प्रतिभा वाघ

plwagh55@gmail.com

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

बारावी आर्ट्सचे शिक्षण पूर्ण करून चित्रकर्ती होण्याचे स्वप्न उराशी बाळगणारी एक वारली आदिवासीकन्या ‘चित्रगंधा’. ती आयुष्यात पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसली ते जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मध्ये प्रवेश घेण्यासाठी. डहाणू ते छत्रपती शिवाजी टर्मिनस हा तिच्या आयुष्यातील पहिला रेल्वे प्रवास. आर्ट स्कूलला प्रवेश घेतला. प्रथम वर्गात पदवी आणि मास्टर्सही पूर्ण केले. चित्रगंधाच्या कीर्तीचा गंध कलाक्षेत्रात पसरला तो तिच्या खास जाड रंगलेपनाच्या शैलीमुळे. वारली चित्रकलेत निष्णांत असलेल्या या चित्रकर्तीची, स्वत:च्या शैलीतील चित्रे खरोखरच अप्रतिम आहेत. आतापर्यंत तिची दोन प्रदर्शने जहांगीर कलादालनात झाली आहेत.

शेणाचे, लाल मातीचे सपाट रंगलेपन, त्यावर पांढऱ्या नाजूक रेषेने चितारलेल्या मनुष्याकृती, प्राणी, पक्षी, झाडे इत्यादी म्हणजे वारली चित्रकला. वरवर पाहता साधी, सोपी वाटते. पण वारली चित्रकर्तीची निरीक्षणक्षमता वाखाणण्याजोगी असते. झाड भूमीकडून वर आकाशाकडे वाढते. ते जीवनाचा विकास करणारे, उदयोन्मुख जीवनाचे प्रतीक आहे. हे वारलींना समजल्यामुळे झाडाचे चित्र काढताना ते जमिनीपासून, आकाशाच्या दिशेने वर जाणारे झाड काढतात. अधिकाधिक झाडे उगवावीत अशी भावना प्रकट करतात. आपण शहरी माणसं मात्र झाड वरून खालच्या दिशेला काढतो. अधिकाधिक झाडे तोडण्याची भावना नकळत व्यक्त करतो.

‘वारल’ म्हणजे जमिनीचा तुकडा. त्यावर उपजीविका करणारे ते ‘वारली’ म्हणून ओळखले जातात. निसर्ग म्हणजे ‘सर्वदायिनी माता’ आहे, न संपणारा ठेवा आहे, हा आदिम शेतकऱ्याचा दृष्टिकोन होता. वारली आदिवासींनी तीच परंपरा जपून ठेवली आहे. ‘सर्वदायिनी माता’ आपल्या उदरात जीवन, मृत्यू दोघांनाही सामावून घेते. भारतीय संस्कृतीच्या प्रत्येक टप्प्यावर या निसर्गमातेचा अमीट प्रभाव दिसून येतो. आणि तसाच तो वारली चित्रांवरही दिसतो. त्यामुळे जीवन आणि मृत्यू यामधील जीवन हे वारली चित्रांचे विषय आहेत. म्हणजे दैनंदिन जीवन, शिकारदृष्ये, मासेमारी, शेती यांच्याशी संबंधित असतात. चित्रातील आकारांचे निसर्गातील आकारांशी नाते असते. वर्तुळ, त्रिकोण, चौकोन या तीन आकारांनी वारली चित्रे तयार होतात. वर्तुळ हे सूर्य-चंद्राचा आकार, त्रिकोण हा डोंगर, टोकेरी झाडाचा तर चौकोन हा शेतजमिनीच्या तुकडय़ाशी नातं सांगतात. चित्रात दोन समद्वीभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू उभ्या रेषेत जोडून त्यावर वर्तुळ आणि काडय़ांसारखे हातपाय म्हणजे मनुष्याकृती बनते. स्त्री आणि पुरुषांच्या आकृतीत स्त्रियांच्या ओटीपोटाचा त्रिकोण, हा धडाच्या त्रिकोणापेक्षा रुंद असतो. तर पुरुषांच्या आकृतीत धडाचा त्रिकोण श्रोणीच्या त्रिकोणापेक्षा रुंद असतो.

महाराष्ट्रात नाशिक, धुळे, ठाणे जिल्ह्य़ांतील डहाणू, तलासरी, केंद्रशासित दादरा, नगर-हवेली, दमण-दीव, गुजरात या ठिकाणी वारली संस्कृती प्रामुख्याने आढळते. आनंदाच्या क्षणी ते नृत्य करून तो साजरा करतात. जसे लग्न, उत्सव, घर प्रवेश, पुत्रजन्म, सुगीचे दिवस आदी प्रसंगी तारपा नृत्य केले जाते. जे अनेकदा वारली चित्रात आढळते. ‘तारपा’ हे वाद्य वाळलेल्या दुधीपासून तयार करतात. संगीत हा वारलींच्या जीवनाचा महत्त्वाचा पैलू आहे. स्त्री आणि पुरुष पाठीमागून हातात हात गुंफून ‘तारपा’ या वाद्याच्या तालावर नृत्य करतात. आनंद साजरा करणारे हे नृत्य सकाळपासून सुरू होते ते रात्रभर चालते. हे नृत्य सुरू असतानाच घराच्या भिंतीवर चित्रनिर्मिती होत असते. लग्नाच्या वेळी स्त्रिया लग्नचौक आणि देवचौक लिहितात. (म्हणजे रेखाटतात) त्यांच्या भाषेत ‘लिहिणे’ असेच म्हणतात. चौकाच्या चार रेषा असतात. हिरोबा, धनतरी, गवतरी आणि कन्सरी. हिरोबा निसर्गातल्या हिरव्या रंगाचा देव, धनतरी म्हणजे धरणी, जमीन. गवतरी म्हणजे गवत पाने, झाडे, वेली आणि कन्सरी म्हणजे धान्याची देवी. चौक लिहिला की, त्याच्या गर्भात देवी काढतात. तिला पालघट म्हणतात, ती कुलदेवता असते. बाहेरच्या बाजूूचे चौक म्हणजे लग्न चौक असतो. त्याच्या शेजारी आयताकृती चौकोनात देव चौक लिहितात. हा लग्न चौकापेक्षा आकाराने लहान असतो. त्यात एक शिरा, तीन शिरा, देवाची आकृती असते. अनुक्रमे एक शिर (डोकं), तीन शिर असलेला देव असा याचा अर्थ असतो. त्या बाजूला वरातीचे दृश्य असते. चौक रंगवून झाल्यावर चादर किंवा कापडाने झाकून ठेवतात आणि पूजाविधी झाल्यावर तो दाखविण्यात येतो. ‘धवलेरीन’ ही स्त्री विवाह लावण्याचे काम करते. तो तिचा मान असतो.

वारली चित्र रंगविण्यापूर्वी गेरू आणि शेणाने भिंत रंगविली जाते. तांदूळ धुऊन, थोडे वाळवून त्याचे पीठ करून त्यात थोडा गोंद घालून पांढरा रंग तयार केला जातो. बांबूची पोकळ काठी दाताने चावून कुंचला बनवितात. कधी कधी विशिष्ट गवताची काडी वापरतात. ही कला स्त्रियांनी जपली आहे. १९७० मध्ये वारली चित्रकला उजेडात आली. २०११ मध्ये जीव्या सोमा म्हशे यांना ‘पद्मश्री’चा मान मिळाला. वारली चित्रकलेला शुद्ध कलेचा दर्जा मिळाला. म्हशे यांची मुले, नातवंडेही चित्र काढतात. आता तरुण चित्रकार, चित्रकर्ती पुढे येत आहेत.

मधुकर वाडो या चित्रकाराच्या चित्रांचे जर्मन भाषेत संकलन झाले आहे. रीना संपत उंबरसाडा, कुसुम सोमा खरपडे नवनवे प्रयोग करीत आहेत. केवळ दोन रंग न घेता अनेक रंग ते वापरतात. साडय़ा, कपडे यावर चित्रं रंगवितात. युवा चित्रकारांच्या चित्रात उंच इमारती, डबलडेकर बस, विमाने दिसू लागली आहेत. मात्र चौक लिहिण्याचा मान स्त्रियांचा आहे.

वास्तविक स्त्रियांनी जपलेली ही कला पुरुषांनी व्यवसाय म्हणून स्वीकारली आहे. साध्या सोप्या आकारांची सुंदर चित्रे काढणाऱ्या वारली लोकांचे दैनंदिन जीवन खूपच खडतर आहे. अंधश्रद्धा, भगत, अंगात देवी येणे यावर ते विश्वास ठेवतात. पण अलीकडे शिक्षणामुळे त्याचे प्रमाण कमी झाले आहे. अजूनही काही भागांत मुली जाणत्या झाल्या की लहान वयातच त्यांचे विवाह होतात.

अशा पाश्र्वभूमीतून आलेली, आठवीत असताना आई-वडील सोडून इतर सर्व नातेवाईक लग्न लावून द्या, असे म्हणत असतानाही बारावी आर्ट्सचे शिक्षण पूर्ण करून चित्रकर्ती होण्याचे स्वप्न उराशी बाळगणारी एक वारली आदिवासीकन्या, चित्रगंधा सागर सुतार.

नावाप्रमाणेच चित्रासारखी अबोल स्वभावाची, बोलक्या डोळ्यांची, लांबसडक वेणीचा शेपटा आणि शिडशिडीत अंगकाठी असलेली. गालातल्या गालात हसणारी चित्रगंधा आयुष्यात पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसली ती ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्’मध्ये प्रवेश घेण्यासाठी. डहाणू ते छत्रपती शिवाजी टर्मिनस हा तिच्या आयुष्यातील पहिला रेल्वे प्रवास.

आर्ट स्कूलला प्रवेश घेतला. प्रथम वर्गात पदवी आणि मास्टर्सही पूर्ण केले. महाविद्यालयात येण्यासाठी पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसलेली चित्रगंधा खडतर प्रवास करून आपले पहिले कलाप्रदर्शन भरविण्यासाठी जहांगीर कलादालनात पोहोचलीसुद्धा. चित्रगंधाच्या कीर्तीचा गंध कलाक्षेत्रात पसरला तो तिच्या खास जाड रंगलेपनाच्या शैलीमुळे. जहांगीर कलादालन मिळवण्यासाठी चार ते पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागते. शिवाय कामातील नावीन्य, प्रयोग पाहण्यासाठी अनेक तज्ज्ञ चित्रकार, विद्यार्थी येतात. सर्वानीच तिचे भरभरून कौतुक केले. वारली चित्रकलेत निष्णांत असलेल्या या चित्रकर्तीची, स्वत:च्या शैलीतील चित्रे खरोखरच अप्रतिम आहेत. आतापर्यंत तिची दोन प्रदर्शने जहांगीर कलादालनात झाली. त्याचबरोबर विविध चित्रकलेच्या कॅम्पमध्येही तिला आमंत्रित केले जाते.

आपल्या आईवडिलांविषयी खूप अभिमानाने बोलते ती. आपले नातेवाईक, आजूबाजूचे लोक यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून पठडीबाहेर जाऊन, आपल्या लेकीची कलाशिक्षण घेण्याची इच्छा त्यांनी पूर्ण केली. ‘मुलीला इतके शिकवून तिच्या शिक्षणावर एवढा पैसा खर्च करून काय उपयोग? नाहीतरी ती दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. तिचं लग्न करून मोकळे व्हा. जबाबदारीतून मुक्त व्हा.’ या सतत मिळणाऱ्या सल्ल्यांकडे लक्ष न देता, वारली चित्रकार असलेले तिचे वडील हरेश्वर वनगा स्वत: लेकीच्या पाठीशी उभे राहिले. त्या वेळी डहाणूतून मुंबईसाठी एकच गाडी सुटत असे. प्रवासाचे एकूण सहा तास होत. वडील स्वत: तिच्यासोबत रोज सकाळी महाविद्यालयात जात. महाविद्यालय सुटेपर्यंत परिसरामध्ये थांबत आणि संध्याकाळी लेकीला घेऊन घरी जात. एक महिनाभर त्यांनी हा प्रवास केला. पण त्यामुळे उदरनिर्वाहासाठी पैसे मिळवणे कठीण जाऊ लागले. प्रवासात सहा तास गेल्यामुळे चित्रगंधाला अभ्यासासाठी वेळही मिळेनासा झाला. हे लक्षात आल्यावर वसई येथील आदिवासी मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहण्याचे तिने ठरले. तिथे संध्याकाळी दिवे जात ते रात्री दीड वाजता येत. रात्री दीड ते पहाटे चार वाजेपर्यंत अभ्यास करून ती वसईहून सकाळी सहाची ट्रेन पकडण्यासाठी हॉस्टेलहून निघत असे. लवकर पोहोचून स्टेशनवर स्केचिंगचा सराव करून नऊ वाजता महाविद्यालयामध्ये हजर होई. त्यानंतर बऱ्याच खटपटी करून मुंबईच्या हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळवला. त्यामुळे सकाळी रेखाटन, संध्याकाळी अर्धा तास वाचनालय आणि पाचनंतर चित्रकलेच्या शिकवण्या घेऊन रंगसाहित्यासाठी पैसे साठवू लागली.

वारली चित्रकलेत तर ती कुशल होतीच, पण तिने खूप मेहनत करावी, एकाग्रता वाढावी म्हणून वडीलही जाणिवपूर्वक प्रयत्न करीत. दिवाळीत रोज पहाटे पाच वाजता उठून तिला रांगोळी काढण्यास बसवत, आईला मदत नाही केली तरी चालेल, पण यात पारंगत हो, असे सांगत त्यामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत रांगोळी पूर्ण होई. त्यातही निसर्गचित्रे, व्यक्तीचित्रे असे विषय असत. संध्याकाळी अंगणातली तिची ही रांगोळी पाहण्यासाठी पाडय़ातील आदिवासींची झुंबड उडत असे. या मेहनतीचे फळ, महाविद्यालयातर्फे ‘युथ फेस्टिव्हल’मध्ये रांगोळीचे सुवर्णपदक मिळण्यात झालं. २००८ मध्ये तिने पदवी आणि २०१० मध्ये मास्टर्स डिग्री प्रथम वर्गात मिळविली. २००५ ते २०११ या काळात तिने एकूण १७ पारितोषिके मिळविली. सागर सुतार या वारली, तरुण कमर्शिअल आर्टिस्टबरोबर चित्रगंधाचा विवाह झाला. आपले बाळ आणि पती यांच्यासह ती आज एकत्र कुटुंबात राहते. या सर्वाच्या प्रोत्साहनामुळे आणि आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे ती मुंबईला कलामहाविद्यालयात नोकरीही करते.

‘जहांगीर कलादालना’मध्ये तिच्या चित्रांचे पहिले प्रदर्शन २०१३ मध्ये झाले. आदिवासी समाजातील ‘वारली जमातीचे जीवन’ अशीच मध्यवर्ती कल्पना घेऊन तिने चित्रनिर्मिती केली होती. तिने जगलेले क्षण, पाहिलेले प्रसंग, वारली जमातीचे दैनंदिन जीवनातील कष्ट आणि उत्सव, आनंदाचे क्षण, जत्रेतील दृश्य, नदीच्या पाण्यात डुंबण्याचा आनंद घेणारी मुले, झाडावर बसून क्रिकेटचा सामना बघणारी मुलं, म्हशीवर ऐटीत बसून जाणारा मुलगा अशा विषयांतून मुलांची निरागसता टिपली आहे. स्वप्नाळू , साध्या साध्या गोष्टींत अपरिमित आनंद मिळविणारी मुलं या चित्रकर्तीला खूप भावतात, असं तिच्या चित्रांतून दिसतं.

गावात मुख्यत्वे वापरले जाणारे पिवळा, लाल, हिरवा असे तेजस्वी रंग तिच्याही चित्रात दिसतात. पुरुष, स्त्रिया, मुलांच्या कपडय़ांसाठी ती हे रंग वापरते. कष्टकरी वारली स्त्रिया, घरासाठी झटणाऱ्या रोजची कामे करण्यातच पूर्ण दिवस घालवणाऱ्या, निवांतपणा नाहीच जणू, त्या पाणी भरताना, धुणी धुताना, दगड फोडताना, लाकडाची मोळी बांधताना दिसतात. कृश शरीरयष्टीच्या पण तरतरीत, तारुण्यात प्रवेश करणाऱ्या मुलीही काटकुळ्या अंगकाठीच्या, कष्टमय जीवनाचे प्रतिबिंब दाखविणाऱ्या, शाळेत गणवेश घालून जाणाऱ्या हसऱ्या मुली जणू भविष्यात चित्रगंधाप्रमाणे काही तरी विशेष यश नक्कीच मिळवतील, असे वाटते.

शेतातून, काटय़ाकुटय़ातून आपला मार्ग काढीत यशाच्या पायऱ्या चढणारी ही चित्रकर्ती, स्वत:ला मिळालेल्या यशावर समाधानी नाही. तिला खूप काम करायचे आहे. ‘‘आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव मिळवण्याची महत्त्वाकांक्षा तुला आहे का?’’ यावर ती म्हणाली, ‘‘मला फक्त खूप काम करायचंय. माझ्या चित्रकलेचा उपयोग माझ्या वारली समाजासाठी करायचा आहे.’’ शहरीकरणाच्या विळख्यात आदिवासी समाजातील अनेक पारंपरिक गोष्टी लुप्त होत चालल्याची खंत या चित्रकर्तीच्या मनात असून, आपल्या चित्रांच्या माध्यमातून त्यांचे जतन करायचे तिने ठरविले आहे. आपल्या समाजातील मुलांना चित्रकलेच्या नव्या क्षेत्राशी परिचय करून देण्यासाठी ती करीत असलेल्या प्रयत्नांना यश येते आहे. दर शनिवार, रविवार ती तलासरी येथील आश्रमशाळेत जाऊन मुलांना चित्रकलेचे मार्गदर्शन करते. वस्त्रकला, हस्तकला, मातीकाम यांची कार्यशाळा घेते. विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी तयार करते. त्यामुळे आदिवासी पाडय़ातील मुले दिल्लीपर्यंत पोहोचली आहेत.

अजूनही डोंगरपट्टय़ातील २० वर्षांच्या आदिवासी मुली तीन-तीन मुलांच्या माता झाल्या आहेत. याची तिला खंत वाटते. जादूटोणा, भूतखेत, अंधश्रद्धा अजूनही आहेत. त्यांचं निर्मूलन व्हायला हवं असं तिला मनापासून वाटतं. तिच्या वडिलांना पारंपरिक वारली कथा, गीते यांची माहिती आहे. पुढील पिढीसाठी हे लिखित स्वरूपात टिकविणे त्यांना गरजेचे वाटते. हा वारसा जपण्यासाठी तिची धडपड सुरू आहे. नोकरी, संसार, चित्रकला या साऱ्यांतून तिला सवड मिळावी अशी आशा आहे. मुंबई शहरात वावरणाऱ्या चित्रगंधाचे पाय जमिनीवरच आहेत.  तिच्या धडपडीला यश येवो आणि चित्रगंधाच्या कीर्तीचा ‘गंध’ जगभर पसरो ही सदिच्छा!

आदिम काळापासून मानव रेषांच्या साहाय्याने चित्र काढून, त्यात नैसर्गिक रंग भरून, आनंद मिळवत आला आहे. निसर्गाच्या सहवासात अहोरात्र असल्यामुळे लोककलाकारांच्या चित्रातील, कलाकृतीतील विषय, प्रतीके  निसर्गाशी संबंधित असतात. विशेष म्हणजे, या कलानिर्मितीत पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा सहभाग अधिक असतो. निसर्गत: निर्मितीक्षमता स्त्रियांकडे अधिक असते, त्यामुळे असेल. त्या घरातील, शेतातील कामे सांभाळून, सवड मिळेल तेव्हा त्यांच्या भावना सरळ, सोप्या, साध्या आकारांतून व्यक्त करतात. मुलगी आपल्या आई, आजीकडून शिकते. गुरू-शिष्य परंपरेप्रमाणे हा वारसा पुढे-पुढे जात असतो. ‘वारली’, ‘मधुबनी’, ‘चित्रकथा’ या अशाच काही चित्रशैली. त्यांना आजही जिवंत ठेवणाऱ्या, नव्हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या काही स्त्री-लोकचित्रकारांना ‘चित्रकर्ती’ या लेखमालेतून आपण भेटणार आहोत, दर पंधरवडय़ाने.

(सर्व छायाचित्रं – सागर सुतार यांच्या सौजन्याने)