संतुलित, समतावादी, सहिष्णू, समजून घेणारे, ठामपणे मागे उभे राहणारेही असतात. काही स्वभावत:च तसे असतात, तर अनेक जण संस्कार, वाचन, चिंतन, अनुभवातून आलेलं शहाणपण यातून विचारी, संयमी होतात. स्वत:च्या वर्तनावर ताबा ठेवतात. अधिक सर्जनशील आणि रचनात्मक उपक्रमांत स्वत:ला गुंतवतात. आपलं आणि आपल्या कुटुंबाचं कल्याण कशात आहे, ते जाणतात.  कुटुंबात परस्परांना आधार देण्याचं, सांभाळून घेण्याचं महत्त्व जाणतात. दोघांच्या अशा प्रगल्भतेनं घराला घरपण, सुरक्षित वातावरणाची, प्रेमाची ऊब लाभते आणि एकीनं, एकमेकांच्या आधारानं, संकटाशी सामना करणं तुलनेनं सोपं जातं.

सध्या अशी अवस्था आहे की मित्रमैत्रिणी दिसत, भेटत नाहीत. हास्यविनोद नाही. गटानं चर्चा, चित्रपट, नाटक, गाणं, सहली, हे सर्व बंद त्यामुळे धमाल बंद. नित्य नूतन जगण्यासाठी आणि विविधतेसाठी आसुसलेल्या माणसाच्या बहुरंगी जगण्याच्या सर्व वाटा ‘करोना’नं अरुंद किंवा बंदच करून टाकल्या. विचार आणि भावना यांचं आदानप्रदान करण्याची नैसर्गिक ऊर्मी आणि गरज असलेल्या माणूस या सामाजिक प्राण्याला ‘करोना’नं निर्माण झालेल्या अनैसर्गिक परिस्थितीला सामोरं जाण्याचं आव्हान पेलावं लागतंय हे खरंच; पण यातूनही नवनवे पर्याय शोधणारे, विविध उपक्रम शोधून ते करणारे, त्यातून आनंद मिळवणारे, अनेक जणही आहेतच. संकटातही नवी संधी शोधणारे आहेत. यातून तावूनसुलाखून निघून स्वत:ची उन्नती साधणारेही आहेत.  वेबीनार किंवा ऑनलाइन थेट कार्यक्रम हा या काळातला सर्वाधिक वापरलेला गेलेला पर्याय आहे.  तसे आणखीही पर्याय पुढच्या काळात पुढे येतील.

हिंसाचार केवळ शारीरिक असतो असं नाही; शब्दांनीही इजा होऊ शकते. प्रेमानं आणि इच्छाशक्तीनं आपण त्यावर मात करूयात. संकटाच्या वेळी पळून जाणं, आक्रमक होणं, ही प्राण्यांची नैसर्गिक प्रेरणा आहे; पण आपण मनुष्यप्राणी आहोत. विचार करू शकतो. प्रतिक्रियेऐवजी विवेक वापरून, स्वत:च्या भावनांवर काबू ठेवून, प्रतिसाद देऊ शकतो. कुणावर हात उचलण्याची, ओरडण्याची सवय प्रयत्नांनी बदलता येते. राग आल्यावर हात उचलण्यापूर्वी थांबा. एक लांब श्वास घ्या. हिंसक विचारांच्या चक्रव्यूहाला भेदण्यासाठी शारीरिक ताकद वापरण्याऐवजी मानसिक ताकद वाढवूयात. संवादातून प्रश्न नक्कीच सुटू शकतात. एकमेकांबरोबर केलेल्या प्रेमळ, आस्थेच्या वर्तनानं ताण हलके होऊ शकतील. हिंसक विचारांचा ‘विषाणू’ नष्ट करूयात. हिंसक वर्तनाची नेहमीसाठी ‘टाळेबंदी’ करून टाकूयात!

(लेखिका वैवाहिक आणि नातेसंबंधविषयक समुपदेशिका आहेत.)