22 January 2021

News Flash

स्मृती आख्यान : विसरभोळेपणाच्या पायऱ्या..

‘अल्झायमर्स सोसायटी’च्या निरीक्षणातून असं दिसून आलं, की सध्याच्या परिस्थितीचा दुष्परिणाम स्मरणशक्तीवर होत आहे

(संग्रहित छायाचित्र)

मंगला जोगळेकर

विसरलो किंवा विसरले हा आजकाल सगळ्यांसाठी परवलीचा शब्द झाला आहे. मात्र हा शब्द सातत्यानं उच्चारावा लागत असेल, विस्मरणामुळे रोजच्या व्यवहारात अडथळे येत असतील वा आर्थिक नुकसान होत असेल, तर मात्र ते गांभीर्याने घ्यायलाच हवं. अर्थात नंतर जागं होण्यापेक्षा अफाट ताकदीच्या आपल्या मेंदूला सुरुवातीपासूनच स्वयंशिस्तीची सवय लावली की स्मरणशक्तीची कार्यक्षमता अधिक वाढते. लक्षात राहात नाही या गोष्टीपासून विस्मरणापर्यंतचा प्रवास करायचा नसेल तर दर पंधरवडय़ाने ‘स्मृती आख्यान’ समजून घ्यायलाच हवं.

सध्या विस्मरण हा एक अतिपरिचित शब्द झाला आहे असं वाटतं का? अगदी दुसरी-तिसरीत जाणाऱ्या मुलांपासून प्रत्येकाच्या तोंडात, ‘‘मी विसरलो, मुद्दामहून नाही केलं’’, ‘‘अगदी लक्षात राहिलं नाही’’, ‘‘तरी मी घोकत होते’’, ‘‘घरातून निघेपर्यंत लक्षात ठेवलं होतं’’, अशी वाक्यं असतातच आणि त्यात काळजी करण्यासारखं काहीच नसतं. कारण जेव्हा छोटय़ाशा कालावधीत शंभर गोष्टी करायच्या असतात, त्या वेळी एखादी गोष्ट आठवली नाही म्हणजे काही महाभारत घडलं असं होत नाही. कालांतरानं अशा बारीक बारीक गोष्टी आपण विसरूनही जातो आणि रोजचं आयुष्य पुढे पुढे जात राहातं.

मात्र जेव्हा असे अनुभव वारंवार येत राहातात, विसरभोळेपणाच्या नवीन नवीन पायऱ्या आपण नियमित चढत राहातो, आज कुठे तरी विसरलेल्या चष्म्याच्या, मोबाइलच्या नाही तर उद्या दुसऱ्या कशाच्या रूपानं किंमत मोजत राहातो, या ना त्या कारणास्तव जोडीदाराच्या नाही तर मुलांच्या टपल्या खात राहातो, तेव्हा मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात ‘माझ्या स्मरणशक्तीला झालंय तरी काय?’ असा प्रश्न आल्याशिवाय राहात नाही. गप्प बसण्याशिवाय बहुतेकदा त्यावर आपण दुसरं काहीच करत नाही. आतल्या आत काही जणांचं मात्र धाबं दणाणून जातं. स्वत:च्या स्मरणशक्तीवरचा विश्वास उडण्याच्या घटना काही जणांच्या बाबतीत घडायला लागतात. महत्त्वाची कागदपत्रं सांभाळणं, एखादी गोष्ट जबाबदारीनं करणं अवघड वाटायला लागतं. त्या वेळी मात्र काही तरी करायला पाहिजे असं वाटायला लागतं.

या चित्रात भर पडली आहे सध्याच्या परिस्थितीची. ‘करोना’च्या कालावधीत स्मरणशक्तीचे प्रश्न वाढत चालले आहेत. हल्ली मित्रमंडळींच्या चर्चामध्ये हा विषय हटकून निघतो. इंटरनेटवर शोध घेतलात तर वर्तमानपत्रांमधून, संशोधन अहवालांमधूनही हा विषय मांडला जाताना दिसतो आहे आणि हा परिणाम स्थानिक नाही, तर जगभर सर्वानाच जाणवतो आहे. ‘करोना’ काळाआधीची स्मरणशक्ती आणि या काळामुळे त्यावर झालेला परिणाम, हा भविष्यातील संशोधनाचा महत्त्वाचा विषय ठरणार आहे. देशात टाळेबंदी सुरू झाली तेव्हा प्रत्येकाच्याच मनामध्ये अस्वस्थता, असुरक्षितता, चिंता अशा भावना होत्या. या भावनांना एकाकीपणाचीही जोड मिळाली. त्यामध्ये व्यापक परिणाम अर्थातच एकटेपणाचा होता. सामाजिक संबंधांबाबतीत ‘संपर्क’ आहे पण भेटीगाठींमध्ये दुरावा आहे, अशी परिस्थिती समाजाच्या काही स्तरांमध्ये आली आहे, असं समाजशास्त्रज्ञ आपल्याला सांगत होतेच. पण टाळेबंदीच्या पडद्यामुळे ही अवस्था सगळीकडे फैलावली. सामाजिक जीवनाचे फायदे डोळ्यांना दिसोत वा न दिसोत, मेंदूसाठी ते अत्यावश्यक आहेत. क्षुल्लक गोष्टींचे किस्से एकमेकांना सांगणं, विनाकारण हास्यातील डूब, एकमेकांसाठी काहीतरी घेऊन जाणं, एकमेकांच्या कुटुंबांची चौकशी करणं, बाहेर गेल्यावर वेगवेगळ्या गोष्टींचं केलेलं निरीक्षण, त्याला जोडलेल्या आठवणी, दिसणारी दुकानं, झाडं, हे सगळं आपल्या आठवणींना बांधून ठेवत असतं. ऑफिसमध्ये असताना कामं लवकर उरकतात, पटापट निर्णय घेतले जातात, असं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असेल. मेंदूला त्याची निर्णयक्षमता, सोशीकता, कणखरपणा देणारा माहौल तात्पुरता तरी संपला आहे. बाहेर न जाण्याचं बंधन, माणसांच्या भेटीचा अटकाव, जगण्यापुरता तरी पैसा मिळेल की नाही याची चिंता, यातून आपण बाहेर येऊ लागलो असलो तरी भीतीचा राक्षस अजून मानेवर बसलेला आहेच. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी गेल्या नऊ महिन्यांतील परिस्थितीमध्ये फार सुधारणा झालेली नाही.

‘अल्झायमर्स सोसायटी’च्या निरीक्षणातून असं दिसून आलं, की सध्याच्या परिस्थितीचा दुष्परिणाम स्मरणशक्तीवर होत आहे. वृद्धाश्रमात राहाणारे ज्येष्ठ असोत, वा तल्लख बुद्धिमत्ता असणारे असोत, सर्वाना विस्मरण होत आहे. नावं लक्षात राहाणं असो, सामानाची यादी करणं असो वा शब्द आठवणं असो, प्रश्न सगळ्यांनाच जाणवताहेत. ‘फ्रन्टीअर्स इन सायकॉलॉजी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात तात्पुरत्या स्मरणशक्तीवर या परिस्थितीचा परिणाम झाला आहे, असं निरीक्षण मांडलं आहे. ‘करोना’तून बरं झालेल्यांनाही काही काळ स्मरणशक्तीचे प्रश्न जाणवत आहेत. शिवाय सर्वच देशांमध्ये नैराश्य वाढलेलं दिसत आहे. काळजीग्रस्त लोकांची संख्या वाढली आहे. तासन्तास संगणकासमोर बसून मेंदू थकणं आता नित्याचं झालं आहे. या सगळ्याचा मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होणारच ना? ‘सायन्स वायर’ पाक्षिकात लिहिणाऱ्या एका न्यूरोसायंटिस्टनं  करोनाकाळाच्या पश्चात स्मरणशक्तीच्या प्रश्नांची लाट येण्याची भीतीयुक्त शक्यता व्यक्त केली आहे. परंतु तरीही मेंदूचं बळ कमी होत आहे, या विचारानं खचून जाण्यासारखी परिस्थिती नाही. चांगली गोष्ट अशी, की गंभीर परिस्थिती येण्याआधीच मेंदू ‘माझ्याकडे लक्ष द्या’ याची आगाऊ सूचना वेगवेगळ्या प्रश्नांच्या लक्षणांतून आपल्याला देत असतो. दुसरी चांगली गोष्ट अशी, की आपण मेंदूच्या क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला, तर मेंदूचा त्यासाठी सक्रिय पाठिंबा मिळतो. तिसरी गोष्ट म्हणजे मेंदू लवचीक असल्यामुळे मेंदूचं झालेलं नुकसान अशा प्रयत्नांमुळे भरून काढण्याची तो आपल्याला संधी देतो. म्हणूनच तुमच्या मेंदूला सामर्थ्यवान करण्यासाठी आवश्यक माहितीची ही नवीन लेखमाला

‘स्मृती आख्यान’ तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल.

या लेखमालेची सुरुवात विस्मरणाच्या प्रश्नाची माहिती घेण्यापासून करू. विस्मरणाचे तीन भाग करता येतील. सर्वसाधारण विस्मरण, ज्येष्ठांमधील विस्मरण आणि गंभीर विस्मरण. यापैकी सुरुवातीला पहिल्या दोन प्रकारांची माहिती आपण घेऊ. एकदा प्रश्न समजल्यावर मेंदूचं काम, स्मरणशक्ती, तात्पुरती आणि कायमस्वरूपी स्मरणशक्ती, संदेशवहनाची प्रक्रिया, याबाबत बोलू. पुढे जाऊन उपयुक्त संशोधनाबद्दल बोलू. मेंदूचं बळ वाढतं राहावं यासाठी ‘मेमरी क्लब’चा तोडगा बऱ्याच जणांना फायद्याचा ठरतो आहे. त्याची माहिती घेऊ. रोजच्या जीवनातील स्मरणशक्तीचे प्रश्न सोडवण्यासाठी कौशल्यांचा वापर, त्यानंतर स्मरणशक्तीची जोपासना कशी करावी, काय गोष्टी केल्यानं मेंदूची कार्यक्षमता वाढू शकते, याची माहिती घेऊ.

सर्वाना जाणवणारा यक्षप्रश्न म्हणजे नावं लक्षात न राहाणं. वेळीच शब्द न आठवल्यामुळेसुद्धा चिंता वाटायला लागते. या प्रश्नांबाबतही आपण काय करता येईल हे नक्की बोलूच. शास्त्रीयदृष्टय़ा मेंदूचं आरोग्य सांभाळण्यासाठी काय करावं, याची माहिती घेऊ. शेवटी ‘डिमेन्शिया’ विषयाची ओळख करून घेऊ. ‘डिमेन्शिया’ रुग्णांची काळजी घेताना काय आव्हानं येतात, काळजीवाहकांवर कसा ताण येतो, याबद्दलही बोलू. अशा रीतीनं आपलं स्मृतीविषयक आख्यान लावावं असं मी ठरवलं आहे. लेख लिहिताना त्यात थोडे बदल होतील, तसंच आपल्या प्रतिक्रियांतूनही मार्गदर्शन होईलच.

मी वैद्यकीय डॉक्टर नसल्यानं शास्त्रीय भाषेत न बोलता तुम्हाला पटेल, भिडेल अशा सोप्या भाषेत माहिती तुमच्यासमोर ठेवणार आहे. खरं तर मेंदूसाठी जे काही करायला पाहिजे, ते फार मोठं तत्त्वज्ञान आहे असं काही नाही. तुमच्यातील बऱ्याच व्यक्ती स्मरणशक्तीचे प्रश्न कमी करण्यासाठी काही ना काही करत असतीलच. फक्त एकत्रित माहितीद्वारे तुम्हाला एक दिशा मिळेल. लेखांमधून मिळालेल्या माहितीचा दैनंदिन जीवनात वापर केलात तर तुमच्या विस्मरणाचे प्रश्न सोडवायला मदत होईल. वास्तविक आपल्या रोजच्या व्यवहारात अगदी छोटे छोटे बदल केले तरी मेंदूच्या क्षमतेमध्ये जाणवण्याइतपत फरक झालेला आढळून येईल. कठीण प्रश्नांकडे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून बघू. स्मरणातील अडसर दूर करायचेच, असं ठरवलं तर बदल दिसणारच. त्याहीपेक्षा थोडं पुढे जाऊन मेंदूचं आरोग्य सुधारल्यास मेंदूला सक्षम ठेवण्याची किल्लीच तुमच्या हातात येईल.

अर्थातच आरोग्यवान मेंदूसाठी प्रयत्न आवश्यक आहेत. आयुष्याच्या अखेरीपर्यंत मेंदूची साथ प्रत्येकाला मिळावी ही काळाची गरज आहे. तुमच्या मेंदूला नवजीवन देणं, त्याचं संरक्षण करणं, त्याला सामर्थ्यशाली बनवणं तुमच्या हातात आहे. ही जबाबदारी आपण पेलायलाच हवी. त्यासाठी कुठलीही औषधाची गोळी परिणामकारक होणार नाही, तर ‘स्वयंशिस्तीची’ गोळी आपल्याला घ्यावी लागेल. लक्षात घ्या, की तेजस्वी मेंदूची निर्मिती करायला पैशांची गरज नसते. त्यासाठी जरुरी असते माहितीची, प्रयत्नांची, कल्पनाशक्तीची आणि इच्छाशक्तीची. एकदा मेंदूला भरारी घेण्याची सवय लावली की आपलं आपल्याला आश्चर्य वाटेल इतकी तो मोठी झेप घेईल. नववर्षांत तुमच्या मेंदूचं सामर्थ्य वाढो आणि त्याच्या झळाळीनं तुमचं आयुष्य उजळून जावो, ही सदिच्छा. तर मग भेटत राहू या.

मंगला जोगळेकर या व्यावसायिक सामाजिक कार्यकर्त्यां आहेत. त्यांनी ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’तून समाजकार्याची पदवी घेतली असून पुढे विधि आणि नागरी नियोजन या विषयांतील पदव्या संपादन केल्या. परंतु समाजकार्य हेच त्यांचे कार्यक्षेत्र राहिले. संशोधन, प्रशिक्षण, अध्यापन आणि ज्येष्ठ सेवा या क्षेत्रात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. ‘युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अ‍ॅण्ड सोशल कमिशन फॉर एशिया अ‍ॅण्ड द पॅसिफिक’च्या स्त्रियांसाठीच्या रोजगारनिर्मिती प्रकल्पामध्येही त्यांनी काम केले आहे. २०१० पासून त्यांनी पुण्यातील ‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालया’त ‘मेमरी क्लिनिक’मार्फत विस्मरण या विषयावर काम सुरू केले. त्या कामाला जोड देण्यासाठी ‘अल्झायमर्स सपोर्ट, पुणे’मार्फत विविध उपक्रम सुरू झाले. आज या दोहोंच्या माध्यमातून ‘डिमेन्शिया’ रुग्ण आणि कुटुंबीयांसाठी पुण्यामध्ये वैविध्यपूर्ण कार्यक्रम सुरू आहेत. डिमेन्शियाविषयक जागृती करणे, स्मृतीविषयक प्रशिक्षण कार्यक्रम, ‘मेमरी क्लब’ असे उपक्रम सुरू केले. या मेमरी क्लबला विशेष प्रतिसाद मिळत आहे. डिमेन्शिया विषयात त्यांनी ‘पीएच.डी.’ पदवी संपादन केली आहे.

mangal.joglekar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 12:04 am

Web Title: article on steps to forgetfulness abn 97
Next Stories
1 जगणं बदलताना : ही पहाटवेगळी आहे
2 पुरुष हृदय बाई : माझ्यातल्या पुरुषपणाचे अंश..
3 जोतिबांचे लेक : चाकोरी मोडणारे पुरुष 
Just Now!
X