03 August 2020

News Flash

श्वास: एका नवीन मितीकडे नेणारं द्वार

जन्म आणि मृत्यूच्या दरम्यान कायम राहणारं काही असेल तर तो असतो केवळ श्वासोच्छ्वास.

(संग्रहित छायाचित्र)

तुमचं शरीर विश्वाचाच भाग आहे. शरीरातलं सर्व काही – प्रत्येक कण, प्रत्येक पेशी- विश्वाचाच भाग आहे. विश्वाच्या जवळ जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग. श्वास हा सेतू आहे. हा सेतू तुटला की तुम्ही तुमच्या शरीरात उरत नाही. तुम्ही एका अज्ञात मितीत प्रवेश करता; मग तुम्हाला स्थळाची, काळाची बंधनं उरत नाहीत. श्वास हा तुम्हाला स्थळा-काळाशी जोडून ठेवणारा पूलही आहे.

आपला जन्म झाला त्या क्षणापासून मृत्यूच्या क्षणापर्यंत आपण सातत्याने श्वास घेत असतो. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंच्या दरम्यान सगळं काही बदलत जातं. प्रत्येक गोष्ट बदलते, कोणतीच कायम राहत नाही.

जन्म आणि मृत्यूच्या दरम्यान कायम राहणारं काही असेल तर तो असतो केवळ श्वासोच्छ्वास.

लहान मुलाचा तरुण होतो; तरुणाचा वृद्ध होतो. हा वृद्ध विकारांनी ग्रासला जातो, त्याचं शरीर विद्रूप होतं, आजारी होतं; सगळं काही बदलतं. तो आनंदी असतो, दु:खी असतो, सहन करत असतो; सगळं काही बदलत जातं; पण या दोन बिंदूंदरम्यान जे काही घडेल ते घडो, प्रत्येकाला श्वास घ्यावाच लागतो. आनंदी असा किंवा दु:खी असा, तरुण असा किंवा म्हातारे असा, यशस्वी असा किंवा अपयशी असा- तुम्ही कोणीही असा- त्याला महत्त्व नाही- एक गोष्ट निश्चित आहे- जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंच्या दरम्यान तुम्हाला श्वास घ्यावाच लागतो.

श्वासोच्छ्वास हा सातत्यपूर्ण प्रवाह आहे; यात खंड शक्यच नाही. तुम्ही काही क्षणांसाठी जरी श्वास घेण्याचं विसरलात, तरी होत्याचे नव्हते होऊन जाल. म्हणूनच श्वास घेण्यासाठी तुमची गरजही नसते, कारण तसं झालं तर मग कठीण होऊन जाईल. कोणी तरी एखाद्या क्षणासाठी श्वास घ्यायचं विसरेल आणि मग.. म्हणूनच, खरं तर श्वासोच्छ्वास तुम्ही करतच नसता, त्यासाठी तुमची गरजच नाही. तुम्ही गाढ झोपता, तेव्हाही श्वासोच्छ्वास सुरूच राहतो; तुम्ही बेशुद्ध पडलात तरी तो सुरूच असतो; तुम्ही कोमात गेलात तरी श्वासोच्छ्वास सुरूच राहतो. त्यासाठी तुमची आवश्यकता नाही; श्वासोच्छ्वास तुमच्याशिवायही सुरूच राहतो. तुमच्या व्यक्तिमत्त्वातला श्वास एक कायम घटक आहे- ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे श्वासोच्छ्वास ही अत्यावश्यक आणि जीवनासाठी पायाभूत अशी बाब आहे. तुम्ही श्वास घेतल्याशिवाय जिवंतच राहू शकत नाही. म्हणजे श्वास आणि आयुष्य हे समानार्थी शब्द असल्यासारखे आहेत. श्वासोच्छ्वास ही आयुष्याची यंत्रणा आहे आणि आयुष्याचा श्वासाशी खोल संबंध आहे. म्हणून तर भारतात आपण त्याला प्राण म्हणतो. आपण दोहोंना एक शब्द दिला आहे- प्राण म्हणजे चेतना, जिवंतपणा. तुमचं आयुष्य म्हणजे तुमचा श्वास आहे.

तिसरी गोष्ट म्हणजे, तुमचा श्वास हा तुम्हाला आणि तुमच्या शरीराला जोडणारा सेतू आहे.

श्वास तुम्हाला सतत तुमच्या शरीरापर्यंत घेऊन जातो, शरीराशी जोडतो, तुमचं शरीराशी नातं तयार करतो. श्वास हा केवळ तुम्हाला आणि तुमच्या शरीराशी जोडणारा पूल नाही, तर तुम्हाला विश्वाशी जोडणारा पूलही आहे. तुमचं शरीर म्हणजे तुमच्याकडे आलेला विश्वाचाच एक भाग आहे, तुमच्या जवळ असलेला. तुमचं शरीर विश्वाचाच भाग आहे. शरीरातलं सर्व काही – प्रत्येक कण, प्रत्येक पेशी- विश्वाचाच भाग आहे. विश्वाच्या जवळ जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग. श्वास हा सेतू आहे. हा सेतू तुटला, की तुम्ही तुमच्या शरीरात उरत नाही. तुम्ही एका अज्ञात मितीत प्रवेश करता; मग तुम्हाला स्थळाची, काळाची बंधनं उरत नाहीत. तिसरी गोष्ट म्हणजे श्वास हा तुम्हाला स्थळा-काळाशी जोडून ठेवणारा पूलही आहे.

म्हणूनच श्वास खूप महत्त्वाचा होतो.. सर्वात महत्त्वाची गोष्ट. तुम्ही जर या श्वासाचं काही करू शकत असाल, तर अवचित वर्तमानाकडे वळाल. तुम्ही या श्वासाचं जर काही करू शकत असाल, तर तुम्हाला आयुष्याच्या स्रोतापर्यंत पोहोचता येईल. तुम्ही या श्वासाचं काही करू शकत असाल, तर तुम्ही स्थळा-काळाच्या पलीकडे जाल. तुम्ही जर या श्वासाचं काही करू शकत असाल, तर तुम्ही या जगातही असाल आणि त्याच्या पलीकडेही जाल. श्वासाला दोन बिंदू असतात. श्वासाचा एक बिंदू शरीराला आणि विश्वाला स्पर्श करतो, तर दुसरा बिंदू या विश्वाच्या पलीकडे जातो. आपल्याला श्वासाचा केवळ एक भाग माहीत असतो. तो जेव्हा विश्वात, शरीरात प्रवेश करतो, तेव्हा आपल्याला तो माहीत असतो; पण तो नेहमीच शारीरापासून अशारीराकडे आणि अशारीराकडून शारीराकडे येत-जात असतो. हा दुसरा बिंदू आपल्याला माहीत नसतो. जर तुम्हाला या दुसऱ्या बिंदूची, सेतूच्या दुसऱ्या ध्रुवाची जाणीव झाली तर तुमचं स्वरूपच बदलून जाईल, तुम्ही एका वेगळ्याच परिमाणात नव्याने रुजाल.

श्वासोच्छ्वासाच्या एका विशिष्ट शैलीचा सराव तुम्हाला करावा लागेल असं नाही- श्वासोच्छ्वासाच्या एखाद्या विशिष्ट प्रणालीचा किंवा विशिष्ट लयीचा सराव करण्याची आवश्यकता नाही- नाहीच! प्रत्येकाने श्वास जसा घेतला जाईल, तसाच घेतला पाहिजे. केवळ त्या श्वासोच्छ्वासातल्या विशिष्ट बिंदूंची जाणीव होणं आवश्यक आहे.

असे काही बिंदू असतात; पण आपल्याला ते माहीत नसतात. आपण श्वासोच्छ्वास करत आलो आहे आणि करतच राहू- आपण जन्माला आल्यापासून श्वास घेतोय आणि मरेपर्यंत घेत राहू- पण आपल्याला या विशिष्ट बिंदूंची जाणीव होत नाहीत. हे विचित्रच आहे. माणूस अवकाशात शोध घेतोय, खोलवर जातोय. माणूस चंद्रावर जातोय; माणूस पुढे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पृथ्वीच्या पलीकडे अवकाशात जातोय; पण तो त्याच्या आयुष्याच्या सर्वात जवळच्या भागाबद्दल माहीत करून घेऊ शकलेला नाही. श्वासोच्छ्वासातल्या विशिष्ट बिंदूंचं निरीक्षण तुम्ही कधीच केलेलं नाही.

हे बिंदू म्हणजे दरवाजे आहेत- तुमच्या सर्वात जवळ असलेले दरवाजे, जिथून तुम्ही एका वेगळ्या जगात प्रवेश करू शकता, एका वेगळ्या अस्तित्वात प्रवेश करू शकता, एका वेगळ्या जाणिवेत प्रवेश करू शकता.

ओशो, द बुक ऑफ सिक्रेट्स, टॉक#३

सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

ओशो टाइम्स इंटरनॅशनल

www.osho.com

भाषांतर – सायली परांजपे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2018 1:04 am

Web Title: article on osho the book of secrets
Next Stories
1 संयमन
2 योग्य निद्रा
3 व्यक्तिमत्त्व म्हणजे संपूर्णत्व!
Just Now!
X