मी म्हणजे माझं शरीर अशी स्वत:ची ओळख धरून माणूस चालतो. पण ज्याच्या अस्तित्त्वामुळे हे शरीर जिवंत आहे त्या आत्म्याची जाणीव तो ठेवीत नाही, जीवन चालू आहे कारण आत्मा आत आहे याची आठवण ठेवली पाहिजे.
भ गवद्गीतेच्या अध्यायाच्या सुरुवातीला माया-ममतेच्या व करुणेच्या मोहात अडकून हातातून गांडीव धनुष्य गळून पडलेला हतबल अर्जुन आपल्याला दिसतो. अर्जुनाच्या या स्थितीचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज फार गमतीशीर करतात. ते म्हणतात, ‘अल्पवयीन अशा नव्याच करुणावृत्तीला घरात आणल्याने आजपर्यंत जवळ असणारी वीरवृत्ती अर्जुनाला सोडून निघून गेली.’
आपल्या युद्ध न करण्याच्या विचारांचं समर्थन करताना, युद्धाचे सामाजिक, राजकीय व कुळाच्या दृष्टीने भयंकर असे मृत्यूचे थैमान घालणारे दुष्परिणाम अर्जुन भगवंताना सांगताना दिसतो. इथे अर्जुनाची मती गुंग झाली आहे. तो एका विचित्र द्वंद्वात सापडला आहे. एकीकडे, शिष्यधर्म तर दुसरीकडे क्षात्रधर्म अशा परस्परविरोधी कर्तव्यांमधल्या कुठल्या कर्तव्याची निवड करणं अधिक योग्य हे अर्जुनाला कळत नव्हतं. या ठिकाणी अर्जुन सर्व ‘नरांचे’ प्रतिनिधित्व करतो. अर्जुनासारखेच आपण सर्वसामान्य लोकही असेच द्वंद्वांत सापडतो. काय नक्की करावे हे कळत नाही. अर्जुनाच्या निमित्ताने त्या नारायणाने अशा द्वंद्व समस्यांमधून सोडवणारे जे सखोल विवेचन केले ते गीतेच्या रूपाने अखिल मानवजातीसाठी मार्गदर्शक असं जीवनविषयक तत्त्वज्ञान बनलं आहे..
देह, मृत्यू व आत्मा
भगवंत म्हणाले, ‘अर्जुना मृत्यूच्या कल्पनेने तू हा जो शोक करीत आहेस तो बरोबर नाही. अरे, तू मारणारा कोण? तू जर मारलं नाहीस तर ते मरणारच नाहीत का? अर्जुना, जो जन्माला आला त्याचा मृत्यू अटळ आहे, तसेच तो मेला त्याचा जन्मही निश्चित आहे. या शरीरात ज्याप्रमाणे बाल्य, तारुण्य व वार्धक्य या अवस्था असतात तसाच पुढे मृत्यू येतो आणि मृत्यू कोणाचा? तर या शरीराचा. हे शरीर पंचमहाभूतांपासून बनलं आहे. हे वरचं आवरण आहे. आतमध्ये शरीराला जिवंतपणा देणारा प्राण अथवा ती चेतना आहे. ती निघून गेल्यामुळे शरीर मृतवत होतं. चेतना गेल्यावर शरीरातील आप, तेज, वायू, आकाश ही तत्त्वं बाह्य पंचभूतांत मिसळली जाऊन हाड-मांसरूपी पृथ्वी तत्त्व शिल्लक राहातं व तेही शेवटी पृथ्वीतत्त्वांत मिसळून जातं. इथे एक लक्षात घे की या ईशनिर्मित सृष्टीत कशाचाही संपूर्ण विनाश न होता, होतं ते फक्त परिवर्तन! समुद्राची वाफ-वाफेचे ढग-ढगांतून पाऊस-पावसाची नदी-नदीचा सागर व पुन्हा वाफ तसे! तेव्हा या शरीराच्या मृत्यूचा तू शोक करू नकोस.’
या शरीरातील चेतनेला, प्राणाला गीता ‘आत्मा’ म्हणते. हा आत्मा शरीर सोडतो. आत्मा कसा आहे? हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तो असतोच असतो. आत्मा नाशरहित, अजन्मा, न बदलणारा, नित्य, शाश्वत, अविनाशी, सर्वव्यापक असा आहे. हा आत्मा अमर आहे व देह नश्वर आहे. शरीर मारले गेले तरी आत्मा मरत नाही. ज्याप्रमाणे आपण जुने कपडे टाकून नवीन वस्त्र धारण करतो त्याप्रामाणे हा आत्मा जुनं शरीर टाकून नवीन वस्त्र धारण करतो.
माणूस मी म्हणजे माझं शरीर अशी स्वत:ची ओळख धरून चालतो. पण ज्याच्या अस्तित्वामुळे हे शरीर जिवंत आहे त्या आत्म्याची जाणीव तो ठेवत नाही, जीवन चालू आहे कारण आत्मा आत आहे याची सतत आठवण ठेवली पाहिजे. देहकेंद्रित असलेली वृत्ती आत्मकेंद्रित केली पाहिजे आपण म्हणजे देह नसून, आपण आत्मा आहोत, अशी जाणीव दृढ केली पाहिजे. एकदा विवेकानंदांना कुणीतरी विचारलं की पाश्चात्त्य तत्त्वज्ञान व भारतीय तत्त्वज्ञान यात फरक काय? त्यांनी सांगितलं की पाश्चात्त्य म्हणतात, ‘मी एक शरीर आहे नि मला आत्मा प्राप्त झाला आहे. आणि भारतीय की मी आत्मा आहे आणि मला शरीर प्राप्त झालंय.’
या तत्त्वज्ञानातून भगवंतांनी मानवाचा मृत्यूविषयक दु:खद दृष्टिकोन बदलायला लावलाय. नश्वर देहाभोवती घुटमळणारी वृत्ती बाजूला सारून, आत्म्याचं महत्त्व व आत्म्याची अमरता जाणली की मानवी जीवनातली सर्वात भयंकर समजली जाणारी घटना वेगळय़ा विचारांनी बघितली जाईल, असे म्हटले आहे. हा विचार कालातीत आहे.
अशा तऱ्हेने अर्जुनाच्या मृत्यूविषयक दु:खावर फुंकर घालून भगवंत अर्जुनाच्या मुख्य प्रश्नाकडे वळतात. अर्जुन एखाद्या सामान्य नराप्रमाणे गोंधळात पडला आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात अगदी क्षुल्लक गोष्टीपासून ते फार महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये माणूस, हे करू की ते करू? अशा द्वंद्वात सापडलेला दिसतो. अर्जुनासमोर असलेले दोनही पर्याय योग्यच होते. त्यातला कुठला निवडायचा यासाठी तो भगवंतांना मार्ग विचारत आहे. या परिस्थितीत माझा ‘धर्म’ कोणता? हा अर्जुनाचा प्रश्न आहे. भगवंत म्हणतायत की अशा द्वंद्वात सापडल्यावर काय करावे व काय करू नये, याचा निर्णय ‘स्वधर्म’ कोणता यावर अवलंबून असतो.
स्वधर्म
स्वधर्म याचा फार सुंदर अर्थ गीता पटवून देते. इथे कुठलाही एक पंथ, किंवा हिंदू-ख्रिश्चन अशा अर्थाचा संकुचित विचार गीता मांडत नाही. संपूर्ण मानव जातीसाठी योग्य कर्तव्याचं तत्त्वज्ञान गीता मांडते. स्वधर्म म्हणजे आपलं त्या त्या परिस्थितीतलं व्यापक मानवी कर्तव्य!
जीवनात एकच व्यक्ती वेगवेगळय़ा प्रसंगात, वेगवेगळय़ा भूमिकेत असते. तसेच आजूबाजूची परिस्थितीही सतत बदलत असते. त्यानुसार आपण ‘स्वधर्म’ हासुद्धा बदलत राहातो. एकच माणूस पुत्रधर्म, पतिधर्म, कुळधर्म, शेजार धर्म, राष्ट्रधर्म अशा कर्तव्यांनी बांधला गेला असतो. कधी विद्यार्थी, नागरिक, नेता, शिक्षक, सैनिक अशा निरनिराळय़ा स्तरांवर विचार करताना व्यापक हिताचा विचार करून धर्म निवडावा लागतो. कधी कधी एकाचा धर्म तो दुसऱ्याचा असत नाही. सीमेवर लढणाऱ्या सैनिकाचा ‘अहिंसा परमो धर्म,’ असा खाक्या असून चालणार नाही. शिक्षकाने मात्र आपल्या शिष्यांना अहिंसेनेच शिकवले पाहिजे. असा धर्म हा बदलत राहतो. स्वधर्म आपल्यापुरताच असला तरी वैयक्तिक विचार न करता व्यापक हिताचा विचार करून धर्म ठरवावा लागतो. श्रीरामप्रभूंनी पत्नीप्रेम हे वैयक्तिक मानलं व राजाचं ‘लोकधन’ हे व्यापक सूत्र आचरलं. झाशीच्या किल्ल्यावर तोफा डागल्या होत्या तेव्हा तोफांच्या माऱ्याच्या मार्गात एक देऊळ येत होतं. राणी लक्ष्मीबाईंनी देऊळ तोडल्याने हातून पाप घडेल असा संकुचित विचार न करता, झाशी राखण्यासाठी देऊळ उडवायला परवानगी दिली.
गीता ‘धर्म’ या कल्पनेचा असा विचार करते. त्याचबरोबर जन्माने आपल्याला मिळालेला धर्म सोडू नये. दुसऱ्यासारखं करायला जाऊन स्वधर्म सोडू नये असेही सांगते. याबाबत विनोबाजी छान उदाहरण देतात. ते म्हणतात की दूध जास्त पौष्टिक असलं तरी माशांना पाण्यातून काढून दुधात टाकलं तर ते तडफडून मरतीलच.
कौरव-पांडवांचं युद्ध हे धर्म-अधर्म, न्याय-अन्याय, नीती-अनीती, सुष्ट-दुष्ट या गोष्टींचं युद्ध आहे. भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत की, तुझे गुरुजन व आप्त हे अयोग्य विचारांची साथ करत शत्रू म्हणून युद्धभूमीवर ठाकले आहेत. तू क्षत्रिय आहेस, न्याय्य विचारांची साथ करतो आहेस. हा धर्मसंग्राम आहे व तुझा संग्रामाचा धर्म आहे. युद्ध हाच क्षत्रियाचा धर्म आहे. तू घाबरलेला नाहीस तरी इतिहासात तुझी नोंद ‘रणांगणातून पळालास’ अशी होऊन तुझी अपकीर्ती होईल. म्हणून जय-पराजय, लाभ-हानी, सुख-दु:ख याचा विचार न करता, तू तुझा क्षात्रधर्म जो राजकीय सामाजिक दृष्टीने अधिक व्यापक आहे तोच पालन कर. जिंकलास तर स्वर्ग मिळेल व हरलास तरी वीरगती पावशील. तेव्हा आपोआप समोर आलेले उघडलेले स्वर्गाचे दारच जणू, असे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते. युद्ध करणे हाच योग्य मार्ग आहे. तेव्हा हे अर्जुना ऊठ व युद्धास तयार हो. जय-पराजय, लाभ-हानी, सुख-दु:ख या भावनांना समान मानून तू युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही. अर्जुनाच्या हतबल दशेतून त्याला बाहेर काढण्यासाठी मृत्यू व स्वधर्म यांचा विचार करताना दुसऱ्या अध्यायाचा अर्धा भाग इथे संपतो. पुढील भाग पुढील लेखात (२६ एप्रिल) बघू.    

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…