22 July 2019

News Flash

नदी वाहते.. अस्वस्थ करते..

शोधाची सुरुवात झाली. एखाद्या गोष्टीचा शोध घ्यायचा म्हणजे शोध घेणारी माणसे मिळावी लागतात.

(संग्रहित छायाचित्र)

संदीप सावंत

नदी शाश्वत विकासासाठी महत्त्वाचा स्रोत आहे आणि नैसर्गिक देणगीही. तिचं समुद्राशी, आकाशाशी, पावसाशी एक सूत्र आहे. पण माणसाने आपल्या गरजांसाठी निसर्गालाच वेठीस धरले आहे. नदीचं वाहत राहणं माणसाच्या जगण्याशी थेट संबंधित आहे, हे लक्षात घेऊन तिला वाचवण्याचे अनेक प्रयोग होत आहेत. ‘श्वास’ चित्रपटाचे संवेदनशील दिग्दर्शक संदीप सावंत यांनी म्हणून हाच विषय घेऊन सर्वागसुंदर चित्रपट तयार केला, ‘नदी वाहते’. नदी वाचवण्यासंदर्भातील विधायक कृतीं लक्षात घेण्यासाठी १४ मार्च  हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो. ‘नदी वाहते’ या चित्रपटाच्या निमित्ताने नदीच्या अनुभवांवरचा हा लेख.

नदी या विषयासंदर्भात काहीतरी ठोस करायचं असं अनेक दिवस डोक्यात होतं. पण नेमकं काय याचा अंदाज काही येत नव्हता. नदीची पुस्तकी व्याख्या शाळेत पाठ झाली होती. पण नदी म्हणजे काय? नदी वाहते म्हणजे नेमकं काय होतं? नदी लुप्त कशी होते? असे अनेक प्रश्न समोर उभे राहात होते. त्यासंदर्भाने जे मिळेल ते वाचायला सुरुवात केली. वाचनाला ठरावीक दिशा ठेवली नव्हती. त्यातून असंख्य मार्ग निर्माण होत गेले. प्रत्येक मार्गाची चाचपणी सुरू झाली, काही जणांशी चर्चा होवू लागली. तेव्हा एक गोष्ट जाणवू लागली ती म्हणजे नदी गावातून, गावांमधून वाहते. म्हणजे झाडं, प्राणी, पक्षी आणि माणसांमधून वाहते. नदीचे जगणे, वाहत राहणे हे तिच्या काठावर अवलंबून आहे.

शोधाची सुरुवात झाली. एखाद्या गोष्टीचा शोध घ्यायचा म्हणजे शोध घेणारी माणसे मिळावी लागतात. शोध घेणे ही त्यांची गरज असायला हवी. शोध घेताना न थांबता, न घाबरता पुढे जाणे महत्त्वाचे असते. भावभावनांच्या पलीकडे जाऊन काम करणे आवश्यक असते. पण ते तेव्हाच होऊ शकते जेव्हा माझे नदीच्या प्रवाहाशी अतूट नाते असते.

अनेक विचारांचं थमान सुरू झाले होते. मनामध्ये काही रचना सुरू झाल्या. त्यात एका मुलीची आणि नदीची मत्री दिसली. दोघी बोलतात एकमेकींशी. नदीला जाऊन भेटायचे असते समुद्राला; आणि मुलीला? तिला कोणाला भेटायचे असते? हा प्रश्न खूपच अस्वस्थ करणारा होता. वाचन सुरू होतेच, नदी काठाने माणसांना भेटणे सुरू झाले. नदीच्या घनदाट परिसरामधून, कधी पात्रामधून, कधी काठाने, कधी तिच्या अस्तित्वाचा मागोवा घेत, कधी दिसत नसली तरी तिच्यासोबत जाणे सुरू झाले.

एकदा मेघा आणि चित्रा नावाच्या दोन लहान मुली आमच्यासोबत नदीच्या परिसरात हिंडायला आल्या होत्या. त्यांना नदीत डुंबायचे होते. ज्या क्षणी त्यांना नदीचा कानोसा लागला, त्या धावत सुटल्या. कधी नदीत शिरल्या कळलेही नाही. तिथे लक्षात आले, की जिनं हे अंतर्बाह्य़ अनुभवलं आहे ती नदी कशी सोडेल? माहेरच्या आठवणींनी गलबलून जाण्यापेक्षा नदीच्या काठावरच ती राहणार नाही का? त्या मुलीला हे वाटणे, स्वत:च्या आशा-अपेक्षा, उद्दिष्टे तिला तिथेच साकाराविशी वाटणे यात नवल काय? पण त्यासाठी नदी वाहती राहायला हवी हे मात्र निर्वविाद! मात्र आता गोष्ट मुलीची होणार की नदीची? हा प्रश्न खूप महत्त्वाचा होता. बघूया कोणाची होते. प्रक्रिया सुरू होतीच..

नदीच्या अभ्यासकांबरोबर फिरताना नदीची अनेक रूपं पाहिली. काही ठिकाणी झालेली प्रचंड जंगल तोड. त्यामुळे डोंगरावरून तसेच आजूबाजूच्या प्रदेशातून वाहून आलेल्या मातीमुळे आकुंचन पावलेली नदी. रत्नागिरीत कोळथरे येथे मोने गुरुजी भेटले. समोरचा एक मोकळा भाग दाखवून ते म्हणाले, ‘पूर्वी इथून नदी वाहत असे.’ ते चित्र भयावह होते. कुडाळला फक्त एका नजरेत शेताचे वय सांगणारा आप्पा भेटला. धो धो पावसात पाण्याखाली जाणारं घर न सोडणारे विस्थापित नाना पाहिले. ‘जियेंगे तो और भी लढेंगे’ असं सांगणारे  देशमुख अमरावतीमध्ये भेटले. प्रचंड इच्छाशक्ती आणि नदीविषयीची दूरदृष्टी असणारे भंवरलालजी जैन अनुभवले. सतत कार्यरत असणारे शेतकी अधिकारी हेमंत तांबे, गजेंद्र पौनिकर मित्र झाले. कृषीपर्यटन केंद्र उभारण्यासाठी धडपडणारे समीर साळवी, सचिन कारेकर, नित्यानंद झगडे जवळून पाहिले. शेती व निसर्ग यांना अचूक मोजमापात आणणारा बापू भोगटे भेटला. शेतावर काम करून नंतर सायकलने शाळेत येणारी मुलं/मुली भेटली. पश्चिम घाटाच्या पायथ्याशी अनेक गावांमध्ये फिरताना प्रसाद देवधरला ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’च्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी अखंड प्रयत्न करताना, स्वत:चा दृष्टिकोन सबळ करताना पाहिलं. नदी वाचवण्यासाठी जिवाची पर्वा न करता लढणाऱ्या राजेंद्र केरकरांसोबत नदी, जंगल फिरलो. तर दुसरीकडे पर्यावरणाचा प्रचंड अभ्यास असणारे माधवराव चितळे यांच्याशी माझा संवाद कायम सुरूच होता. पाणी प्रश्नांवर काम करणारे पोपटराव पवार, राजेंद्र सिंह यांच्याशी महत्त्वाच्या चर्चा झाल्या होत्या. अशा शेकडो गोष्टी, अनुभव, संभ्रम यातून मार्ग काढणे सुरू होते..

गेल्या ३०-४० वर्षांमध्ये शेती व शेतीपूरक व्यवसायापासून माणूस दुरावला. पोटापाण्यासाठी शहराकडे वळू लागला किंवा इतर मार्ग शोधू लागला. त्यामुळे नदीकडे दुर्लक्ष झाले. तेव्हाच तिच्या दुर्दशेला सुरुवात झाली.

या प्रवासात नदीच्या काठावर, तिच्या अनुषंगाने नव्यानं प्रयत्न करणारी, नदीपासून दूर गेलेली, काहीच प्रयत्न न करणारी, नदीचा दुरुपयोग करणारी अशी अनेक मंडळी भेटू लागली. पण असे लक्षात येऊ लागले की खूप कमी प्रमाणात का होईना नदीच्या काठावर पुन्हा एकदा कोणीतरी उभं राहताना दिसत होतं. नदीच्या पाण्याचा योग्य उपयोग कसा करायचा त्यासाठीचे प्रयत्न करताना दिसत होते. यासगळ्यातून समजत होतं, की नदीच्या काठावर पुढच्या काळात तरुणांकडून प्रयोग होण्याची शक्यता जास्त आहे. हा प्रवास दीर्घ आणि संघर्षांचा असणार यात शंका नाही. पण तो करावा लागणार. नदीचं वाहत राहणं हे काठ किती सक्रिय आहे यावरच अवलंबून राहणार यात शंका नाही.

आता माझ्या चित्रपटाचा उद्देश, हेतू मिळणे सुरू झाले होते. नदीच्या पाण्याचा योग्य प्रकारे उपयोग करणे, तिची परिसंस्था टिकवणे. यासाठी काठावरील माणसांना नदीची गरज भासली पाहिजे. त्यांचे जगणे नदीवर अवलंबून असायला हवे. त्यासाठी काय करायचे हा प्रश्न त्यांना सतत पडत राहायला हवा. चित्रपटाचा मार्ग दिसण्यास सुरुवात झाली होती..

इथं एका महत्त्वाच्या निर्णयाला मी आलो. पटकथा संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये काय करायचे नाही हे ठरवावे लागते. ते असे, की एका गावातून एक नदी वाहते. नदीवर काहीतरी संकट येते. गावातले ती आणि तो एकत्र येतात. हे दोघं आधीपासून एकमेकांच्या  प्रेमात असतात. गावकरी त्यांच्यासोबत येतात आणि लढा दिला जातो. सगळे मिळून जिंकतात. हिरो-हिरोइन एकत्र येतात. आणि जय जयकार! असा चित्रपट करायचा नाही, हे नक्की होते.

शालेय शिक्षणामध्ये प्रश्नोत्तरे पाठ करण्यापलीकडे अशा पर्यावरणविषयांना कोणी महत्त्व देत नाही. नदी जीवनदायिनी आहे हे लक्षात घेतलं जात नाही.

जीवनावश्यक वस्तूंच्या आपल्या गरजा आणि प्राधान्यक्रम बदलला आहे. कोणी काहीही म्हणाले तरी नदी, शेती, शेतीपूरक उद्योगांना पर्याय नाही यावर विश्वास असणारी अनेक पात्रे या संशोधनाच्या प्रवासात विविध रूपात मिळत गेली आणि गुरुजी, भाऊ, प्रकाश, तुकाराम, मंगेश, अनघा, अनघाची आई, आप्पा, आकाश अशा नावाने पटकथेमध्ये सामील झाली. इतर पात्रंही याच प्रवासात मिळाली.

इथे खूप महत्त्वाची बाब माझ्या लक्षात आली, ती म्हणजे चित्रपटाचा भौगोलिक अवकाश आता नक्की होणे गरजेचे आहे. त्याशिवाय पटकथेचा प्रवास पुढे सुरू होऊच शकत नाही. कारण त्यांची नावं, व्यवहार, सवयी, पीकपद्धती, सामाजिक रचना तसंच नदीचं स्वरूप, तिचा रंग-पोत, आवाका, वेग, गूढता आणि कल्पनेपलीकडील सौंदर्य इत्यादींवरच पटकथा अवलंबून असणार होती. आम्ही ठरवलं, की कोकण वा गोव्यातील नदी जी उगमापासून पस्तीस-चाळीस गावांतून वाहते आणि समुद्राला मिळते ती आपली नदी. या नदीच्या काठाचा परिसर, पश्चिम घाटाच्या पायथ्याचा भाग हाच आपल्या चित्रपटाचा भवताल.

पटकथेची प्रक्रिया म्हणजे शोधच असतो. नदीशी जोडणारा शेतीपूरक उद्योग, नवी माणसं, शेतजमीन आणि अजून खूप काही शोधणारी आपली पात्रे. तसेच नदी वाहताना तुम्हाला विचारून वाहत नाही. तिचा मार्ग निसर्गातील असंख्य घटनांवर, प्रसंगांवर अवलंबून असतो. शोधण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक प्रयत्नांचे, प्रश्नाचे उत्तर मिळतेच असे नाही. काही वेळेला थोडय़ा अवधीने मिळते. कधी खूप उशिरा मिळते. पटकथेने हळूहळू शोधाच्या प्रक्रियेचे स्वरूप घ्यायला सुरुवात केली होती. जिला गोष्ट आहेसुद्धा आणि नाहीसुद्धा अशा मार्गावरून तिचा प्रवास सुरू झाला होता. तारेवरची कसरत सुरू झाली होती. या सगळ्या प्रक्रियेने मी अंतर्बाह्य़ थरारून गेलो होतो.

अनेक विषयांवरील ग्रामसभा, जनसुनावण्या, त्यासंदर्भातील गावागावांत होणाऱ्या सभा जवळून पाहिल्यावर, चर्चा केल्यावर लक्षात आले, की नदीवर किंवा कुठेही मोठे प्रकल्प येतात तेव्हा निर्माण होणारा संभ्रम, भीती, अस्थिरता, चिंता, संशय याचे प्रचंड मोठे ढग डोक्यावर येतात. पण भविष्यात या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन सामान्य माणसाला उभे राहावे लागेल. तिथेच राहून स्वत:चे मार्ग शोधावे लागतील. सत्य-असत्याचा विवेकाने विचार करून पर्याय शोधावे लागतील. हा पटकथेचा ‘सबफोकस’ बळकट होवू लागला. यासाठी सतत काम करत रहाणे, प्रयत्नशील असणे म्हणजेच शोध सुरू राहाणे या विचाराला बळकटी मिळाली.

पर्यावरण अभ्यासक संदीप जोशी एकदा मला म्हणाले होते, की राजकीय अनास्था हेसुद्धा महत्त्वाचे कारण आहे. शहरातून, गावातून वाहणाऱ्या नदीच्या परिस्थितीवर त्या भागाचे आरोग्य, स्वास्थ्य, स्वरूप अवलंबून असते. त्याकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. त्यासाठी नदीविषयक कायदे जनसामान्यांना अगदी सहज माहीत व्हायला हवेत. इतर देशात यासंदर्भात काय प्रयत्न झालेत तेही सर्वाना कळणे गरजेचे आहे.

पटकथेच्या, दिग्दर्शनाच्या प्रक्रियेमध्ये का? आणि पुढे काय? हे दोन खूप महत्त्वाचे प्रश्न असतात. कोणत्याही शोधण्याच्या वाटेवर हे दोन प्रश्न तुम्ही नेमके कुठे जात आहात, अजून पर्याय हवेत, खूप प्रयत्न करण्याची गरज आहे अशा असंख्य गोष्टींचे भान तुम्हाला देत असतात. किंबहुना तुम्हाला जमिनीवर ठेवत असतात. पटकथा आता शोधाची होते आहे याची जाणीव मला होवू लागली. ती फक्त नदीची, एका मुलीची गोष्ट न राहता ती सर्वाची होत होती. माझ्यासाठी ही खूप महत्वाची प्रक्रिया होती. नदी हे त्यातील एक पात्र होते. आता थेट विषयाला भिडणं सुरू झालं होतं. नदीचं वाहतं राहणं माणसांच्या जगण्यासाठी गरजेचं होतं.

या सर्व प्रक्रियेमध्ये माझा लेखक आणि दिग्दर्शक म्हणून प्रवास समांतर चालू होता. कधी एकत्र तर कधी एकटय़ाचा अवलंबून आहे. पटकथा त्यांच्या म्हणजेच काठावरील माणसांच्या जगण्यातून, प्रयत्नांमधून, यशापयशांमधून पुढे सरकत होती.

एक गोष्ट प्रमुख्याने जाणवत होती, ती म्हणजे प्रचंड घडामोडी, नाटय़, संघर्ष कुठेतरी आतमध्ये सुरू होताच. आणि चित्रपट त्याचं ‘एक्सप्रेशन’ (प्रतिबिंब) असण्याची गरज निर्माण होत होती. प्रचंड संघर्ष, घडामोडी यापेक्षा नदीला प्रवाही ठेवण्यासाठी, ‘एकवीस अपेक्षित’ पठडीतील प्रश्नोत्तरांपेक्षा जास्त वैचारिक क्षमतेची गरज प्रकर्षांने जाणवत होती. कारण नदीचे संवर्धन करण्यासाठी वैचारिक क्षमता असणे गरजेचे आहे.

सादरीकरणामध्ये चित्रपट फक्त वास्तववादी नसून त्याला कवितेची लय, भास आहे हे विसरून चालणार नव्हते. नदी एक सुंदर नाद, लय, आभास, अवकाश निर्माण करते. आता हळूच का होईना चित्र आणि आवाजाची लय सापडू लागली होती. नदी चालते, धावते, उसळते, शेजारी येवून बसते, कधी आवाज न करता तर कधी अलगद. मजा येत होती. संशोधन, लोकेशन्स (चित्र आणि आवाज) आणि पटकथा यांचा प्रवास बरोबरीनेच सुरू होता. म्हणूनच ते शक्य होत होते. या प्रक्रियेमध्ये एक वेळ येते जेव्हा तुम्ही चित्र-आवाज एकत्र, तसेच फक्त आवाज जो चित्र निर्माण करतो हे अनुभवायला सुरुवात होते. भर दिवसा झाडाचं पिकलं पान नदीच्या पाण्यात पडतं, तो आवाजही स्पष्ट ऐकू येतो. चित्रपट करण्यातील अजून सुंदर ‘फेज’ कोणती असणार?

‘नदी वाहते’ या चित्रपटाच्या निमित्ताने शहरातील नद्या जवळून बघण्याची संधी मिळाली. तासभर नदीतून फेरफटका मारल्यावर हिला नदी का म्हणायचे? असा प्रश्न उभा राहिला होता. घाण आणि दुर्गंधी. जगणं अशक्य झालं होतं. याच नद्यांच्या काठावर शहरं वसली आहेत. शहरात पिण्याचं पाणी कोणत्यातरी नदीवर बांधलेल्या धरणातून येते. त्यामुळे आपल्या शहरातील नदीत घाण, कचरा, रसायनं टाकल्यामुळे काहीच फरक पडत नाही. लहानांपासून थोरांपर्यंत ही सवयच आपल्याला लागली आहे.

नदीच्या संदर्भात नदीतील विविध प्रकारचे प्रदूषण, नदीचे लुप्त होणे, नदीवरील अतिक्रमण, धरणांचे प्रश्न, विस्थापितांचे प्रश्न यासंदर्भात खूप लिहिलं-बोललं जातं.

पण त्याचबरोबर ज्या नद्या काही प्रमाणात जिवंत आहेत, वाहत्या आहेत त्या वाचवण्यासाठी नदीचे काठ पुन्हा एकदा सक्रिय होणं गरजेचं आहे. ही जाणीव आज अनेक तरुणांमध्ये दिसून येते. जिथे जिथे काठावरील माणसे नदीपासून दूर गेली किंवा निष्क्रिय झाली तिथे तिथे नदीची अवस्था बिकट झाली. आज नदीच्या पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याची सुरुवात कुठेतरी व्हायला हवी. मुळात नदी हा शाश्वत विकासासाठी महत्त्वाचा स्रोत आणि नैसर्गिक देणगी आहे. तिचं समुद्राशी, आकाशाशी, पावसाशी एक सूत्र आहे. आज माणसांच्या गरजांना मर्यादा उरल्या नाहीत. त्यासाठी आपण निसर्गावर किती अवलंबून रहायचे? म्हणजे त्याला किती वेठीस धरायचे ते ठरवावं लागेल. आता नदीच्या पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करायचा म्हणजे नेमकं काय?

त्याच शोधाचा हा चित्रपट आहे, ‘नदी वाहते’..

First Published on March 16, 2019 1:16 am

Web Title: article by director sandeep sawanton river