News Flash

व्यर्थ चिंता नको रे : दिसतं तसं नसतं, म्हणूनच..

करोनाच्या या तात्पुरत्या संकटावर मात करण्यासाठी का नाही जागवायचा आपल्या मनातला ‘बुद्ध’?..

डॉ. आशीष  देशपांडे dr.deshpande.ashish@gmail.com

दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं! मनाच्या फसव्या तऱ्हा सांभाळत आपला मेंदू परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आपले पूर्वीचे अनुभव, निर्णय, त्यात मिळालेलं यश आपल्या आकलनाला आत्मविश्वास देतात आणि सकारात्मकता येते. उलटपक्षी नकारात्मकता. म्हणजे परिस्थिती तशीच असते, पण आपण तिच्याकडे कसं पाहातोय ते महत्त्वाचं. ‘जातक कथा’ आपल्याला तेच सांगत आल्या आहेत.  

फार फार वर्षांपूर्वी एका गावात दोन व्यापारी कुटुंबं होती. प्रत्येक कुटुंबातील दोन दोन भाऊ एकत्र व्यापाराला परगावी जात. एकदा त्यांना कळलं की, त्यांच्या गावाच्या बाजूच्या रखरखीत वाळवंटापल्याड एक सधन राज्य आहे. त्यांनी ठरवलं, की त्या राज्यात व्यापार करायचा. आतापर्यंत त्यांच्या वाडवडिलांनी हा वाळवंटातला प्रवास टाळलाच होता, कारण पाण्याची कमतरता नि चलाख दरोडेखोरांची भीती. प्रत्येकाच्या २५० बैलगाडय़ांचा ताफा, कामगार, छोटे व्यापारी यांना एकत्र घेऊन जाणं कितपत शक्य होईल, नि मालाचा खप नक्की किती होईल याबद्दलच्या साशंकतेमुळे या दोन व्यापारी कु टुंबांनी ठरवलं की, एका कुटुंबानं प्रथम जायचं आणि दुसऱ्यांनी दोनेक महिन्यांनंतर.

ज्या भावांनी प्रथम जायचा निर्णय घेतला त्यातल्या एका भावाच्या मनात आलं, ‘अरे, ही तर नामी संधी आहे. आपण त्या गावात पोहोचणारे पहिले व्यापारी असू. लोक भराभर माल घेतील, किंमतही चांगली मिळेल. जाताना ताफ्यातल्या बैलांना मुबलक गवत मिळेल आणि माणसांना फळं-भाज्यादेखील मिळतील.’ दुसऱ्या भावाच्या मनात आलं, ‘अरे, अनोळखी रस्ता, दरोडेखोरांची भीती, रखरखीत वाळवंट.. मागाहून गेलो असतो तर बरं नाही का झालं असतं? आपल्या मित्रांचा अनुभव कामी आला असता!’ ज्यांनी मागाहून जायचा विचार केला होता, त्यातल्या एका भावाच्या मनात आलं, ‘बरंच झालं नंतर जातोय ते. त्या राज्यात खरंच बाजारभाव चांगला आहे की नाही हे समजेल. भाव ठरवायला फारसा विचार करायला लागणार नाही. आधीच्या ताफ्यानं तयार केलेल्या वहनवटीनं रस्ता शोधणंदेखील सोपं जाईल. जुनं गवत आधीच्या ताफ्यातल्या बैलांनी खाल्लय़ामुळे नवीन, ताजं गवत आपल्या बैलांना खायला मिळेल.’ तर दुसऱ्या भावाला वाटलं, ‘काय उपयोग आहे मागाहून जाऊन? रखरखीत वाळवंटात कदाचित दरोडेखोरांना व्यापाऱ्यांची चाहूल पहिल्यांदा लागणार नाही, कारण कित्येक वर्षांत कोणीच त्या रस्त्यानं गेलेलं नाही, पण दुसऱ्यांदा जाताना नक्कीच त्यांना कुणकुण लागणार.’

दोन्ही व्यापारी कुटुंबांतल्या भावंडांना पैसे कमवायची संधी आहे. त्या संधीमध्ये काही वेगळेपण नाही, पण तरीही प्रत्येक भाऊ या संधीकडे वेगळ्या दृष्टीनं पाहातोय. परिस्थिती एकच, पण विचार वेगळे असल्यामुळे त्यांच्या मानसिकतेत काय बदल होऊ शकेल? चौघांपैकी कोणाचा विचार बरोबर किंवा चुकीचा वाटतोय? आपल्या आयुष्यात चांगलं घडावं म्हणून आपण सर्वच झटत असतो. बहुतेक वेळा वरवर समान दिसणारी संधी खोलात जाऊन विचार केला तर थोडीफार वेगळी असू शकते. तेव्हा ‘तेरी कमीज मेरी कमीजसे सफेद कैसे?’ या प्रश्नात अडकून काहीच उपयोग नसतो. आपल्या परिस्थितीचं नक्की वेगळेपण काय आहे, हे समजून घेतल्याशिवाय त्यातले खाचखळगे नि दडलेल्या संधी आपल्याला समजणार कशा? कुठलीच परिस्थिती आखुडशिंगी-बहुदुधी गाईसारखी नसते. तेव्हा साहजिकच परिस्थिती स्वीकारताना तिच्या उण्यादुण्यांचा विचारही व्हायला पाहिजे नि तिच्या फायद्याचाही. मग त्यातून स्वत:साठी सर्वात चांगला मार्ग कोणता याचा शोध सोपा होईल. नाही का?

आपली परिस्थिती समजून घेण्याची पद्धतही थोडी विचित्रच असते. आता मला सांगा, आकृती क्र. १ मध्ये दिलेल्या दोन रेषांपैकी कुठली रेष मोठी आहे? बघा, नीट विचार करा. पाहिजे तर एक पट्टी घ्या नि मग बघा. सुरुवातीला आपल्या अंदाजानं धोका दिला ना? आता आकृती क्र.२ बघा. काय दिसतंय? एक मध्यमवयीन, मोठय़ा कपाळाचा, करारी डोळ्यांचा, धारदार नाकाचा साहेब?  की मैदानात झाडाखाली पाठमोरी बसलेली एक चिमुरडी?  की मध्यम वयातली इंग्लिश मड्डम?  जरा वेगळ्या नजरेनं त्याच चित्राकडे बघितलं तर चित्रच बदलतं. पुढचा प्रयोग तर अद्भुतच आहे. तिसऱ्या आकृतीत त्या माणसाच्या नाकाच्या बाजूला एक बेरजेचे चिन्ह दिसतंय? त्याकडे ३०-४० सेकंद डोळे न मिटता बघा. आता फिकट भिंतीकडे बघा. कोण दिसतंय भिंतीवर?  कसे आले साहेब हे तुमच्या भिंतीवर?

म्हणूनच तर म्हणतात, दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं! मनाच्या या सगळ्या फसव्या तऱ्हा सांभाळत बिचारा मेंदू परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आपले पूर्वीचे अनुभव, निर्णय, त्यात मिळालेलं यश आपल्या आकलनाला आत्मविश्वास देतात आणि सकारात्मकता येते. उलटपक्षी नकारात्मकता. म्हणजे परिस्थिती तशीच असते, पण आपण तिच्याकडे कसं पाहातोय ते ठरवतं की तिचं कितपत ‘ज्ञान’ आपल्याला येणार ते.

तर, फार फार वर्षांपूर्वीचे आपले गोष्टीतले भाऊ निघाले प्रवासासाठी. दिवसभराच्या प्रवासात साहजिकच त्यांच्या मनात चलाख दरोडेखोरांचा विचार होताच. रात्रभर जागता पहारा ठेवत दुसरा दिवस उजाडला तशी त्यांच्या मनातली दरोडेखोरांची भीती कमी झाली, पण पहाटे निघतानाचा उत्साह आदल्या दिवसाचा प्रवास, जागरण नि रणरणतं ऊन आटवू लागले. तेवढय़ात समोरून एक माणसांचा तांडा आला. नुकतीच आंघोळ करून ओलेत्यातच होते ते लोक. त्यांच्या बैलगाडय़ांची चाकंही चिखलानं माखली होती. त्यांचा म्होरक्या म्हणाला, ‘‘महाराज, एवढं पाण्याचं ओझं वाहून का बरं मुक्या जनावरास्नी फिरवताय? पुढे एक तलाव हाए बघा. द्या फेकून तुमच्याजवळचं ते पाणी नि बघा कसे पटकनी पोहोचाल तलावाशी.’’ तो तांडा दूर गेल्यावर थोरल्या भावानं विचार केला, ‘संध्याकाळपर्यंत पोहोचायचंच आहे गावाला. मग जरा लवकर लवकर चाललो तर बरंच होईल. त्या म्होरक्यानं सांगितल्याप्रमाणे करू या, म्हणजे बैलही जरा जोर पकडतील.’ त्यानं बरोबर भरून घेतलेलं सगळं पाणी दिलं फेकून. ‘आता आपण पैलगावी पोहोचलो..’ या मिथ्येत रमला तो! बाजारातल्या ‘नफेरंजनात’ दरोडेखोरांची चलाखी त्याला समजलीच नाही. रखरखीत वाळवंटात गोडय़ा पाण्याच्या अपेक्षेनं आणि बरोबरचं पाणी फेकून देण्याच्या अघोरी निर्णयानं कासावीस झालेले पांथस्थ दरोडेखोरांच्या डावपेचात पुरतेच अडकले. अर्धमेली अवस्था झाली. दरोडेखोरांनी शांतपणे त्यांच्या मालावर नि अन्नावर मारलेला फडशा ते फक्त किलकिल्या डोळ्यांनी पाहू शकत होते. दोन भाऊ शेवटचा श्वास घेताना म्हणत होते, ‘‘अरे, या वाळवंटात कुठनं येणार होता तलाव?  इतक्या अनुभवी लोकांनी सांगितलं होतं की, हे वाळवंट रखरखीत आहे, पाण्याचा मागमूसही नाही, दरोडेखोर चलाख आहेत. नाही मिळालं पाणी पुढे तर काय, एवढा साधा विचारही नाही केला आपण? कसे फशी पडलो रे!’’

त्यांच्यामागून दुसऱ्या दोन भावांचं कुटुंबही निघालं दोनेक महिन्यांनी. पहिला दिवस नि रात्रीचा प्रवास झाल्यावर त्यांनासुद्धा तसाच पाण्यानं भिजलेल्या माणसांचा तांडा दिसला. त्यातील म्होरक्यानं त्यांनासुद्धा तलावाबद्दल सांगितलं; पण या भावंडांनी विचार केला, ‘आधी तलावातलं पाणी पाहू, मग आपल्याजवळचं पाणी फेकू!’ पुढे येताच त्यांना तुटलेल्या बैलगाडय़ा, लुटलेला ताफा, मृतदेहांचे अवशेष दिसले. मागे वळून पाहतात, तर हिरमुसलेले दरोडेखोर पळ काढत होते.

थोडक्यात काय? प्रत्येक परिस्थितीत अडचणी असतातच. त्या ‘महाअडचणी’ होतात, कारण गोष्टी आपल्या मनासारख्या व्हाव्यात अशी आपली अपेक्षा असते आणि त्या बहुतेकदा होत नाहीत नि आपली फजिती होते! ती टाळायची असेल तर एकच करायला लागतं, ते म्हणजे गोष्टी आपल्या मनासारख्या व्हाव्यात हा अट्टहास  टाळणं. हा अट्टहास टाळला की आपोआप आपण ‘मनासारख्या नाही झाल्या तर काय करायचं?’ हा विचार करायला लागतो. म्हणतात ना? Your plans might fail but never fail to plan!!

नव्या उमेदीनं हे भाऊ पुढच्या प्रवासाला निघाले. लवकर पोहोचण्याच्या आशेनं भावांनी ठरवलं, की रात्रीही प्रवास करायचा. वाटाडय़ाला लवाजम्याच्या पुढे ठेवून ताफा ताऱ्यांच्या भरवशावर रात्रीच्या प्रवासाला लागला. थकलेल्या वाटाडय़ाला दिवसरात्रीच्या श्रमानं मध्यरात्री झोप लागली आणि बैलानं दिशा बदलली. पहाट होईस्तोवर पूर्ण ताफा परत सकाळच्याच ठिकाणी आला. आता बरोबर अन्नधान्य जरी थोडंफार असलं तरी पाणी पुरतं संपलं होतं. पाण्याशिवाय पैलगाव गाठणं अशक्यच होतं. काही तरी मार्ग शोधणं आवश्यक होतं. भर वाळवंटात पाणी कसं मिळणार? या विचारांनी सारेच पांथस्थ निराश झाले, पण भावांनी विचार केला, ‘हे दरोडेखोर ज्या अर्थी भर वाळवंटात दुसऱ्याला फसवण्यासाठी ओलेत्यानं फिरतात, बैलगाडय़ा चिखलात चालवतात, म्हणजे इथे कुठे तरी पाणी असणारच!’ पाणी शोधण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. बाकीचे पांथस्थ या वाळवंटात पाणी शोधणाऱ्या भावांकडे नुसते पाहात होते, त्यांना वेडय़ात काढत होते. निराश होऊन देवाज्ञेची वाट पाहात होते. तेवढय़ात एका भावाला काही अंतरावर एक हिरवंगार झुडुप दिसलं. लगेच त्यानं त्याखाली कुदळीनं खोदायला सुरुवात केली. ८-१० हात खाली जाताच तिथे एक कातळ लागला. सगळ्यांच्या मनातला आशेचा अंकुर क्षणार्धात कोमेजला, पण भावांनी जिवाच्या आकांतानं सगळी ताकद एकवटून कातळावर घाव घातला नि कातळ भेदून पाण्याचं कारंजं काढलं. कातळाखालच्या थंडगार, मधुर पाण्यानं सगळ्या पखाली भरून घेतल्या आणि प्रवास यशस्वी केला!

मानवी दु:खाच्या सोसानं भावनाविवश झालेला राजकुमार एका वृक्षाखाली समाधीस्थ झाला आणि ४९ व्या दिवशी त्या राजपुत्राला ज्ञानप्राप्ती झाली. त्या बोधीवृक्षाखाली राजपुत्राचा ‘गौतम बुद्ध’ झाला. आयुष्यातली निराशा, दु:खं कमी करण्यासाठीचा मार्ग बौद्ध धर्मात उद्धृत केला आहे. परिस्थिती सतत बदलत असते, कुठल्याही परिस्थितीत प्रयत्न केला नाही तर ती अधिकच बिकट होते आणि आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टी एकमेकांशी अदृश्य संबंधांनी जोडलेल्या असतात. या परिस्थितींना तोंड देण्यासाठी चार सत्यं आपल्याला स्वीकारायला लागतात. आयुष्य म्हणजेच अडचणी, त्या महाअडचणी होतात, कारण आपलं आयुष्य एका विशिष्ट पद्धतीचं असावं अशी अपेक्षा/ इच्छा असते. निराशा, दु:ख कमी करण्यासाठी या ‘इच्छा/ अपेक्षांच्या अट्टहासावर’ मात करायला लागते. ती मात जर करायची असेल, तर मनाला शिस्त (ध्यानधारणा) लावून राग, मूर्खपणा नि बेधुंद इच्छा या तीन विषांपासून दूर ठेवायला लागतं. कुठल्याही परिस्थितीत प्रयत्नांची शिकस्त न सोडता, योग्य जाण, ज्ञान, अवलोकन, वर्तन, भाषा यांच्या वापरानं सदोदित दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करत, सत्कर्म करत राहायचं. ही शिस्त जाणिवेतनं नेणिवेत येण्यासाठी ‘साधना’ करायची नि ‘निर्वाणा’पर्यंत (बुद्धीपर्यंत)  पोहोचायचं. हा मार्ग लोकाभिमुख होण्यासाठी ‘जातक कथांचा’ वापर केला गेला. त्यातलीच एक आज मी तुम्हाला सांगितली.

विसाव्या शतकात अल्बर्ट एलिस नावाच्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञानं प्रचलित केलेली ‘रॅशनल इमोटिव्ह थेरपी’ किंवा ‘कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी’ यांची पाळंमुळं कुठे तरी इ.स.पू. ५६३-४८३ ते सम्राट अशोकाच्या कालखंडातल्या बौद्ध धर्मातल्या तत्त्वज्ञानाशी जुळतात हा निव्वळ योगायोग म्हणायचा का?

२६ मे रोजी ‘बुद्धपौर्णिमा’ आहे. करोनाच्या या तात्पुरत्या संकटावर मात करण्यासाठी का नाही जागवायचा आपल्या मनातला ‘बुद्ध’?..

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2021 1:06 am

Web Title: article on occasion of buddha purnima zws 70
Next Stories
1 मी, रोहिणी.. : दुहेरी भूमिकांचं आव्हान
2 वसुंधरेच्या लेकी : तरुणाईचा चेहरा
3 ..म्हणूनच जगन्नाथाचा रथ चालू आहे
Just Now!
X