News Flash

वसुंधरेच्या लेकी : बालीच्या बालिका

शासनाला नमावं लागलंच. प्लास्टिक कचऱ्याविरोधात कायदा झालाच.. बाली बेट पुन्हा एकदा मोकळा श्वास घेऊ लागलं.. या बालीच्या बालिकांविषयी..

इसाबेल आणि मेलाती विजसेन

सिद्धी महाजन – snmhjn33@gmail.com

मेलाती आणि इसाबेल विजसेन, वय र्वष के वळ १० आणि १२. प्लास्टिक प्रदूषण करणाऱ्या देशांच्या क्रमवारीत इंडोनेशियाचा दुसरा क्रमांक लागत असल्याचा फटका त्यांच्याही नितांतसुंदर, देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाली बेटाला बसला. पर्यटनासाठी लोकप्रिय बालीचा जीव प्लास्टिकच्या जाळ्यात घुसमटू लागला. भवितव्य समोर होतं. दोघी बहिणींनी त्या विरोधात शंख फुं कलं. ‘ बाय बाय प्लास्टिक बॅग्स’ या संस्थेची स्थापना केली. जनजागृतीसाठी कार्यशाळा घेतल्या, साफसफाई मोहिमा राबवल्या आणि अखेर महात्मा गांधीजींच्या पावलावर पाऊल टाकत उपोषण सुरू केलं. शासनाला नमावं लागलंच. प्लास्टिक कचऱ्याविरोधात कायदा झालाच.. बाली बेट पुन्हा एकदा मोकळा श्वास घेऊ लागलं.. या बालीच्या बालिकांविषयी..

या लेखातून आपण वळूया थोडंसं पूर्वेकडे!

नजर जाईल तिथपर्यंत मनाला खेचून घेणारी, डोळ्यांना सुखद गारवा देणारी हिरवी वनराई. निवांत पसरलेली मुलायम भातखाचरं. शांत, अनंत हिरवाईखाली पहुडलेले जागृत ज्वालामुखी. अन् या नयनरम्य नजाऱ्याला नजर लागू नये म्हणून की काय, या सुप्रसवा भूमीला चहूबाजूंनी वेढत कवेत घेणारे काजळकाळे समुद्र किनारे.

जावा आणि लंबोक या दोन बेटांमधोमध वसलेलं बाली हे इंडोनेशियन द्वीपसमूहातील एक छोटंसं अन् देखणं बेट. इथला निसर्ग जसा अवर्णनीय आहे तसा इथला सांस्कृतिक वारसाही अतुलनीय आहे. इथली अस्पर्श गहिरी शांतता, अन् शुद्ध मोकळी हवा श्वासात भरून घेण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो पर्यटकांची रीघ दरवर्षी इथे लागलेली असते. पण जसा पर्यटकांचा राबता वाढला, आधुनिकीकरण झालं, तशी बालीच्या सौंदर्याला दृष्ट लागली. देवभूमी म्हणून ओळखलं जाणारं हे देखणं बेट अन् इथला सागर, हळूहळू प्लास्टिकचं आगर बनू लागलं.

प्लास्टिक प्रदूषण करणाऱ्या देशांच्या क्रमवारीत इंडोनेशियाचा दुसरा क्रमांक लागतो. दरवर्षी पाच अब्ज पर्यटकांना आकर्षून घेणाऱ्या आणि पर्यटन हाच स्थानिकांच्या पोटापाण्याचा सर्वात मोठा व्यवसाय असणाऱ्या बाली बेटावर समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरं आणि इतर अनेक ठिकाणी प्लास्टिकचा खच पडलेला दिसून येत असे. सुंदर निळ्याशार समुद्राचे आणि निवळशंख पाण्याच्या स्रोतांचे श्वास जागोजागी अडकलेल्या प्लास्टिकमुळे घुसमटलेले दिसून येत. पावसाळा सुरू झाल्यावर, वारे उलटे वाहू लागल्यावर बालीमध्ये चक्क कचऱ्याचा मौसम सुरू होत असे. जिथे नजर जाईल तिथे प्लास्टिकची विद्रूप गुंतवळ दिसून येत असे आणि मुख्य म्हणजे कोणालाच याचं सोयरसुतक नव्हतं. आंतरराष्ट्रीय माध्यमातून सतत या प्रश्नावर आवाज उठवला जात असताना स्थानिक प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसलं होतं. सामान्य जनतेत याबाबत जनजागृती सोडा, काहीच कृती होताना दिसत नव्हती.

अशा वेळी  दहा आणि बारा र्वष वयाच्या दोन बहिणींनी आपल्या बेटावरील प्लास्टिकचं समूळ उच्चाटन करण्याचा चंग बांधला. आपल्या भोवताली उग्र रूप धारण करणारी ही समस्या दिवसेंदिवस प्रचंड वेगानं मोठी होत असताना, ते थांबवण्यासाठी त्यांना वयानं मोठं होण्यासाठी अजिबातच थांबायचं नव्हतं. ही समस्या म्हणजे त्यांच्या रोजच्या जगण्यात अडथळा आणणारा प्रश्न होता. दररोज लाखो टन प्लास्टिक समुद्रात ओतणारा त्यांचा देश प्लास्टिकमुळे समुद्री प्रदूषण करणाऱ्या देशांच्या यादीत जगात दुसऱ्या क्रमांकावर विराजमान होता आणि ते अजिबात भूषणावह नव्हतं. त्यांना समजत होतं, की या सगळ्याचे वाईट परिणाम आपल्याच पिढीला बघावे आणि भोगावे लागणार आहेत. या सगळ्यांबरोबर आपल्याला एक सुवर्णसंधीही मिळाली आहे. आपण ठरवलं तर प्रयत्न करून या नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये बदलू शकतो. तेव्हाच आयुष्याच्या त्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांना कळून चुकलं, की प्लास्टिक निर्मूलनाचं काम आपण पुढाकार घेतल्याशिवाय कुणीच करणार नाही. त्यांच्या लक्षात आलं, की बालीमध्ये तयार होणाऱ्या ६८० क्युबिक मीटर्स इतक्या प्लास्टिक कचऱ्यापैकी फक्त पाच टक्के कचऱ्यावर पुन्हा प्रक्रिया केली जाते. म्हणजे एखाद्या चौदा मजली इमारतीएवढा कचरा! या एवढय़ा मोठय़ा समस्येला आळा घालण्यासाठी या मुलींना एक जालीम उपाय प्रत्यक्षात आणायचा होता. प्लास्टिकबंदी. त्या मुलींची नावं होती, मेलाती आणि इसाबेल विजसेन.

बालीमध्ये रामायणावर आधारित खूप पारंपरिक कलाप्रकार प्रचलित आहेत. त्यांपैकी एक आहे केचक नृत्य. यात अनेक वानर सारखा ‘चक चक केचक’ असा आवाज काढत रामाला प्रोत्साहन देत राहातात. एका क्षणाला त्यांचा आवाज एवढा घुमू लागतो, की मुख्य पात्रांच्या बरोबरच प्रेक्षकही रोमांचित होतात. असाच होता या वानर सेनेचा निर्वाणीचा लढा. ही बंदी प्रत्यक्षात आणण्यासाठी या दोन बहिणींनीही असंच जंग जंग पछाडले. प्लास्टिक बंदी प्रत्यक्षात आणण्याचा विचार मांडणं म्हणजेच भल्याभल्यांची झोप उडवणं होतं. इतकी र्वष बेसुमार प्लास्टिक उत्पादन आणि वापर करण्यासाठी सरावलेल्या लोकांना आणि त्याहीपेक्षा स्थानिक सरकार आणि उत्पादक लॉबी यांना हा नियम मान्य करण्यासाठी आपल्या ‘विशेष फायद्यां’ना तिलांजली द्यावी लागली असती. साहजिकच त्यांना वाकायला लावणं एकदम जिकिरीचं काम होतं. हा कायदा मान्य करण्यासाठी, सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी जनहित याचिका दाखल केली. पण नुसते कागदावरच प्रयत्न करून भागणार नव्हतं, कारण सरकारचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गव्हर्नर मांगकु पास्तिका यांनी तब्बल दीड वर्षं या सगळ्यावर काहीच प्रतिक्रिया नोंदवली नव्हती.

आता मात्र या दोघींचा धीर सुटत चालला होता. तेव्हा त्यांना आठवली भारतभेटीत साबरमती आश्रमाला दिलेली भेट. एका परक्या देशात मोहनदास करमचंद गांधी नावाच्या एका साध्यासुध्या दिसणाऱ्या माणसानं केवळ विचारांच्या अन् शांततेच्या मार्गानं दिलेल्या लढय़ाची तिथे ऐकलेली गोष्ट. या माणसाच्या शिकवणीनं त्यांची समस्या चुटकीसरशी सोडवली. तिच्यातून प्रेरणा घेऊन एकमतानं त्यांनी गांधींच्या उपोषण आणि सत्याग्रहाचा मार्ग अनुसरला. वय लहान असल्यानं आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानं सूर्योदय ते सूर्यास्त जाहीर उपोषण करण्यास सुरुवात केली.  आणि याचा जादूची कांडी फिरावी तसा परिणाम झाला. चोवीस तासांत पोलिसांच्या गराडय़ात त्यांना गव्हर्नरपाशी नेण्यात आलं. आणि अशा प्रकारे बालीमध्ये प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यावर अखेर शिक्कामोर्तब झालं.

या एवढय़ाशा मुलींमध्ये दहाव्या आणि बाराव्या वर्षी ही हिंमत आली कुठून?

या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी बालीतल्या शेतांमधून मजल दरमजल करत थोडा प्रवास करावा लागेल. घनदाट जंगलात लपलेल्या, बंडुंग प्रांतातील अबायनसेमाल या ठिकाणी जावं लागेल. या ठिकाणी गर्द हिरव्या वनराजीत प्रवेश केल्यावर थोडेसं आत, गोल छपराच्या, गवतानं शाकारलेल्या आणि पूर्णपणे बांबू आणि इतर नैसर्गिक गोष्टींचा वापर करून बांधलेल्या अवाढव्य तीन-चार मजली झोपडय़ांनी सुसज्ज असा प्रासाद आपलं स्वागत करतो. पर्यावरणपूरक पर्यायी शिक्षणपद्धतीचा प्रसार करण्यासाठी जॉन आणि सिंथिया हार्डी या दाम्पत्यानं २००८ मध्ये सुरू केलेल्या ‘ग्रीन स्कूल’ नावाच्या शाळेमध्ये ४१ देशांमधली पाचशे मुलं आणि ४७० स्थानिक मुलं शिक्षण घेतात.

‘चेंज मेकर्स’ म्हणजेच बदलाचे शिल्पकार घडवणं  हे शाळेचं ब्रीद आहे. इथे रोजच्या जगण्यातील छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून विद्यार्थ्यांच्या मनात शाश्वत विकासाची संकल्पना रुजवली जाते. मुलांमधल्या सर्जनशक्तीला आणि विचारक्षमतेला मोकळा अवकाश मिळत जातो. पूर्णपणे हरित इंधनावर चालणारी ‘बायो बस’ इथे आहे. शाळेनं समुद्रजीवनाची आणि प्रवाळांची तोंडओळख करून देण्यासाठी सुरू केलेले ‘डायव्हिंग क्लब’ आहेत. ही शाळा समाज, शिक्षक, पालक आणि इतर घटकांना एकत्रित आणणाऱ्या ‘कुल कुल’ या पारंपरिक बाली विचारपद्धतीतून निर्माण झाली आहे. इथे विद्यार्थ्यांना जगभरात चाललेल्या सकारात्मक कार्याची ओळख करून दिली जाते. काहीतरी वेगळं, भव्य कार्य करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्ती, त्यांचं जीवन यांच्याबद्दल रोजच्या पाठय़क्रम आणि वर्गातून माहिती दिली जाते.

शिक्षणानं माणसाला स्वत:पेक्षा मोठा विचार करायची शक्ती दिली पाहिजे. काहीतरी नवीन करून पाहण्याची दृष्टी दिली पाहिजे. समस्या तयार करणाऱ्या माणसांच्या संख्येत भर न घालता, मुलांना समस्या सोडवणारे म्हणजेच ‘प्रॉब्लेम सॉल्व्हर्स’ बनवलं पाहिजे. अन् ही शाळा मुलांना नेमकी हीच दिशा दाखवते, स्वत:च्या समस्यांवर स्वत: उत्तर शोधण्याच्या निर्णायक वळणावर मुलांना विचार करण्याचं खूप दुर्मीळ स्वातंत्र्य देते. या स्वातंत्र्याचा सकारात्मक उपयोग मेलाती आणि इसाबेल यांनी केला.आपल्या घरासमोरच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहायला गेल्यावर प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये अंग गुरफटून जातंय अन् ४० देशांना जे साध्य झालं ते आपल्या देशात साध्य होत नाहीये हे पाहिल्यावर आपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याच्या उत्कट भावनेपोटी ‘ बाय बाय प्लास्टिक बॅग्स’ या संस्थेची स्थापना केली. शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करण्यासाठी कार्यशाळा घेण्याचा झपाटा लावला. बेटावरील समुद्रकिनाऱ्यांवर प्रचंड मोठय़ा प्रमाणावर साफसफाई मोहिमा राबवल्या आणि सर्वात शेवटचा घाव घातला तो उपोषण करून.

बालीच्या गव्हर्नरनी जाहीरनाम्यावर सही केल्यानंतर २०१८ पर्यंत बालीला प्लास्टिकमुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण ते म्हणावं तसं शक्य झालं नाही. परिणामी या बहिणींनी सरकारवर आणलेला दबाव तसाच कायम ठेवला. स्थानिक, नागरी आणि राष्ट्रीय पातळीवर सरकारला विश्वासात घेऊन उपक्रम सुरूच ठेवले. तरुणाईला संबोधित करण्यासाठी त्यांनी ‘टेड टॉक’मध्ये व्याख्यान दिलं, न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांपुढे आपलं म्हणणं मांडलं आणि जागतिक नाणेनिधी- जागतिक बँकेच्या परिषदेत उत्साहानं भाग घेऊन वर्ल्ड बँकेच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी क्रिस्टलीना जोर्जिव्हा यांच्याकडून कौतुकाची थाप मिळवली. पण त्यांच्या कामाची खरी पावती त्यांना मिळाली ती २०१९ मध्ये. बालीमध्ये पुनर्वापर करण्यास अयोग्य अशा प्लास्टिकवर बंदी आणणारा कायदा लागू झाला, बेकायदा प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांना सहा महिन्यांची नोटीस बजावली गेली, न जुमानणाऱ्या अडेलतट्टू लोकांचे परवाने रद्द केले गेले आणि या दोन बहिणींनी उपोषण करत रस्त्यावर जागवलेल्या शंभर रात्रींचं चीज झालं.

मेलाती आणि इसाबेलनं २०१३ मध्ये सुरू केलेली ‘बाय बाय प्लास्टिक बॅग्स’ ही चळवळ आता जगभर फोफावली आहे. या संस्थेच्या पन्नास संघटना वेगवेगळ्या देशांत उभ्या राहिल्या असून जगभरातील मुलं, तरुण याद्वारे प्रबोधन करतात. ‘सिंगल युज प्लास्टिक’चा वापर कमी करण्याच्या पलीकडे जाऊन या बहिणींनी ‘माउंटन मामास’ प्रकल्प सुरू केला आहे. त्यात बालीतील स्थानिक स्त्रियांना दान केलेल्या किंवा पुनर्निर्मिती  केलेल्या साहित्यातून पुन्हा वापरण्यायोग्य पिशव्या तयार करण्यास प्रशिक्षण दिलं जातं. या पुढे जाऊन मेलाती आपल्या जमातीला भेटण्यासाठी जगभर फिरते आहे. तिच्या मते एक बुलंद हाक देणं खूप खूप महत्त्वाचं आहे, केचकमधल्या वानरांचा आवाज अविरत घुमण्यासाठी!

(फोटो विजसेन भगिनींच्या फेसबुक पेजवरून)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2021 6:39 am

Web Title: bali isabel and melati wijsen vasundharachya leki dd70
Next Stories
1 गद्धेपंचविशी : पाय जमिनीवर ठेवणारी ‘पंचविशी’!
2 पडसाद : बहुरंगी चतुरंग!
3 गगनाला विश्वविक्रमी गवसणी
Just Now!
X