20 November 2019

News Flash

सांधेदुखीची डोकेदुखी

सांधेदुखी हा फक्त उतारवयात उद्भवणारा आजार नसून तो तरुण वयातही होऊ शकतो. मुख्य म्हणजे तरुण वयातील संधिवात हा आनुवंशिक आजार आहे.

| October 4, 2014 01:01 am

सांधेदुखी हा फक्त उतारवयात उद्भवणारा आजार नसून तो तरुण वयातही होऊ शकतो. मुख्य म्हणजे तरुण वयातील संधिवात हा आनुवंशिक आजार आहे. सर्वसाधारणपणे आढळून येणारी, उतारवयातील सांधेदुखी शरीराचे वजन पेलणाऱ्या सांध्यांमध्ये होत असल्याने वयपरत्वे हळूहळू ती वाढत जाते, मात्र दोन्ही प्रकारच्या सांधेदुखीवर उपचार म्हणजे सुरुवातीला औषधे, व्यायाम, मुख्य म्हणजे आराम हेच आहे. यासह अलीकडे सांधेरोपण शस्त्रक्रियाही रामबाण उपाय ठरू लागल्या आहेत.
सांधेदुखीने त्रस्त झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातही सांधेदुखी हा उतारवयात उद्भवणारा आजार आहे, असा अनेकांचा गरसमज आहे, मात्र तरुण वयात सांधेदुखी ज्या लोकांमध्ये बळकावते त्या लोकांना सांधेदुखी हा केवढा त्रासदायक आजार आहे, हे कळल्यावाचून राहत नाही.
सांध्याच्या पिशवीच्या आवरणाला (Synovium) जो आजार जडतो, तो तरुण वयात होणारा सांधेदुखीचा आजार आहे. सांध्यातील हाडांच्या आवरणाला (Synovium) जडणारा आजार, हा उतारवयात होणारा सांधेदुखीचा आजार आहे.
तरुण वयातील सांधेदुखीमध्ये रिन्यूमॅटॉइड (Rheumatoid), गाऊट (gout), ankylosing spondilitis सारख्या आजारांचा समावेश होतो. उतारवयात होणारा संधिवात यात Osteoarthritis हा आजार मोडतो. तरुण वयातील संधिवात हा शरीरातील बऱ्याच घटकांशी संबंधित आहे. तो बहुतांशी करून हात व पाय यातील लहान सांध्यांना व मणका यांना होतो.
 उतारवयातील संधिवात (Osteoarthritis) हा मोठय़ा सांध्यांना (Knee, Hip, Shoulder) यांना होतो व तो अर्थातच सांध्यातील हाडांच्या घर्षणामुळे होतो. तरुण वयातील संधिवात २० ते ५० वयोगटातील लोकांना होतो. मुख्य म्हणजे आनुवंशिक आजारांमध्ये तरुण वयातील संधिवाताचा समावेश होतो. तरुण वयातील संधिवाताचे लवकर निदान करून वेळेवर उपचार केल्यास त्याचे प्रमाण कमी ठेवता येते. औषधोपचार, व्यायाम, संधिवातावरील औषधे नियमितपणे वर्षांनुवष्रे घ्यायला लागतात. ती या आजाराची गरज असते. लवकर निदान व उपचार केल्यास सांध्यातील आवरणाचा आजार हाडाला इजा करत नाही व सांध्याची हालचाल बरेच वर्षे चांगली ठेवता येते. तरुण वयातील संधिवात बहुतांशी वेळा सांध्याला सूज आणते व सांधा दुखतो. हाताचे व छोटे सांधे, सकाळी आखडणे व दुखणे व दिवसभर हळूहळू सांध्यांना बरे वाटणे हे लहान वयातील संधिवाताच्या आजाराचे लक्षण आहे. लहान सांधे एकामागून एक असे दोन्ही हातांचे व पायांचे सुजणे व दुखणे हा लहान वयातील संधिवात आहे.
उतारवयातील संधिवात ५० वर्षांनंतर उद्भवतो. यात आनुवंशिकता व वजन पेलणाऱ्या सांध्यांमध्ये होत असल्याने तो हळूहळू वाढत जातो. वजन, हाडाचा ठिसूळपणा हा उतारवयातील संधिवातावर अप्रत्यक्षरीत्या परिणाम करत असतो. नियमित व्यायाम, औषधे घेऊन हा वात कमी ठेवता येतो. वजन कमी करून व वजन सांध्यावर न पडता जे व्यायाम करता येतात ते करून सांधे व स्नायू बळकट ठेवता येतात व वात लांबवता येतो. उतारवयातील संधिवात यात मुख्यत्वेकरून गुडघे, खुबे, कंबर, मान व खांदे या सांध्यांचा समावेश असतो. ते सांधे हाडातील वंगण कमी झाल्यामुळे झिजतात. ही सांधेदुखी वजन टाकणाऱ्या सांध्यांना होते. चालले की हे सांधे दुखतात, एका जागी बसले, की हे सांधे त्रास देत नाहीत.
दोन्ही प्रकारच्या सांधेदुखीवर उपचार म्हणजे सुरुवातीला औषधे, व्यायाम, आधार देणे (Splintage) व मुख्य म्हणजे आराम हाच आहे. काही काळानंतर जर हा आजार वाढला तर व औषधांचा उपयोग होत नसेल तर, दुर्बिणीच्या साहाय्याने सांध्याची सूज काढता येते अथवा इंजेक्शन देऊन सांध्याचे दुखणे कमी करता येते. पूर्णपणे खडबडीत झालेल्या सांध्यांना औषधांनी व दुर्बिणीतून केलेल्या शस्त्रक्रियेने काही परिणाम होत नाही. अशा वेळेस सांधाबदल ही शस्त्रक्रिया करून रुग्णाला पूर्ण बरे करता येते.
दुर्बिणीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया ही सांधेदुखीच्या सुरुवातीच्या आजारामध्ये उपयोगी ठरते. लॅप्रोस्कोपी जशी पोटाची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया तशीच आथ्रोस्कोपी ही सांध्याची दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. खेळामध्ये व अपघातामध्ये होणारी सांध्यातील इजा, बंध तुटणे, कुर्चा फाटणे, सूज अशा ६ ते ७ प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे केल्या जातात. संधिवातात दोन अथवा तीन प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीतून करता येतात.
वर नमूद केल्याप्रमाणे लहान वयातील संधिवात सांध्याच्या पिशवीच्या आवरणातील सुजेमुळे होतो. ती सूज अथवा सांध्यातील रोग दुर्बिणीतून काढून टाकता येतो. ती सूज कुठल्या प्रकारच्या वाताची आहे हेदेखील आवरणाचा भाग तपासणीला पाठवून ठरवता येतो. व त्यावर औषधोपचार करून तो बरा अथवा कमी करता येतो.
उतारवयातील वाताचे (Osteoarthritis) बरेच रुग्ण जर अगदी सुरुवातीच्या अवस्थेत डॉक्टरकडे आले, तर त्यांना सांध्यात इंजेक्शन देऊन (वंगणयुक्त द्रव्य) अथवा दुर्बिणीतून फाटलेली कुर्चा अथवा हाडावरील आवरणाचा झिजलेला भाग गुळगुळीत करून बऱ्याच प्रमाणात बरे करता येते. कृत्रिम सांधारोपण ही शस्त्रक्रिया बऱ्याच वर्षांपासून या रुग्णांना वरदान ठरते आहे. गोळय़ा, इंजेक्शने, व्यायाम, Splintage, तेलाचा मसाज अशा सर्व प्रकारचे उपाय करून व लागल्यास दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून जर सांध्याचा आजार कमी होत नसेल व रुग्णाला रोजची दिनचर्या करण्यास त्रास होत असेल तर सांधेबदल अथवा कृत्रिम सांधेरोपण हा उत्कृष्ट उपाय आहे. आपल्या देशात बरेच रुग्ण स्वत: पसे भरत असल्या कारणामुळे व त्यांना शस्त्रक्रियेबद्दल प्रचंड भीती असल्यामुळे, शक्यतो त्यांच्याकडून शस्त्रक्रिया टाळण्याची मानसिकता दिसून येते.
आपल्या देशात भारतीय व परदेशी बनावटीचे असे सांधे उपलब्ध आहेत. परदेशी बनावटीचे सांधे भारतीय सांध्याच्या किमतीपेक्षा दुप्पट किमतीचे असतात. हा खर्च वगळता इतर सर्व खर्च दोन्ही प्रकारांमध्ये सारखाच होतो.
परदेशी बनावटीचे सांधे गेल्या ४० ते ५० वर्षांपासून जगभरात वापरले जात आहेत. त्यामुळे ते अधिक उच्च प्रतीचे असतात व त्यासाठी लागणारी साधनसामग्रीदेखील फार अचूक व नीटनेटकी असते. आपल्याकडे बनणारे सांधे अजून काही वर्षांनंतर त्या योग्यतेचे होतील.
यशस्वितेच्या निकषावर गुडघे, खुबे, खांदे या सांध्यांची, सांधाबदल शस्त्रक्रिया सर्वाधिक यशस्वी ठरते आहे. आपल्या देशात गेली चाळीसहून अधिक वर्षे खुबे (Hip) बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केली जात आहे. गुडघेबदल शस्त्रक्रिया गेली २५ वर्षांहून अधिक वर्षे यशस्वीरीत्या केली जाते आहे. यासह खांद्यांची शस्त्रक्रियाही गेल्या १५ वर्षांपासून प्रचलित आहे.
म्हणूनच सांधेदुखीकडे दुर्लक्ष न करता वेळेवर उपाययोजना करून स्वत:चे आयुष्य सुखकर करणे शक्य आहे व तीच काळाची गरज आहे, हे विसरता कामा नये.   

First Published on October 4, 2014 1:01 am

Web Title: arthritis inflammation causes symptoms and treatments
टॅग Arthritis
Just Now!
X