‘‘आज माझं वय ८३ तर शि.दं.चं ८८ आहे. मागं वळून पाहताना ठळकपणे लक्षात येतं, की यांच्या-माझ्या बऱ्याचशा आवडी-निवडी, नेमकं सांगायचं तर अभिरुचीत समानता आहे. तसे आम्ही दोघंही आपापल्या क्षेत्रातले कलाकार, काही संदर्भात मी तडजोड केली. पण एक सांगते, दोघंही जर आपापल्याच कामांमध्ये रमत राहिलो असतो तर कदाचित स्थैर्य हरपलं असतं. चित्रकार म्हणून यांचं स्थान खूप वेगळं आहे, त्याचा दर्जा अत्यंत वरचा आहे, हे लक्षात आल्यावर मी ते स्वीकारलं. कदाचित ते तेवढे नसते तर मी नसतं स्वीकारलं.’’
शि. द. फडणीसांबरोबरीच्या आपल्या ५८ वर्षांच्या सहजीवनाविषयी सांगताहेत प्रसिद्ध लेखिका शकुंतला फडणीस.
आमच्या लग्नाला ५८ वर्षे झालेली असली तरीही अजूनही सुरुवातीचे ते दिवस तितक्याच उत्कटपणे आठवतात. शि.द.फडणीस या व्यंगचित्रकाराचं स्थळ विचारात घेताना मला काहीजणांनी असाही सल्ला दिला होता, की मुलाला नोकरी नाही. शिवाय कलावंत लहरी असतात. मी याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. कारण मला लग्नापूर्वीच यांची चित्रं खूप आवडत होती. एवढंच नव्हे तर मी ‘हंस’ मासिकाच्या विनोद विशेषांकावरील यांच्या मुखपृष्ठासंबंधी लिहिलेला अभिप्राय तेव्हा शकुंतला बापट या माझ्या नावानं एका वर्तमानपत्रात छापूनही आला होता.
त्यावेळची एक समांतर घटना म्हणजे लग्नापूर्वी अमरावतीला असताना मी एक हलकी-फुलकी कथा लिहिली होती. ती मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल की नाही, अशी शंका मनात बाळगतच पाठवली होती. योगायोगानं ती छापून आली पण लग्नानंतर. माझ्या पूर्वाश्रमीच्या बापट या आडनावानंच. सासरी सगळय़ांनी माझ्या त्या कथेचं खूप कौतुक केलं होतं. बालसाहित्य, विनोदी साहित्य व व्यंगचित्राचं रसग्रहण मी तेव्हा आवडीनं लिहीत असे. शि.दं.ची रेषांची आणि माझी लेखनाची वाटचाल आपापली लय सांभाळून घडत राहिली. आम्ही दोघेही आपापल्या कलाविष्कारात जसे तल्लीन असायचो तसेच एकमेकांच्या सर्जनाशीही तन्मय होत आलेलो आहोत. बस स्टॉपवर उभ्या असलेल्या तरुणीच्या साडीवर मांजरांची चित्रं आहेत आणि तिच्या शेजारी असलेल्या तरुणाच्या शर्टवर उंदराची. तो तरुण तिच्या साडीकडे एखाद्या मांजर दिसलेल्या उंदरासारखाच भेदरून बघतो आहे, असं शि.दं.चं चित्र अत्यंत लोकप्रिय झालेलं होतं. मला ते प्रथम पाहताना डोळय़ांत पाणी येईस्तोवर हसायला आलेलं होतं. लग्नाआधी या चित्रांमुळे या चित्रकाराची रेषा ओळखीची झालेली होती. मी तिच्यावर खूश होते.
माझ्या माहेरी सगळय़ांनाच साहित्य, संगीत व चित्रकला यांसारख्या कलाप्रकारांची आवड होती. त्या सगळय़ाचा परिणाम म्हणून की काय, व्यंगचित्रांचं रसग्रहण व विनोदी साहित्याचं लेखन या गोष्टी मला खुणाऊ लागल्या. ‘कलावंत लहरी असतात’ वगैरे सूचनांना माझ्या कलासक्त मनात मुळी थाराच मिळाला नाही. कारण मला वाटायचं आणि अजूनही वाटतं, की कुठल्याही कलावंताला अचानकच काही सुचतं. मग त्याचं विचारचक्र सुरू होतं. तंद्री लागते. आजुबाजूचं काहीच दिसत नाही. पण ती सगळी सर्जनाची प्रक्रियाच तर असते. त्याचा तो आवेग ओसरल्यावर तोही चारचौघांसारखाच माणूस असतो. मी स्वत:ही कलावंत असल्यानं मला हे सारं समजून घेता आलं, असं वाटतं. कोल्हापूरहून शि.द. तेव्हा कलेच्या प्रांतातल्या मुशाफिरीसाठीही पुण्यात स्थायिक व्हायच्या तयारीनं आलेले होते. मोठय़ा बहिणीकडे मी उन्हाळय़ाच्या सुट्टीत आले होते. ओळखीतून स्थळ सुचवलं गेलं, ते पसंत पडलं आणि आमचं लग्न झालं. ते वर्ष होतं १९५५. गेल्या ५८ वर्षांमध्ये शि.दं.ची चित्रं-व्यंगचित्रं एक एक क्षितिज ओलांडत आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र प्रदर्शनांपर्यंत जाऊन पोहोचली. आतापर्यंत माझीही २८ पुस्तकं प्रकाशित झाली. त्यापैकी तीन पुस्तकांना राज्यस्तरीय व चार पुस्तकांना खासगी पुरस्कार मिळाले. शि.दं.चीही अनेक चित्रपुस्तकं प्रसिद्ध झालीत. ‘रेषाटन’ हे सचित्र आत्मवृत्त प्रसिद्ध झालं. त्याला म.सा.प.चा ‘लक्ष्मीबाई टिळक’ पुरस्कारही मिळाला. आतापर्यंतच्या कारकीर्दीचा आढावा घेणारं ‘फडणीस गॅलरी’ हे इंग्रजी पुस्तक जगभरच्या वाचकांसाठी उपलब्ध झालेलं आहे.
आज माझं वय ८३ तर शि.दं .चं ८८ आहे. मागं वळून पाहताना ठळकपणे लक्षात येतं, की यांच्या माझ्या बऱ्याचशा आवडी-निवडी, नेमकं सांगायचं तर अभिरुचीत समानता आहे. आम्ही दोघंही अपवादात्मक काही उत्तम मालिका बघतो, पण उगीचच टीव्हीसमोर बसून राहाणं आम्हाला अजिबात आवडत नाही. शास्त्रीय संगीत ऐकायची दोघांनाही आवड. दोघांचे आवडते गायक कलावंतही सारखेच. कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, मालिनी राजूरकर व रघुनंदन पणशीकर यांचं गाणं सुखावतं लता-आशांची अर्थातच सगळी नव्हेत, पण काही निवडक मेलोडियस गाणी सतत ऐकावीशी वाटतात. आमच्या शेजारी सवाई गंधर्व राहात असत. माझ्या लग्नाआधीच ते वारले, पण त्यांच्या घरी जाणं येणं खूप. त्या संबंधांवर आधारित एक लेख मी लिहिला होता. तो कित्येकांना भावला होता. शि.दं. नाही त्याचं अप्रूप वाटलं होतं.
लग्नाच्या सुरुवातीच्या काळात काही घटना अशा घडल्या की, तेव्हा एकमेकांसाठी असणं महत्त्वाचं होतं. तसे आम्ही असल्याचा प्रत्यय घडोघडी येई. यांच्या चित्रांचं पहिलंवहिलं प्रदर्शन मुंबईतल्या जहाँगीर आर्ट गॅलरीत करायचं ठरलं होतं. तेव्हा आमच्या दोन्ही मुली (लीना आणि रूपा) लहान होत्या. दिवसा मी त्या दोघींकडे लक्ष पुरवून रात्री उशिरापर्यंत यांना मदत करीत बसायचे. त्यात किती वेळ जायचा ते कळायचंच नाही. एकदा तर माझ्या सासूबाईंनी सकाळी सकाळी खिडकी उघडून मला बाहेर बघायला लावत म्हटलं, ‘‘पाहिलंस का? बाहेर उन्हं आली आहेत. आता तरी दोघे जरा विश्रांती घ्या.’’
पूर्वी मोठय़ा शहरांमध्येच फक्त आर्ट गॅलरीज् असायच्या. छोटय़ा गावांमध्ये प्रदर्शन न्यायचं तर पॅनल्स नेण्यापासून सगळी उस्तवार करावी लागायची. सगळं सामान पाच क्विंट्लच्या आसपास व्हायचं. त्यातून मार्ग काढायचा म्हणून शि.दं.नी स्वत: डिझाइन करून कुठंही न्यायला, उभारायला सहजसुलभ असलेली अँगल्स आणि स्क्रीन्स तयार केली. हे जर चित्रकार झाले नसते तर कदाचित इंजिनीअर झाले असते. यांना अनेक वस्तूंची दुरुस्ती किंवा नवीन रचना करायची अतोनात आवड आहे. घरातल्या वस्तूंवर यांचे सतत प्रयोग चाललेले असतात. यातनं कधी कधी प्रदर्शनासाठीच्या रचनेबाबत घडलं तसं उत्तम काही हाती लागतं, तर कधी कधी कुरबुरीचे प्रसंगही ओढवतात. काही तरी करून बघायचंय म्हणून यांनी बऱ्याच नादुरुस्त वस्तू खूप काळ साठवून ठेवल्या की माझी चिडचिड होते.
शि.द. भावंडांमध्ये सर्वात लहान आणि त्यातूनही बालपण संस्थानात गेल्यामुळे तसे अघळपघळ. खर्चीक स्वभावाचे. चार वस्तूंची गरज असेल तर दहा खरेदी करून आणतील. मग त्यातल्या सहा पडून का राहिनात, हा वायफळ खर्च आमच्यात वाद घडवतो. पूर्वी तर यांना स्वयंपाकघरातलं काहीही माहीत नसायचं, पण आता मुली सासरी गेल्यापासून आम्ही दोघंच. तेव्हा भाजी किंवा दूध वगैरे आणतात. यांच्यासारख्या कलावंताकडून मी प्रापंचिक मदतीची अपेक्षा केलीच नाही. एक तर पुरुषांना प्रापंचिक जबाबदारी नकोच असते किंवा त्यातलं काही माहीत नसतं. शिवाय आवडच नाही ते कशाला सांगा? मुली लहान असताना तर त्यांचं काय शिक्षण चाललेलं आहे, त्यांना कसली बक्षिसं मिळाली आहेत, हे काहीच यांना माहीत नसायचं आता मात्र प्रपंचात थोडंबहुत लक्ष असतं, मला जमेल तेवढी मदत करायला ‘धडपडतात.’
नवरा हा काही बाबतीत ‘टिपिकल’च असतो, हे शि.दं.च्या बाबतीतही खरं आहे. यांनी जर एखादी गोष्ट ठरवलेली असेल तर मग घरात माझी कितीही तारांबळ उडत असतानाही ते ठरल्या वेळी ठरलेलं काम पार पाडणारच. घरकामात मदत करणाऱ्या बाई एखाद्या वेळी आल्या नाहीत तर थोडीबहुत मदत करतात, पण समजा त्याच वेळी यांचं कुठं जायचं ठरलं असेल तर त्यात बदल नाही. जाणार म्हणजे जाणारच. अशा काही संदर्भात मी तडजोड केली आहे. पण एक सांगते, दोघंही जर आपापल्याच कामांमध्ये रमत राहिलो असतो तर कदाचित स्थैर्य हरपलं असतं. चित्रकार म्हणून यांचं स्थान खूप वेगळं आहे, त्याचा दर्जा अत्यंत वरचा आहे, हे लक्षात आल्यावर मी ते स्वीकारलं. कदाचित ते तेवढे नसते तर मी नसतं स्वीकारलं. समजा ते एखाद्या ऑफिसात वगैरे काम करीत असते तरीही मी म्हणाले असते, की मला माझं अमुक लेखन पूर्ण करायचं आहे. रजा घ्या. डबा लावा. मला लिहायचं आहे. पण तसं नव्हतं. यांच्या कलेची उंची माझ्या लक्षात येताच मी समरस झाले. शिवाय मला स्वत:लाही चित्रकलेची आवड होतीच. शि.दं.ची चित्रही माझ्या परखड समीक्षेनंतरच इतरांच्या नजरेस पडली. मी त्यांच्या चित्रांची पहिली ‘वाचक’ होते अन् आहे. या समरसतेमुळेच माझ्या हातून ‘संवाद हास्यचित्रांशी’ यासारखं हास्यचित्रांच्या रसग्रहणाचं पुस्तक लिहिलं जाऊ शकलं.
यांच्या ‘हसरी गॅलरी’ या प्रदर्शनात तर मी ‘पु.लं.ची नारायण’ असते,’ असं हे म्हणतात. ‘चित्रहास’ हा कार्यक्रम आम्ही दोघे मिळून करतो. मी स्लाइड प्रोजेक्टर लावण्यापासूनच ते सहनिवेदनापर्यंत बरंच काही यात करत आले आहे. एकदा तर स्वयंचलित स्लाइड प्रोजेक्टर आयत्या वेळी नादुरुस्त झाला. हे जागेवर नव्हते. कुणीतरी यांना काहीतरी विचारत लांब नेलेलं होतं. मी घामाघूम झाले. त्या अंधारात ते कुणालाही कळलं नाही. पण प्रसंगावधान राखून एक एक स्लाइड हातानं उचलून ठेवत मी कार्यक्रम पूर्ण केला. नंतर यांना कळल्यावर यांनी खूपच नावाजलं.
यांचं पहिलंवहिलं चित्रपदर्शन गाजलं, तो प्रसंगही आत्ता घडल्यासारखा वाटतो. यांनी प्रचंड खूश होऊन घरातल्या प्रत्येकासाठी काही ना काही दिलं. मला विसरले. मग सासूबाईंनी आग्रह धरल्यावर मोत्यांची सुरेख माळ दिली. माझ्या पुस्तकांसाठी यांनी आजवर जेवढी चित्रं करून दिलीत, तेवढी दुसऱ्या कुठल्याही लेखकाला नाही, ही गोष्ट ते म्हटलं तर चेष्टेनं म्हटलं तर प्रेमानं सांगतात. ‘होल्डॉल’ हे माझं सचित्र पुस्तक प्रकाशित झाल्यावर तर आनंदाच्या भरात मी बोलून गेले, ‘‘चित्रांसह हे पुस्तक म्हणजे दागिना मिळाल्याचा आनंद आहे. असे अलंकार कुठल्याही सराफाकडे मिळणं शक्य नाही.’’ हे अलंकार शि.दं.नी माझ्यासाठी वारंवार आणून माझी हौस पूर्ण केली. त्याचे अत्यंत समाधान आहे.  
शि.दं.नी त्यांच्या ‘रेषाटन’ या पुस्तकात आमच्या सहजीवनाबद्दल लिहून ठेवलं आहे, ते लिहितात, ‘आमच्या संसारात आंबट, तुरट, तिखट काही असतं की नाही! हो, भरपूर! प्रत्येक विवाहित जोडप्यामध्ये जे सनातन वाद चालतात त्याचेही नमुने आमच्याकडे आहेत. तिची शिस्त, स्वच्छता, टापटीप हे सर्व कोकणस्थी बाण्याचं. यातलं माझ्याकडे बेताचंच.’ याच पुस्तकात त्यांनी आम्हा दोघांमध्ये चालणाऱ्या संवादांचे तुकडेही दिलेले आहेत. वर असंही म्हटलं आहे की यावरून या श्रुतिकांचे विषय होतील. उदाहरणार्थ, ‘‘ही डिरेक्टरी सरकवली कुणी? टेबलाला समांतर नाही’’ किंवा ‘दारावरच्या त्या मुलाला इतके पैसे? दुसऱ्याला पैसे द्यायचा तुम्हाला उत्साह. बायकोनं मागितलं की हात आखडता’’ किंवा ‘‘टेबलाखाली बिस्किटाचे तीन तुकडे पडलेत. कुणासाठी? मुंग्यांना निमंत्रण, दुसरं काय?’’ या सगळय़ावर कळस म्हणजे, ‘‘फडणीसांची शिस्त व टापटीप म्हणून संपादक, प्रकाशक उगाच तुमची तारीफ करतात. काही नाही. ती सारी शिस्त व टापटीप तुमच्या स्टुडिओतच संपते. माझ्यासाठी काहीच उरत नाही..’’
यांच्या मते इतरांशी संबंध येतो त्यावेळीही शकुनचा बाणा रोखठोक आणि बोलणं स्पष्ट असतं. मतं किंवा विचार तर्कसंगत असतात. शि.द.असंही सांगतात, की माझं बोलणं ऐकताना त्यांच्यातला तत्त्वज्ञ जागा होतो. ही सारी गंमत सोडली तर आमचं जगणं जणू एकमेकांसाठीच असल्याचं वेळोवेळी पटत राहिलेलं आहे. यांनी एका चित्रसंग्रहाच्या अर्पणपत्रिकेत म्हटलं आहे, ‘सौ. शकुंतलास- प्रत्येक उपक्रमात तिची साथसंगत अतिशय महत्त्वाची असते.’
आमची थोरली मुलगी लीना २६ जानेवारीला जन्मली. तिचा वाढदिवस देशभर साजरा होतो, असं आम्ही मजेनं सांगत असतो. यांची चित्रं आणि माझ्या लेखनावर ती मार्मिक भाष्य करीत असते. हौशी मंडळींच्या नाटकात ती करते त्या भूमिका आणि विविध समारंभांचं सूत्रसंचालन पाहून आमच्यातला कलेचा वारसा तिनं जपल्याचं समाधान मिळतं. तिचा नवरा अनिल गोगटेही साहित्य व नाटकांत रमणारा आहे. या दोघांची मुलगी हिमानी नृत्य शिकली आहे. सध्या तिच्या लहान मुलाच्या तालावरच फक्त ती नाचते, असं शि.द. गमतीनं म्हणतात. हिमानीहून धाकटा धवलही नृत्य-नाटय़ांत अधूनमधून काम करतो. आमची धाकटी मुलगी रूपा देवधर चित्रकार आहे. अप्लाइड आर्टमधल्या पदवीकेनंतर तिनं कॉम्प्युटर ग्राफिक्सचं ज्ञान मिळवून शि.दं.च्या चित्रांच्या सी.डी. तयार करणं, डिजिटल प्रिंट्स, प्रदर्शनांसाठी मदत याचा सपाटा लावला. तिचा नवरा विकास हा सॉफ्टवेअरमधला तज्ज्ञ. रूपाचा मोठा मुलगा चिन्मय आयआयटीमधून बी.टेक.अन् एम.टेक झाल्यावर त्याला स्टेनफर्ड विद्यापीठात शिकण्यासाठी फेलोशिप मिळाली. दहावीत असतानाच त्यानं शि.दं.च्या एका चित्रावरून अ‍ॅनिमेशन फॉर्ममध्ये उत्तम सी.डी. तयार केली होती. धाकटा असीमही हरहुन्नरी आहे. हे सारं मिळून आमचं कुटुंब. आमच्या सहजीवनाला नवे संदर्भ, नवा अर्थ देणारी ही गोड मंडळी.
बेळगाव जिल्ह्य़ातल्या भोज या मूळ गावचे शि.द. आणि अमरावतीत लहानाची मोठी झालेली मी. लग्नाच्या बंधनात गोवले गेल्यापासून आम्ही गेली सहा दशकं परस्परांच्या सहवासात दररोज सृजनाचा आनंद मनमुराद घेत आलो आहोत. माणूस म्हणूनही एकमेकांचे गुण-दोष निरखत आजवरचा हा प्रवास मन लावून करत आलेलो आहोत.
(शब्दांकन : नीला शर्मा)