News Flash

ज्येष्ठांचे लिव्ह इन :  निखळ मैत्री  ते सहजीवन

सरोजची स्वप्नं पाकळी पाकळीनं कोमेजून गेली. आपलं पितळ उघडं पडल्यावर नवऱ्याची अरेरावी वाढली.

सरिता आवाड sarita.awad1@gmail.com

एक स्त्री आणि एक पुरुष यांची मैत्री, त्यांचं एकत्र वावरणं, हसणं-खिदळणं, या अजूनही आपल्या समाजाला खटकणाऱ्याच गोष्टी. अशा मैत्रीबद्दल सहकारी आणि नातेवाईकांमध्ये कुजबुज सुरू झाली की त्याची परिणती त्या व्यक्तींच्या त्यांच्या-त्यांच्या संसारात कायमच संशयाची ठिणगी पडण्यात होते. सरोज आणि सुभाषची गोष्टही काहीशी अशीच. त्याच्यातली वेगळी गोष्ट अशी, की त्यांना वेढलेल्या संशयाच्या आणि वायफळ चर्चाच्या मळभानं त्यांना जवळ आणलं आणि विचित्र परिस्थितीत त्यांच्या सहजीवनाला सुरुवात झाली. त्यांच्या गोष्टीचा हा पूर्वरंग.

मुंबईच्या उपनगरातलं एक टोकाचं पोस्ट ऑफिस. आसपास खुरटी झाडं आणि चढत्या वाढत्या इमारती. पोस्टाचं छप्पर पत्र्याचं होतं. दुपारचा उष्मा असह्य़ व्हायचा. तशातच सरोज काऊंटरवर गर्दीला तोंड देत असायची. बरोबर आणलेला डबासुद्धा खायला वेळ मिळायचा नाही. तशात काम झाल्यावर मनीऑर्डर्स, पाकिटं, टपाल तिकिटांचा हिशोब जुळवणं. तिची शेवटचा रुपया जुळेपर्यंत घालमेल असायची. मदत तर सोडाच, पण सहकाऱ्यांचे कुजकट शेरे ऐकून ती बावरून जायची. अशीच वर्षांमागून वर्ष गेली. सरोज यंत्रासारखी काम करत राहिली. एकदा ऑडिट आलं. त्याचा ताण आलाच तिला. तेव्हा नवीनच बदलून आलेला सुभाष तिच्या जवळ आला आणि म्हणाला, ‘‘मी करतो आज मदत तुम्हाला.’’ आणि केली त्यानं मदत. हिशोब नीट जुळले. कधी नाही ते ऑडिट असून सरोज वेळेवर बाहेर पडली.

हळूहळू ओळख व्हायला लागली. तिचा डबा खाऊन होईपर्यंत तो तिचं काऊंटर सांभाळायला लागला. अधूनमधून गप्पा व्हायच्या. उजळ वर्णाच्या, बारीक काडीचा चष्मा घालणाऱ्या हसतमुख सुभाषचा सरोजला कामात आधार वाटायला लागला. सतत ताणलेल्या तिच्या चेहऱ्यावर थोडं हसू दिसायला लागलं. ऑफिस ते स्टेशन सुभाष सोबत करायला लागला. त्यातून तिला समजलं, की शेजारच्याच उपनगरात त्याचं घर आहे. त्याची बायको शाळेत शिक्षिका आहे. त्याला एक छोटी मुलगी आहे. त्याचे आईवडील त्याच्याच घरी असतात. चार बहिणींच्या पाठीवरचा एकटा भाऊ होता ना तो. सरोज मात्र गप्प गप्प असायची. बऱ्याच दिवसांनी खोदून खोदून विचारल्यावर त्याला समजलं, की सरोजचं लग्न झालं होतं; तिच्या आत्तेभावाशीच. पंधराव्या वर्षीच तिला बोहल्यावर चढवून वडिलांनी बहिणीला दिलेला शब्द पाळला होता. बारावीपर्यंत शिकवल्यावर तिला सासरी पाठवलं होतं. सासरी गेल्यावर एका वर्षांत तिला मुलगाही झाला, तेव्हा वडिलांनी सुस्कारा सोडला. पण हे स्वास्थ्य लवकरच संपलं.

कारण आत्याच्या मुलाचं शिक्षण, नोकरी याबद्दल तिनं त्यांना दिलेली माहिती खोटी निघाली. मुलाला नोकरी नव्हती. सारा दिवस चौकात टवाळ्या करण्यात त्याचा वेळ जायचा. घरची शेती होती, पण त्याची कष्टाची तयारी नव्हती. सरोजची स्वप्नं पाकळी पाकळीनं कोमेजून गेली. आपलं पितळ उघडं पडल्यावर नवऱ्याची अरेरावी वाढली. तो मारहाण करायला लागला. सासू-सासऱ्यांनी कानावर हात ठेवले. तशी एका रात्री नेसत्या कपडय़ानिशी मुलाला कडेवर घेऊन सरोज माहेरी मुंबईला आली ती कायमचीच. या धक्क्यानं वडील खचले. पण त्यांनी सरोजला पोस्टात अर्ज करून नोकरी करायला लावलं. नंतर तेही वारले. सरोज, तिची आई आणि मुलगा असे राहायला लागले. आई अधूनमधून औरंगाबादला तिच्या भावाकडे नातवाला घेऊन जायची. त्याला नंतर तिथेच शाळेत घातलं. नोकरी करणाऱ्या एकटय़ा सरोजला मुलाकडे लक्ष देणं जमेल न जमेल..

अशी ही एकटेपणाच्या कवचातली सरोज. गाण्याची तिला खूप आवड होती. रेडिओवर ‘बेला के फूल’ ऐकल्याशिवाय कधी झोपायची नाही. कधी तरी शास्त्रीय गाणं शिकावं, असं तिचं स्वप्न होतं. शाळेत असताना ती गॅदरिंगमध्ये गायली होती. आताही हळूच गुणगुणत असायची, पण हे फक्त सुभाषलाच माहीत होतं. तिच्या फसलेल्या लग्नाची हकीकत कळल्यावर तिच्याबद्दल त्याला सहानुभूती वाटायला लागली.

एके दिवशी हसत हसत सुभाषनं सरोजला एक मासिक दाखवलं. त्यात सुभाषची कविता छापून आली होती. सुभाषचं हे अंग सरोजला माहीत नव्हतं. सुभाषच्या सहवासात सरोज मोकळी व्हायला लागली. तिच्यातला बदल सर्वाच्या लक्षात आला. त्यातच पोस्टाचं विभागीय संमेलन करायचं ठरलं. सुभाषनं सरोजला या कार्यक्रमात भाग घ्यायला खूप प्रोत्साहन दिलं. शेवटी सरोज तयार झाली. तिची तयारी करून घ्यायला सुभाष ऑफिस संपल्यावर तिच्या घरी जायला लागला. संमेलन झकास झालं. सुभाषनं सूत्रसंचालन केलं. सरोजच्या स्त्री कर्मचाऱ्यांशी ओळखी व्हायला लागल्या. सरोजला पोस्टाच्या वर्तुळात गायिका म्हणायला लागले. गायनाच्या स्पर्धेत तिला बक्षीस मिळालं. ‘हमने देखी हैं उन आँखोकी महकती खुशबू, हाथ से छूके इसे इष्कका इल्जाम न दो’ हे गाणं मनापासून गायलं तिने.

पण प्रत्यक्षात ‘इष्क का इल्जाम’ वाटय़ाला आलाच. सरोज आणि सुभाषचं एकत्र असणं, सुभाषचं तिच्या घरी येणं-जाणं सगळ्यांच्या लक्षात आलं. आणि ही बातमी हस्ते-परहस्ते जयापर्यंत- म्हणजे सुभाषच्या बायकोपर्यंत पोहोचलीच. सुभाषचं उशिरा घरी येणं तिला खटकत होतं. पण असेल युनियनचं काम, असं म्हणून ती दुर्लक्ष करत होती. पण ओळखीच्या एक बाई, जिचे पती पोस्टात होते, त्यांच्याकडून ही बातमी ऐकल्यावर जयाची अगदी लाही लाही झाली. सुभाषच्या घरातली परिस्थिती स्फोटक बनली. पावलोपावली गैरसमज, संशय, वादावादी यांनी घरचं वातावरण पार बिघडून गेलं. सुभाषची मुलगी कावरीबावरी झाली. जया आता हट्टालाच पेटली. साहजिकच होतं. तिचा संसारच पणाला लागल्याच्या बातम्या तिला मिळत होत्या. असुरक्षिततेची भावना तिला ग्रासू लागली. कदाचित अशा गोष्टी जवळच्या कु णाशीही आपण बोलू शकत नाही, असं असल्यामुळे जयाची जगण्याची अंतप्रेरणा तिला सुभाषच्या विरोधात अनेक गोष्टी करण्यास भाग पाडू लागली. सुभाषच्या सगळ्या मित्रांचे, अधिकाऱ्यांचे फोन नंबर शोधून काढून सुभाषची तक्रार करण्याचा तिनं सपाटाच सुरू केला. लोक सरोज आणि सुभाषला टाळायला लागले, कुजबुजायला लागले. सुरुवातीला या दोघांची प्रतिक्रिया बावरण्याची होती. पण नंतर त्यांना राग यायला लागला. समाजाच्या त्यांना खलनायक-नायिका ठरवण्याच्या रेटय़ानं त्यांना आणखी जवळ आणलं. सुभाष काम झाल्यानंतर बाहेर  रेंगाळत वेळ काढायला लागला. कामातले मित्र आडून आडून त्याच्या प्रकरणाची चौकशी करायला लागले. त्यांना चघळायला चविष्ट विषय मिळाला. पण सुभाषला या चर्चा नकोशा वाटत होत्या.

सरोजची उलघाल सुरूच होती. खूप वर्षांनी प्रेमाचा गारवा तिच्या वाटय़ाला आला होता. आता पुन्हा होरपळ सुरू झाली. सुभाष घरी आला की आनंदाची लाट उसळायची, पण ही भेट संपणार याचीही जाणीव असायची. त्यामुळे सारखं घडय़ाळाकडे लक्ष. सरोज आणि सुभाष आरोपांच्या हल्ल्याच्या आधीचे दिवस आठवायचे आणि त्या आठवणींमध्ये रंगायचे. आरोपांचा हल्ला पुन्हा जमिनीवर आणायचा. जयाचा क्षणाक्षणाला होणारा जळफळाट, मुलीची, आई-वडिलांची केविलवाणी नजर सुभाषला असह्य़ झाली. एका रात्री अकराच्या सुमाराला सुभाष सरोजच्या दारात उभा राहिला. हातात लहानशी बॅग होती. त्यानं सरोजला सांगून टाकलं की आता तो इथेच राहाणार आहे. आरोपांचं जंजाळ थोडय़ा वेळासाठी गळून पडलं आणि सरोज सुभाषच्या सहजीवनाला सुरुवात झाली..

सुभाष सरोजकडे राहायला आलाय हे सरोजच्या आईला अजिबात आवडलं नाही. ‘तो जोपर्यंत आहे तोपर्यंत मी घरी येणार नाही,’ असं तिनं जाहीर करून टाकलं. सरोजचे मामा आले आणि दोघांना भेटले, शांतपणे बोलले. तेव्हा दोघांना घटस्फोट घ्यायची आवश्यकता त्यांनी पटवली. सरोज तर नवऱ्यापासून अनेक वर्ष वेगळी राहात होती. तिला घटस्फोट सहज मिळाला असता. सुभाषला मात्र घटस्फोट घेणं कठीण होतं. सुभाषनं जयाला फोनवर घटस्फोटाची कल्पना दिली, पण तिची यासाठी मुळीच तयारी नव्हती. तिच्या लेखी सरोज हीच खलनायिका होती. तिचा संसार उद्ध्वस्त करणारी. जसजसे दिवस जायला लागले तशी ती प्रचंड संतापत गेली. त्या भरात तिनं सासू-सासऱ्यांना सांगून टाकलं, की ‘मुलगा जर राहात नाही इथं तुमचा, तर तुम्ही तरी का राहाता? मी का म्हणून सेवा करायची तुमची? जा तुमच्या गावाला..’ खरोखरच ते दोघं कोकणात त्यांच्या गावी निघून गेले.

सरोज आणि सुभाष एकमेकांच्या सहवासात सुखावले होते. पण चहुबाजूंनी झालेल्या विरोधाचं सावट त्यांच्या सुखावर आलं होतं. सुखाची चवच गेली होती. आई-वडील कोकणात गेलेले कळल्यावर तर सुभाष कळवळलाच. कोकणातल्या घराची दुरवस्था त्याला ठाऊक होती. पाणी शेंदून आणणं, सरपण आणून चूल पेटवणं म्हाताऱ्या आईला कसं झेपणार?.. त्याचा जीव उडून गेला. कसंही करून कोकणात घर नीट बांधायचं असं त्याच्या मनानं घेतलं. पण पैसे उभे कसे करणार? त्याला चैन पडेना. नोकरीची आठच वर्ष बाकी होती. कर्ज मिळणं कठीण होतं. त्याला एकच मार्ग सुचला तो म्हणजे नोकरी सोडून फंडाचे पैसे घेऊन त्यातून घर बांधायचं. हे लवकरात लवकर करायला हवं असं त्यानं ठरवलं.

सरोजच्या नोकरीची दहा वर्ष बाकी होती. आई मुलाला घेऊन औरंगाबादला राहात जरी असली तरी त्याच्या  शिक्षणाचा खर्च तिलाच करायचा होता. सुभाषनं नोकरी सोडल्यावर तिला नोकरी करायला हवीच होती. त्याशिवाय कसं निभावणार? खूप चर्चा झाल्यावर शेवटी असा निष्कर्ष निघाला, की सुभाषनं नोकरी सोडून फंडातून कोकणात घर बांधायचं आणि सरोजनं कोकणात बदली करून घ्यायची. दोघांनी कोकणात आई-वडिलांबरोबर राहायचं. त्या दृष्टीनं दोघांची खटपट सुरू झाली.

शहरात असेपर्यंत कायद्याची कामं करायला सुरुवात झाली. सरोज पतीपासून ३० वर्ष वेगळी राहात असल्यानं तिला घटस्फोट मिळणं त्या मानानं सोपं होतं. तसा अर्ज तिनं कोर्टात दाखल केला. पण नवऱ्यानं काही प्रतिसादच दिला नाही. त्या अर्जाचं घोंगडं भिजत पडलं. जयाला तर घटस्फोट नकोच होता. अशा वेळी काय करायचं, यासाठी वकिलांशी चर्चा, काथ्याकूट यात भरपूर वेळ जायला लागला. सुभाषनंही न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल करून ठेवला. सुभाष सरोजकडे राहातो, या कारणानं जयाला घटस्फोट मागता आला असता. तिढा असा होता, की जयाला  काहीही करून तिचा संसार टिकवायचा होता आणि सुभाष तर घरी जायला तयार नव्हता. अशा परिस्थितीत घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणं एवढंच शक्य होतं.

सरोजचा मुलगा बारावी चांगल्या मार्कानी पास झाला. त्याला इंजिनीअरिंगला प्रवेश मिळाला. तो वसतिगृहात राहायला गेला. सुभाषनं नोकरीचा राजीनामा दिला. फंडाचे पैसे घेऊन कोकणातलं घर सुधारायला, म्हणजे नवीनच बांधायला सुरुवात केली. सरोजनं कोकणात बदलीसाठी अर्ज केला. तिचा अर्ज मंजूर झाला. सुभाष आणि सरोज कोकणात रवाना झाले. त्यांच्या सहजीवनाच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. या सहजीवनात त्यांना हरपलेलं श्रेय मिळालं का?.. ते पाहू या पुढच्या (२२ मे) भागात.

(या लेखातील घटना, व्यक्ती खऱ्या आहेत मात्र त्यांच्या विनंतीवरून खरी नावे प्रसिद्ध केलेली नाहीत)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2021 1:08 am

Web Title: concept of live in relationships live in relationships in older couples zws 70
Next Stories
1 मी, रोहिणी.. :  ‘मित्रा’ची धाडसी गोष्ट
2 वसुंधरेच्या लेकी : चळवळीतले कार्यकर्ते घडवताना..
3 गद्धेपंचविशी : चित्तचक्षुचमत्कारिक काळ
Just Now!
X