सकारात्मक प्रेरणेवर सातत्याने सांगोपांग विचार केल्याने उचित कृती हातून घडते. घडत रहाते. इतकेच नव्हे तर ती माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य भाग होते आणि एक प्रकारे ती त्याच्या चारित्र्याचा हिस्सा होते. आणि असे म्हणतात, माणसाचे चारित्र्य त्याची नियती घडवते.
फ्रेडरिक नित्शे हा विचारवंत, मूळचा जर्मनीचा. त्याच्या क्रांतिकारी विचारांनी त्याच्या काळात प्रचंड खळबळ माजली होती, पण आपण त्याचे धार्मिक विचार बाजूला ठेवून त्याच्या काही शाश्वत विचारांतून बरेच काही शिकू शकतो. स्वत:ला का बदलायचे? या प्रश्नाचा शोध घेताना त्याच्या या वचनाचा आपल्याला उपयोग होऊ  शकतो.
“The snake which cannot cast its skin has to die. As well the minds which are prevented from changing their opinions; they cease to be mind.”
    – Friedrich Nietzsche
जो सर्प कात टाकत नाही त्याला मरावेच लागते. तसेच आपली स्वत:ची विचारधारा बदलण्यास जी मने तयार होत नाहीत ती आपले अस्तित्वच गमावून बसतात!
 थोडक्यात प्रश्न हा आहे की, आपली मने ताजीतवानी, प्रवाही ठेवायची आहेत, की केवळ ‘जैसे थे’ अवस्थेत ठेवायची आहेत? आमचे खानदान, आमच्या उज्ज्वल(?) परंपरा, आमच्या रीतीभाती, आमच्या रूढी पिढय़ान्पिढय़ा आहेत तशाच ठेवत राहणे म्हणजे आपण साचलेल्या विचारधनात डमुंबणारे आहोत, की जुन्यातले चांगले ते मन:पूर्वक स्वीकारत नव्या कालानुरूप प्रवाही असणारे मन विकसित करणारे आहोत याचा निर्णय ज्याने त्याने घ्यायचा आहे.
आमच्या घरातदेखील काही वर्षांपूर्वी हा प्रश्न निघाला होता. आई खंबीर असेपर्यंत कानिटकर घराण्याच्या सर्व परंपरा ती अत्यंत प्रामाणिकपणे, सश्रद्धा भावनेने करीत असे. एकच उदाहरण देतो. आमच्या घरी नवसाच्या उभ्याच्या गौरी, गणपतीपाठोपाठ प्रवेश करायच्या. गौरी-गणपती म्हणजे मोठा उत्सव असे. गौरींच्या नैवेद्यासाठी सोवळ्याने लाडू-करंज्या करायच्या. त्या जेवतात त्या वेळी सोळा स्वतंत्र भाज्या, शिवाय पुरणाचा स्वयंपाक, दोन चित्तपावन सवाष्णी, एक वयात न आलेली कुमारिका, एक सत्शील ब्राह्मण, शिवाय सारे नातेवाईक असा मोठ्ठा कारभार असे. आम्हा दोघा भावांची लग्ने झाल्यावर सुरुवातीची काही वर्षे माझी पत्नी गौरी आणि धाकटी वहिनी प्राची यांनी ते सगळे बिनचूक पाळले, पण आम्ही दोघेही स्वतंत्र झाल्यावर सोळा स्वतंत्र भाज्यांपेक्षा एक उकडलेल्या बटाटय़ाची आणि इतर पंधरा भाज्या कल्पकतेने रुचकर करायच्या आणि त्यांची विविध जोडकामे करीत गवार-भोपळा, वांगी-पावटा, तोंडली घालून मसालेभात, गाजर-टोमॅटो-काकडी अशी पचडी, अशा नावीन्यपूर्ण पाच-सहा निवडक रुचकर भाज्या करायच्या, नैवेद्यापुरते पुरण, पुरणपोळ्या बाहेरून मागवायच्या, दोन महिला- त्यांची जात-पोटजात, सवाष्ण-विधवा काही बघायचे नाही असे ठरले. ब्राह्मणभोजनाबरोबर आमचा बौद्ध धर्मीय वाहनचालक सपत्नीक निमंत्रित असे. एक अविवाहित मुलगीच कुमारिका म्हणून बोलवायची. सारे कसे सोयीचे बनवले आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आई म्हणाली, ‘‘करताय ना सगळं श्रद्धेने, पोचेल तिथपर्यंत.’’
या सगळ्या गोष्टी आमच्या कुटुंबातील विचारधारेतील बदलाच्या प्रतीक आहेत असे मला वाटते. त्याची स्पष्ट कारणे अशी.  एक- सोवळेओवळे म्हणजे स्वच्छता आणि टापटीप असा साधा अर्थ घेतला. दोन- अनेक भाज्या असल्यामुळे अन्न आणि ऊर्जा वाया जाई. ते संपले. तीन- जातपात-धर्म-उच्च-मागास हा विषय संपला. चार- कोणतीही स्त्री सवाष्ण असणे हा तिच्या नशिबाचा भाग असतो. कोणतीही स्त्री विधवा किंवा विभक्त परिस्थितीमुळे होते, त्यामुळे त्यांना जेवायला किंवा हळदीकुंकवाला बोलवायचे नाही हा स्त्रीत्वाचा अपमान थांबला. सत्शील ब्राह्मण कोण, हे संशोधन बंद झाल्यामुळे निमंत्रित व्यक्तीच्या सत्शीलतेचा शोध संपला. आणि सगळ्यात महत्त्वाचे- कुठल्याही मुलीचे ऋतुचक्र कधी सुरू होईल हे तिच्या हातात नसते आणि केवळ निसर्गाने ती ऋतुमती झाली म्हणून तिचा निमंत्रणाचा अधिकार काढून घेणे बंद झाले.
अर्थात हे बदल हळूहळूच झाले. काही जाणूनबुजून तर काही परिस्थितीमुळे. सुरुवातीला प्रत्येक बदलाचा त्रास झाला, पण हा अल्पकालीन त्रासाचा अडथळा पार झालाच आणि याचे एकमेव कारण म्हणजे हे बदल विचारधारेतील स्पष्टतेमधून झाले. याच्या अगदी उलट परिस्थिती डॉक्टर विशाखाची. ती अत्यंत हुशार आणि निष्णात मधुमेहतज्ज्ञ आहे. तिचा नवरा विशाल त्यांचा परंपरागत सावकारीचा आणि शेअर बाजाराचा व्यवसाय करतो. तिच्यापेक्षा शिक्षण कमी; परंतु त्यांच्या समाजात उच्चशिक्षित मुलेच कमी. वरपक्ष कोटय़धीश म्हणून तिने ‘हो’ म्हटले इतकेच. त्यांच्या घरात स्त्रियांनी डोईवरचा पदर ओढून चेहरा झाकायची रीत. विशाखा त्याला अपवाद नव्हती. एकदा का घरी आले, की घराचे सर्व रीतिरिवाज, अगदी पती जेवल्याशिवाय जेवायचे नाही. घरात असताना, घरातून बाहेर पडताना साडीच हवी, अशा एक न दोन गोष्टी. तिला साधा पंजाबी ड्रेस किंवा नाइट गाऊन घालणे यालासुद्धा मनाई होती. ती विशालकडे कटकट करी, पण विशाल त्यावर म्हणे, ‘अगं, दादा-आई यांच्यासाठी कर.’’
यावर उपाय म्हणून महिन्यातून दोनदा ते महाबळेश्वरला जात. तिथे विशाखाला काय करू आणि काय नको असे होत असे. जितकी आखूड शॉर्ट वापरणे शक्य असायचे तसे ती वापरायची, संपूर्ण पाठ उघडी ठेवणारे टॉप्स, बिकिनी घालून तलावात पोहणे आणि परदेशी स्त्रिया जसे शरीर टॅन करण्याकरिता तलावाबाजूच्या आरामखुर्चीवर बिकिनीत पडून राहतात तशी पडून राही. रात्री डिस्को आणि बीअरची धमाल. हे दोन दिवस तिचे असायचे, पण दोन वर्षांच्या नियोजनानंतर ती आई झाली आणि सगळे संपले. अचानक विशालचे वागणेही बदलले. ‘आता तू आई झाली आहेस. आपल्या मुलाने तू असे कपडे घातलेले पाहिले तर त्याच्यावर वाईट संस्कार होतील. आता मजा बास,’ असं त्याने निक्षून सांगितले. विशाखाला पर्यायच राहिला नाही. या घटनेला पाच-सहा वर्षे उलटून गेली आहेत, पण..
दोन्ही उदाहरणे एक गोष्ट स्पष्ट करतात- स्वत:मध्ये बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात विचार करण्याच्या पद्धतीत बदल करण्यापासून होते. वर्तनात बदल करणे काही काळ सोपे असते. विशाखाचेच बघा ना, तिला जे मुक्त जगणे हवे होते, ते काही र्वष, निदान महिन्यातून दोन दिवस तरी जगत राहिली, परंतु विशालने ना आपले विचार बदलले, ना आईवडिलांना काही समजावले आणि विशाखानेसुद्धा बदलण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे तिला ते जगणं कटकटीचंच वाटत राहिलं. काही जण म्हणतील, लग्न झाल्यावर अशा तडजोडी कराव्याच लागतात. इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. लग्नात तडजोड करावी लागते हे सत्य आहे, परंतु ती मन:पूर्वक केलेली, आपल्या मूल्यांशी फारकत घेऊन केलेली तडजोड नसावी.
जर स्वत:च्या विचारांची, मतांची आणि मूल्यांची पायमल्ली करणारी तडजोड असेल, तर ती करणे स्वत:च्या मानसिक स्वास्थ्यासाठी हिताचे नसते. केवळ जोडीदाराला आवडते किंवा आवडत नाही म्हणून, मनाविरुद्ध वागत राहण्याने मानसिक ताण येतो आणि अनेकदा त्यातूनच म्हणजे ताण, अगतिकता, असुरक्षितता अशा भावनांच्या दमनातून शारीरिक आजार कायमचे पाठीशी लागतात.
तर स्वहितासाठी बदलाला पर्याय नाही!
बदलाचे मूळ सूत्र
बदलाचा विचार वारंवार केल्याने बदलाची आतून प्रेरणा निर्माण होते. या सकारात्मक प्रेरणेवर सातत्याने सांगोपांग विचार केल्याने उचित कृती हातून घडते. योग्य कृती वारंवार केल्याने त्याची सवय होते. वारंवार योग्य सवयीने कृती करीत राहिल्याने ती सहजवृत्ती बनते. इतकेच नव्हे तर ती माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य भाग होते आणि एक प्रकारे ती त्याच्या चारित्र्याचा हिस्सा होते. आणि असे म्हणतात- माणसाचे चारित्र्य त्याची नियती घडवते.
हे सूत्र जर नीट समजावून घेतले तर माणूस आपली नियती स्वत:च कशी घडवू शकतो याचा अनुभव येईल. इथे मला दोन उदाहरणे देण्याची गरज वाटते. आधी अयोग्य बदलाचे उदाहरण आणि मग योग्य बदलाचे उदाहरण
उदाहरणार्थ तो. लहानपणीच आईवडील वारलेला अनाथ मुलगा. काकाकडे वाढला. काकाची परिस्थिती अतिशय वाईट. त्यात त्याला दारूचे व्यसन. काकू धुण्याभांडय़ाची कामे करून कसाबसा संसार ओढायची. त्याला काकाच्या सतत बिडी पिण्याचे आणि दारू पिण्याचे मोठ्ठे आकर्षण. त्याच्या मनात एकच विचार- आपण आता १४ वर्षांचे झालो. आता मोठय़ा माणसासारखे वागायचे. तो एका हॉटेलात काम करी. तिथले लोक रोज रात्री दारू पीत. त्याचा विचार हाच की, मोठे झाले म्हणजे दारू-बिडी पिणे. लहान वयात तो दारू रोज पिऊ लागला. म्हणता म्हणता सवय लागली. त्याच वेळी त्याला गर्दची ओळख झाली. त्याला वाटले- ‘हवा में उडने की दवा मिल गई’. गर्द महाग, मग चोऱ्या. मग एका पाकीटमार टोळीची गाठ पडली. त्यांच्यात सामील. ‘उडव पाकीट पी गर्द’ असा झमेला.. मग घडायचे तेच घडले .पोलिसांचा ससेमिरा. तुरुंगाच्या वाऱ्या आणि अखेर तो मुंबईतून तडीपार..
हीच त्याची नियती होती का?
तो एका व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाला. तिथेच राहून काम करू लागला. जरा स्थिर झाल्यावर अनाथालयातील एका मुलीशी लग्न केले. मुलगा झाला. शाळेत जाऊ लागला. मुलगा चौथीतून पाचवीत गेला. बाबाला म्हणू लागला, ‘मी तुमच्यापेक्षा जास्त शिकलोय.’ त्याचे वाक्य बाबासाठी बदलाची प्रेरणा ठरली. रात्रशाळेत जाऊन तो दहावी झाला. मुक्त विद्यापीठातून बारावी. मानसशास्त्रात बी.ए. पदवी प्रथम वर्गात. दरम्यान रस्त्यावर कपडे, भाजी विकून स्वत:चे घर केले. मुलगा बी.कॉम. झाला. त्याला वाटले, पुन्हा मुलगा म्हणेल की, मी तुमच्यापेक्षा जास्त शिकलेलो आहे. असे म्हणण्याची त्याने मुलाला संधीच दिली नाही. एम.ए.ला  प्रवेश घेतला आणि पहिले वर्ष प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याची बातमी मला नुकतीच कळली. आता त्याच केंद्रात समन्वयक म्हणून काम करीत आहे आणि नवी चारचाकी घरी येण्याच्या मार्गावर आहे.
हीच होती का त्याची नियती?
ही सत्यकथा आहे. पहिला तो आणि दुसरा तो या दोन स्वतंत्र व्यक्ती नाहीत.
विचार बदलण्याने सुरुवात केली, तर कोणताही माणूस संपूर्णपणे बदलू शकतो, यावर श्रद्धा ठेवून आपली नियती घडवायला माणूस तयार आहे का नाही? हा फक्त प्रश्न आहे.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…