२०० फूट उंचीचा ‘लुना’ हा भलामोठा वृक्ष कापण्यापासून वाचवणे आणि त्याचबरोबर पर्यावरण संरक्षणाकडे जनतेचे लक्ष वेधून घेणे असे दुहेरी उद्दिष्ट ठेवून लढा सुरू झाला होता.या आंदोलनात सहभागी होऊन झाडावर चढलेली ज्युलिया तब्बल ७३८ दिवस त्यावर मुक्काम ठोकून होती. अनेकदा तर कडाक्याच्या थंडीत झाडावरून पडता पडता ती वाचली आणि निर्धाराने तिथेच राहिली.
 एका तरुणीने दिलेला हा प्रदीर्घ तरीही अहिंसक लढा होता. पर्यावरण रक्षणासाठी झटणाऱ्यांकरता एक ‘माइलस्टोन’ ठरला. आजही ज्युलिया पर्यावरण रक्षणासाठी जगभर फिरते आहे. त्यासाठी तिने ‘सर्कल ऑफ लाईफ’ हा ट्रस्टही स्थापन केला आहे. तिच्या या कार्याविषयी ‘जागतिक वन्य दिना’निमित्ताने खास लेख.
कॅलिफोर्नियात समुद्र किनाऱ्यालगत, प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या आणि खूप उंच वाढणाऱ्या ‘रेडवूड’ या वृक्षाचं जंगल आहे. विशेष म्हणजे जगात हा वृक्ष इतरत्र कोठेही आढळत नाही. फर्निचरच्या व्यवसायासाठी अमेरिकन लाकूड कंपन्या या वृक्षाची सर्रास तोड करतात. याच कॅलिफोर्नियातील एका धनाढय़ कंपनीला शेकडो चौरस हेक्टर जंगलतोडीचे कंत्राट मिळाले होते. या कंपनीने यापूर्वीही अशीच मोठय़ा प्रमाणावर जंगलं साफ केली होती आणि त्यामुळे जमिनीची धूप होऊन जमीन खचणे, सुपीक माती वाहून जाणे, यांसारखे पर्यावरणाचे नुकसान तर झालेच. शिवाय जंगलातील वृक्षवल्लीच्या आसऱ्यात राहणाऱ्या प्राणीमात्राचेही अस्तित्व धोक्यात आले. काही प्रजाती नष्टही झाल्या. लाकूडतोड कंपन्यांच्या या ‘जंगलराज’ला पर्यावरणप्रेमी व्यक्ती, संस्था वेगवेगळ्या मार्गाने विरोध करतच होत्या. त्यांच्यापैकीच एका छोटय़ा गटाने सुमारे हजार वर्षे जुन्या रेडवुडवर ६ बाय ६ चे दोन प्लॅटफॉर्म बांधून त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले.
झाडावरच मुक्काम ठोकला की तो पाडायला कोणी धजावणार नाही ही त्यांची अटकळ होती. सुमारे २०० फूट उंचीचा हा भलामोठा वृक्ष कापण्यापासून वाचवणे आणि त्याचबरोबर पर्यावरण संरक्षणाकडे जनतेचे लक्ष वेधून घेणे असे दुहेरी उद्दिष्ट ठेवून हा लढा सुरू झाला. या पर्यावरणप्रेमी गटाने झाडास ‘लुना’ हे नावही दिले होते. आळीपाळीने गटातील एकएक सदस्य झाडावर चढून मुक्काम करू लागला. हळूहळू अमेरिकेतील प्रसिद्धीमाध्यमांचे त्यांच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनाकडे लक्ष गेलं. एकएक दिवस जात होता. हे स्वयंसेवक एकएक करून फार फार तर २-४ दिवस झाडावर काढायचे. थंडीचा ऋतू अगदी तोंडावर आला होता आणि या स्वयंसेवकातील उत्साहही थंड पडू लागला. हळूहळू स्वयंसेवकांची संख्या रोडावू लागली.
आणि त्याच वेळी ‘तिचा’ या प्रकरणात प्रवेश झाला..
ती, ज्युलिया आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबरच पॅसिफिक किनाऱ्यावरील रेन-फॉरेस्टच्या भटकंतीवर निघाली होती. या जंगलांनी तिच्यावर अशी काही मोहिनी घातली की, त्यांच्या संरक्षणासाठी गरज पडल्यास लढा देण्याचा तिने निर्णय घेतला आणि नोव्हेंबर महिन्यात तिने ‘हमबोल्ड काऊन्टी’ या पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असलेल्या गटाबरोबर काम करायला सुरुवात केली. आंदोलनाचा भाग म्हणून ती झाडावर चढली. पाच दिवस वर राहून खाली उतरली तेव्हा तिला कळले की, तिच्यानंतर झाडावर चढायला कोणीच नाही. झाडावर कोणी चढले नसते तर ते आंदोलन फसलेच असते आणि या आंदोलनावर घाव घालायला कंपनीचे लोक बाजूलाच तंबू ठोकून टपून बसले होते.
 ज्युलियाने क्षणाचाही विचार न करता पुन्हा झाडावर चढली. तो दिवस होता १० डिसेंबर १९९७. दोन आठवडय़ांनंतर पुन्हा जमिनीवर भेटू, असं सहकाऱ्यांना सांगून झाडावर चढलेली ज्युलिया तब्बल ७३८ दिवस या झाडावर मुक्काम ठोकून होती आणि मग काय ज्युलियामुळे ‘लुना’ आणि ‘लुना’मुळे ज्युलिया, दोघांनाही जगभर प्रसिद्धी मिळाली. (आता ती ज्युलिया बटरप्लाय हिल या नावाने ओळखली जाते) पर्यावरण रक्षणासाठी एका तरुण मुलीने दिलेला हा प्रदीर्घ तरीही आहिंसक लढा. अनेक देशांमधील धनदांडग्या कंपन्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा होता. पर्यावरणप्रेमींसाठी स्फूर्तीदायक होता. पर्यावरण रक्षणासाठी झटणाऱ्यांकरता एक ‘माइलस्टोन’ ठरला..
दोन वर्षांच्या ‘लुना’वरील वास्तव्यात तिला कोणत्या यातना सहन कराव्या लागल्या नाहीत?  खाली असलेले स्वयंसेवक तिला दोरीवरून अन्न-पाण्याचा पुरवठा करायचे. जमिनीपासून १८० फूट उंच ६ बाय ६ च्या तकलादू फळकुटावर, कॅलिफोर्नियातील हाडे गोठवणाऱ्या थंडीत काढायचे म्हणजे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हते. टिंबर कंपनीही तिने झाडावरून उतरावे म्हणून शड्डू ठोकून तयारच होती. पण ती बधत नाही हे लक्षात आल्यावर, हेलिकॉप्टर झाडाजवळ थांबवून हवेचा, दिव्यांचा प्रचंड मोठा झोत तिच्या दिशेने सोडला जाई. अत्यंत कर्णकर्कश संगीत दिवस-रात्र तिला ऐकू जाईल असे लावायचे, ‘लुना’च्या आजूबाजूची सर्व झाडे कापून, तिच्यासकट ‘लुना’ कापून टाकण्यासाठी लाऊडस्पीकरवरून धमकावले जायचे, सर्व प्रकारचा मानसिक दबाव आणून तिचे मनोधैर्य खच्ची करण्याचे अयशस्वी प्रयत्न झाले. शेवटचा प्रयत्न म्हणून झाडाजवळ २४ तास कडक पाहारा ठेवून तिचे अन्नपाणी बंद करण्याचाही प्रयत्न झाला. एकीकडे अतिथंड आणि बोचऱ्या वाऱ्यांमुळे हातापायाची बोटं निकामी होण्याची वेळ आली. सोसाटय़ाचा वारा आणि त्यामुळे आलेल्या वादळाच्या तडाख्यात ती खाली पडता पडता वाचली. अशा या जीवघेण्या यातनांमुळे ती अनेक आठवडेच्या आठवडे झोपू शकली नाही. स्वत:चे हाल सहन करून ‘लुना’वरील संकट टाळण्यासाठी जीवाची बाजी मारली. यामागे तिचा स्वार्थ काहीच नव्हता, ना तिला कुठली प्रसिद्धी हवी होती. ‘अहिंसक मार्गाने पर्यावरण रक्षण करा आणि वसुंधरा वाचवा’ हाच संदेश तिला जगाला द्यायचा होता.
दोन वर्षांच्या प्रदीर्घ वास्तव्यात तिचे ‘लुना’बरोबर अव्यक्त, भावनिक ऋणानुबंध निर्माण झाले. हळूहळू ती त्या वृक्षाशी संवाद साधू लागली हे ऐकून कोणाचा विश्वास बसणार नाही, पण एकदा वाऱ्याच्या प्रचंड झोताने ती वरून खाली पडण्याच्याच स्थितीत होती. तेव्हा तिने देवाऐवजी ‘लुना’चा धावा केला आणि तिला चक्क भास झाला; ‘लुना’ झाड तिच्याशी बोलत होतं , तिला सांगत होतं, ‘माझ्यासारखंच हवेच्या दिशेने शरीर झुकव, वाऱ्याविरुद्ध लढण्याचा प्रयत्न करू नको’ आणि ‘लुना’ने सांगितलेली युक्ती अमलात आणून तिने आपला जीव वाचविला. ज्युलियाने पायातले बूट कधीच फेकून दिले होते. अनवाणी पायाने ती संपूर्ण झाडावर फिरायची, त्याचे सौंदर्य डोळ्यात साठवायची, त्याच्या आडोशाने राहणाऱ्या पक्ष्यांना साद घालायची. झाडाच्या पानांच्या आकारातील भिन्नतेमुळे पावसाचे पाणी मुळापर्यंत जाऊन झाड कसे वाढते याचा अभ्यास केला आणि तोही ‘लुना’ या विश्वविद्यालयातून. या ‘लुना’नेच तिला निसर्गाच्या अज्ञात पण हुरळून जाणाऱ्या सौंदर्याची ओळख करून दिली.
तिचा सगळा व्यवहार झाडावरच चालू होता. दोरीच्या साहाय्याने अन्न, टपाल व इतर वस्तूंची वर-खाली वाहतूक करायची. झाडावर बसून तिने खूप पत्रलेखन केलं. फ्रँक फिरवून डायनोमा चार्ज करून ती रेडिओ ऐकायची, सोलर पॅनेलद्वारे बॅटरी चार्ज करून फोन वापरायची, बघता बघता वर्ष सरले. लाखो अमेरिकी लोकांपर्यंत तिची कहाणी पोहोचली. अनेक ब्रॉडकास्टिंग, रेडिओ केंद्र, टीव्ही  चॅनेल्सनी तिच्या मुलाखती घेतल्या. ‘लुना’ झाडाखाली हजारो लोक संगीताच्या तालावर बेधुंद होऊन नाचत होते. ज्युलियानेसुद्धा त्या छोटय़ाशा फळकुटावरून त्यांना साथ दिली. ध्येयाने प्रेरित होऊन जीवाची पर्वा न करता ज्युलियाने ‘लुना’वर यशस्वी लढय़ाचा झेंडा ‘फडकावला होता, अवघ्या अमेरिकनांनी तिच्या या धैर्याला ‘सलामी’ दिली होती. हा भावपूर्ण, हृदयदावक प्रसंग प्रसारमाध्यमांनी संपूर्ण अमेरिकेला दाखवला होता.
   १९९९ मध्ये ‘हॅमबोस्ट पॅसिफिक लम्बर’ कंपनीबरोबर एक कायदेशीर करार करण्यात आला. त्या करारानुसार आजूबाजूच्या तीन एकरातील झाडे आणि अर्थातच ‘लुना’ आहे तसं ठेवण्याची हमी देण्यात आली आणि त्या बदल्यात ज्युलियाने झाडावरून उतरण्याचे मान्य केले. या दोन वर्षांच्या काळात जमा झालेले ५० हजार डॉलर कंपनीस भरपाई म्हणून द्यायचे होते. ‘अर्थ फर्स्ट’ या संघटनेने ते दिले, पण कंपनीने मोठय़ा मानाने ते पैसे एका स्थानिक महाविद्यालयाला शाश्वत जंगलासंबंधीच्या संशोधनासाठी देणगी म्हणून दिले. ‘सॅक्चुरी फॉरेस्ट’ नावाच्या संस्थेने त्यात मध्यस्थांची महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.
आणि अखेर ती झाडावरून खाली उतरली..
‘लुना’ वाचविण्यासाठी तिने झाडावर बसून केलेल्या आंदोलनाला नंतर ‘अर्थफर्स्ट’ ही पर्यावरणवादी चळवळ, इतर संस्था आणि स्वयंसेवकांनी मदतीचा हात दिला. या सर्वाशिवाय तिचा हा पराक्रम यशस्वी झालाच नसता असं तिला वाटतं. ऑक्टोबर १९९८ मध्ये तिच्या या साहसास कॅलिफोर्नियातील रेडवे येथे संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘लुना’वर केलेली कविता ज्युलिआने झाडावरून टेलिफोनद्वारे वाचून दाखविली. ‘बटरफ्लाय’ ‘ट्री सीट- द आर्ट ऑफ रेझिसटन्स’ हे दोन अनुबोधपट तिच्यावर काढण्यात आले. एका प्रसिद्ध कवीने ‘किसड् बाय मिस्ट’ ही कविताही तिच्यावर लिहिली. अधूनमधून टेलिव्हिजन सिरिअलमध्ये तिचे नाव यायचे. २ एप्रिल २००० हा दिवस बर्कले शहराने ‘ज्युलिया बटरफ्लाय हिल डे’ म्हणून साजरा केला. याच वर्षी ‘दि लिगसी ऑफ लुना’ हे तिचे आत्मचरित्रही प्रसिद्ध झाले. सुप्रसिद्ध भारतीय दिग्दर्शिका दीपा मेहता यांनीही ‘विदूषी लुना’ नावाची फिचर फिल्म तयार केली आहे. हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री त्यात ज्युलियाची भूमिका करीत आहे. हा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.
  तर, अशीही तरुणपणीची ज्युलिया बालपणी कशी होती, बालपणात अशा कोणत्या गोष्टी घडल्या, तिच्यावर कोणते संस्कार झालेत ज्यामुळे ती एवढी धाडसी बनली. लहाणपणी अगदी ७/८ वर्षांची असताना ज्युलिया आपल्या कुटुंबासमवेत जंगल ट्रेकला गेली होती. फिरताफिरता एक सुंदरसं, नाजूक फुलपाखरू तिच्या खांद्यावर येऊन विसावलं. जंगल ट्रेक पूर्ण होईपर्यंत ते तसंच तिच्या खांद्यावर होतं. तिच्याशी दोस्तीच केली म्हणा ना! त्यात तेव्हा हे सर्वजण अर्कान्सा राज्यात राहायचे. म्हणून तिला ज्युलिया बटरफ्लाय हिल हे टोपणनाव  देण्यात आलं.
याच वयात एका भीषण मोटार अपघातात ज्युलियाच्या मेंदूला गंभीर इजा झाली. सुमारे वर्षभर तिला त्यासाठी उपचार घ्यावे लागले. मग काय शालेय शिक्षणाचे धडे तिने घरीच गिरविले. हळूहळू ती सावरली आणि या अपघातामुळेच तिला मानवी जीवनातील ‘क्षणाचं’ महत्त्व उमजलं. एखाद्या क्षणाचं सोनं कसं करायचं हे तिला कळू लागलं, जीवनाची नवी दिशा मिळाली. कालांतराने तिने आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून व्यापारशास्त्रात पदवी घेतली. तेव्हाच तिने बऱ्याच कविताही केल्या, लिखाण केलं. स्वयंपाक करायला आवडायचे म्हणून वयाच्या १८ व्या वर्षी एक रेस्टारन्टही सुरू केले. पण निसर्गभ्रमण, जंगलसफारीची ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती. त्या अनुषंगाने मग पर्यावरण रक्षणाचीही आवड निर्माण झाली. आणि त्यातूनच घडलं ते ‘लुना प्रकरण’ लुना अर्थात पर्यावरण रक्षणासाठी २ वर्षे झाडावर राहून तिने केले अथक प्रयत्न आणि अमेरिकेला त्याची नोंद घ्यावीच लागली. तिचा लढा यशस्वी ठरला.
आजही ‘लुना’ ताठ मानेने उभे आहे.
कॅलिफोर्निया राज्यातील स्टॅनफोर्ड शहराबाहेरील एका डोंगरमाथ्यावर १०१ क्रमांकाच्या महामार्गावर ‘लुना’ ताठ मानेने उभे राहून आपल्याला दर्शन देतो आणि जणू सांगतो, ‘‘हो, माझी जीवनदायिनी ज्युलियाच आहे.’’ आज ‘लुना’ एका घनदाट जंगलात असल्याने आणि एका खासगी कंपनीची मालमत्ता असल्याने त्याचे दूरवरूनच दर्शन घ्यावे लागते. मात्र दरम्याने आणखी एक अनपेक्षित घटना घडली.
 ज्युलियाने वाचविलेल्या ‘लुना’वर सुमारे वर्षभरानंतर एका माथेफिरूने बुंध्यापैकी निम्म्या भागावर यांत्रिकी करवत चालविली. ‘लुना’ची जखम भळभळून वाहू लागली, पण लगेच लक्षात आल्याने झाडांचे तज्ज्ञ, स्वयंसेवक जीवशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ एकत्र आले. त्यांनी दिवसभरात विशिष्ट आकाराच्या स्टीलच्या कडय़ा बनविल्या आणि बुंध्यावर फिट केल्या. स्थानिक वनौषधींचाही प्रयोग करण्यात आला. ‘लुना’च्या तब्येतीविषयी नियमित बातम्या येऊ लागल्या. ‘लुना’ने या सर्वाच्या कष्टाचे चीज केले त्यांच्या प्रयत्नांना यश दिले.
 ज्युलियाने पुढे ‘सर्कल ऑफ लाइफ’ हा ट्रस्ट स्थापन केला. जगभरातील भिन्नविभिन्न जीवसृष्टीने पर्यावरणाचा आणि परस्परांचा आदर करून जगणे, त्यासाठी जनजागृती करणे, लोकांना शिक्षण आणि प्रेरणा देण्याचे काम सध्या ती जगभर फिरून करीत आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रेरणादायक व्याख्यानं देते आहे. याशिवाय पर्यावरण रक्षणासाठी प्रेरणा देणारी अनेक पुस्तके तिने लिहिली. त्यात ‘स्पिरिच्युअल अ‍ॅक्टिव्हेशन’ या पुस्तकाचा समावेश आहे. जॉन केनेडी (ज्युनिअर) यांनीही एका मासिकात तिच्या कार्याचा गौरव केला होता. ‘वसुंधरा वाचवा, नवी पिढी वाचेल’ हा मंत्र जपत, ज्युलिया आजही ठिकठिकाणी आपल्या भाषणांमधून पर्यावरण रक्षणाची हाक देत आहे.
 भारतासह संपूर्ण जगात ज्युलियासारखे एकांडे शिलेदार, पर्यावरणवादी गट, पर्यावरण रक्षणाच्या कार्यात सक्रिय आहेत. अनंत अडचणींना तोंड देत एकाकी आपले कार्य करीत आहेत. प्रस्थापित धनदांडग्यांविरोधात मूकपणे तर कधी जाहीरपणे लढा देत आहेत; परंतु दु:ख याचे वाटते की, ज्युलिया आणि ‘लुना’ यांना जगभर प्रसिद्धी मिळाली तशी यांच्या कार्याची ओळख अजूनही बऱ्याच भागात झालेली नाही. विविध संस्था सरकार संघटनांकडून त्यांच्या कार्याला बळ मिळणे तर दूरच, पण त्याची दखलही क्वचितच घेतली जाते. त्यांच्या या अनामिक, एकाकी पर्यावरण लढय़ाला स्फूर्ती व दिलासा मिळो हीच इच्छा!