अरुंधती देवस्थळे

arundhati.deosthale@gmail.com

साहित्याचं नोबेल पारितोषिक प्राप्त पोलंडच्या लेखिका ओल्गा तोकरझुक. देशद्रोही, पर्यावरण दहशतवादी असे अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले तरी त्यांनी आपले  लिखाण सातत्याने चालूच ठेवले. साहित्यात वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या ओल्गा यांच्या साहित्याने खळबळ माजवली असली तरी त्या वाचकप्रिय लेखिका आहेत. ‘मी जे बोचणारं लिहिते ते समाजात सुधारणा व्हावी म्हणून’, असं खणखणीतपणे सांगणाऱ्या,नव्या युगातल्या पोलिश साहित्याचं नेतृत्व करणाऱ्या या लेखिकेविषयी..

गेल्या ८-१० वर्षांतले साहित्याच्या नोबेलचे स्पर्धक पाहिले तर लक्षात येतं, की यांच्यापैकी एकही आधीच्या शतकातल्या लेखकांसारखा काहीतरी भव्यदिव्य, पण सरळ, विनासायास वाचकांपर्यंत पोहोचणारं लिहिणारा नाही. एवढंच नव्हे, तर आपलं लिखाण सर्वांपर्यंत पोहोचावं असा प्रयत्न वरकरणी तरी करताना दिसत नाही. प्रत्येकात कॉमन असते ती व्यामिश्रता. व्यामिश्रतेचं सामान्यीकरण करता येणं शक्यच नसतं. अमुक एक लेखक आधी माणूस म्हणून समजावून घ्यावा तर त्याच्या बहुपेडीत्वात कसले कसले सांस्कृतिक धागे आढळतात. आईवडील मूळचे एका देशातले, घरात मूळ आणि सद्य संस्कृती आणि भाषा यांचं मिश्र वातावरण, मग लेखकाचं स्वत:चं स्थानांतरण, कधी शिक्षण. त्याचे प्रिय लेखक, त्यांच्या लेखनातून डोकावणारे संदर्भ आणखीन तिसऱ्याच कुठल्यातरी भाषा संस्कृतीतले. त्यातून घडत जाणाऱ्या संवेदनांच्या जाणिवा-नेणिवा आणि सर्जनशीलता, त्यात अभ्यासलेल्या विषयाने दिलेली दृष्टी, या सगळ्याचा मागोवा घ्यावा तेव्हा या अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेन्टिंगमधला एकेक स्ट्रोक समजल्यासारखा वाटतो.

लेखक समजण्यासाठी वाचकाचा अनुभवपट, बौद्धिक कक्षा रुंदावलेल्या असणं अत्यावश्यक ठरतं. भाषा, संस्कृती वैविध्य असतंच, पण त्याबरोबर अभिव्यक्ती आणि साहित्यप्रकारांमध्ये केलेले प्रयोगही देशोदेशींच्या दिग्गजांमध्ये आपलं वेगळेपण जाणवून देणारे असतात. ओल्गा तोकारझुकचं लेखन हे नेमकं अशा प्रकृतीचं, अशा प्रवृत्तीचं, अभिव्यक्तीची कुठलीही मूस नाकारणारं आहे.

समाजात तिची ओळख एक प्रथितयश लेखिका, निर्भीड कार्यकर्ती आणि स्त्रीमुक्तीची पुरस्कर्ती अशी आहे. पोलिश समाज आणि राजकारणावर हिरीरीने टीका करते म्हणून तिच्यावर targowiczanin म्हणजे देशद्रोही, ख्रिश्चनिटीविरोधी, पर्यावरण दहशतवादी असल्याचे आरोप केले जातात. पण ओल्गाला ते मान्य नाहीत. तिच्या मते, ती जे बोचणारं लिहिते ते समाजात सुधारणा व्हावी म्हणून. राजकारण्यांचा तिटकारा असला तरी देशावर तिचं प्रेम आहे. आजवर तिचे ३ कथासंग्रह आणि ८ कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या असून, त्यांचे १४ जागतिक भाषांत अनुवाद झाले आहेत.

सरकारशी संबंध नरम गरम असूनही ती पोलंडची सर्वमान्य लेखिका आहे, हे तिचे टीकाकारही मानतात. पोलंडच्या संस्कृती आणि राष्ट्रीय वारसा खात्याने तिला त्यांचा सर्वोच्च पुरस्कार २०१५ मध्ये बहाल केला. तिला पोलंडचा सर्वोत्तम साहित्यासाठीचा २००८ Nikeपुरस्कार आणि वाचकांनी ठरवलेला Nike असे दोन्ही पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच वर्षी तिला शांती, लोकशाहीतून प्रगती आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य निर्मितीकरिता लक्षणीय योगदानासाठी लेखकांना दिलं जाणारं जर्मनीचं ‘ब्रूकर प्राइझ’ मिळालं.

तर नोबेल पुरस्कार मिळतानाची ‘‘For a narrative imagination that with encyclopaedic passion represents the crossing of boundaries as a form of life,’’ अशी घोषणा ऐकल्यावर झालेला आनंद जरासा जिरताच ओल्गाची एक प्रतिक्रिया होती, ‘‘मी आता भारतीय रेस्तराँमध्ये जाऊन, वाइनबरोबर शाकाहारी भारतीय जेवण चाखत सेलिब्रेट करणार आहे.’’ ओल्गाचे भारताशी असलेले बंध रेशमाचे आहेत. ती २०१४ च्या ‘जागतिक पुस्तक मेळ्या’त दिल्लीला आली होती. तिथून राजस्थान आणि अमृतसरच्या सुवर्णमंदिरातही गेली होती. अनुभव इतका भावला की तिला लगेच वर्षअखेरीस परत इथे यायचं होतं, पण आईच्या गंभीर आजारपणामुळे ते स्थगित करावं लागलं. तिच्या लघुकथांचा संग्रह ‘कमरे और अन्य कहानियाँ’ (२०१४) ‘राजकमल प्रकाशना’ने प्रसिद्ध केला आहे. भारत म्हणजे तिला थक्क करणारी ‘अनुभवों की बारात’ वाटते. तिला तो सांस्कृतिक वैविध्यानिशी नीट समजावून घ्यावासा वाटतो. तिच्या ‘Flights ’मध्ये भारताचे संदर्भ येतात. एका कादंबरीत सरस्वती नावाचं एक पात्रही आहे.

ओल्गाचा जन्म शिक्षक कुटुंबात झाला. वयाच्या अकराव्या वर्षांपर्यंत ती खेडय़ात राहिली. जंगलात दूरवर भटकणं तिला आवडायचं. वडिलांमुळे लोककथांतही तिला रस निर्माण झाला होता. आसपासच्या निसर्गात ती त्यांचे पडसाद शोधत राही. मग कुटुंब शहरात गेलं. ओल्गाला मोठय़ा शाळेत दाखल करण्यात आलं. वॉर्सा युनिव्हर्सटिीत तिने मानसशास्त्रात पदवी घेतली आणि त्यानंतर देशभरात वेगवेगळ्या हॉस्पिटल्स आणि संस्थांमध्ये काम करून व्यवसायाचा आवश्यक अनुभव घेतला. त्याचे पडसाद तिने टिपलेल्या घटनांच्या बारकाव्यांत आणि व्यक्तिचित्रणात शैलीचा भाग बनून सहज सामोरे येतात. फ्रॉईडने तिच्यातला लेखक जागवला असं ती म्हणते. ‘‘माझ्यात कमालीची अशांतता दडलेली आहे. शब्दांची अशी काही झुंबड उडते, की एखादं वाक्यदेखील सलगपणे लिहिता येत नाही. एखाद्या हस्तलिखिताची तीनेकशे पानं पाहून स्वत:लाच आश्चर्य वाटतं. हे स्थिर राहून, सलग मीच लिहिलंय का? असा प्रश्न पडतो.’’

वॉर्सा युनिव्हर्सटिीत तिला तिचा पहिला नवरा रोमन फिनागास भेटला, दोघांनी ‘रुता पब्लिशिंग’ नावाचं प्रकाशनगृह काही वर्ष चालवलं. त्यांना मुलगा झाल्यावर (१९८६) ओल्गाला गृहिणी आणि आईच्या भूमिकेत शिरून घरावर लक्ष केंद्रित करणं क्रमप्राप्त झालं, पण त्यातून मिळालेल्या फावल्या वेळात मनात साचलेल्या अस्वस्थपणातून तिच्या लेखनाची खरी सुरुवात झाली. कॉलेजजीवनात लघुकथा स्पर्धेत तिला बक्षिसं मिळाली होती. काही कविता नामवंत मासिकांतून प्रसिद्ध झाल्या होत्या, पण आता त्याला दिशा मिळाली. ओल्गाचं पाहिलं पुस्तक Miasta w lustrach (Cities in a mirror) हा काव्यसंग्रह १९८९ मध्ये प्रसिद्ध झाला होता. Podróz ludzi ksiegi  (‘द जर्नी ऑफ द बुक पीपल’- १९९३) तिची पहिली कादंबरी. ‘‘तिचं काय करावं हे बहुसंख्य वाचक आणि समीक्षक दोघांनाही कळेना.’’ओल्गा हसत हसत सांगते. मूठभर लोकांना मात्र तिचं वेगळेपण नीटच लक्षात आलं आणि भावलं. नंतर आलेली

‘ए. ए.’ ही कादंबरी, १९२०च्या पोलिश जर्मन पार्श्वभूमीवर उलगडणारी. एलमा एल्झनर या मध्यमवर्गीय मुलीला अचानक दैवी सिद्धी प्राप्त झाल्यावर होणाऱ्या बदलांची!

तिची तिसरी कादंबरी ‘Prawiek i inne czasyl (Primeval and Other Times) १९९६ मध्ये आली आणि चांगलीच गाजली. पोलंडच्या केंद्रस्थानी असलेलं प्राविक हे काल्पनिक खेडं. गावावर चार देवदूतांचा पहारा.. तेच या कादंबरीचे सूत्रधार. त्यातली माणसंपण विक्षिप्त- जुन्या पठडीतली. एकीकडे कथाकाराचा खडा आवाज आणि दुसरीकडे सादर केलेला मॅजिक रिअ‍ॅलिझम! पुराणकथेच्या गारुडाखाली कालप्रवाहातून तुकडे वेचत आकार घेणारं कथानक. या कादंबरीच्या अंतोनिया लॉइड जोन्सने केलेल्या उत्कृष्ट अनुवादाने ओल्गाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन पोहोचवलं आणि अभावितपणे नव्या युगातल्या पोलिश साहित्याचं नेतृत्व तिच्याकडे आलं. त्यानंतर आलेल्या. Dom dzienny, dom nocny (House of Day, House of Night, १९९८ मधून तिने कादंबरी या आकृतिबंधाची तोडमोड सुरू केली. कल्पिताबरोबर ललित निबंधासारखं गद्य, विसंगत वाटणारी कथानकं असे प्रयोग सुरू केले, ते लोकांच्या पचनी पडायला कठीण गेले. पण मग हे प्रयोग आणि त्यातून येणारी अतिशय वेगळी अनुभूतीच तिची ओळख बनली. अशा प्रकारच्या स्वत:च्या  कादंबऱ्यांना ती  onstellation novels म्हणते. ‘अवकाशात भिरकवलेले लखलखीत तुकडे, जे भावेल आणि हाती लागेल तेवढं उचलायचं. कालाच्या आकाशगंगेत प्रत्येकाची कक्षा आहे आणि तरीही फिरत राहणं हीच जिवंतपणाची खूण आहे.’ असं मानणाऱ्या ओल्गाला वाङ्मयाचे वाचक वाचायला शिकले- पिकासोच्या चित्रांसारखे!

ओल्गाने हाताळलेले साहित्यप्रकार आणि शैलीमुक्त संचार तिच्या नंतरच्या लेखनातून सुरू राहिला.  इतकंच नव्हे तर तिच्या पुस्तकांच्या अनुवादांना वेगवेगळ्या देशांत पारितोषिकं मिळाली आहेत, हे निश्चितच उल्लेखनीय!

२००४ मध्ये आलेलं Ostatnie historie (kThe Last Storiesl)  म्हणजे मृत्यू या कल्पनेचा घेतलेला बहुआयामी मागोवा : जिवंत असणं म्हणजे काय? मरणात काय काय अंतर्भूत असतं? मरणोत्तर अस्तित्व असेल तर त्याला शरीरातल्या इतर अवयवांची गरज असते का? काळ सातत्याने असतो की सापेक्षतेने? तीन पिढय़ांच्या दृष्टिकोनातून बघितलेले बदलत जाणारे पलू.

Beiguni (Flights २००७) ही तिची आजवरच्या लेखनात सर्वोत्कृष्ट मानली गेलेली कादंबरी! इथे ‘प्रवासीपण’ आणि ‘भटकंती’ हेच कादंबरीचं विविध रूपांत सामोरं येणारं प्रमुख पात्र आहे,  इतर वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून सामोरा येणारा! त्याचा या ‘कादंबरी’त जबरदस्त प्रयोग केलाय, कुशल विणकरासारखा!

पाच शतकांचा लंबाचौडा स्पॅन. कादंबरीचा कॅलिडोस्कोप ऐतिहासिक मुळांमध्ये रुतलेल्या कहाण्या, पृथ्वीच्या पाठीवर ठिकठिकाणी घडणाऱ्या घटना आणि मानवी मनांमधून उठणारा, हरवणारा स्ट्रीम  ऑफ कॉन्शसनेस यांच्या लहान-मोठय़ा तुकडय़ांतून बनणाऱ्या कोलाजवरून फिरत राहतो. उदाहरण द्यायचं झालं तर : एक साधा सरळसोट माणूस त्याची बायको आणि मुलगा प्रवासाच्या मधेच गायब होतात आणि ३ दिवसांनी अचानक परत येतात. का? ते कळत नाही. मधूनच संगीतकार शोपांच्या बहिणीनं त्याच्या अकाली मृत्यूनंतर त्याचं हृदय शरीरातून काढून बरणीतून पॅरिसहून गुप्तपणे मायदेशी वॉर्साच्या चर्चच्या प्रांगणात पुरण्यासाठी आणण्याची मनस्वी सत्यकथा, बोटीवर एक व्याख्याता म्हणून आमंत्रित ग्रीसतज्ज्ञ व्यासंगी वयोवृद्ध  प्रोफेसर आणि त्याची मध्यमवयीन बायको, त्यांच्या नात्याचे ताणे-बाणे आणि त्याचा आकस्मित मृत्यू, अशाच एका विमानतळावर चाललेल्या ‘ट्रॅव्हल सायकोलॉजी’वरच्या परिससंवादाआडून अकॅडेमिक जगाला मारलेल्या कोपरखळ्या आणि अचानक आलेली ई-मेल पाहून दूर परदेशातून, मरणोन्मुख माजी प्रियकराला मायदेशी भेटायला येणारी त्याची मत्रीण, त्याचा एकमेव आधार असलेली, तो आता या जगात पाहुणा आहे हे लख्ख कळल्यावर थंड, शुष्क मनाने हिने चूपचाप त्याची जीवनयात्रा संपवणं, हे सगळंच आगळंवेगळं.

एखाद्या अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेन्टिंगसारख्या १३१ विगनेट्समधून कथन उलगडत नेलं आहे. तिच्या गाजलेल्या पुस्तकांबद्दल ठळकपणे जाणवणारी हीच एक गोष्ट की एखाद्या फ्लॅशमधून असं मनाला आजवर अतक्र्य असलेलं, मोलाचं काहीतरी, जेवढं काही पल्ले पडतं त्यातून काहीतरी लखलखून जातं. ओल्गा तिच्या पोतडीतून वेगवेगळी पात्रं आणि घटना काढत जाते त्यात असं काही वेचक डिटेलिंग असतं की ती व्यक्ती तिच्या वैशिष्टय़ांसह डोळ्यासमोर उभी राहते आणि सशक्तपणे पटावर आपली भूमिका निभावते.

कादंबरी ही साहित्यविधा अक्षरश: मनासारखी वाकवणारी आणि वळवणारी ओल्गा तोकारझुक आणखी एका बाबतीत प्रचंड नशीबवान आहे. तिला तिच्याच ताकदीच्या अंतोनिया लॉइड जोन्स आणि जेनिफर क्रॉफ्टसारख्या कल्पक विदुषी अनुवादिका कायम लाभत आलेल्या आहेत. जेनिफर क्रॉफ्टने केलेला मूळ पोलिश भाषेतल्या Flights चा इंग्लिश अनुवाद मॅन बुकर विजेता (२०१८) ठरलाच. या अनुवादावरून इतर जागतिक भाषांत या कादंबरीचे अनुवाद झाले.

ब्लेकच्या कवितेची ओळ नाव म्हणून घेणारी Drive Your Plow Over the Bones Of the Dead (२००९), ही पोलंडच्या एका खेडय़ातल्या साठीतल्या यानीनाची कहाणी सांगणारी कादंबरी, एक वेगळाच प्रयोग ठरली. सरळ आणि सलग कथानकामुळे असेल कदाचित, कादंबरी विशेषत: परकीय भाषांच्या / संस्कृतीतल्या वाचकांपर्यंत व्यवस्थित पोहोचली. यानीना मूळची इंजिनीअर, नंतर सेवानिवृत्त शिक्षिका, लोकांच्या ‘समर हाऊसेस’ची देखभाल करणारी. तिच्या दोन अचानक हरवलेल्या कुत्र्या आणि त्यानंतर स्थानिक शिकारी क्लबमधून अचानक गायब होत जाणारी माणसं यांचा सूत्रबद्धपणे शोध घेणारी गोष्ट, फक्त डिटेक्टिव्ह कादंबरी राहत नाही. रहस्यमय कथानक तिच्या आठवणींच्या जंगलातून भटकताना, अनपेक्षित वळणावळणातून धर्मातला ढोंगीपणा, प्राण्यांचे हक्क, अल्पसंख्याकांचे प्रश्न, वेडेपण म्हणजे नेमकं काय? नियतीवादात कितपत तथ्य आहे? यासारखे वेगवेगळे मुद्दे हाताळत वाटचाल करतं. याचा वेध घेणारी यानीना एकलकोंडी आहे. तिला माणसांपेक्षा जनावरांची साथ भावते. त्यांचं मन, वागणं तिला आपसूकच कळतं यात वेळोवेळी आलेले राजकीय भूमिकांचे संदर्भ समकालीन पोलिश समाजात खळबळजनक ठरले आणि तिच्यावर ‘पर्यावरण दहशतवादा’चा गंभीर आरोप आला.  या कादंबरीवर आधारित ‘स्पूर’ नावाचा चित्रपटही युरोपात गाजला. २०१७ मध्ये त्याला बíलन फिल्म फेस्टिव्हलचं सिल्व्हर बेअर प्राइझही मिळालं.

ओल्गाचं आजोळ युक्रेनचं. तिच्या लेखनातून युक्रेन अधूनमधून डोकावत राहतो.  २०१४ मध्ये, siegi Jakubowe (The Books of Jacob) ही ओल्गाची नऊशेहून अधिक पानांची एपिक कादंबरी बाहेर आली. तो पोलंडच्या इतिहासातला असा काळ की इथल्या समाजात ख्रिस्ती, मुस्लीम आणि ज्यू एकत्र नांदत होते. या तिन्ही संस्कृतींच्या चालीरीती, कपडे, प्रार्थनास्थळे, समाजमनाचे बारकावे आणि राजकारण, खाण्यापिण्याचे पदार्थ, बाजारातील विविधता, राजदरबार, स्थापत्य आणि इतर कलांची एक जत्राच एखाद्या पिरिअड फिल्मसारखी डोळ्यासमोर उलगडत जाते. केंद्रस्थानी आहे जेकब फ्रँझ या एका ज्युईश पंथाच्या धार्मिक नेतृत्वाची पोस्टमॉडíनस्ट चष्म्यातून पारखलेली कहाणी. त्याला अनेक परस्परविरोधी पलू आणि कारणमीमांसा आहे. वादळ उठणार हे माहीतच होतं. या कालखंडातल्या घटनाक्रमाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात पोलिश जनतेत आणि विचारवंतांत टोकाचे मतभेद आहेत. म्हणून पुस्तक गाजलं, पण  तिच्यावर आरोपांची झड उठली. पोलंड आणि युक्रेनमधल्या संघर्षांत पोलंडला त्यांच्या ऐतिहासिक अपराधभावाची आठवण करून देत युक्रेनला झुकतं माप दिल्यानं  मायदेशीयांचा रोष तिच्या वाटय़ाला आला. ती राहात असलेल्या नोव्हा रुदा या गावातल्या राष्ट्रभक्त संघटनेनं देशाची बदनामी केल्याबद्दल तिला दिलेलं मानद नागरिकत्व रद्द करण्याचा ठराव पास केला. तिला वादविवादाचं वावडं नसावं, आपल्या भूमिकेबद्दल ती अगदी स्पष्ट असते. ‘‘मी सरळ विचार करणारी. आम्ही पोलंडचे नागरिक. एक देश म्हणून इतिहासातली काळी पाने होती तशी स्वीकारू असं आपलं मला वाटलं होतं. पण ते चुकीचं ठरलं. कुठल्याही देशाला अशी प्रकरणं जगासमोर यायला नको असतात. सोईस्कर नसलेला इतिहास नाकारून कसं चालेल? लोकांचा आक्षेप मी लिहिलेल्या सत्यावर नसून, मी ते जगासमोर का मांडलं यावर आहे.’’ असा ओल्गाचा प्रतिवाद.

डाव्या विचारसरणीच्या ओल्गाला चारचौघांसारखं काहीच मंजूर नाही. तिच्यासारख्याच बेबंद वृत्तीचा इंग्लिश कवी विल्यम ब्लेक तिला खूप भावणारा! प्राण्यांवर अतोनात प्रेम असल्याने मनापासून स्वीकारलेला शाकाहार. अनेकदा तिच्याकडे साबणसुद्धा कधीचा संपलेला असतो, घरात काही खायला- प्यायलासुद्धा नसतं. पण तिला तेही बरंच वाटतं. पण अशा या टोकाच्या स्वभावामुळे इतर कोणाची, विशेषत: मुलांची जबाबदारी पेलणं  मुश्किलीचं होऊन बसतं. ती लोअर सिलेसिया भागातल्या एका गावात राहते. अजून मला स्वत:चा असा ठाव-ठिकाणा सापडलेला नाही, असं तिला वाटतं. या बेचनीमुळेच ओल्गा खूप हिंडते, वेगवेगळ्या संस्कृती, निसर्गाची रूपं आणि माणसं काठावरून तटस्थतेने निरखत राहते. गुंतण्याचा तिचा स्वभावच नाही. किंबहुना आसक्तीचंच ओझं होतं.

जेव्हा केव्हा मी अकॅडमीच्या पायऱ्या चढते, ती पायरीला नमस्कार करूनच. तिच्या लायब्ररीच्या अनंत श्रीमंतीचं, न झेपणाऱ्या मोठेपणाचं दडपण येतं.. केवढी प्रचंड बौद्धिक ताकदीची इकोसिस्टिम उभी आहे या भव्य वास्तूत, असं जाणवत राहतं. आत गेल्यावर तुमचं स्वत्व पूर्णपणे व्यापून टाकणारी, तिच्या तेजाचा क्षणभरही विसर न पडू देणारी! इथल्या स्वतेजाने झळकणाऱ्या रत्नावलीत आता ओल्गा तोकारझुक नावाचं एक माणिक दाखल झालंय.

२०१८ चं साहित्याचं नोबेल पारितोषिक, संबंधित परीक्षक समितीची बैठक अपरिहार्य कारणांनी न होऊ शकल्यानं अघोषित राहिलं. मग २०१९ अखेरीस, मागील आणि या वर्षीची अशी एकत्रित घोषणा अखेरीस करण्यात आली आणि २०१८ चा पुरस्कार पोलंडच्या लेखिका ओल्गा तोकरझुक यांना आणि २०१९ चा ऑस्ट्रियाचे ज्येष्ठ लेखक पीटर हँडके यांना घोषित झाला.