28 September 2020

News Flash

आभासी जाळ्यातलं बाल्य

आणखी एक गोष्ट लक्षात आली, की मोकळ्या तासांच्या वेळी किंवा मधल्या सुट्टय़ांमध्ये मुलं याच विषयांवर चर्चा करत असतात.

(संग्रहित छायाचित्र)

मेघना जोशी

शाळांना उन्हाळ्याच्या सुट्टय़ा लागल्या की पूर्वीच्या आईवर्गासमोर प्रश्न असायचा आमच्या मुलांना घरी कसं अडकवून ठेवायचं, तर आत्ताच्या काळात मात्र मुलांना खेळासाठी घराबाहेर कसं काढायचं, असा यक्षप्रश्न पडतो आहे. मोबाइलचं, विशेषत: स्मार्टफोनचं सहज उपलब्ध असणं या मुलांना एकाकी तर बनवत आहेच, परंतु आभासी जगात नेत शरीर आणि मनावर घातक परिणाम करत आहे, व्यसनी बनवत आहे. सेल्फीची क्रेझ, इयत्ता सातवी-आठवीपासूनच गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड असणं, त्यातून सुरू होणारं चॅटिंग, फोटोज्चं शेअिरग आणि पुढे घडणाऱ्या अपरिहार्य घटना.. हा प्रश्न आता अधिक गांभीर्याने आणि तितक्याच संवेदनशीलतेने हाताळायला हवा..

‘‘आमच्या बाबूवर तुम्ही असे आरोप करूच नका. हे बघा, बाबू अभ्यास करत नाही, मस्ती करतो, मारामारी करतो वगरे वगरे सगळं म्हणजे अगदी सगळं मान्य आहे मला, पण त्याच्या मोबाइलच्या वापराबाबत काहीही बोलायचं नाही तुम्ही. कारण बाबू पूर्ण दिवसांत फक्त एक तास मोबाइल वापरतो, तोसुद्धा मी समोर असताना. तो फक्त गेम खेळतो हो, बाकी कोणत्याही वाईट कामासाठी नाही वापरत तो मोबाइल. तुम्ही सगळे शिक्षक त्याला पाण्यात का पाहता समजतच नाही मला?’’ आजूबाजूच्या कोणालाही ‘ब्र’ काढू न देता बाईंनी आपली जीभ सल सोडली होती..

‘‘शत्रुत्व कसलं, का असणार? तुमचा मुलगाच एका मुलीकडे तिचा मोबाइल नंबर मागत होता. त्याबाबत तिच्या पालकांची तक्रार आली म्हणून तुम्हाला बोलावलं, एवढंच.’’ समोरची पोरसवदा शिक्षिका बचावाच्या पवित्र्यात म्हणाली. पण त्या बाईंना मुलावरचा मोबाइलबाबतचा आरोप ठार अमान्य होता. ‘‘सातवीतलं पोर ते, ते कसलं मागतंय नंबर कोणाचा आणि त्यातून काय घडणारेय?’’ त्यांचा दुसरा युक्तिवाद हजर होता. ‘‘बरं, सोडून देतो तुमच्या मुलाला. पण उद्या काही वावगं झालं तर परत शाळेकडे यायचं नाही.’’ उपस्थित शिक्षकांचा प्रतिवाद. आमच्या शाळेच्या कार्यालयात घडलेला हा प्रसंग, शिक्षक आणि पालकांमधला. हे असे प्रसंग शालेय सुट्टीच्या नांदीच्या दिवसातच सातत्याने घडायला लागले म्हणूनच त्यातलं गांभीर्य संवेदनशीलतेनं हाताळायला लागणार हेही जाणवलं.

एका शाळेची  मुख्याध्यापिका या नात्याने शाळेत गेल्या काही दिवसांपासून माझ्यासमोर दररोज साधारणत: एक-दोन तरी अशा प्रकारची प्रकरणे येत आहेत. त्यामध्ये कळत-नकळत मुलांच्या हातात जाणाऱ्या मोबाइलचा संदर्भ येतोच येतो आणि हा मोबाइल फक्त गमतीने हाताळण्यापुरता उरत नाही तर त्याचा खूप खोल, दूरगामी परिणाम होत आहे, हे प्रत्येकाशीच बोलताना जाणवू लागलं. ‘‘मी मुलाचा मोबाइल पाण्याच्या बादलीत बुडवला आणि नाहीसा केला, कारण मोबाइल दिल्यापासून लक्षच नाही त्याचं कशात. तसा तो मोबाइल वाईट गोष्टींसाठी वापरतच नव्हता हो, पण त्यात एवढा वेळ वाया घालवणं मला मान्य नव्हतं.’’ एक जास्तच सजग(?) पालक सांगत होत्या.

या सगळ्यांच्या बोलण्यात येणारी एक गोष्ट मला कायम खटकली. सारे पालक खात्रीने सांगतात, ‘माझं मूल मोबाइल वाईट गोष्टींसाठी अज्जिबात वापरत नाही.’ या ‘वाईट गोष्टी’ म्हणजे काय असं थोडंसं गोड बोलत विचारायचा प्रयत्न केला तेव्हा, अश्लील क्लिप्स पाहणं, पॉर्न साइट्सना भेट देणं वगरे वगरेसारखी उत्तरं समोर आली. पण नववीच्या वर्गात गप्पा मारायला लागले आणि पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी मोबाइल गेम्स सर्रास खेळतात हे स्पष्ट दिसलंच. गणिताची उत्तरं देताना कां-कू करणारे अनेकजण मोबाइल गेम्सबाबत बोलायला मात्र खूपच उत्सुक असल्याचं लक्षात आलं. हे सगळे गेम्स म्हणजे काय तर ‘लढाई. काहीतरी जिंकणं, कुणाला तरी हरवणं, अनेकांना नामोहरम करणं, विशेषत: ठार मारणंच आणि शेवटी आपण अजिंक्य होणं.’ या मुलांकडून खेळल्या जाणाऱ्या जवळजवळ सगळ्याच मोबाइल गेम्सचं समान सूत्र आहे. इतर अनेक चांगले मोबाइल गेम्स असतीलही, कदाचित बुद्धिवर्धकही असतील ते, पण दुर्दैवाने ते खेळणारं आजपर्यंत वर्गात कुणीच भेटलं नाही. म्हणून जेव्हा मी मुलांशी बोलले तेव्हा मोबाइल गेम्स खेळणारे सारे याच प्रकारचे गेम्स खेळत असल्याचं लक्षात आलं.

हे सगळं माझ्याच आजूबाजूला आहे का याचा मागोवा घेतला तर लक्षात आलं की हे माझ्या आसपासचंच नव्हे तर सार्वत्रिक आहे. आणखी एक गोष्ट लक्षात आली, की मोकळ्या तासांच्या वेळी किंवा मधल्या सुट्टय़ांमध्ये मुलं याच विषयांवर चर्चा करत असतात. फक्त ‘पबजी’सारखे खेळच नव्हे तर सर्व मोबाइल गेम्सबाबत मुलं जास्तच स्वामित्व गाजवतात. ‘तो माझा गेम आहे, मी तो खेळतोय, त्यामुळे येनकेनप्रकारेण तो मी जिंकलाच पाहिजे,’ हे  मनात घोळत असतं. अपरिपक्व कुमारवयीन मुलं हे करणारच. त्यांना किती दोष देता येईल?

वर मी दिलेल्या उदाहरणामध्ये मुलांपाशी मोबाइल घडय़ाळी किती तास असतो याचं गणित पालक घालत असतात, पण तो त्यांच्या मनात किती तास असतो हे महत्त्वाचं! आम्ही शाळेत असताना सटीसामाशीच एखादा चित्रपट पाहायला मिळायचा, पण तसा तो पाहिल्यावरही त्यातल्या हिरो किंवा हिरॉइन्सबाबत सतत बोलणारे किंवा त्यांची स्टाइल अचूक उचलणारे आम्ही सगळे नव्हतो का हो, हा माझा पालकांसाठी प्रश्न आहे. विचार करा, खूप मोठ्ठा कालावधी मध्ये असूनही जर चित्रपट आपल्यावर एवढा प्रभाव पाडत असेल तर रोज काही तास मोबाइल हातात दिला आणि हातातून काढून घेतला तरी मनातून कसा बरं काढून घेता येईल? बरं, गटागटाने खेळले जाणारे जे गेम्स आहेत त्यात आपलेच मित्र सोबत घेऊन वेळ ठरवून ते खेळले जातात. क्रिकेटची मॅच तासभर खेळून त्याबाबत दोन तास वाद घालणारे आपण.. आठवा बरं. यावरून मुलं काही काळ गटात मोबाइल गेम्स खेळत नंतर त्याबाबत गप्पांमध्ये किती वेळ घालवत असतील, याचं गणित मांडणं फारसं अवघड नाहीच. अगदीच गप्पा मारत नसतील, पण मनातल्या मनात गेम्सबद्दल विचार तर नक्कीच करत असतील किंवा ऑनलाइन चॅटिंग करत असतील हे तर नाकारता येत नाही ना. बरं, आणखी एक लक्षात आलंय की कदाचित गप्पा मारत नसतील, पण मनातल्या मनात चुकलेल्या मूव्ह्जचा, मारल्या गेल्याचा, पुढे येणाऱ्या टास्कचा विचार असं खूप काही तरी येतंच ना. गेम्स खेळणाऱ्या मुलांनीच हे मान्य केलंय. म्हणजे ते जरी गेम्स एक तास खेळले तरी त्याबाबत विचार कायमच डोक्यात राहतो आणि एखाद्या गोष्टीचा असा विचार करणं म्हणजे व्यसनच आहे. त्यात ‘स्टिमुलेशन गेम्स’ आणि ‘रिअ‍ॅलिटी गेम्स’ हे खूप घातक आहेत हे आता अनेक अनुभवांतून सिद्ध झालं आहे.

हे सगळं आत्ता लिहिण्याचं कारण म्हणजे आता सुट्टय़ांमध्ये मोबाइल्स, विशेषत: आईचा मोबाइल, शालेय विद्यार्थ्यांच्या हातात जास्त काळ जातो आणि नकळत गेम्सचं हे जाळं मुलांच्या आसपास विणलं जातं.

‘‘सुट्टय़ांमध्ये जेव्हा गेम्स खेळण्यासाठी म्हणून मोबाइल हातात घेतला जातो तेव्हा सुरुवातीला घरातले वडीलधारे आणि मुलं यांच्यामध्ये मोकळेपणा असतो.’’ एक प्रथितयश समुपदेशक आपलं मत मांडत होत्या, ‘‘ मात्र हळूहळू मोबाइल लॉक्स, प्रायव्हसी कोडस् वगरे वगरे प्रकार सुरू होतात. कारण मनोरंजनासाठी वापरल्या जाणाऱ्या मोबाइलचा वापर हळूहळू इतर गोष्टींसाठी करण्यास सुरुवात होते. सोशल नेटवर्किंग साइट्सवर अकाउंट काढत स्वत:चे फोटो टाकून त्याला जास्तीतजास्त लाइक्स मिळवण्यासाठी चढाओढ सुरू होते.’’ सेल्फीची क्रेझ, इयत्ता सातवी-आठवीपासूनच गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड असणं वगरेसारख्या गोष्टी, त्यातून फोटोज्चं होणारं शेअिरग आणि पुढे घडणाऱ्या घटनांचे अनुभव त्या समुपदेशकांकडून ऐकताना भयचकित व्हायला झालं. हे सारं करण्याचं धाडस ही मुलं कसं करू शकतात?, याचं उत्तर देताना त्या म्हणतात, ‘‘अनेकदा आई मंडळींना या नवीन तंत्रज्ञानामधलं फारसं काही कळत नाही, त्यामुळे आईच ‘माझ्या मोबाइलवरनं आत्या, मावशी किंवा कोणा नातेवाईकाला हा हा मेसेज पाठवायचा आहे, तो पाठव बरं,’ असं सांगत मुलाच्या हातात मोबाइल थोपवते. इथेच ते मूल आईचं पाणी जोखतं आणि अशा प्रकारांना सुरुवात होते. त्यांनी आणखी एक प्रकार सांगितला तो म्हणजे ‘इन रिलेशनशिप.’ यात ‘इन रिलेशनशिप’ म्हणून बॉयफ्रेंड अगर गर्लफ्रेंडचा फोटो ठेवला जातो आणि आपल्याव्यतिरिक्त इतर कोणाचा तरी फोटो आढळला तर ही मुलं एवढी हादरतात की यामुळे आत्महत्या केलेल्या किंवा तसा प्रयत्न केलेली अनेक प्रकरणे त्यांच्यापाशी येतात. अगदी शालेयवयातली सुद्धा.’’ सातवी-आठवीपासूनच सुट्टयांमध्ये छोटय़ा छोटय़ा ट्रीप्स काढण्याची सध्या फॅशनच आहे, असं मुलांकडनं, शिक्षकांकडनं आणि समुपदेशकांकडनंही कळलं. त्यावेळी मुलांमुलींचे एकत्र फोटो काढले जातात. कारण मोबाइलमधल्या कॅमेऱ्यांमुळे ते खूप सोप्पं झालंय. ते आपापसात शेअर करणं वगैरे नैसर्गिकच, पण ते क्रॉप करून एकमेकांना पाठवण्यातून पुढे घडणारे काही प्रसंग समुपदेशक मंडळींकडून ऐकले आणि काळजाचा ठोका चुकलाच. प्रसंग मोजकेच होते, पण त्याची तीव्रता कानाडोळा करण्यासारखी नक्कीच नव्हती.

पूर्वी मुलं किंवा मुली सुट्टीमध्ये घराबाहेर फिरत राहिली तर आईवडिलांना काळजी वाटायची. तुमच्या-आमच्यापैकी अनेकांनी त्यासाठी प्रसंगी चार फटकेही खाल्ले असतील. पण आज शालेय वा महाविद्यालयीन मुलं-मुली घरातूनच एकमेकांच्या संपर्कात असतात. ती घराबाहेर जात नसल्याने आईवडीलही बेसावध असतात आणि प्रकरण फार पुढे गेल्यावर लक्षात येतं तोपर्यंत वेळ अनेकदा निघून गेलेली असते. याला ‘प्रकरण’ अशासाठी म्हणते की गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असणं हे अगदी बारातेरा वर्षांच्या मुलांपासून ‘इनथिंग’ आहे. ज्यांना ते नसतात त्यांना न्यूनगंड यायला लागतो. आणि मग प्रेम-ब्रेकअप -प्रेम हेही सर्रास  चालतं. यालाच काहीशी पुष्टी देत समुपदेशक सांगतात, ‘‘काही वेळा कमावता बॉयफ्रेंड आपल्या शालेय वयातल्या गलफ्रेंडला मोबाइल देतो. त्यामुळे ते तासन्तास एकमेकांच्या संपर्कात असतात. त्यातून त्याने जर तिला नाकारलं तर तिच्या भावविश्वाला मोठा हादरा बसतो. त्या वेळी त्यांना योग्य ते समजून घेणारं कोणी भेटलं नाही तर किशोरवयातच आयुष्य उद्ध्वस्त व्हायची शक्यता असते.’’ समुपदेशकांच्या मते अशी उदाहरणं अल्प आहेत, अत्यल्प नाहीत.

आणखी एक गोष्ट समाजमाध्यमांच्या प्रभावामुळे झालीय, अगदी शालेय मुलींमध्येही. ती म्हणजे अगदी तोकडय़ा, तंग कपडय़ांमधले फोटो समाजमाध्यमांवर टाकून जास्तीत जास्त लाइक्स मिळवण्याची धडपड. आणि मोठ्ठीच्या मोठ्ठी फ्रेंडलिस्ट असण्याची क्रेझ. यातून चढाओढ निर्माण होते. याच चढाओढीचं रूपांतर छुप्या शत्रुत्वामध्ये होतं आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांची अभ्यासातली एकाग्रता लक्षणीय  घटण्यात दिसतो. इयत्ता पाचवी-सहावीपासूनच आईच्या किंवा आजी-आजोबांच्या नावाचं अकाउंट काढून ते हाताळत या गोष्टी केल्या जातात, हे मुलं गप्पांच्या ओघात सहजपणे मान्य करून जातात. काही मुलं या गोष्टी फार मनावर घेत नाही, पण जी मुलं अभ्यासात हुशार असतात ज्यांना आपण ‘सिन्सिअर’ वगैरे म्हणतो ती मुलं उलट त्यांच्या स्वभावाप्रमाणे यातही ओढली जातात आणि त्यांच्या एकंदर शैक्षणिक प्रगतीत बाधा येते.’’ हे इतकं हळूहळू घडतं की सुरुवातीला लक्षातच येत नाही आणि लक्षात येतं तेव्हा त्यातून बाहेर पडणं जिकिरीचं असतं, असा आम्हा शिक्षकांसह सर्वाचाच अनुभव सांगतो.

काही घरांमधली परिस्थिती तर यापेक्षा भयानक असते. अशी उदाहरणे देताना समुपदेशकांनी सांगितलं, ‘‘आईचा जर वडिलांवर संशय असेल तर अनेकदा आईच वडिलांच्या मोबाइलमधले मेसेजेस वाचण्यासाठी मुलांची मदत घेते. यातून मुलांना आईच्या मोबाइलविषयक ‘अज्ञाना’ची जाणीव होते आणि ती मुलं बिनधास्तपणे मोबाइलचा हवा तसा वापर करू लागतात. हे प्रकरण तर काही वेळा इतकं पुढे जातं की हीच मुलं वडिलांनाही ब्लॅकमेल करतात.’’ मी शाळेत शिकवत असले, मुलं माझ्या अवतीभवती असली तरी माझ्यासाठी हे सारं खूप नवीन होतं, खरं तर अगम्य होतं, माझा विचाराधीन चेहरा पाहून समुपदेशक म्हणाल्या, ‘‘तुम्ही खूपच मागे आहात हो जगाच्या.’’

या विषयावर अधिक माहिती घ्यावी म्हणून आणखी दोन डॉक्टर्सशी संवाद साधला. त्यातील एक अगदी आतील ग्रामीण भागात काम करणाऱ्या तर एक पुण्यामध्ये कार्यरत असणारे. दोन्ही डॉक्टर्सचं एकच म्हणणं, ‘‘वयाच्या दीड-दोन वर्षांपासून मोबाइल दिल्याशिवाय मूल जेवत नाही ही साधारण तक्रार. साहजिकच ते जेवण्यासाठी मोबाइल मुलाच्या हातात दिला जातो हळूहळू कालावधी वाढत जातो आणि सुट्टीत तर काय रिकामपणच! त्यामुळे मुलांकडेच तो सोपवला जातो. ग्रामीण भागात पालकांना स्मार्टफोन वापरता येत नाही, पण ‘स्टेटस सिम्बॉल ’ म्हणून तो मुलांकडे असतोच. त्यामुळे आजकाल शहरी किंवा ग्रामीण कोणत्याही भागातील तरुण पिढीला प्रत्यक्ष संवाद साधणं त्रासाचं होऊ लागलंय. आजूबाजूला काय घडतंय याबाबत ते अनभिज्ञ असतात.

मी आणि माझा मोबाइल, बस्स..! आणि त्यामुळे अकार्यक्षमतेमुळे येणारा लठ्ठपणा आणि झोपेचा वेळ कमी झाल्यानं होणारे दुष्परिणाम हेही सार्वत्रिक आहेत.’’

एका महाविद्यालयीन मत्रिणीने सांगितलं, ‘‘सुट्टीमध्ये मुलं वेळ ठरवून सलग सहा सहा तास गेम्स खेळतात. ते गेम्स ऑनलाइन खेळावे लागतात, त्यामुळे इंटरनेट डिस्कनेक्ट झालं तर आपण मारले जाऊ असं त्यात असल्याने त्या काळात आलेले कॉल्सही घेतले जात नाहीत, मेसेजेसही पाहिले जात नाहीत.’’ त्या गेम्सच्या आभासी जगात ही मुलं पूर्णपणे बुडून जातात. हे ऐकल्यावर माझे एक मित्र म्हणाले, ‘‘हे काहीच नाही. या काळात मुलं दुपारी चार वाजता झोपतात आणि रात्री साडेअकराला उठतात. त्यांना दीड, दोन, तीन वगरे जीबी डाटा मोफत असतो दिवसाला, तो रात्री बारा वाजता सुरू होतो. त्या वेळी ते खेळायला सुरुवात करतात, तो डाटा साधारणत: दुपारी चार वाजता संपतो, त्या वेळी झोपतात आणि परत साडेअकराला उठून बाराला नवीन गेम.’’ मुलांचा हा बदलता दिनक्रम खरोखरच काळजीत भर टाकणारा आहे. कारण ही सरळसरळ व्यसनाधीनता आहे. आणि त्यातलं गांभीर्य म्हणजे, त्यांना त्यामधून बाहेर काढणारं कुणीही नाही. घरच्यांना अनेकदा तेव्हा जाग येते जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते.

नानाविध स्क्रीनच्या या व्यसनासाठी वर्षभर अभ्यासाचा दिला जाणारा अतिरिक्त ताणही कारणीभूत आहे. असं माझ्या एका आयुर्वेदिक डॉक्टर मत्रिणीला वाटतं. माझी फिजिओथेरपिस्ट पुतणी म्हणते, ‘‘अंगठय़ाच्या आणि मानेच्या स्नायूंवर मोबाइलच्या या अतिरिक्त वापराचा खूपच ताण येतो त्याचप्रमाणे मुलांचं पोश्चरही (शरीराची ठेवणही) बिघडतं.  तिच्या मते, काही पालक असं म्हणतात की ‘‘माझं मूल चित्र काढणं किंवा रंगवण्यासाठी मोबाइल वापरतं म्हणजे त्यात ते हुशार आहे.’’ पण जे मूल मोबाइलवर चांगल्या प्रकारे चित्र रंगवू शकतं त्याला ते तसं कागदावर जमेलच असं नाही, कारण त्या दोन्हीसाठी वापरले जाणारे स्नायू वेगवेगळे असतात. त्यामुळे असा विचार करणं हे स्वत:चं भ्रामक समाधान असतं.

माणसांपेक्षा मोबाइल्सची संख्या वाढत चाललेल्या या देशात लोक रागाने प्रश्न करतील, ‘‘मग काय मोबाइल कुलपात ठेवायचा का?’’ त्यावर आमचे डॉक्टर मित्राचं उत्तर असतं, ‘‘मोबाइल वापराला अज्जिबात विरोध करू नका. मुलांना मोबाइलचा विधायक किंवा रचनात्मक उपयोग त्यांच्या आवडीनुसार जाणीवपूर्वक शिकवा. जसं की मी कविता करण्यासाठी मोबाइल वापरतो, तसं वेगवेगळ्या भाषा शिकण्यासाठीही मोबाइल वापरता येतो. वेगवेगळे व्हिडीओज बनवणं, कराओके वापरून गाण्याचा सराव करणं, यूटय़ूबवर काही चांगल्या स्पर्धा असतात त्यात भाग घेणं. जाणीवपूर्वक काही गोष्टी करायला हव्यात.’’ पण डॉक्टरांच्या या विचारावर एकमुखी आवाज उठला तो पालकांनी मुलांना वेळ देण्याचा. आजकाल आईवडिलांना मुलांसाठी वेळ कुठे आहे किंवा सुट्टीच्या दिवसांत दिवसभर थोडेच पालक त्यांच्याबरोबर असणार? त्यावर डॉक्टर म्हणाले, ‘‘जर तुम्ही दोघं एकत्रितपणे वेळ देऊ शकत नसाल तर वेळेची विभागणी करा. पण मुलांना मोबाइलमध्ये गुंतू देऊ नका. मुलांशी संवाद साधत राहा. प्रत्येक वेळी त्याला न विचारता, जाणवू न देता लक्ष ठेवा. तुमच्यात काही वाद झाला किंवा मुलांनी काही चूक केली असेल तर ती स्वीकारा, स्वत: काही चुकला असाल तर ते मोकळेपणाने कबूल करा म्हणजे मूल या आभासी जगात बुडणार नाही. तुमच्याबरोबरचा त्याचा संवाद कायम राहील. दुसरं महत्त्वाचं, सुट्टीत मुलांनी खूप खेळलं पाहिजे, खूप दमलं पाहिजे. त्यासाठी काय करता येईल याची तजवीज करा. कदाचित तुमच्या मित्रमंडळींचं वा शाळेतल्याच पालकांचा गट बनवा आणि त्यातून मुलं काही तास तरी बाहेरच्या अंगमेहनतीचे खेळ खेळतील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा.’’

डॉक्टरांनी सांगितलेली सर्वात महत्त्वाची बाब, प्रत्येक पालक विशेषत: आईवर्ग. मग ती पूर्णवेळ गृहिणी असेलही ‘मला नाही हो काही समजत त्या मोबाइलमधलं’ असं म्हणत उगाचच हार पत्करतात. थोडासा धीर ठेवा, जिद्द बाळगा आणि मोबाइल साक्षर व्हा. ती तुमच्यापेक्षाही तुमच्या मुलांची गरज आहे, हे लक्षात ठेवलं तर प्राथमिक गोष्टी समजून घ्यायला काहीच हरकत नाही.  म्हणजे मग कारण नसताना मुलांना मोबाइल द्यायची वेळ येत नाही आणि दुसरं म्हणजे ते काय करताहेत, हेही तुम्हाला कळत जाईल.

आपलं मूल मोबाइल व्यसनाधीन होऊ नये, त्याची एकाग्रतेची पातळी चांगली राहावी, ते अष्टावधानी असावं, अभ्यासामध्ये हुशार असावं असं वाटत असेल तर पालकांनी काळजी घ्यायला हवी. काहींच्या सुट्टय़ा सुरूही झाल्यात, काहींच्या व्हायच्यात. या सुट्टय़ांमध्ये त्यांचा मोबाइल, संगणक, टॅब्लेट, पॅडचा अगदी टीव्हीचाही वापर वाढणार नाही यासाठी सजग राहायला हवं. सिंधुदुर्गमधील मालवणमधल्या आमच्या एका छोटय़ाशा शैक्षणिक संस्थेत काम करताना आलेले हे अनुभव, आपला देश तर केवढा मोठा आणि मुलंही किती मोठय़ा संख्येने.. तेव्हा प्रश्नही तेवढेच व्यापक आहेत. शितावरून भाताची परीक्षा यायला तेवढं पुरेसं आहे.

joshimeghana.23@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 12:13 am

Web Title: article on child virtual world
Next Stories
1 या सुखांनो या..
2 उन्हाळ्यातील स्वास्थ्यपूर्ण आहार
3 तशीच जात राहा..
Just Now!
X