04 March 2021

News Flash

नेतृत्वाचे शिवधनुष्य

नेतेपदी पोहोचण्यासाठी महत्त्वाकांक्षेला पर्याय नाही, पण महत्त्वाकांक्षा हा शब्द आला की एक वेगळ्या अर्थाचा कटाक्ष किंवा तत्सम भाव जागृत होतो

(संग्रहित छायाचित्र)

ऋता पंडित

ruta19@gmail.com

भारताच्या एकाहत्तराव्या प्रजासत्ताकदिनी झालेल्या संचलनात कॅप्टन तानिया शेरगिल यांनी पुरुष सैनिक तुकडीचे नेतृत्व केले. कॅप्टन तानिया यांची करारी मुद्रा, शोभून दिसणारा सैनिक पोशाख आणि आत्मविश्वासपूर्ण अभिनिवेश पाहून स्त्रीच्या नेतृत्व गुणाविषयी सातत्याने उपस्थित केलेल्या प्रश्नचिन्हालाच प्रश्न विचारावेसे वाटतात. आजही आपली स्त्री नेतृत्वात मागे का? तिला मागे ठेवलं जातं की ती मागे राहाते? येत्या ८ मार्चला साजरा होणाऱ्या जागतिक महिला दिनीही या प्रश्नाचा ऊहापोह व्हायला हवा.

शब्दांनी माझी चाळण केलीत

नजरांनी वार केलेत

तिरस्काराने मला मारलेत

तरीही मी परत उठेन, वावटळासारखी

– माया अ‍ॅँजेल्यू ,‘स्टील आय राईज’

सुप्रसिद्ध अमेरिकी कवयित्री माया अ‍ॅँजेल्यू यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांच्या कर्तृत्वाने अनेक काचेच्या भितींना हादरवले. त्यांचा जन्म १९२८ मध्ये तर मृत्यू २०१४ मध्ये झाला. अमेरिकेत त्या काळात सामाजिक उतरंडीत स्त्रियांना दुय्यम स्थान होतेच आणि त्यातही जर ती स्त्री ‘कृष्णवर्णीय’ म्हणजे ‘आफ्रिकन-अमेरिकन’ असेल तर ती ‘गोऱ्या’ स्त्रीपेक्षाही दुय्यम असे. माया अमेरिकेतील ‘सिव्हिल राईट्स मूव्हमेंट’मध्येही सक्रिय होत्या. त्यांनी जगण्यातून हाच संदेश दिला की, भोवतालची परिस्थिती कितीही विपरीत असली तरी या जगात आपल्या कर्तृत्वाने आणि स्थिर चित्ताने स्वत:ला सिद्ध करणाऱ्या, फक्त ध्येयावर लक्ष केंद्रित करून पुढे जाणाऱ्या स्त्रिया आज जगाला हव्या आहेत. आणि हो, अशा स्त्रिया आज आपल्या समाजात आहेत.

१७ फेब्रुवारी २०२० रोजी भारताच्या सशस्त्र दलातील लिंगाधारित भेदभाव संपुष्टात आणण्याचे निर्देश देत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने तळप्रमुख पदासारख्या नेतृत्वासाठीचा स्त्रियांचा मार्ग मोकळा केला. यापुढे लष्करात स्त्रियांना कायमस्वरुपी पदे आणि नेमणुका दिल्या जातील. त्यावेळच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ‘सामाजिक आणि मानसिक कारण देऊन सन्यातील महिला अधिकाऱ्यांना संधीपासून वंचित करणे हे फक्त भेदभावपूर्ण नव्हेच तर अस्वीकार्य आहे. केंद्र सरकारने आपला दृष्टिकोन आणि मानसिकतेत बदल केला पाहिजे.’ न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी केंद्र सरकारच्या विधानामागील बारकावे आणि तपशिलाची नोंद घेऊन स्पष्टीकरण दिले की स्त्रियांच्या शारीरिक जडणघडणीमुळे त्यांना वेगळा न्याय, वेगळी वागणूक देणे म्हणजे समानतेचा गळा घोटणे होय.’ स्त्रियांच्या बाबतीतला हा निकाल म्हणजे  विकसनशील समानतेच्या वाटेवर पडलेले दमदार पाऊल आहे आणि त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन करावे लागेल. परंतु येता काळच ठरवेल की, ही अपेक्षित समानता प्रत्यक्षात कशी येईल ते.

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने कॅप्टन तानिया शेरगिल यांचे उदाहरण दिले. नुकत्याच म्हणजे २६ जानेवारी २०२० रोजी, भारताच्या एकाहत्तराव्या प्रजासत्ताकदिनी झालेल्या संचलनात आपण सर्वानी कॅप्टन तानिया शेरगिल यांना पुरुष सैनिक तुकडीचे नेतृत्व करताना पाहिले. कॅप्टन तानिया यांची करारी मुद्रा, शोभून दिसणारा सैनिक पोशाख आणि आत्मविश्वासपूर्ण अभिनिवेश बघून अभिमानाने आणि आनंदाने ऊर भरून आला. शेरगिल कुटुंबातील ही चौथी पिढी, सत्तावीस वर्षीय कॅप्टन शेरगिल आज भारतीय सन्यात आहे. बी.टेक्. (इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन) नागपूर आणि ऑफिसर ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी, चेन्नई येथून पदवी प्राप्त केलेल्या कॅप्टन तानिया शेरगिल २०१७ पासून सन्यात कार्यरत आहेत. निवृत्त सेना अधिकारी वडील सूरतसिंग शेरगिल आणि निवृत्त  शिक्षिका आई लखिवदर कौर यांच्या या लाडक्या लेकीने पुरुष सैनिक तुकडीचे नेतृत्व करून, केवळ काचेच्या नाही तर दगडी, पोलादी भितींना तडे दिलेत. होय, आता फक्त तडे गेलेत, लवकरच भगदाड पडतील आणि हळूहळू असमानतेच्या या भिंती जमीनदोस्तही होतील अशी आशा आहे.

अशीच आणखी एक घटना काही दिवसांपूर्वी घडली. भारतीय उद्योजिका किरण मुजुमदार-शॉ यांना ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा सन्मान बहाल झाला. ऑस्ट्रेलिया देशातर्फे ‘सर्वोच्च नागरी सन्मान’ उद्योजिका किरण मुजुमदार-शॉ यांना त्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या सामाजिक गुंतवणुकीबद्दल, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील समन्वयाबद्दल आणि लिंग-समानतेचा पुरस्कार करण्याबद्दल देण्यात आला, असे निवेदन करण्यात आले. ‘बायोकॉन’ची स्थापना करणाऱ्या किरण मुजुमदार-शॉ यांनी पुरस्कार स्वीकारताना सुंदर आकाशी रंगाची साडी, दागिने आणि टिकली असा पेहराव केला होता. एरवी कॉर्पोरेट विश्वाला साजेशा पेहरावात सहज वावरणाऱ्या किरण मुजुमदार-शॉ यांनी आपली भारतीय स्त्री ही ओळख अशी जपली. पेहराव किंवा तत्सम बाह्य़ गोष्टींना महत्त्व नाही, पण भारतीय म्हणून आपले जे काही विशेष आहे ते त्यांनी जपले, असे मात्र नक्की वाटले आणि एका भारतीय उद्योजिकेला हा पुरस्कार लाभला ही आपल्यासाठी निश्चितच गौरवाची बाब आहे. किरण मुजुमदार-शॉ या पहिल्या पिढीच्या उद्योजिका आहेत, ज्यांनी बायोटेक्नोलॉजी म्हणजे जैव तंत्रज्ञानाची मुहूर्तमेढ भारतात १९७८ मध्ये ‘बायोकॉन’ची स्थापना करून केली. व्यवसाय क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करणाऱ्या किरण स्वत:ला ‘अ‍ॅक्सिडेंटल ऑन्त्रप्रेन्युअर’ म्हणतात. कॉर्पोरेट विश्वात पुरुषांची मक्तेदारी असताना, किरण मुजुमदार-शॉ यांनी लहान वयातच मोठे स्वप्न बघितले आणि ते प्रत्यक्षात आणले. एकीकडे अजूनही लिंगभेद, असमानता, स्त्रियांवर अत्याचार होत असताना, अशा दिलासादायक घटना घडतात आणि वाटेवर काचा असल्या तरी त्यांच्यावरून चालत जाण्याचे बळ अंगी येते.

स्त्रिया आणि नेतृत्व

लीडर किंवा नेता हे शब्द आपल्या ओळखीचे, ते शब्द उच्चारल्यावर डोळ्यासमोर उभी राहणारी प्रतिमाही ठरावीक. मराठी भाषेतील ‘नेता’ हा शब्द पुल्लिंगीच भासतो (किंवा असतो) असे, म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, हे प्रचलित वाक्य आपण जाणतो, मग यशस्वी स्त्रीच्या मागे कोण असतं किंवा ती असे काय करते की ती यशस्वी होते. आज जगभरात नेतृत्वपदी स्त्रिया अनेक ठिकाणी आहेत, पण पुरुषांच्या तुलनेत हे प्रमाण अजूनही कमी आहे. आरक्षण किंवा तत्सम धोरणांचा अवलंब होतो, पण तरीही हे प्रमाण कमी आहे. ‘स्त्रिया आणि नेतृत्वाचा चक्रव्यूह’ (Women and the Labyrith of Leadership) या ‘हार्वर्ड बिझनेस रिव्हू’मधील लेखात अ‍ॅलीस इगली आणि लिंडा कार्ली लिहितात की, ‘नेतृत्वाच्या पदापर्यंत पोहोचण्याचा चक्रव्यूह भेदणे (स्त्रियांसाठी) सोपे आणि सरळ नाही. त्यासाठी जिद्द, चिकाटी, स्वत:च्या प्रगतीचा आढावा आणि समोर काय आव्हाने आहेत, या सर्वाची जाणीव ठेवावी लागते. नेतृत्वपदाची आस असणाऱ्या स्त्रियांसाठी मार्ग असतो, पण तो मार्ग नागमोडय़ा वाटा, अपेक्षित अन् अनपेक्षित अवघड वळणांचा असतो.’ या लेखात स्त्रियांपुढील अडथळ्यांची चर्चा केली आहे आणि आस्थापनेत नेतृत्वपदाचे ध्येय स्त्रियांना साध्य होण्यास व्यवस्थापनाने काय केले पाहिजे, याचीही विस्तृत मांडणी केली आहे. वानगीदाखल, ‘नेतृत्वपदी स्त्री असल्यास तिच्याबरोबर किंवा हाताखाली काम करणाऱ्यांच्या मनोभूमिकेत योग्य बदल घडवून आणणे. उशिरापर्यंत काम करणे, म्हणजे खरे काम, या विचारांत बदल करणे.  टीममध्ये एकच स्त्री न घेता, स्त्रियांचा सहभाग वाढवणे. केवळ बठे काम नव्हे, तर शारीरिक बळाचे कामही आहे, जिथे अधिकाधिक अनुभव मिळेल, स्वत:चा कस लागेल असे काम करण्यास प्रोत्साहन देणे

आणि आस्थापनेतील मनुष्यबळ विभागाने ‘कुटुंबाचा’ विचार करणारी धोरण प्रणाली राबवणे,’ असे अनेक मुद्दे या लेखात मांडले आहेत. लेखात शेवटी म्हटले आहे की, ‘आम्हाला आशा आहे की, व्यावसायिक जीवनातील अडथळ्याचा नकाशा स्त्रियांपाशी असेल तर त्या सर्वंकष निर्णय घेऊ शकतील. स्त्रियांना जर समानता हवी असेल, तर स्त्रियांनी आणि पुरुषांनी नेतृत्वाचे स्थान समान विभागून घेतले पाहिजे. लिंगाच्या परिप्रेक्ष्यातून नेतृत्व समानता हवी असेल तर अडथळे कुठले आहेत हे समजून घेतले तर आपल्या हयातीत ते दूर होण्याची शक्यता आहे.’

 स्त्रिया आणि महत्त्वाकांक्षा:  व्यस्त नाते?

नेतेपदी पोहोचण्यासाठी महत्त्वाकांक्षेला पर्याय नाही, पण महत्त्वाकांक्षा हा शब्द आला की एक वेगळ्या अर्थाचा कटाक्ष किंवा तत्सम भाव जागृत होतो. स्त्रिया आणि महत्त्वाकांक्षा हे तर एक न रुचलेले समीकरण. लेखिका अ‍ॅना फेल्स, त्यांच्या  ‘स्त्रिया महत्त्वाकांक्षी नसतात का?’ या दीर्घ लेखात म्हणतात, ‘लहानपणी दोन निर्विवाद गोष्टी एकत्र येतात. एक म्हणजे कुठल्या तरी कौशल्यात मिळवलेले नपुण्य, जसे लिहिणे, नृत्य, अभिनय. दुसरे म्हणजे त्याबद्दल मिळालेलं कौतुक. यातूनच पुढे जो प्रभुत्वाचा अनुभव येतो तो महत्त्वाकांक्षेची पायाभरणी करतो. प्रयत्नांना मिळालेल्या अनुमोदनाचा परिपाक आणि पुढे ती (पुन्हा) निर्माण होणे म्हणजे महत्त्वाकांक्षा.’ परंतु यशस्वी स्त्रिया त्यांना मिळालेले यश हे बहुदा ‘मिरवत’ नाहीत. कारण लक्ष वेधून घेणे अशा स्त्रियांना आवडत नाही. स्वत:च्याच यशोगाथेत स्त्रियांना केंद्रस्थानी राहणे जड जाते, असे निरीक्षण फेल्स नोंदवतात. अ‍ॅना फेल्स स्त्रियांना महत्त्वाकांक्षेपासून दूर न जाता, काय करा हे सुचवतात. त्या लिहितात, ‘महत्त्वाकांक्षेबद्दल महत्त्वाकांक्षी व्हायचे असेल तर प्रथम नियोजन करा. सपोर्ट सिस्टीम उभी करा. सारे काही सहज मार्गी लागेल अशी अपेक्षा करू नका. कामाच्या, कुटुंबाच्या इतर साऱ्या जबाबदाऱ्या सांभाळताना काय गाळायचे, काय ठेवायचे यातील प्राधान्यक्रम ठरवा. तुमच्या कामाच्या, बुद्धीच्या, कौशल्याच्या बळावर मान्यता मिळवा. नीट विचार करून, शहानिशा करून तुम्हाला योग्य कामासाठी मान्यता मिळेल असे बघा, शोधत राहा. स्वत:विषयी, स्वत:च्या कामगिरीविषयी चारचौघात बोला. तुमचे काम योग्य लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी स्वत: पुढाकार घ्या. इट्स नेव्हर टू लेट. समाजप्रिय प्राणी म्हणून आपण सततच ‘अनुमोदानाच्या’ प्रतीक्षेत असतो. प्रभुत्व आणि मान्यतेचा अनुभव महत्त्वाकांक्षेला चेतवत राहतो आणि प्रयत्न करण्यास भाग पाडतो. महत्त्वाकांक्षेला पूरक वातावरण असेल तर महत्त्वाकांक्षा कधीच स्थिरावत नाही तर  पुढची पायरी गाठते.’

महत्त्वाकांक्षी स्त्री म्हणजे ती अमुक एक प्रकारेच, वागणार, बोलणार असा जो एक गरसमज असतो, तो खोडून काढणेही स्त्रियांच्याच हातात आहे. परिवर्तनशील (ट्रान्सफॉर्मेशनल) नेतृत्व गुण आणि व्यवहारी (ट्रान्सझ्याक्शनल) नेतृत्वगुणांचा अभ्यास केला असता,  नेतृत्वपद भूषविणाऱ्या स्त्रियांमध्ये परिवर्तनशील नेतृत्व गुण पुरुषांच्या तुलनेत अधिक असतो, असा एका विस्तृत अभ्यासाचा निष्कर्ष आहे. आपल्याबरोबर काम करणाऱ्यांना मार्गदर्शन करणे, सक्षम बनवणे, या गोष्टी या स्त्रिया तुलनेत अधिक करतात. आज नेतृत्वपदी स्त्रियांची टक्केवारी कमी असली तरी गुणात्मकरीत्या स्त्रिया अधिक प्रभावी आणि सर्वाना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व गुण जोपासतात, असे म्हणायला हरकत नाही.

नेतृत्वाचा लेखाजोखा

नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेणाऱ्या किंवा नेतृत्वाची जबाबदारी अंगावर पडल्यावर ती यशस्वीपणे पार पाडायची असेल तर काही सामन्य व्यवहारज्ञान वाटतील अशा, पण मूलगामी गोष्टी त्या व्यक्तीला कराव्या लागतात. आपल्या नेतृत्वाचा नेमका हेतू काय आहे ते जाणणे. हिलरी क्लिंटन यांचे एक विधान आहे, ‘‘कितीही प्रयत्न केला तरी, ती ‘काय’ सांगते आहे, याकडे लक्ष दिले जात नाही. ती बोलत होती तेव्हा ‘कशी’ दिसत होती, हीच गोष्ट चर्चिली जाते.’’ त्या म्हणतात की, त्या आता अशा गोष्टींची तमा बाळगत नाहीत, काम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करतात. उद्दिष्टाकडे लक्ष ठेवून वाटचाल केल्यास महत्त्वाचे काय ते कळत जातेच.

प्रभावी नेतृत्व हे एक नवीन गुंतागुंतीचे कौशल्य शिकणे होय. हे शिकणे म्हणजे स्वत:ला पणाला लावत, भोवतीचे सुख-वर्तुळ भेदत पुढे जाणे. नेतृत्वाच्या यशात द्रष्टेपण, सोबत असलेल्यांचे सबलीकरण, प्रेरणादायी वर्तन, संकल्पना- धोरण आखणी, सांघिक मूल्यांना खतपाणी, जागतिक दृष्टिकोन, चिकाटी आणि लवचीकता, चांगल्या कामाचा गौरव, जीवनातील समतोल, ताण सहन करण्याची क्षमता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता या गोष्टी अंतर्भूत असतात, असे  GELI (ग्लोबल एक्झिक्युटिव्ह लिडरशिप इन्व्हेंटरी) अहवालातून स्पष्ट झालं.

द्वंद्व आणि सामाजिक धारणा

स्त्रिया अधिक भावनाप्रधान असतात म्हणून त्या नेतृत्वपदाबरोबर येणाऱ्या तणावाच्या परिस्थितीला, शारीरिक आणि मानसिक कस पाहणाऱ्या घडामोडींना खंबीरपणे सामोरे जाऊ शकत नाहीत, हा समज प्रथम स्त्रियांनीच स्वत:च्या मनातून काढायला हवा. समाजात आणि कार्यक्षेत्रात वावरताना जोखमीच्या आणि शारीरिक कस बघणाऱ्या अनुभवांना सामोरे जाण्यासाठी स्त्रियांनी स्वत:ला तयार केले पाहिजे. स्त्रीची अब्रू म्हणजे ‘काचेचं भांडं’ हा दृष्टिकोन जोपर्यंत स्त्रिया स्वत:च्या मनातून काढून टाकत नाहीत आणि समाजही स्त्रीकडे केवळ स्त्री म्हणून न बघता, एक व्यक्ती म्हणून बघत नाही, तोवर हा लढा निकराने लढावाच लागेल. केवळ आधुनिक पेहराव केला, हाती शिलगावलेली सिगारेट, मद्याचा प्याला असला, पुरुषी अभिनिवेश घेतला, लैंगिक स्वातंत्र्य मिळाले की स्त्रीमुक्ती साध्य झाली, असा समज असेल तर ती दिखाऊ प्रतीकात्मकता स्त्रियांसाठीच प्रतिगामी ठरते. सुजाण, विचारी स्त्रियांनी आपल्या वर्तनातून आपल्या आजूबाजूच्या वर्तुळात आणि त्यायोगे समाजात नेतृत्वाचे  शिवधनुष्य पेलण्याचा आदर्श निर्माण केला पाहिजे.

स्त्रियांवर बलात्कार आणि अ‍ॅसिड हल्ले होत असताना त्या एकटय़ा झुंजणाऱ्या स्त्रियांच्या मृत्यूला व्यर्थ न जाऊ देण्यासाठी, न्यायालयीन नेतृत्वपदी जर अधिक स्त्रिया असतील तर अशा नराधमांना कायद्याच्या चौकटीत राहूनच योग्य ती शिक्षा, विलंब न होता मिळेल का, असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. निर्णयप्रक्रियेत सकारात्मक आणि सर्वसमावेशक बदल घडवून आणायचा असेल आणि निर्णयप्रक्रियेतील विलंब जर कमी करायचा असेल तर नेतृत्वपदी पोहोचण्यास स्त्रियांनी स्वत: पुढाकार घेतला पाहिजे. जोपर्यंत निर्णयप्रक्रियेत सुजाण स्त्रियांचा सक्रिय सहभाग वाढत नाही तोवर त्यांच्या मताला वजन येणार नाही. म्हणूनच भावनिक बुद्धिमत्तेच्या जोरावर धोरणीपणे एकेक पाऊल पुढे टाकत नेतृत्व पदापासून लांब ठेवणारी ही काचेची भिंत उध्वस्त करण्यास स्त्रियांनी समोर आले पाहिजे.

परंतु समानतेचा रस्ता एकेरी वाहतुकीचा नाही, केवळ स्त्रियांनीच नारे देत, न्याय मागत राहायचे हे किती दिवस चालणार? घरातील पुरुषप्रधान वातावरणात पुरुषांनी घेतलेले निर्णय, घरातील स्त्रिया धीराने आणि कौशल्याने कशा बदलू शकतात, ही स्त्रियांची मुत्सद्देगिरी असो किंवा पत्नीचे मत विचारात घेऊन एकत्रित निर्णय घेण्याऱ्या पतीला, ‘बायकोच्या ताटाखालचं मांजर’ म्हणून कमी लेखणारे पुरुष आणि स्त्रियाही असतात, हे दृष्टीआड करता येत नाही. स्त्रिया आणि पुरुष दोघांनीही हे नेतृत्वाचे शिवधनुष्य पेलण्यास एकमेकांना साथ दिली, तर कोणाच्याही मनात दुसऱ्याविषयी किल्मिष राहणार नाहीत. नेतृत्वपदासाठी जी व्यक्ती योग्य असेल ती नेतृत्वपदी जाईल. गुणांवर, कर्तृत्वावर भर दिला जाईल.

कॅप्टन तानिया शेरगिल आणि उद्योजिका किरण मुजुमदार-शॉ यांनी त्यांच्या कर्तृत्वाने, त्यांच्या समोरील भिंती भेदल्या. आणि हो, २०२०च्या प्रजासत्ताकदिनी सीआरपीएफमधील २१ महिला डेअरडेव्हिल्सनी ‘स्टंट्स’ सादर केलेले पाहिले की वाटतं मनातील शंका आणि पूर्वग्रह मागे सारून, कर्तृत्वाच्या बळावर नेतृत्वाच्या वाटेवर चालण्यास आपणही सज्ज होऊ या.

(लेखिका उद्योजिका तसेच कौशल्यविकास क्षेत्रात प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. )

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 1:19 am

Web Title: article on why behind women leadership abn 97
Next Stories
1 जीवनकौशल्य
2 जीवन विज्ञान : अपचन, कुपचन आणि अतिपचन
3 मनातलं कागदावर : जुईच्या फुलाचा गंध
Just Now!
X