तृप्ती राणे – trupti_vrane@yahoo.com

‘करोना’मुळे संपूर्ण देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्याचा फार मोठा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. अनेकांचे उद्योगधंदे ठप्प झाले, काहींनी नोकऱ्या गमावल्या, कित्येकांच्या नोकऱ्या टिकल्या; परंतु पगार अगदी ५० टक्क्यांपर्यंतही कमी झाले. घर चालवण्यासाठी येणाऱ्या मासिक खर्चात मात्र विशेष फरक पडला नाही. ही स्थिती किती काळ राहील तेही सांगता येत नसल्याने पुढचे अनेक महिने घरखर्च कसा भागवायचा, हा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर उभा ठाकला आहे. प्रत्येकाचं घर आणि त्यांच्या गरजा वेगवेगळ्या असल्या तरी कुटुंबातल्या प्रत्येकाला विश्वासात घेतलं आणि एकत्रितपणे विचार केला तर त्यावर नक्कीच उपाय सापडू शकतो..

शनिवारची सकाळ, गरम चहा आणि पोहे.. मस्त बेत! कीर्तीनं आवाज दिला, ‘‘चला सगळे, गरमागरम नाश्ता करायला या!’’ थोडय़ा वेळात सुजय डायनिंग टेबलपाशी आला.  कीर्ती म्हणाली, ‘‘अरे, तू काल रात्री बराच वेळ जागा होतास.. कधी झोपायला आलास कळलंच नाही मला. हल्ली रोजच तुला झोपायला उशीर होतोय. हे ‘वर्क फ्रॉम होम’ना डोक्याला ताप झालंय. दिवसाचे २४ तास आणि आठवडय़ाचे सात दिवस कमीच. तुमच्या कंपनीला तुमच्या तब्येतीची काळजी आहे की नाही?..’’ आपणच बोलतोय, सुजयकडून काहीच प्रतिसाद कसा नाही, हे पाहायला कीर्ती वळली, तर तिला चिंतेत असलेला सुजय दिसला.  सुजयच्या बाजूच्या खुर्चीत बसत हळूच म्हणाली, ‘‘सॉरी सुजय.. माझं लक्ष नव्हतं तुझ्याकडे. काय झालं? तू असा चिंतातुर का दिसतोयस? काही प्रॉब्लेम झालाय का कामात?’’

सुजय दीर्घ नि:श्वास टाकत म्हणाला, ‘‘कीर्ती, तुला माहिती आहेच, की या ‘करोना’मुळे माझी कंपनी दोन महिने बंद होती आणि आता जरी सुरू झाली असली तरीसुद्धा खूप नुकसान झालेलं आहे. म्हणून लोकांना कमी करण्यात आलंय. काही मोजकेच लोक कंपनीत यापुढे काम करतील, असं काल रात्री कंपनी व्यवस्थापनानं सर्वाना कळवलं. मला या गोष्टीची कुणकुण होतीच. म्हणून मीसुद्धा दुसऱ्या नोकरीचा शोध घ्यायला सुरुवात केली होती; पण या अशा परिस्थितीत नवीन नोकरी मिळणं कठीण आहे. ऑफिसचं काम संपल्यावर रोज रात्री मी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीचे अर्ज पाठवत बसायचो, म्हणून झोपायला उशीर होत होता..’’ हे सगळं ऐकून  कीर्ती अस्वस्थ झाली. आपल्या नवऱ्याची नोकरी गेली की काय, हा विचार तिला शहारून गेला. तेवढय़ात सुजय म्हणाला, ‘‘सुदैवानं मला नोकरीवरून कमी नाही केलंय; पण पगार मात्र कमी केलाय. यापुढे परिस्थिती सुधारेपर्यंत ५० टक्केच पगार मिळणार आहे.’’ हे ऐकून कीर्तीनं दोन्ही हात जोडून देवाचे आभार मानले आणि सुजयला म्हणाली, ‘‘सुजय, आपण नक्कीच बऱ्याच लोकांपेक्षा नशीबवान आहोत. पगार कमी झाला, पण तुझी नोकरी चालू आहे याचंच मला खूप बरं वाटतंय. पुढे सगळं नक्कीच ठीक होईल. तू नको काळजी करू. आपण काही ना काही मार्ग काढू या प्रसंगातून बाहेर पडायला.’’

सुजय म्हणाला, ‘‘अगं, निम्म्या पगारात कसं होणार? शिवाय हे असं किती महिने चालणार हेसुद्धा माहिती नाही. आपले खर्च, गुंतवणूक, कर्जाचे हप्ते हे सगळं कसं सांभाळायचं?’’ त्यावर कीर्ती म्हणाली, ‘‘आपण जमा-खर्चाचं गणित मांडू या आणि मग यावर सविस्तर चर्चा करू.’’ तितक्यात त्यांची दोन्ही मुलं, स्वरा आणि अथांग, तिथे आली. स्वरा महाविद्यालयात दुसऱ्या वर्षांला होती, तर अथांग दहावीत. दोघांचेही ‘ऑनलाइन’ वर्ग सुरू होते. घरात एकच लॅपटॉप असल्यामुळे सुजय, स्वरा आणि अथांग एकमेकांची वेळ सांभाळून तो वापरत होते. कुटुंब मध्यमवर्गीय असलं तरीसुद्धा मोजक्यात कसं चांगलं जगायचं हे जाणून होतं. दोन्ही मुलं आपल्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघत उभी राहिली आहेत, हे जेव्हा कीर्ती-सुजयच्या लक्षात आलं, तेव्हा दोघंही म्हणाले, ‘‘अरे, तुम्ही दोघे असे उभे का? बसा. चला, आपण सगळे आधी नाश्ता करू आणि मग बोलू.’’

नाश्ता झाल्यावर स्वरा म्हणाली, ‘‘काय झालंय? सांगा आता.’’ मग सुजयनं सद्य:परिस्थिती मुलांना सांगितली. कीर्ती म्हणाली, ‘‘परिस्थिती थोडी गंभीर नक्कीच आहे. आता आपण स्वत:वरचा विश्वास कायम ठेवत पुढची पावलं उचलायची आहेत. मला नक्की खात्री आहे, की या खडतर परिस्थितीतूनही आपण सगळे व्यवस्थित बाहेर पडू. तुम्ही दोघं आता घरातली परिस्थिती समजण्याइतके मोठे झाला आहात. तेव्हा आपण सगळ्यांनी यापुढे काय तडजोड करायची हे मिळून ठरवू या. अथांग, जरा पटकन बाबांची डायरी आणि पेन घेऊन ये बरं.’’ आईनं सांगितल्याबरोबर अथांग धावत जाऊन पेन-डायरी घेऊन आला. कीर्तीनं स्वराला सांगितलं, ‘‘स्वरा, मी सांगते तसं लिही. वाणसामान, वीज बिल, गॅस बिल, टेलिफोन बिल, तिघांच्या मोबाइलचं बिल, ब्रॉडबँड बिल, सोसायटीचा खर्च, वृत्तपत्रं, स्टेशनरी, महाविद्यालयाची फी, शाळेची फी, शिकवणीची फी, गावी पाठवायचे पैसे, मोलकरीणबाईंचा पगार, दूध, फळं, भाजी, विमा, गृहकर्ज, इतर खरेदी, खादाडी..  सुजय, तू जरा आता यासमोर आकडे सांग.’’ त्यावर सुजयनं एकेक करून खर्चाचे आकडे सांगायला सुरुवात केली.

तितक्यात अथांग म्हणाला, ‘‘बाबा, या वर्षी आपल्या गावच्या घरात काम करून घ्यायला हवं, असं आजोबा म्हणत होते.’’ त्यावर कीर्ती म्हणाली, ‘‘हो हो, बरी आठवण केलीस. स्वरा, तेपण लिही बरं.’’ स्वरा हळूच सुजयच्या कानात पुटपुटली, ‘‘बाबा, तुम्ही अथांगला या वर्षी क्रिकेटचं नवीन किट द्यायचं प्रॉमिस केलं होतं. तो खर्चसुद्धा लिहू का?’’ सुजयला भारावून गेल्यासारखं झालं. कीर्तीकडे बघत तो म्हणाला, ‘‘हो स्वरा, तेसुद्धा लिही.’’ सगळं लिहून झाल्यावर मग कीर्तीनं थोडा विचार केला आणि म्हणाली, ‘‘चला, आता आपण कामाला लागू या. सुजय, आपले गरजेचे खर्च हे आपण व्यवस्थित भागवू शकू. वाणसामान, वीज बिल, गॅस बिल, ब्रॉडबँड बिल, सोसायटीचा येणारा खर्च, स्टेशनरी, शाळा-कॉलेजची आणि शिकवणीची फी, वृत्तपत्र, दूध, फळं, भाजी यासाठीचा खर्च आवश्यकच आहे. विम्याचे हप्ते भरणं गरजेचं आहे आणि ते आपण भरायचे आहेत. विमा आणि आरोग्यावरचा या वर्षीचा खर्च आपण साठवलेल्या गुंतवणुकीतून करायचा. गृहकर्ज तर फेडावंच लागणार, पण मला असं वाटतं, की सरकारनं दिलेल्या सोयीचा आपण फायदा करून घ्यावा. बँकेला जरा विनंती करू या, की पुढचे सहा महिने हप्तावसुली करू नये.’’ त्यावर स्वरा म्हणाली, ‘‘अगं आई, पण न भरलेल्या हप्त्यावर पुन्हा व्याज लागेल ना. मग तो खर्चसुद्धा महागात पडेल.’’ त्यावर कीर्तीनं तिला समजावलं, ‘‘स्वरा, तुझं अगदी बरोबर आहे; पण मी असा विचार करतेय, की बाबांचा पगार किती महिन्यांसाठी कमी राहील हे माहिती नाही. म्हणून आपल्या हाताशी पैसे राहतील तेवढं चांगलं. उद्या न जाणो, पण नोकरी गेली तर कर्जसुद्धा मिळणार नाही. म्हणून कर्जाचे हप्ते थोडे लांबणीवर टाकू या असं मला वाटतंय. सुजय, तुला पटतंय का हे?’’ सुजयनं त्यावर होकारार्थी मान डोलावली. अथांग म्हणाला, ‘‘ए आई, तू बाकीच्या खर्चाबद्दल काय विचार केला आहेस? मी एक सांगतो, मला या वर्षी माझं ‘बर्थडे गिफ्ट’ नको. पुढे कधी तरी मागून घेईन आणि मला काही महिने मोबाइल नसला तरी चालेल. तसं पण बाबांचा मोबाईल नंबर माझ्या शाळेत आणि क्लासमध्ये दिलेला आहेच. तेव्हा काही महिने मी माझा नंबर बंद ठेवू शकतो.’’ त्याचं ऐकून स्वरा म्हणाली, ‘‘आई, माझासुद्धा मोबाइल बंद राहिला तरी चालेल. बाबांचा नंबर मी माझ्या कॉलेजमध्ये देते आणि व्हॉटस्अ‍ॅप तर चालू राहील. मग काही समस्या नाही. आपण ‘लँडलाइन’ फोनपण बंद करू या, म्हणजे आणखी काही पैसे वाचतील आणि आम्ही दोघंही अभ्यासाची स्टेशनरी सांभाळून वापरू.’’ आपल्या दोन्ही मुलांचा समंजसपणा पाहून कीर्ती आणि सुजय सुखावले.

सुजय म्हणाला, ‘‘मला प्रश्न पडतोय तो गावी पाठवायच्या पैशांचा, गावच्या घराच्या डागडुजीचा आणि मोलकरीणबाईंच्या पगाराचा..’’ त्यावर कीर्ती म्हणाली, ‘‘सुजय, मोठे खर्च काही काळ टाळू या. आई-बाबांना आपण खरी परिस्थिती सांगितली, तर त्यांनासुद्धा हे पटेल. तेव्हा डागडुजी पुढल्या वर्षी बघू. महिन्याचे पैसे मात्र आपण पाठवतच राहायचे. आपल्या गुंतवणुकीतून ‘एसडब्ल्यूपी’ (‘सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन’) करून हा खर्च भागवायचा. मोलकरणीच्या खर्चात आपण पूर्ण कपात नको करू या. विमलताई आपल्याकडे अनेक र्वष काम करत आहेत. ‘करोना’मुळे त्या येऊ शकत नाहीत, पण हे सगळं सुरळीत झालं, की लगेच हजर होतील. तेव्हा मी त्यांना निम्मा पगार देऊन सुरू ठेवू इच्छिते. बघा, तुम्हा सर्वाना हे पटतंय का. त्यांचा अख्खा पगार तुम्हा दोन मुलांच्या ‘पॉकेटमनी’पेक्षाही कमी आहे आणि त्या नेहमी आपल्यासाठी वेळीअवेळीही कामावर आलेल्या आहेत, सुटय़ाही जास्त घेतलेल्या नाहीत..’’ त्यावर बाकी तिघांनी एकमेकांकडे बघून होकारार्थी मान डोलावली.

‘‘स्वरा, टाळेबंदी संपली की अनेक ठिकाणी मोठमोठे सेल लागतील.  त्यामुळे मैत्रिणींबरोबर तुलाही खरेदीला जावंसं वाटेल. तो मोह काही दिवस आवरायला लागेल  आणि अथांग तुलाही चायनीय, पिझ्झा ऑर्डर करण्यावर बंधनं घालावी लागतील.’’ कीर्ती म्हणाली. ‘‘अर्थातच आई,’’ दोघांनी एकसुरात सांगितलं.  सुजयला आता जरा बरं वाटू लागलं. कीर्ती त्याला म्हणाली, ‘‘अरे सुजय, हताश होऊन चालत नाही. माणसानं प्रयत्न करावेत, यश मिळणारच. सुदैवानं आपण आधी केलेल्या गुंतवणुकीचा आपल्याला पुढची दोन-तीन र्वष तरी फायदा होईल. तेव्हा तू आता कोणतीही काळजी न करता कामावर लक्ष दे. दुसरी चांगली नोकरी मिळाली तर उत्तमच; पण याही परिस्थितीत आपण सुखी राहू शकतो. काही काळ मजा नाही करता येणार, पण ठीक आहे की! एखाद्या वर्षी फिरायला नाही गेलं, हॉटेलात जाऊन मजा नाही केली, हौस नाही भागवली, तर काय बिघडतं? या वर्षी जमेल तितके पैसे वाचवू, जमेल तितकी गुंतवणूक चालू ठेवू आणि प्रयत्न करत राहू. मीसुद्धा काही तरी हातभार लावीन. घरगुती का होईना, पण एखादा उद्योग सुरू करीन. तुम्ही मुलं आता मोठी झाला आहात, तेव्हा घरच्या कामात थोडा हातभार लावलात तर हे सगळं शक्य होईल. काय मग?.. ‘मिशन पॉसिबल’मध्ये कोण-कोण माझ्याबरोबर आहे?..’’ त्यावर तिघांनीही जोरात ‘‘हो!’’ म्हणत एकमेकाला टाळ्या दिल्या आणि पुन्हा चहाची फर्माईश केली.

आजच्या या परिस्थितीमुळे कीर्ती-सुजयसारखी अनेक कुटुंबं आर्थिक तणावातून जात आहेत. कीर्ती-सुजयची गोष्ट वाचताना खूप सोपी वाटते, पण एखादं कुटुंब जेव्हा अशा परिस्थितीतून जात असतं तेव्हा त्यांचे त्रास त्यांनाच कळतात. आज अनेक कुटुंबं तर याहीपेक्षा खडतर परिस्थितीचा सामना करत आहेत. काही जणांचे उद्योग ठप्प झाले आहेत. रोजच्या कमाईवर जगणारी माणसं हतबल झाली आहेत. डॉक्टर, वकील अशा व्यावसायिकांनाही हा त्रास चुकलेला नाही. परिस्थिती बदलणारच आहे हा आशावाद या लेखाद्वारे मांडला गेला असला, तरीसुद्धा हा कठीण काळ कदाचित पुढची दोन-तीन र्वषसुद्धा राहू शकेल. तेव्हा अशा वेळी हताश ना होता शक्य आणि अशक्य गोष्टींचा विचार करून ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण हेही दिवस जातील.

वाचकांना उपयोगी पडू शकतील अशा काही गोष्टी

मिळकत आणि खर्चाचा ताळमेळ घाला. खरी गरज काय आहे हे समजून घ्या. इथे भावनिक होऊन चालणार नाही. आपण काय पेलू शकतो याचा सारासार विचार करा आणि तसंच वागा.

खर्च जमतील तितके कमी ठेवा. जरी पुढील ६-७ महिन्यांत परिस्थिती बरी वाटायला लागली, तरीसुद्धा खर्चावर नियंत्रण ठेवा.

जर तुमचे कुणाकडून पैसे परत घ्यायचे राहिले असतील, तर तगादा लावा. थोडे थोडे करून का होईना, पैसे परत मिळवा.

पुढील २ वर्षांचे खर्च भागवण्यासाठी जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर त्या गुंतवणुकीची जोखीम कमी करा. सुरक्षित पर्याय निवडा, परंतु एकाच ठिकाणी पैसे ठेवू नका. गुंतवणुकीतून बाहेर पडताना कदाचित नुकसान होईलही, परंतु सध्या हाताशी पैसे असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. भविष्य सध्या तरी अंधारात आहे. त्यामुळे सावध राहा.

जर मागील गुंतवणुकीचा साठा नसेल, तर कुठल्या प्रकारे मिळकतीची सोय करता येईल यावर भरपूर विचार करा. घरबसल्या गृहिणी अनेक उद्योग करू शकतात. ज्यात सुरुवातीची गुंतवणूक कमी आहे.  इतर पारंपरिक पर्यायांबरोबरच आता ऑनलाइन क्लास, कोर्स वाढू लागले आहेत. तुम्हाला घरबसल्या कोणते क्लास घेता येत आहेत का  किं वा तुमच्या शिक्षणाची मदत घेऊन सल्लागार म्हणून काम करता येईल का ते पाहा. एखादी छोटी नोकरीसुद्धा मिळत असेल तर करा. कारण इथे मासिक खर्च भागवायचे आहेत. तेव्हा आणखी चांगलं मिळेल या अपेक्षेनं वेळ वाया घालवू नका.

कर्जाच्या हप्त्यांचं नीट अवलोकन करा. जिथे जिथे शक्य होईल तिथे मुदत मागा. परंतु त्याबरोबर वाढीव व्याज किती द्यावं लागेल यावरही लक्ष ठेवा.

येत्या काळात पुन्हा सगळीकडे वस्तूविक्रीचे ‘सेल’ सुरू होतील. त्यांचा मोह आवरा. थोडेसेच पैसे खर्च होतील असं समजून उगीच खरेदी करू नका. परंतु जर तुमच्या कामासाठी उपयोगी वस्तू स्वस्त मिळत असेल आणि तिचा वापर करून जर तुमची मिळकत वाढत असेल किंवा भविष्यातील खर्च कमी होत असेल, तर नक्कीच याचा फायदा करून घ्या. आरोग्य विमा आणि आयुर्विमा नियमित भरा. विपरीत प्रसंगी या दोन्ही विम्यांचं कवच तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला उपयोगी पडेल. शारीरिक आरोग्य आणि भावनिक आरोग्य सांभाळा.

(लेखिका सनदी लेखापाल व गुंतवणूक सल्लागार आहेत.)