28 November 2020

News Flash

सावध ऊर्फ निमूट!

‘‘आजकाल काही काही गोष्टी समजून घ्याव्याच लागतात. आता एकेका छोटय़ा, सुटय़ा, माणसाच्या सुख-दु:खाला कुठे काही जागा नाही. त्यानं आपलं सतत इतरांना घाबरून राहावं. मुकाट त्रास

| April 27, 2013 01:01 am

‘‘आजकाल काही काही गोष्टी समजून घ्याव्याच लागतात. आता एकेका छोटय़ा, सुटय़ा, माणसाच्या सुख-दु:खाला कुठे काही जागा नाही. त्यानं आपलं सतत इतरांना घाबरून राहावं. मुकाट त्रास सोसत राहावा. किंवा मग आपलं उपद्रवमूल्य वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा. मला आता या वयात ते कसं जमणार?.. म्हणून..’’
त्यांच्या फ्लॅटची रचना अशी होती की, त्यांचं मुख्य दार आणि त्यांच्या मजल्यावरचं लिफ्टचं दार जवळजवळ एकमेकांना लागून होतं. लिफ्ट वापरणाऱ्यांनी लिफ्टचं दार धडाधड आपटणं, लिफ्टपाशी जमलेल्या लोकांनी गोंगाट करणं यांचा नेहमीच त्रास व्हायचा. तो एकवेळ चालवून घेतलाही असता, पण दुसरी पीडा जास्त होती. लिफ्टमधून बाहेर पडणारे लोक घाईच्या नादात तिचा दरवाजा नीट, पूर्ण बंद करायचे नाहीत. मग लिफ्टचं इशारेवजा संगीत कर्कश आवाजात वाजत राहायचं. नीऽऽ नोऽऽ नीऽऽ नोऽऽ नीऽऽ नोऽऽ! दिवसभरात केव्हाही! फ्लॅट विकत घेताना हा संभाव्य उपद्रव समजला नव्हता. आता नंतर समजून उपयोग नव्हता. एवढय़ा उच्चभ्रू वस्तीमध्ये पुन:पुन्हा फ्लॅट विकत घेणं हे काही खायचं काम नव्हतं. घरातले सगळे मुख्य सभासद दिवसभर घराबाहेर असत. त्यांना या ‘लिफ्टसंगीता’ची फारशी झळ लागत नसे. घरी दिवसभर असणाऱ्यांना ती कटकट जाचे. दरवेळेला कुणी एकाने  लिफ्टचं दार र्अधमरुध लावून बाहेर कटावं आणि घरातल्या म्हाताऱ्यांनी चडफडत, पुटपुटत तिथवर पोहोचून ते उघडं वैतागवाणं दार (आणि त्याहून जास्त ती वैतागवाणी धून) बंद करावी. हा काय उच्छाद आहे? घरातल्या आजी अनेकदा तक्रार करायच्या, ‘अरेऽ ती लिफ्ट नीट बंद होत्येय हे बघायला सांगा रे’. सगळे ‘हो’ म्हणायचे. काहीही करायला जायचे नाहीत. म्हातारी माणसं नाहीतरी तक्रारखोरच असतात. आपण दिवसभरात बाहेरच्या जगात नाना प्रकारची तलवारबाजी करून आल्यावर पुन्हा घरी यांच्या समस्या कुठे सोडवत बसणार? त्यातही, सार्वजनिक वापराची लिफ्ट आवाज करते ही काय समस्या आहे?
आजींच्या दृष्टीनं ती होती आणि वाढत चालली होती. जेवताना, जरा लवंडलेलं असताना, पडद्यावरच्या मालिकेतली सासू सुनेचा छळ करण्याच्या ऐन रंगात आली असताना मध्येच आजींना त्या ‘मेल्या’ लिफ्टचा तो ‘मेला’ दरवाजा पूर्ण बंद करायला जावं लागायचं. रात्रीच्या जेवणाच्या वेळेला घरातले सगळे टेबलभोवती जमले की त्या चडफडायच्या,‘‘आज तीनदा जावं लागलं लिफ्ट बंद करायला.’’
‘‘जरा डोळा लागत होता तोच लिफ्टचा भोंगा लागला घुमायला.’’
‘‘त्या लिफ्टचं काहीतरी..’’ एकूण घरादाराचा कोमट प्रतिसाद पाहिल्यावर मग त्यांनी एकेकाला स्वतंत्रपणे विश्वासात घ्यायचं धोरण आखलं. नातवाला सुचवलं,
‘‘तुझ्याकडे खेळायला येतो त्या साहिलचा धाकटा भाऊ संग्रामच कारण असतो बरं का या गोंगाटाला.’’
‘‘तो जेमतेम चौथी-पाचवीतला पोरगा आहे. त्याला काय कळतंय?’’
‘‘जे दार उघडून आपण आत जातो त्याच्या बाहेर पडल्यावर ते पक्कं बंद करण्यामध्ये एवढं न समजण्यासारखं काय आहे?’’
‘‘घाईघाईत राहत असेल गॅप.’’
‘‘असेल. पण मला त्रास होतो ना! एकदा चांगला धरणार आहे त्याला.’’
‘‘नको ग आजी.’’
‘‘मी ‘मारणार’ नाही म्हटलं, ‘धरणार’ म्हटलं.’’
‘‘तरी नको.’’
‘‘लहान मुलगा आहे, चुकतोय, सांगायला नको?’’
‘‘तू सांगायला जाशील आणि आय विल हॅव टू पे द प्राईस. साहिल हा आमच्या ज्युनिअर कॉलेजच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन आहे. त्याच्या भावाला आपण वाईट वागवलं तर तो आपल्याला सोडेल का? त्यानं ठरवलं तर तो मला टीममधून काढू शकतो. माहितीये? त्याची अशी खुन्नस आपल्याला परवडणार नाही हं आजी, सांगून ठेवतोय!’’ नातवानं स्पष्ट बजावलं. त्याचं संभाव्य क्रिकेट करिअर बरबाद करण्याचा धोका आजींनाही पत्करायचा नव्हता, म्हणून त्यांनी तो विषय तिथंच सोडला. एक-दोन दिवसांत त्यांना त्यांच्या घरी कामाला येणाऱ्या राजम्माबद्दल जरा संशय यायला लागला. लिफ्टचं दार धड न लावताच ती मजल्यावरची कामं करायला जाते आणि आपल्याला नसत्या कामाला लावते! तिला चांगलंच सुनावलं पाहिजे. त्यांनी सहज आपल्या सुनेपाशी तसा विषय काढताच सून एकदम घाईलाच आली. कधी नव्हे तेवढय़ा अजीजीनं बोलायला लागली, ‘‘अहोऽ.. राजम्माला काही बोलू नका हं उगाच. तिच्या जिवावर माझी नोकरी चालल्यासारखी आहे. दोन दिवसांसाठी ती यायची नसली तरी माझं धाबं दणाणतं. शिवाय तिचं काम चोख आहे.’’
‘‘कबूल आहे. पण एवढय़ा चोख कामांमध्ये अजून थोडं चोख व्हायला काय हरकत आहे तिला? लिफ्ट नीट बंद करायला ५ सेकंदसुद्धा जादा लागणार नाहीत तिला.’’
‘‘असेल! पण तुम्ही उगाच तिला काहीतरी बोलू नका.’’
‘‘मग तू बोल.’’
‘‘आणि स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेऊ? तिनं आपलं काम सोडलं तर?’’
‘‘सोडू दे. दुसरी बघू.’’
‘‘आता एवढं सोपं राहिलं नाही आई ते. ऊठसूट नोकर बदलणं, ठेवणं. त्यांच्याही संघटना असतात. भरपूर नुकसानभरपाई मागायला शिकवतात त्या! नाहीतर नव्या बाईला कामावर यायला मनाई करतात. कटकटय़ा मालकिणी म्हणून आपल्या नावाचा बोभाटा करतात तो वेगळाच. त्यापेक्षा दिवसाकाठी एक-दोनदा स्वत: जाऊन लिफ्टचं दार बंद करणं परवडलं.’’
‘‘कोणाला परवडलं?’’ हा प्रश्न आजी विचारणार तेवढय़ात त्यांची सून तिथून सटकली. ती फार काळ त्यांच्यासमोर थांबत नसे, पण आपलं म्हणणं थेट पोहोचवल्याशिवाय राहतही नसे. जसा आजचा संदेश होता! लिफ्टच्या दरवाजाबाबत राजम्माला टोकू नये ही विनंती. (नव्हे, आज्ञाच! लोभ असला-नसला तरी काय फरक पडतो?)
लिफ्टसंगीतातले बदसूर एकटय़ा आजींनाच जाचत होते म्हणून त्यांनी चिकाटीनं आपल्या चिरंजीवांसमोर तो मुद्दा मांडला.
‘‘बाबा रेऽ सोसायटीच्या सेक्रेटरीला सांगून काही तोडगा निघेल का या प्रश्नावर?’’
‘‘एवढय़ासाठी लगेच सेक्रेटरीपर्यंत कशाला जायचं आई?’’
‘‘त्यांना म्हणावं, लिफ्टमध्ये अशा अर्थाची नोटीस लावा किंवा लिफ्टच्या दाराचा भोंगा वाजेल तेव्हा वॉचमनला इकडे यायला सांगा.’’
‘‘बघतो.’’
‘‘नुसता बघतोस की करतोससुद्धा? या दोन्हीत फरक आहे म्हणून म्हणते.’’
‘‘हूं’’
चिरंजीव मोघमच राहिले. शेवटी आजींनी टोकदार प्रश्न विचारला,
‘‘सेक्रेटरींना तक्रार करण्यात काही अडचण आहे का?’’
‘‘म्हटलं तर आहे. त्यांचा मेहुणा आमच्या कंपनीचा सी.ई.ओ आहे. मनात आणलं तर तो मेहुण्याचं मन माझ्याविषयी खराब करू शकतो. एकदा एकाचा सी.आर. स्पॉईल झाला की संपलंच! ही चार-पाच र्वष माझ्या करियरच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहेत आई.’’
‘‘प्रश्नच नाही, तुझं सगळं चांगलं व्हायलाच हवं. पण आपल्याला आपला प्रश्न मोठाच असतो ना..’’
मुलाने फक्त मान हलवली. विषय पुढपर्यंत नेला नाही.
संध्याकाळी सोसायटीतल्या काही ज्येष्ठ स्त्रिया खालच्या पटांगणात येऊन बाकावर शिळोप्याच्या गप्पा मारीत बसत असत. तशाच एकदा सगळ्या जमल्या असताना आजींनी या लिफ्टसंगीताचा मुद्दा लावून धरला. सोसायटी गुरख्यांना, रखवालदारांना एवढाल्ले पगार देते तरीही ते लोक काही नीट काम करीत नाहीत, लिफ्टचा कर्णा वाजू लागला की जिने चढून वर येऊन लिफ्ट बंद करणं हे त्याचंच काम नाही का, वगैरे बाबी त्या बोलत होत्या. तर बाकावरच्या इतर आज्यांनी त्यांना गप्पच केलं. सबुरीचा सल्ला देत म्हटलं,
‘‘तुम्ही उगाच रखवालदारांना वेठीला धरू नका बाई.’’
‘‘का? एखाद्याला त्याच्या कामाची, कर्तव्याची जाणीव करून देण्यात काय चूक आहे?’’
‘‘असं आहे, अनेकदा बंद फ्लॅटमध्ये आपण म्हाताऱ्या एकेकटय़ा राहत असतो. एखाद्या रखवालदारानं डूखधरला, कुठे मारलं-लुटलं तर काय घ्या? त्या कोपऱ्यावरच्या सोसायटीतली घटना ऐकलीये ना? रखवालदारानंच एका फ्लॅटमधल्या म्हाताऱ्या आजी-आजोबांचे हात-पाय बांधून घर धुऊन नेल्याची? तो खूनही करू शकला असता! नशीब, नाही केलान्.. सध्याच्या काळात काहीही होऊ शकतं. तेव्हा आपणच सावध राहायला हवं.’’
हा शेवटचा सल्ला मात्र आजींना पटला. शेवटी कोणत्याही बाबतीत सध्याच्या काळात सावध ऊर्फ निमूट राहायला हवं. कारण आपल्याजवळ कसलीही सत्ता नाही. आपण कोणाचंही काहीही अडवू किंवा बिघडवू शकत नाही. आज माणसाला किंमत येते ती फक्त त्याच्या उपद्रवमूल्यामुळे. ज्याची उपद्रव करण्याची शक्ती मोठी, तो मोठा. त्याला सगळ्यांनी दबून, भिऊन राहायचं. बाकी वयासाठी, ज्ञानासाठी, अनुभवासाठी एखाद्याला मानण्याचा काळ गेला. असाल वयानं मोठे, ज्ञानी, अनुभवी तर ते तुमचं तुमच्यापुरतं! आता फक्त रोकडा व्यवहार करण्याबाबत बोलायचं. म्हणे आपल्यासारख्यानं बोलायचं नाही. आजी गप्प राहिल्या. बरेच दिवस त्यांनी लिफ्टसंगीताबाबत काहीच तक्रार केली नाही तेव्हा कधी तरी त्यांच्या चिरंजीवांना ती बाब आठवली. हसून म्हणाले, ‘‘हल्ली तुझी लिफ्ट फार गुण्यागोविंदाने नांदताना दिसत्येय आई.’’
‘‘हूं, तसं समज’’, आजी निर्विकारपणे म्हणाल्या. चिरंजीव घाबरे झाले, ‘‘तू कुठे बाहेर जाऊन काही तक्रारबिक्रार नाही ना करून आलीस?’’
‘‘नाही.’’
‘‘मग ठीक आहे. आजकाल तसं करून चालत नाही आई. काही काही गोष्टी समजून घ्याव्याच लागतात.’’
‘‘घेतलंय ना समजून! चांगलंच समजून घेतलंय. आता एकेका छोटय़ा, सुटय़ा, माणसाच्या सुख-दु:खाला कुठे काही जागा नाही. त्यानं आपलं सतत इतरांना घाबरून राहावं. मुकाट त्रास सोसत राहावा. किंवा मग आपलं उपद्रवमूल्य वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावा. मला आता या वयात ते कसं जमणार?.. म्हणून..  अगो बाईऽ.. पुन्हा ठेवलं वाटतं कोणीतरी लिफ्टचं दार उघडं..’’ आजी लडबडत दरवाजाच्या दिशेनं निघाल्या. मुलगा त्यांच्याकडे बघत राहिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 1:01 am

Web Title: cannot complain about troublesome people
Next Stories
1 आत्मविश्वासाची ‘गंमतशाळा’
2 होय, आम्ही घेतोय घटस्फोट..
3 ‘मॅगीनॉमिक्स’ आणि ‘थॅचरिझम ’
Just Now!
X