लग्नात मिळालेला हुंडा आणि नातेवाईकांकडून घेतलेल्या कर्जाऊ भांडवलाच्या जोरावर तिने व्यवसायाची वाट निवडली. आर्थिक परिस्थिती बेताची असताना, प्रतिकूल परिस्थितीत वराहपालन, मत्स्यव्यवसाय, रेस्तरां असे विविध व्यवसाय लीलया सांभाळण्याचे कसब तिने आत्मसात केले. सामान्य तरुणी ते चीनमधील प्रथितयश उद्योजिका आणि  गुहासदृश याओडोंग ते आलिशान हवेलीपर्यंतचा शेन झ्युली हिचा प्रवास म्हणूनच वेगळा ठरतो. वृद्धांसाठी मोफत केअर सेंटर सुरू करीत जिने आपली सामाजिक बांधीलकीही जपली आहे, त्या झ्युलीविषयी..
स्त्रीपुरुषांना मिळणाऱ्या मिळकतीच्या  भेदभावाचा मुद्दा चीनमधेही आहेच! पण काही चिनी स्त्रियांनी स्वत:चे छोटे-मोठे उद्योग सुरू करून त्यांच्यातील क्षमता पुरुषांच्या तुलनेत कुठेही कमी नाहीत हे सिद्ध करून दाखवले आहे. चिनी मनुष्यबळात स्त्रियांचा ३६ टक्क्यांहून अधिकचा वाटा आहे. याच वायव्य चीनच्या शान्झी प्रांतातील शेन झ्युली या उद्यमी स्त्रीची अत्यंत प्रतिकूलतेतून आजची एक सन्माननीय उद्योजिका इथपर्यंतची वाटचाल विस्मयचकित करणारी आहे.  
वराहपालन, मत्स्यव्यवसाय, रेस्तरां असे विविध व्यवसाय लीलया सांभाळणाऱ्या झ्युलीची गणना आज चीनमधली एक प्रतिष्ठित महिला उद्योजिकेत केली जाते. झ्युलीचा जन्म चीनमधील जिंग्बियन इलाख्यातील हॉन्गशिवान या एका दुर्गम भागातील खेडय़ातला. पर्वतराजीने सजलेला हा भाग. घरची अत्यंत गरिबी, शिक्षणाचा अभाव अशा परिस्थितीत वाढलेल्या झ्युलीचा विवाह १९९३ साली शेन हैबिन या तेवढय़ाच गरीब तरुणाशी झाला. कायम आजारी असणारे त्याचे आई-वडील यांच्यासोबत झ्युली आणि हैबिन यांचा संसार एका गुहासदृश निवाऱ्यात, ज्याला याओडोंग म्हटले जाते त्यात सुरू झाला. ‘मला असे गलिच्छ आयुष्य जगायचे नव्हते. यातून मार्ग काढलाच पाहिजे,’ असा निर्धार केल्याचे झ्युली सांगते.
३००० युआन ही हुंडा  (हो तिथेही ही प्रथा आहेच!) म्हणून मिळालेली रक्कम आणि कर्जाऊ    घेतलेले २ लाख युआन असे भांडवल गोळा करून आपल्या नवऱ्यासाठी शेतमजुरांना लागणारे तीन चाकी वाहन तिने विकत घेतले. आणि माल वाहतुकीच्या छोटय़ा व्यवसायास झ्युली आणि हैबिन यांनी सुरुवात केली. झ्युलीला थोडेबहुत शिवणकाम येत होते. जमतील तसे कपडे शिवून ती स्थानिक शेतकी बाजारपेठेत ते विकत असे व संसाराला हातभार लावत असे. कसेबसे आपले घर चालवणाऱ्या झ्युलीला संसाराच्या सुरुवातीलाच फटका बसला. तिचा नवरा हैबिन पेट्रोलियम पदार्थाची वाहतूक करीत असताना एका अपघातात सापडला. सर्व पेट्रोलियम उत्पादन तर वाया गेलेच पण त्याचे वाहनही अपघातातून सुटले नाही. आणि हैबिनही जखमी झाला. आधीच कर्जाचे ओझे डोक्यावर आणि वर पुन्हा एक लाख युआनचे नुकसान झाले. ‘या आर्थिक नुकसानीने आमचे गरीब कुटुंब अधिकच उद्ध्वस्त झाले,’ झ्युली सांगते.
 तिने पुन्हा नातेवाईकांकडून ५०० युआनचे कर्ज मिळवले आणि छोटासा किराणा व्यवसाय सुरू केला. या वेळी मात्र सगळे काही तिच्या मनासारखे घडत गेले, अगदी घेतलेले कर्जही चुकते झाले. काही वर्षे व्यवसायाचा अनुभव घेतल्यानंतर थोडीशी पुंजी या जोडप्याजवळ जमा झाली होती. त्या पुंजीच्या जोरावर तिने थोडे धाडस करायचे ठरवले. झ्युलीची नजर घराजवळ असलेल्या एका दुर्लक्षित तळ्याकडे गेली. तिने हैबिनशी चर्चा करून त्यात मासेमारीचा व्यवसाय सुरू करायचे ठरवले. त्या कठीण दिवसांबद्दल झ्युली सांगते, ‘ हे तळे अतिशय गलिच्छ होते आणि तिथे माशांचे प्रजोत्पादन जवळजवळ अशक्य होते. त्यावर एकच पर्याय होता, तो म्हणजे ते तळे साफ करणे. यंत्र भाडय़ाने आणण्याएवढी आमची ऐपत नव्हती म्हणून मग सर्व कुटुंबाने मिळून एका हातगाडीच्या आधारे तळ्यातील गाळ काढून तळे खोल आणि स्वच्छ केले. या दिवसात आम्ही पिवळा तांदूळ खाऊन, तळ्याचे पाणी पिऊन दिवस काढले. आमच्या हातापायांना जखमा झाल्या. पण इलाज नव्हता.’
हे सर्व काम पूर्ण व्हायला सहा महिने लागले. त्या दरम्यान कसेबसे ८०,००० युआन जमवून त्यांनी दीड लाख फ्रइज नावाचे मासे पुनरुत्पादनासाठी खरेदी केले. पण या माशांसाठी लागणारे खाद्य अतिशय महाग होते. त्यावर झ्युलीने उपाय शोधला. तळ्याच्या काठावर डुकरे पाळून त्यांची विष्ठा ती माशांना खाऊ  घालत असे. झ्युलीचा हा प्रयोग यशस्वी ठरला आणि एका वर्षांतच तिच्याकडे ६०० डुकरे पाळली गेली आणि त्यावर पोसले गेलेले मासे १५ किलोचा एक याप्रमाणे वजनदार झाले. असे अनेक मासे तयार झाले. त्यांच्याद्वारे चांगले उत्पन्न मिळू लागले. हा व्यवसाय वाढवायचा या उद्देशाने झ्युलीने शेजारच्या गावातील आणखी एक तळे घेण्याचं तिने ठरवलं. उत्तम सूर्यप्रकाश आणि भरपूर पाणी यामुळे तिचा व्यवसाय कैक पटीने वाढू शकेल, असा झ्युलीचा कयास होता.
पण १६ जुलै २००० ला चीनमध्ये ढगफुटीने हाहाकार माजला. आपल्या तळ्याचे काय होईल या शंकेने झ्युली आणि हैबिन दोघेही मोटारसायकलवरून तळ्याच्या दिशेने निघाले. पण चिखलामुळे निसरडय़ा झालेल्या रस्त्यावरून मोटारसायकल घसरली आणि या दोघांसह ती एका खाईत जाऊन पडली. ‘मी शुद्धीवर आले तेव्हा माझ्या वेदनांपेक्षाही हैबिनला डोक्याला जबर दुखापत झाल्याने तो कोमात गेला आहे, हे कळल्याने माझ्यावर आभाळच कोसळले.’ ती सांगते.
 हैबिन काही काळाने शुद्धीवर आला, पण पुढे किती तरी महिने तो अंथरुणाला खिळून होता. झ्युलीवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. या काळात तिच्या ‘पिग फार्म’ ते ‘मत्स्योत्पादनाचे तळे’ या दरम्यानच्या वाऱ्या वाढत गेल्या. डोळ्यांत तेल घालून आपला व्यवसाय झ्युलीने जपला आणि वाढवला. हैबिनची प्रकृती थोडी सुधारल्यावर तिने सेन्ट्रल चायना हुबेई प्रोव्हिनसमधून फिश कल्टिव्हेटिंग टेक्नॉलॉजीचा एक अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर तिने १.६ दशलक्ष युआन इतका फंड जमवून आपल्या व्यवसायाला आधुनिक स्वरूप दिले.  ती रहात असलेल्या युलिन या भागाच्याच नावाने तिने ‘युलिन फिशरीज’ नावाची कंपनी स्थापन करून मोठय़ा प्रमाणावर मत्स्योत्पादन सुरू केले. अशा प्रकारची युलिनमधली ही पहिलीच कंपनी होती. आर्थिक बाजू सुदृढ करण्याच्या हेतूने तिने अनेक ठिकाणी रेस्तरां सुरू केले आणि मंगोलियाच्या काही भागात जिवंत मासे विक्री उद्योग सुरू केला.
२००९ साली माशांच्या पुनरुत्पादनाचे ज्ञान इतरांनाही मिळावे म्हणून तिने एक कल्चर सहकारी संस्था स्थापन केली. त्यातून मार्गदर्शन घेऊन सुमारे दीडशे कुटुंबांनी जवळपासच्या बारा तळ्यांमध्ये हा उद्योग सुरू केला. आता झ्युलीचा व्यवसाय वाढत चालला होता. ज्या नातेवाईकांच्या, समाजातील इतर घटकांच्या मदतीने ती इथवर पोहोचली होती त्यांचे उतराई होण्याची झ्युलीची इच्छा होती. आपल्या सासू-सासऱ्यांच्या गरिबीमुळे झालेल्या हाल-अपेष्टा तिला विसरता येत नव्हत्या आणि योग्य उपचारांअभावी त्यांचा झालेला मृत्यू तिला अस्वस्थ करीत होता. म्हणून वृद्धांसाठी केअर सेंटर चालवण्याची तिने तयारी सुरू केली. आणि २०१३ साली पहिले ‘एल्डरली केअर सेंटर’ तिने सुरू केले. ‘‘इथे बेघर वृद्धांना अन्न-वस्त्र-निवारा आणि आवश्यक ते वैद्यकीय उपचार मोफत मिळण्याची व्यवस्था आम्ही केली आहे. त्याचबरोबर अनेक गरीब अनाथ लोकांना आम्ही या केंद्रात नोकरी देतो. समाजाचे ऋण काही प्रमाणात का होईना फेडल्याचे समाधान खूप आहे,’’ असे झ्युली सांगते. आज केवळ अशा केअर सेंटर्समधली झ्युलीची गुंतवणूक ३२ दशलक्ष युआनपेक्षाही अधिक आहे. आपल्या व्यावसायिक यशाचे श्रेय झ्युली तिच्या नवऱ्याला देते. ‘आम्ही दोघे उत्तम जोडीदार आहोत. माझा नवरा कधीच शाळेत गेला नसल्याने मला व्यवसायाच्या प्रमुख बाजू सदैव सांभाळाव्या लागल्या. परंतु तो खुल्या दिलाचा असल्याने त्याचा सल्ला मला नेहमीच उपयुक्त ठरला आहे.’  असे ती म्हणते.
या जोडप्याला दोन मुले आहेत. २० वर्षीय युयू आणि १८ वर्षीय मियामिया दोघेही पॉलिटिकल सायन्स शिकत आहेत. दरम्यान, ‘युलिन वुमेन्स फेडरेशन’चा सन्मानाचा डबल लर्निग अॅण्ड डबल एम्युलेशन, युलिन्सचा ‘टॉप टेन आंत्रप्रनर’सारखे अनेक सन्मान झ्युलीला प्राप्त झाले आहेत.
झ्युलीसारख्या स्त्रिया जागतिक पातळीवर फार उलथापालथ घडवतात असे म्हणता येत नाही. पण प्रतिकूलतेवर मात करीत आपले आयुष्य अधिकाधिक संपन्न करीत आपल्या छोटय़ाशा जगालाही समृद्धीकडे नेण्याची उमेद आणि कर्तृत्व त्या बाळगून आहेत! आलेली परिस्थिती आहे तशी स्वीकारण्यापेक्षा बदल घडवण्याची त्यांची धमक, स्वत:वरचा विश्वास आणि सामाजिक ऋण फेडण्याची त्यांची बांधीलकी चकित करणारी आहे.
गुहासदृश याओडोंग ते आलिशान हवेलीपर्यंतचा शेन झ्युलीचा हा प्रवास आपल्या समाजबांधवांचा समुत्कर्ष साधत अलौकिक तऱ्हेने सुरू आहे.

या पानावर प्रसिद्ध होणारी ‘फक्त तीन शब्द’ आणि ‘ पुरुषोपनिषद’ ही दोन सदरे यापुढे प्रसिद्ध होणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी
संपादक