News Flash

पुरुष हृदय बाई : पुरुषपणाची सार्थकता

पुरुषाच्या व्यक्तिमत्त्वात दडलेले हे अहंकार आणि अधिकार स्त्री-पुरुष संबंधातील संघर्षांचं निमित्त ठरतात

डॉ. संतोष पाठारे santosh_pathare1@yahoo.co.in

काय असतं पुरुष असणं?.. शारीरिक फरक तर असतोच, पण त्याहीपेक्षा सामाजिक आणि मानसिक फरक जास्तच. कर्ताधर्ता तूच, म्हणून अबोध निरागस मुलाचं कणखर पुरुषांत होणारं रूपांतर असो, की कुटुंबाची जबाबदारी घ्यायला हवी म्हणून मनाविरुद्ध नोकरी, लग्न करायला लागणं असो, किंवा मग त्यातून येणारा अहंकार, अधिकार असो वा उन्मादी वागणं असो. पुरुषाच्या या वेगवेगळ्या रूपांत सासरी जाणाऱ्या मुलीसाठी धाय मोकलून रडणंही सामील असतं आणि बायकोच्या जाण्यानं कोलमडून पडणंही असतं; पण अखेर कशात असते सार्थकता पुरुष असण्याची?..

‘पुरुषासारखा पुरुष असून बायकांची कामं काय करतोयस,’ असा खोचक शेरा मिळण्याच्या काळात आणि घरात मी जन्मलो नाही, ही माझ्या बाबतीत घडलेली एक चांगलीच घटना मानायला हवी. आई-वडिलांनी घरात तीन मुलींबरोबर एकुलता एक मुलगा म्हणून वेगळी वागणूक न देता, साफसफाईपासून स्वयंपाकाच्या तयारीपर्यंत सगळ्या कामांची समसमान वाटणी केल्यामुळे समाजात वावरताना अनेकदा ‘अमुक काम पुरुषांनी करायचं आणि तमुक काम बायकांनी’ असे परंपरागत संकेत मोडून काढायला मला त्रास झाला नाही. बायको गाडी चालवत असो किंवा मुली ‘आयपीएल’ची मजा लुटत असोत, दुसऱ्या बाजूला मी खुशाल ‘एफ.एम.’वर गाणी ऐकत असतो, कारण ‘गाडी चालवणं’ किंवा ‘आयपीएल पाहाणं’ ही पुरुषाची मक्तेदारी आहे आणि आपण तसे वागलो नाही तर आसपासची माणसं आपली टिंगल करतील, या विचारातून मी स्वत:ला पूर्णपणे मुक्त करून घेऊ शकलो आहे. ज्याला जी गोष्ट करण्यात आनंद मिळतो, ती त्यानं करावी, इतका साधा तर्क लावून जगता यायला हवं! या गोष्टींचा पौरुषाशी लावण्यात येणारा संबंध मला नेहमीच बुचकळ्यात टाकत आलाय. यातूनच माझं ‘पुरुष असणं म्हणजे नक्की काय?’ या प्रश्नाचं उत्तर शोधणं सुरू झालं.

पुरुष आणि स्त्री या दोन प्रजाती निसर्गानं निर्माण केल्या आहेत, त्यांना आपली आपली  वैशिष्टय़ं प्रदान केली आहेत. सहजीवन जगण्यासाठी लागणारी आवश्यक क्षमता आणि कौशल्यं दोघांकडेही आहेत. समाजात माणूस म्हणून जगताना या दोन प्रजातींमध्ये समानता असणं हे तर्कसुसंगत आहे; पण ‘तू मला मुलासारखी आहेस,’ असं मुलीला सांगून मुलाकडून करत असलेल्या अपेक्षांचं ओझं तिच्या खांद्यावर टाकणं हे जसं अन्यायकारक आहे, तसंच एखादा मुलगा खेळाच्या मैदानाऐवजी स्वयंपाकघरात अधिक रमला, जिममध्ये न जाता कथक शिकू लागला, तर त्याच्यावर बायकी असल्याचा शिक्का मारणंसुद्धा तितकंच खेदजनक आहे.

आपण पुरुष किंवा स्त्री म्हणून जन्माला आलो तरीही ज्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात आपली जडणघडण होते त्यानुसार आपलं व्यक्तिमत्त्व घडत जात असतं. आपल्या भावभावना, विचार करण्याचे दृष्टिकोन आणि आचार, हे स्त्री किंवा पुरुष म्हणून नव्हे, तर आपण माणूस म्हणून किती संवेदनशील आहोत यावर ठरत असतात. काही भावनांना, वर्तनांना लिंगाशी जोडून परंपरावाद्यांनी माणसाच्या आविष्कार स्वातंत्र्यावर जी बंधनं घातली आहेत त्यांना तोडून जगणं हे नेहमीच अवघड होत आलेलं आहे. आधुनिक युगात व्यक्तिस्वातंत्र्याचा उद्घोष सुरूअसतानादेखील यात फार बदल झालेला दिसत नाही.

व्यक्तिगत पातळीवर आपण स्त्री-पुरुष म्हणून परस्परांचा आदर करत असलो, समानतेचा पुरस्कार करत असलो, तरीही सामाजिक आयुष्यात मात्र अनेकदा स्त्री आणि पुरुष हा भेद स्वीकारून वावरणं अपरिहार्य ठरत जातं. मला याची पहिली जाणीव झाली ती शालेय जीवनात. लहानपणापासून शाळेत जायला सोबत करणाऱ्या मैत्रिणी दहावीत अचानकपणे आपला एक वेगळा ग्रुप करून आपापसात कुजबुज करायला लागल्या तेव्हापासून त्यांचं काही तरी वेगळं सिक्रेट असणार हे लक्षात आलं. आम्ही मुलगेसुद्धा मॅटिनीचे इंग्रजी सिनेमे या मैत्रिणींच्या नकळत पाहू लागलो. पुरुषांचं एक स्वतंत्र विश्व असतं आणि त्यात स्त्रियांना सहजासहजी प्रवेश नसतो याची चाहूल शाळेच्या अखेरच्या वर्षांत लागली. कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणींचा एकत्र घोळका असला तरीही जर ‘खास’ गप्पा करायच्या असतील तर आसपास मैत्रिणींपैकी कोणी नाही ना, याची खात्री करून घेतली जायची.

आम्ही सर्व मित्रमैत्रिणींनी एकत्र शिक्षण घेतलं. काही मैत्रिणींनी आमच्यापेक्षाही अधिक टक्के  मिळवले. तरीही शिक्षण संपल्यानंतर आम्हा मित्रमैत्रिणींना समाजमान्य चाकोरीच्या बाहेर पडता आलं नाही. ‘टी.वाय.’च्या वर्गात प्रथम आलेल्या माझ्या एका  मैत्रिणीनं उच्च शिक्षण घेण्याचं नाकारलं तेव्हा माझ्या मनात धस्स् झालं होतं. एका वर्षांच्या आत आई-वडील आपलं लग्न करून देणार आहेत, हे कळल्यानंतर त्यांच्या निर्णयाला विरोध करण्याचं धाडस नसल्यामुळे संसाराच्या गाडय़ाला जुंपण्याआधी मनसोक्त जगून घेण्याची इच्छा मात्र तिनं पूर्ण करून घेतली. बुद्धिमत्ता असून शिक्षण थांबवणाऱ्या माझ्या या मैत्रिणीबद्दल जेवढी सहानुभूती त्या वेळी माझ्या मनात निर्माण झाली, तेवढीच अनुकंपा घरच्यांच्या आग्रहामुळे इच्छा

व कुवत नसूनही ‘एमएस्सी’ करणाऱ्या माझ्या दोन मित्रांबद्दल मला वाटली होती. पुढे काही विद्यार्थ्यांनासुद्धा अशाच परिस्थितीमधून जाताना पाहिलं. गावाकडे राहणाऱ्या दादा-दादी आणि  बडे पापा यांच्या आग्रहाखातर मुंबईत शिक्षण सुरूअसतानाच लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या माझ्या काही विद्यार्थ्यांचे केविलवाणे चेहरे मला आठवतात. घरातील मोठा मुलगा म्हणून त्यांना मन मारून, ठरवलेलं करिअर सोडून,घर-संसाराची जबाबदारी उचलण्यासाठी नोकरीच्या घाण्याला जुंपून घ्यावं लागलं होतं. आयुष्याची सोनेरी स्वप्नं पाहाणाऱ्या स्त्रीच्या वाटय़ाला जसं ‘द ग्रेट इंडियन किचन’ येतं तसंच पुरुषाच्या वाटय़ालासुद्धा अनेकदा नकोशी वाटणारी ‘नोकरी’ येते.

पुरुषांच्या बाबतीत आणखी एक गोष्ट. बाहेरच्या जगाबद्दल कुतूहल निर्माण होत असताना घरात घडलेली एखादी अप्रिय घटना- विशेषत: मृत्यू, अबोध वयातील निरागस मुलाला कणखर पुरुष बनवून टाकते. परवाच एक जवळचा मित्र ‘करोना’नं अत्यवस्थ होता. त्याच्यासाठी रक्ताची आणि इंजेक्शनची जुळवाजुळव करणाऱ्या त्याच्या सतरा वर्षांच्या मुलाची तारांबळ पाहाताना मला माझ्या वडिलांच्या मृत्यूची रात्र आठवली. आपण घरातील एकटे पुरुष आहोत, आई आणि बहिणींना धीर देणं, ही आपली जबाबदारी आहे, आपल्याला रडून चालणार नाही, असं त्या रात्री मी स्वत:ला किती तरी वेळा बजावलं होतं, त्याची आठवण झाली. त्या एका क्षणानं मला कणखर बनवलं होतं. इथे मला अपरिहार्यपणे सत्यजित राय यांच्या लहानग्या अपूची आठवण होते. लाडक्या बहिणीच्या, दुर्गाच्या मृत्यूनंतर नकळतपणे त्याच्यात आलेली प्रगल्भता त्यांनी किती मोजक्या प्रतिमांमधून टिपली आहे. हा अपू प्रत्येक पुरुषाला आयुष्याच्या एका वळणावर भेटतोच. मला आणि माझ्या मित्राच्या मुलाला तो अगदी कोवळ्या वयात भेटला. कोणताही अभिनिवेश न दाखवता कुटुंबाची जबाबदारी  स्वत:च्या अंगावर घेणं, आपल्या इच्छांना, आकांक्षांना मुरड घालून कणखरपणे आलेल्या परिस्थितीला सामोर जाणं म्हणजे पुरुष असणं का? कदाचित हा पुरुषाच्या स्वभावाचा एक कंगोरा असावा. आपण कुटुंबाचे कर्तेधर्ते झालोत, या भावनेतून येणारा अहंकार आणि अधिकार ही त्याची अजून दुसरी टोकं!

पुरुषाच्या व्यक्तिमत्त्वात दडलेले हे अहंकार आणि अधिकार स्त्री-पुरुष संबंधातील संघर्षांचं निमित्त ठरतात. या दोन भावना म्हणजेच जणू पुरुषार्थ! आयुष्यभर असा पुरुषार्थ मिरवताना त्याच्यातील हळवेपणा व्यक्त होण्याचे प्रसंगसुद्धा येतच राहातात. एरवी कठोर वागणारा बाप मुलीला सासरी पाठवताना धाय मोकलून रडतो. बायकोला आपल्या धाकात ठेवणारा नवरा तिच्या मृत्यूनंतर कोलमडून जातो. याच्या उलट पतिनिधनानंतर अनेक स्त्रिया मुलांच्या पालनपोषणासाठी खंबीरपणे उभ्या राहाताना दिसतात, पण पुरुषाला मात्र त्याच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भरून काढणं सहजासहजी शक्य होत नाही.

कणखरपणा आणि हळवेपणा या दोन टोकांच्या भावनांमध्ये वावरणाऱ्या पुरुषामध्ये आणखी एक भावना प्रबळ होताना दिसते, ती असते उन्मादाची. हा उन्माद वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रकट होत असतो. पुरुषात निर्माण होणाऱ्या या उन्मादाचं क्रूर दर्शन निष्ठा जैनचा ‘गुलाबी गँग’ हा माहितीपट पाहाताना झालं होतं. संपतबाईंच्या (संपत पाल) कारकीर्दीवर आधारित हा माहितीपट ट्रोम्सोच्या (नॉर्वे) आंतरराष्ट्रीय महोत्सवात दाखवला गेला होता. यातील एका प्रसंगात आपल्या बायकोचा गळा दाबून खून करून नंतर तिला जाळून तिचं प्रेत स्वयंपाकघरात टाकणाऱ्या नराधमाला पाहाताना अंगावर काटा आला होता. माझ्याबरोबर असलेल्या सर्बियाच्या ज्युरी मैत्रिणीनं ‘पुरुष आपल्या पत्नीबरोबर इतक्या निर्घृणपणे वागतात?’ असा प्रश्न विचारला, तेव्हा आपण पुरुष असल्याची लाज वाटली होती. असहाय्य महिलेवर बलात्कार करणाऱ्या, लहान मुलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या पुरुषाची नेमकी मन:स्थिती काय असेल, याचा अंदाज करणं कठीण होऊन जातं. ‘निर्भया’सारखी प्रकरणं पुरुष इतका हीन पातळी कसा  गाठू शकतो, याचा वारंवार विचार करायला लावून अस्वस्थ करतात.

या उन्मादाचा एक आविष्कार होतो शारीरिक आकर्षणातून. या आकर्षणाच्या किती विविध तऱ्हा! पौगंडावस्थेत निर्माण झालेलं हे आकर्षण पुरुषाबरोबर जन्मभर सोबतीला राहातं. मात्र या नैसर्गिक आकर्षणाच्या पलीकडे पुरुष भावनिकरीत्या एखाद्या व्यक्तीमध्ये गुंतू शकतो हे अनेकदा मान्य केलं जात नाही. त्यानं निकोपपणे केलेल्या स्पर्शाला या आकर्षणाची किनार असणार असा अर्थ गृहीत धरला जातो. पुरुष त्याच्या मनातील भावना एखाद्या मित्राजवळ मोकळेपणानं बोलतो किंवा त्याच्या आवडत्या विषयावर सहकारी मैत्रिणीबरोबर चर्चा करतो, त्या वेळी त्या मित्र किंवा मैत्रिणीबरोबर त्याचे जुळून येत असलेले अनुबंध हे शारीरिक आकर्षणाच्या पलीकडचे असतात, हे समजून घेण्याची प्रगल्भता त्याच्या जवळच्या माणसांमध्ये असायला हवी. पुरुषपणाची कसोटी अशा प्रसंगांमध्ये लागते.

मुलगा, प्रियकर, नवरा अशा वेगवेगळ्या अवस्थांमधून जाताना पुरुष ‘बाप’ या भूमिकेवर स्थिरावतो. तिथे हळवेपणापेक्षा कणखर आणि कठोर वागणं त्याला क्रमप्राप्त होतं. मुलगा म्हणून वावरताना मला माझ्या वडिलांनी घेतलेले निर्णय कधीच मान्य झाले नाहीत. त्यांच्या-माझ्या वयात असलेलं दोन पिढय़ांचं अंतर हे कदाचित त्यामागचं एक प्रमुख कारण असू शकतं; पण त्यांच्या जाण्यानंतर मात्र ज्या-ज्या परिस्थितीत त्यांनी जे निर्णय घेतले असते, तेच निर्णय माझ्याकडून घेतले गेले, तेव्हा बापपणाचं हे वर्तुळ पूर्ण झाल्याचा अनुभव मी घेतला. तो एका कवितेतून व्यक्त केला-

मनाच्या एका कोपऱ्यात

तो अजून बसला आहे,

वंशपरंपरेने विणलेल्या खुर्चीत

ठाण मांडून..

युगानुयुगाचं जोखड त्याच्याही

होतंच खांद्यावर..

उजाडताच तो घराबाहेर पडायचा घेऊन,

दिवेलागण होऊन गेल्यावर

परतायचा थकून भागून..

पण नजरेतील जरब

ताजीच राहायची, पापण्या मिटेस्तोवर..

घरभिंतीपेक्षा मोठय़ा भासायच्या

त्याच्या अस्तित्वाच्या खुणा..

त्याच्या करडय़ा सावलीखाली

झाकून जायची,

आईची मायाळू लगबग..

चिडीचूप होऊन जायचं

तिचं गजबजलेलं गोकुळ..

तो झाला नाही आमचा मित्र,

कधीच त्याने घातला नाही

गळ्यामध्ये गळा

दोन चार लाफे लगावले प्रसंगी,

त्यातूनच व्यक्त व्हायचं

त्याचं प्रेम-त्याचा लळा..

तो बाप होता,

बापासारखा जगला..

गेल्यानंतर माझ्यामध्ये

बाप बनून उरला..

पुरुषपणाच्या सार्थकतेचा माझा शोध अजून सुरूच आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2021 12:05 am

Web Title: article about different forms of manhood habits that change boys into men zws 70
Next Stories
1 मावशी!
2 ‘माँ’सी
3 एक जाणता विणकर पक्षी!
Just Now!
X