डॉ. नंदू मुलमुले – nandu1957@yahoo.co.in

कुटुंबीयांचा सहवास लाभणं ही संकल्पना प्रत्यक्षात येईपर्यंतच गोड असते याचा घरी राहाणाऱ्या सगळ्यांनाच प्रत्यय येऊ लागलाय. हा सहवास सक्तवास आहे, स्वेच्छावास नाही. शिवाय आजारपणाची, संभाव्य मृत्यूच्या भयाची चौकट लागलेलं हे सहवासाचं चित्र, एका अनिश्चिततेच्या कॅनव्हासवर चितारलेलं आहे. माणूस प्रत्यक्ष संकटाला भीत नाही तेवढा अनिश्चिततेला घाबरतो.. सध्या करोना विषाणूंचा भयाणू झाला आहे. नागरिकांना घरात राहण्याचा आदेश मानणं भाग आहे. मात्र अनिश्चिततेच्या सावटाखाली या नात्याचाच काच होत असेल तर प्रेमच त्यावर मात करू शकेल. एकमेकांना समजून घेणं हेच आजच्या घडीला महत्वाचे आहे.

२० मार्च २०२०, समीर राजस्थानची सहल पूर्ण करून मुंबईत परतला, तेव्हा दुसऱ्या दिवशीची परतीच्या विमानाची तिकिटं खिशात असल्याची त्याने खात्री करून घेतली, आणि मगच तो टॅक्सीत बसला. संध्याकाळी सात वाजता बायको-मुलीसह मुलुंडला भावाकडे पोचला, तेव्हा वहिनीच्या चेहऱ्यावरील स्वागतशील मास्कखाली थोडा नाराजीचा भाव त्याला जाणवला. दोन बीएचकेच्या घरात आधीच तीन, त्यात या तिघांची भर!

प्रश्न एका रात्रीचा आहे, उद्या आपण परतीच्या वाटेला असू, त्याने स्वत:ची समजूत घातली. रात्र गप्पागोष्टींत पार पडली. दुसऱ्या दिवशी विमाने बंद केल्याचं जाहीर केलं गेलं. रेल्वे आरक्षण नव्हतं, त्यात अध्र्याअधिक गाडय़ा आधीच रद्द केल्या होत्या. बसने सोळा तास प्रवास करावा का, हा विचार करेतो ‘जनता कर्फ्यू’ लागला आणि सारेच रस्ते बंद झाले. इकडे सोसायटीत ‘बाहेरगावचे पाहुणे’ आल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती. हे ‘बाहेर देशातले’ नाहीत हा खुलासा समीरच्या भावाने, मिहीरने केल्यावर ती थोडी दबली खरी, पण शेजाऱ्यांच्या डोळ्यांतला संशय काही गेला नाही. दुसरा दिवस उजाडला तो धुणी-भांडी करणाऱ्या बाईच्या स्वयंघोषित सुट्टीने. समीरच्या बायकोने, सुनीताने परिस्थिती ओळखून कंबर कसलीच होती, त्यामुळे जाऊबाई सुखावल्या, पण लवकरच भाजी संपत आल्याचं लक्षात आलं. आता नवऱ्याने बाहेर पडावं, असं तिला वाटत नव्हतं, पण पाहुण्यांना रोजचा भाजीवाला माहीत नाही, तो नाही सापडला तर दुसरा कुठला शोधायचा हे माहीत नाही, या परिस्थितीत नाइलाज होता. मात्र असा नाइलाज दूधवाला, गॅसवाला वगैरे शोधण्यात पदोपदी येणार याची तिला जाणीव झाली. पाहुणचाराचं कौतुक एक दिवस, दुसऱ्याच दिवशी ते ओसरलं. तिसऱ्या दिवशी दैनंदिनी सुरू झाली खरी, पण सकाळचा चहा आणि आंघोळी आटोपल्यावर पुढय़ात सारा दिवस बिनकामाचा. आंघोळ करून, तयार होऊन करायचं काय, अन् जायचं कुठे?

समीरला रोज जिमला जायची सवय. मित्रमंडळीसोबत चहापान, गप्पा, मग घरी येऊन पेपर वाचन. हे सारंच बंद पडलं. त्यानं सोसायटीत खाली उतरून जॉगिंगचा प्रयत्न केला, पण पाचच मिनिटांत भावाचा घाबरल्या आवाजात फोन आला, नको उगाच, कुणी व्हिडीओ काढून पोलिसांना कळवायचं लॉकडाऊनचा भंग केला म्हणून. हा भाऊ आधीच हरीण-काळजाचा! त्याची कल्पनाशक्ती भयापोटी संकटाच्या पुढे धावायची. वास्तविक भय ही संभाव्य संकटाप्रति जागृत अशी माणसाची भावनिक, शारीरिक संरक्षक प्रतिक्रिया. ती उपयुक्त आहे, एका हद्दीपर्यंत. अतिरेकी भय संकटापेक्षा संहारक! हे आपल्या शरीराच्या प्रतिकारशक्तीसारखं. प्रतिकार हवा, मात्र या शक्तीचा विषाणू-विरोधच शरीराला अनेकदा मूळ विषाणूपेक्षा हानीकारक ठरतो.

त्यात भयाचा भडाग्नी भडकावणारी माध्यमे. समीरचा भाऊ मिहीर बँकेत ऑफिसर. त्याला एरवीही सतत बातम्या पाहण्याचं व्यसन. त्यातही एकच बातमी विविध वाहिन्या कशी देतात हे पाहण्यात रोज त्याची संध्याकाळ निघून जायची. त्यावरून नवरा-बायकोची भांडणं नित्याची. त्यात ‘बायकोने केली मेव्हण्याची हत्या’ आणि ‘ट्रकने चिरडले चार जणांना’ असल्या बातम्यांनीही तो विचलित व्हायचा. येथे तर करोनाचा कहर. क्रिकेट मॅचचा स्कोअर ठेवतात तसा सतत तो मृतांच्या आकडय़ांचा स्कोअर ठेवायला लागला. त्यात बव्हंशी वाहिन्यांवर ‘बडी खबर, मृतकोंकी संख्या हुई ..’ म्हणत नाटकी आवाजात ओरडणाऱ्या न्यूज-कन्यका! बायकोला आमटीच्या फोडणीचा ठसका लागून ती खोकली तरी घाबरून जाणारा मिहीर हळूहळू अस्वस्थ होऊ लागला.

समीरची चार वर्षांची मुलगी घरी बसून कंटाळली. आइसक्रीम खायला चला नं, म्हणत मागे लागू लागली. सगळे घरात कोंडून का बसले आहेत तिला कळेना. दिवसभराच्या अविश्रांत बातम्यांमधून तिच्या वाटय़ाला ‘कार्टून नेटवर्क’ येईना. एरवी मोबाइलसाठी हट्ट धरणारी, गेम खेळखेळून कंटाळली. शाळा नाही म्हणून झालेल्या आनंदाचा भर लवकरच ओसरू लागला. लहान मुलांची अद्याप सवय नसलेल्या घराला तिचा हट्टीपणा खटकू लागला. त्यावरून, ‘पोरांवर संस्कार नाहीत’ हा अविर्भाव जावेच्या तोंडावर शब्दाहून स्पष्ट दिसू लागल्याने समीरची बायको वैतागली. पोरीने महागडय़ा सोफ्यावर बसून जेवण्याचा हट्ट धरावा आणि सोफा खराब होईल या भीतीने काकूने तिच्याकडे रागाने पाहिलं याचा जावेला राग यावा, असं चालू झालं. दूर राहून जपलेल्या नात्यातला ओलावा आटला, सारे खटकणारे कंगोरे उघडे पडले.

स्वयंपाकघरात जावा-जावांच्या परस्परसंबंधांचा एक नवा ‘एपिसोड’ सुरू झाला. ‘आता किती दिवस मुक्काम?’ या प्रश्नाला कोणाही जवळ उत्तर नव्हतं. घरचे काय आणि बाहेरचे काय, सारेच त्या छोटय़ाशा घरात मुक्कामाला आलेले. हा मुक्काम स्वेच्छेचा नव्हता, तरी मुक्काम होताच, सक्तीचं साहचर्यही होतं. साहचर्यात सुसह्य़ता अल्पजीवीच असते, ते अधिक ताणलं की माणसांच्या चर्याही बदलू लागतात. समीरच्या बायकोची भावना म्हणजे, ‘आम्ही काय मुद्दाम लादला आहे पाहुणचार?.. वेळ अशी आली म्हणून, आणि मागल्या दिवाळीत सारे मुलुंडवासी गावी आठ दिवस सहल करून आले तेव्हा आम्ही काही काटकसर केली होती पाहुणचारात?’, तर मिहीरची बायको कामवाल्या बाईच्या असहकाराने करवादलेली. तशीही ती आतिथ्याबद्दल फार प्रसिद्ध नव्हतीच. त्यात पुरुषमंडळींच्या सतत चहापाण्याची भर. अशा वेळी सरसकट ‘आता बायकांच्या कामात पुरुषांचा हातभार लागू लागेल’, या कल्पना फोल! जे पूर्वीही कपबशा धूत होते तेच आणि तेवढेच आज धुवायला सरसावले, हा अनुभव येथेही आला.

दोघा भावांचे वडील नाना, संध्याकाळी पार्कमध्ये जायचे, ते बंद झाले. त्यात त्यांना मधूनच खोकल्याची उबळ यायची. ती एरवीही कानाला गोड नव्हतीच, करोनाच्या पाश्र्वभूमीवर आता भीतीदायक झालेली. शेजारच्या सोमणांकडे त्यांची संध्याकाळी एक बैठक व्हायची. मात्र ‘आता तुम्ही खोकलात की त्यांच्या पोटात गोळा उठायचा, कशाला जाता!’, म्हणून मिहीरने त्यांना बळजबरीने घरी बसवलं, त्यामुळे ते नजरकैदेत पडल्यासारखे झाले. भावाभावांत एरवी गप्पा व्हायच्या, मात्र आता सगळ्या विषयांना करोनाचा वास लागलेला. तो नसता तरी वातावरणात फरक पडला नसता हे उघडच होतं, कारण बातम्यांत तेच, मोबाइलमध्ये तेच, बोलण्यात तेच, मेंदू नुसता भोवंडून गेला. समीरने खासगी गाडीसाठी धडपड करून पाहिली, पण मिहीरला आपल्या भावाने जीव धोक्यात घालावा वाटेना.

कुटुंबीयांचा सहवास लाभणं ही संकल्पना प्रत्यक्षात येईपर्यंतच गोड असते याचा हळूहळू सगळ्यांनाच प्रत्यय येऊ लागला. हा सहवास सक्तवास होता, स्वेच्छावास नव्हता. शिवाय आजारपणाची, संभाव्य मृत्यूच्या भयाची चौकट लागलेलं हे सहवासाचं चित्र चितारलेलं एका अनिश्चिततेच्या कॅनव्हासवर! माणूस प्रत्यक्ष संकटाला भीत नाही तेवढा अनिश्चिततेला घाबरतो. विद्यार्थ्यांत आत्महत्येचं सर्वात जास्त प्रमाण निकालाआधी असतं आणि संकटापेक्षा संकटाच्या चाहुलीनं भीतीची दुर्भीती होते. त्यात अशा अनिश्चित संकटाचा सामना जो-तो आपापल्या प्रकृतीनुसार करतो. मिहीरचा सतत हात धुण्यावर कटाक्ष, तर समीर थोडा बेदरकार. ‘अरे हा सामान्य फ्लू गटातला व्हायरस, तो तसाही सत्तर टक्के लोकांना होणारच, काय घाबरायचं ?’ असल्या वाक्यांनी मिहीरच्या बायकोला हायसं वाटायचं, मात्र मिहीर वैतागायचा. ‘अरे साध्या सर्दीनं कुणी मरतं का? हा जीव घेणारा फ्लू आहे, इटलीची अवस्था नाही पाहिली?’, मग दोघा भावांत तेच वादविवाद. त्याच्या पुष्टय़र्थ दिलेले तेच ‘व्हॉट्सपी’ पुरावे. अनिश्चिततेचा सगळ्यात मोठा धोका हाच. तिला ढगांसारखा कुठलाही आकार द्या. कुणाला भूत दिसतं, कुणाला फुलपाखरू! आणि निराकाराला आकार देणं माणसाची मूलभूत गरज.

मिहीरचे शेजारी सोमण, त्यांची कथा वेगळीच. पासष्टीचे सोमण बायकोसोबत एकटेच. त्यांचा मुलगा अमेरिकेत, मुलगी ऑस्ट्रेलियात. रोज व्हिडीओ कॉलवर एकमेकांचे चेहरे पाहणं, विचारपूस करणं, काळजी घ्यायला सांगणं आणि त्याच-त्या सूचनांची उजळणी करणं. हे एरवीही होतंच. त्याला आता ‘हात धुवा, चेहऱ्याला बोट लावू नका’ची भर पडलेली. मुलं सुरक्षित होती, सक्षमही, पण अंतरं एवढी, की आपलं काही बरंवाईट झालं तर त्यांना येणं शक्य नाही या काळजीपोटी सोमण स्वत:ची अतिरेकी काळजी घेत, बायकोलाही भाग पाडीत. एरवीही सतरा-अठरा तासांचा प्रवास. झालंच काही विपरीत तरी ते कुठे धावून येणार? आता तर विमानं बंद पडलेली, तेव्हा तो प्रश्नच मिटला. तसे सोमण ठणठणीत होते, पण करोनाच्या पाश्र्वभूमीवर शरीराच्या प्रत्येक हालचालीबाबत ते, शिकाऱ्याचा माग लागलेले श्वापद व्हावं तसे अतिसजग होऊन गेले होते. घरातल्या घरात नाकाला रुमाल बांधून बसत, हवेच्या झुळुकीने विषाणू आला तर? दूर कुणी शिंकल्याचा आवाज आल्याबरोबर दारे-खिडक्या लावून घेत. हात धूत. बायकोनेही धुवावं असा त्यांचा आग्रह असे, मग तिने दिरंगाई केली की चिडत. त्यांच्या त्या बेचैनीपोटी बायको नाईलाजाने नुकतेच धुतलेले हात पुन्हा नळाखाली धरी.

या भयाने सोमणांचं मन सतत शंकेखोरही झालं होतं. ‘मी बाहेरून आणलेली दुधाची पिशवी धुतली का? मघा नाक खाजवलं ते हात धुण्याआधी की नंतर? दाराची बेल गुरख्याने वाजवली होती. ती पुसली का? तो बोलताना थोडा खाकरला होता का? त्याने आणलेला पेपर (ही सुरुवातीची गोष्ट, नंतर काही दिवस वृत्तपत्र बंद झालं) डायनिंग टेबलवर अंथरला होता, ते टेबल नंतर पुसायचं राहिलं..एक ना दोन! हा विषाणू वृद्धांना धरतो असं त्यांनी वाचलं होतं. आता ते काही तेवढे विकलांग वगैरे नव्हते, पण विषाणूपेक्षा भयाच्या या ‘भयाणू’ने त्यांच्या मनाचा ताबा घेतला होता.

या भयाणूला श्वास किंवा स्पर्श लागत नाही, तो नुसत्या विचाराने संक्रमित होतो. त्याचा पसरण्याचा वेग ‘मनोजवं मारुत तुल्य’ आहे. अफवा हे त्याचं वाहन, अनिश्चितता हे त्याचं खाद्य आणि करोनाबाबत तर हे दोन्ही उदंड! त्यात व्हॉट्सपी विद्यापीठात अफवांना सबगोलंकारी शास्त्रीय रसायनात बुडवून कल्हई केलेलं! त्यामुळे या भयाणूची पैदास विषाणूपेक्षा अधिक. त्याच्यापासून बचाव करता करता सोमण थकून गेले होते.

सजगता आवश्यक खरी, पण तिलाही काही काळ आराम लागतो. निवांतपणा लागतो. तो सारं भयाचं मळभ बाजूला सारून मनाला द्यावा लागतो, नसता अतिथकव्याने माणसाची प्रतिकारशक्तीही कमकुवत होते.

विस्कळीत झालेल्या दिनचर्येचीही हळूहळू घडी बसायला सुरुवात होते. भयही अंगवळणी पडतं. अनिश्चितता हेच निश्चित, हे सत्य स्वीकारल्यावर वाट पाहणं संपतं. ती क्रिया आस्तेकदम सुरू झाली. मिहीरने खूप दिवसांचं कपाट आवरायचं काम काढलं. त्याला जुना पत्त्यांचा जोड सापडला. त्याने पुतणीला जादू शिकवल्या. मोठय़ांचेही डाव सुरू झाले. माध्यमी महापुराला माणसं कंटाळली होतीच. अशा संकटांना तोंड देताना माहितीचं महत्त्व सत्य परिस्थितीची जाणीव करून देणं, लोकांना न घाबरवता पुरेसं सावध करणं यापरते दुसरं काय? मात्र तथ्याची बातमी आणि बातमीचं मनोरंजनीकरण करण्याची सवय पडलेल्या वाहिनीचा प्रवाह एकदम वळवणं कठीणच.

माणसात मुळात लवचीकता असतेच. कामवाल्या बाईनं ‘येऊ का’ विचारलं, मात्र आता मिहीरच्या बायकोनेच तिला आठ दिवस नको म्हणून सांगितलं. आपणच घासायची म्हटल्यावर मोजकीच भांडी पडतात हे तिच्या लक्षात आलं होतं. तेच कपडय़ांचं. ज्याने-त्याने आंघोळीसोबत आपापले कपडे धुऊन टाकतो म्हटल्यावर तोही भार कमी होतो. एवढंच नव्हे, तर कृतिव्यग्रतेने मनात घोंगावणारे संकटाचे विचारही कमी होतात हे लक्षात आलं. विचारांचा सामना विचाराने होईल, ते आटोक्यातल्या समस्यांबाबत असतील तर. करोनासारख्या, शतकातून एकदा साऱ्या जगाला ग्रासणाऱ्या संकटाचं भय जो कोलाहल निर्माण करतं, त्याच्यापुढे आमच्या चिमुकल्या मेंदूतील समजुतीचे विचार हतबल ठरू शकतात यात आश्चर्य नाही. त्यावर उत्तर मेंदू व्यग्र ठेवणं हेच. युद्धभूमीवर सैनिकांना सतत कामात गुंतवून ठेवण्यात येतं ते यासाठी. शारीर व्यग्रता मन स्थिर करतं, भयाला संतुलित ठेवतं.

लॉकडाऊनचा पहिला रविवार आला. तसा आता वारांमध्ये फरक राहिलाच नव्हता. मिहीर खाली उतरला तेव्हा सोसायटीच्या आवारात त्याला इस्त्रीचं टेबल टाकलेला बिहारी दिसला नाही. ‘वो मुलुख चला गया’, गुरख्याने सांगितलं. हातावर पोट असणाऱ्या कष्टकऱ्यांच्या स्थलांतराच्या बातम्या पाहिल्याचं त्याला आठवलं. आपण एकदाही त्याची विचारपूस केली नाही, त्याच्या लक्षात आलं. कुठे असेल तो? चालत मैलोंगणती, वाट आपल्या घराची? संकट सगळ्यांपुढे सारखंच, मात्र कुठे जिवापेक्षा मोठे, कुठे भुकेपेक्षा लहान.

समीरचा परवा फोन आला, गावी परत रिकामी जाणारी अ‍ॅम्ब्युलन्स असेल तर पाहा म्हणून. आता एखाद्या रुग्णाची वाहतूक करणाऱ्या वाहिकेतून प्रवास करावा का, हा बायकोचा सवाल निरुत्तर करणाराच होता, मात्र भाऊ-भावजयीने हा धोका न पत्करण्याचा, प्रवास सुरक्षित होईपर्यंत थांबण्याचा आग्रह चालवला आहे. हे संकट साधंसुधं नाही, अभूतपूर्व आहे आणि जिवावर बेतणारं आहे याची त्यांना जाणीव झाली आहे. ही जाणीव ज्या भयापोटी झाली आहे, ते भय त्यांना प्रतिक्रियात्मक न ठेवता सक्रियात्मक (प्रोअ‍ॅक्टिव्ह) करेल, हा विश्वासच या संकटाची लाट ओसरलेली पाहील. ज्ञानेश्वरांनी वर्णिलेली, माणसाने स्वत:भोवती भयाची जी ‘दुर्गे पन्नासिली (बांधिली)’ आहेत, ती ढासळतील. संकट स्थिरावलं आहे, त्याचा मास्क हटून तोंडवळा दिसू लागला आहे. मग आपणही स्थिरावण्याला काय हरकत आहे? अनिश्चित अशा निश्चित कालावधीनंतर समीर, तुम्ही, आम्ही ‘घरी’ परतू एवढं नक्की.

(लेखक मानसतज्ज्ञ आहेत.)