प्रसाद शिरगांवकर – prasad@aadii.net

आर्थिक व्यवहार आणि खरेदी ‘ऑनलाइन’ माध्यमातून करायला आपण शिकलो होतोच, पण ‘करोना’ आल्यानंतरच्या काळात डिजिटल तंत्रज्ञान आणि ऑनलाइन माध्यमांचा वापर अनेक बाबतीत अपरिहार्य झाला आणि येत्या काळात ऑनलाइन माध्यमांचा वापर वाढणार हे तर स्पष्टच आहे. त्याबरोबर त्यातले काही नवीन प्रश्नही समोर येऊ शकतील. ‘महामोहजाल’ सदरातून आपण वर्षभर ज्या धोक्यांविषयी जाणून घेत होतो, त्यांना बळी पडायचं नसेल, तर त्या त्या लेखात सांगितलेले डिजिटल जगातील सर्व सुरक्षिततेचे उपाय लक्षात ठेवावे लागतील.

२०२० हे वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला आणि संपूर्ण जगाला जोरदार धक्का देणारं वर्ष म्हणून आयुष्यभर आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहील. वर्षांच्या सुरुवातीला असलेले आपले संकल्प, आपली स्वप्नं, आपल्या इच्छा,आपल्या योजना या सगळ्या- सगळ्याला या वर्षांच्या सुरुवातीलाच आलेल्या ‘करोना’च्या साथीनं सुरुंग लावले आणि त्यानंतर आपल्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक व्यवस्थांना जोरदार हादरे दिले. मात्र २०२० च्या या अत्यंत काळ्याकुट्ट अशा आठवणींना आणि इतिहासाला लाभलेली सोनेरी किनार म्हणजे आपल्यापैकी बहुसंख्यांच्या आयुष्यात अत्यंत प्रकर्षांनं झालेला ‘डिजिटल’ तंत्रज्ञानाचा प्रवेश!

२०२० च्या जागतिक संकटाच्या काळामध्ये अगदी लहान मुलांच्या शिक्षणापासून ते मोठय़ा कंपन्यांच्या कामकाजापर्यंतच्या अनेक गोष्टी (कदाचित बळजबरीनं) ‘ऑनलाइन’ व्हायला लागल्या. त्याचबरोबर, आपल्या रोजच्या गरजेच्या दूध, फळं, भाज्यांपासून ते जीवनातल्या अनेक आवश्यक गोष्टींपर्यंत अनेक गोष्टी आपण ऑनलाइन मागवायला लागलो. तसंच, अगदी साधे साधे व्यवहार प्रत्यक्षात जरी केले तरी त्यांची ‘पेमेंट्स’ आपण डिजिटल पद्धतीनं करायला लागलो. गेली काही र्वष आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं डिजिटल तंत्रज्ञान, जे आपण बऱ्यापैकी घाबरत घाबरत किंवा गंमत म्हणून वापरत होतो, ते अचानक सगळ्यांनाच काहीसं बळजबरीनं, पण अत्यंत वेगानं, झपाटय़ानं आत्मसात करून रोजच्या आयुष्यात वापरावं लागलं. डिजिटल तंत्रज्ञानानं आपल्या आयुष्यात मारलेल्या या खोलवरच्या मुसंडीचे अनेक दूरगामी परिणाम होणार आहेत असं चित्र आज दिसत आहे.

‘वर्क फ्रॉम होम’

टाळेबंदीच्या काळामध्ये अनेक कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ ही पद्धत सुरू केली. देशभरातल्या हजारो कंपन्यांचे लक्षावधी कर्मचारी, व्यवस्थापक इत्यादी अनेक जण आपापल्या घरून काम करायला लागले. अर्थातच, सेवा क्षेत्रातल्या बहुसंख्य कंपन्यांना अशा प्रकारे घरून काम करता येणं हे सहज शक्य झालं. उत्पादन क्षेत्रामध्ये किंवा कृषी क्षेत्रामध्ये, जिथे प्रत्यक्ष जागेवर किंवा कारखान्यात जाऊन काम करावं लागतं तिथे असं ‘वर्क फ्रॉम होम’ शक्य नाही, पण उत्पादन क्षेत्रातही प्रत्यक्ष उत्पादन वगळता बाकीची व्यवस्थापकीय कामं, विक्रीची कामं ही ऑनलाइन सुरू ठेवण्यावर अनेक कंपन्यांनी भर दिला. सेवा क्षेत्रामधल्या विशेषत: ‘आयटी’ (माहिती तंत्रज्ञान) किंवा ‘आयटीईएस’ (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एनॅबल्ड सव्‍‌र्हिसेस) अशा ज्ञानावर आधारित काम करणाऱ्या, जिथे संगणक आणि चांगलं इंटरनेट कनेक्शन असतं, क्षेत्रातील कर्मचारी कुठूनही काम करू शकतात अशा कंपन्यांनी अत्यंत वेगानं ‘वर्क फ्रॉम होम’चं प्रारूप आत्मसात केलं. या क्षेत्रातल्या अनेक कंपन्यांना टाळेबंदीचा फटका न बसता उलट जास्त कार्यक्षमतेनं त्यांचं काम सुरू राहू शकलं. आपल्या सर्व किंवा बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी घरूनच काम केलं तर त्याचे होणारे फायदे हे अनेक कंपन्यांना आणि कर्मचाऱ्यांनाही आता स्पष्टपणे दिसत आहेत. कंपन्यांची वाचणारी ‘इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट’ – अर्थात कं पनीच्या कार्यालयात जाऊन काम करण्यासाठी पुरवाव्या लागणाऱ्या सोईसुविधा आणि कर्मचाऱ्यांचा रोजचा वाचणारा प्रवासाचा वेळ आणि ऊर्जा या दोन्हीमुळे अनेक कंपन्या ‘करोना’चं संकट टळल्यानंतरही ‘वर्क फ्रॉम होम’ प्रारूप पुढे सुरू ठेवतील अशी लक्षणं दिसत आहेत.

ऑनलाइन शिक्षण

गेले सहा-आठ महिने देशातल्या बहुसंख्य शाळा ऑनलाइन पद्धतीनं सुरू आहेत. प्रत्यक्ष वर्गामध्ये शाळा भरण्याची चिन्हं अजूनही दिसत नाहीयेत. बहुधा सर्व विद्यार्थ्यांचं हे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन शिक्षणातच जाईल. याशिवाय अनेक विद्यापीठांच्या परीक्षा किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या प्रवेश परीक्षा या यंदा ऑनलाइन पद्धतीनं झाल्या. ‘विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं शिक्षण ऑनलाइन देता येणं शक्यच नाही’ या विचारापासून ते जवळपास वर्षभर सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण द्यावं लागण्यापर्यंतचा प्रवास गेल्या सहा महिन्यांतच घडला. शिक्षक, विद्यार्थी आणि शैक्षणिक, प्रशासकीय संस्था या सगळ्यांसाठीच हा संपूर्णपणे नवा अनुभव होता. बहुसंख्य लोकांना ‘या ऑनलाइन शिक्षणात फारसा दम नाही,’ असं अजूनही वाटत आहे. मात्र, ‘करोना’च्या काळामध्ये देशभरातल्या अनेक शाळांनी आणि शिक्षकांनी अनेक वेगवेगळे कल्पक प्रयोग केले. ऑनलाइन शिक्षण प्रभावीपणे कसं देता येईल, यासाठीच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून बघितल्या. त्यातल्या काही पद्धती पारंपरिक शिक्षणापेक्षा खूप प्रभावी ठरल्या असतील, तर काही पद्धती कदाचित पूर्णपणे चुकल्या असतील. काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा खूप फायदा झाला, ही पद्धत खूप मनापासून आवडली असेल, तर काहींना अजिबात आवडली नसेल आणि ते मारून मुटकून लॅपटॉप किंवा मोबाइलसमोर बसत असतील. हे असे अनंत संमिश्र अनुभव ऑनलाइन शिक्षणाच्या बाबतीत घडले आहेत गेल्या काही महिन्यांत. ‘करोना’चं संकट संपल्यानंतर शाळा पुन्हा प्रत्यक्षात सुरू होतील अन् मुलं पुन्हा शाळेत जायला लागतीलही, पण नजीकच्या भविष्यकाळामध्ये प्रत्यक्षात भरणाऱ्या शाळा आणि ऑनलाइन शिक्षण या दोन्हींची सरमिसळ असलेली संमिश्र शिक्षणपद्धती अस्तित्वात येईल अशी लक्षणं दिसत आहेत.

ऑनलाइन शॉपिंग आणि डिजिटल व्यवहार

‘करोना’च्या काळामध्ये प्रत्यक्ष बाजारपेठेत जायची भीती वाटत असल्यामुळे किंवा त्यावर र्निबध असल्यामुळे अनेक जण आपल्या नेहमीच्या गरजेच्या वस्तू विकत घेण्यासाठी ऑनलाइन खरेदीकडे वळले. यामुळे भारतामध्ये गेली काही र्वष वाढत असलेलं ऑनलाइन खरेदीचं प्रमाण अधिकच मोठय़ा प्रमाणात वाढलं. मात्र या काळामध्ये दुसरीही एक रोचक घटना घडली. ‘करोना’च्या अगदी सुरुवातीच्या काळात, जेव्हा ऑनलाइन खरेदीच्या वितरणावरही र्निबध होते, तेव्हा अनेक सोसायटय़ांनी किंवा एकाच भागात राहाणाऱ्या अनेक नागरिकांनी आपापले व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स तयार केले आणि या ग्रुप्समधून एकत्र येऊन त्यांनी आपल्या जवळच्या किराणा मालाच्या दुकानदारापासून ते भाजीवाल्यापर्यंत अनेकांकडे एकत्रित मागणी नोंदवणं सुरू केलं. तसंच भाजीपाला विकणाऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांनीही आपल्या जवळच्या किंवा नेहमीच्या ग्राहकांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स तयार करून त्यांच्याकडून एकत्रित ऑर्डर घेऊन त्यांना घरपोच माल देण्याची सोय उपलब्ध करून दिली. ‘करोना’च्या काळात ज्यांच्या नोकऱ्या किंवा व्यवसाय बंद पडले होते अशा अनेक जणांनी खाद्य व्यवसाय किंवा काही घरगुती वस्तूंचे व्यवसाय नव्यानं सुरू केले. त्यांनीही मागणी नोंदवून घेण्यासाठी समाजमाध्यमं आणि व्हॉट्सअ‍ॅपवरच्या ‘कम्युनिटीज्’चा खूप मोठय़ा प्रमाणावर उपयोग करून घेतला. ‘ई-कॉमर्स’च्या बरोबरीनं उदयाला आलेले हे ‘लोकल कॉमर्स’ आणि ‘सोशल कॉमर्स’ नजीकच्या भविष्यात मोठय़ा प्रमाणावर वाढत जातील असं वाटत आहे. ई-कॉमर्स, लोकल कॉमर्स आणि सोशल कॉमर्स, या तिन्ही व्यवसाय पद्धतींमध्ये वाढ होते आहेच आणि तिन्ही प्रकारांमध्ये प्रचंड मोठय़ा प्रमाणावर डिजिटल व्यवहार आणि ‘डिजिटल पेमेंट्स’ केली जात आहेत.

डिजिटल साक्षरता आणि सुरक्षिततेची गरज

सध्याच्या बदललेल्या जगण्यात आपल्या आयुष्यातलं डिजिटल तंत्रज्ञानाचं स्थान आणि महत्त्व दोन्ही वाढतच जाणार आहे आणि याचबरोबर डिजिटल विश्वातल्या धोक्यांची तीव्रता आणि वारंवारिताही वाढत जाण्याची मोठी शक्यता आहे. ऑनलाइन फसवणूक, ‘क्यूआर कोड’द्वारे होणारी फसवणूक, ‘सायबर बुलिंग’, ‘गेमिंग’चं व्यसन, समाजमाध्यमांवरून केल्या जाणाऱ्या गलिच्छ टीकाटिपण्या आणि धमकावणं अर्थात ‘ट्रोलिंग’, ऑनलाइन अश्लील साहित्यातील वाढ, खंडणीखोरी, हे आणि असे अनंत प्रकारचे धोके आजही डिजिटल विश्वात आहेतच. येत्या काळात अनेक नवे धोके निर्माण व्हायची शक्यताही नाकारता येत नाही.

गेले वर्षभर सुरू असलेल्या ‘महामोहजाल’ या लेखमालेत आपण डिजिटल जग आणि समाजमाध्यमांवर असलेल्या अनेक धोक्यांविषयी चर्चा करत आलो आहोत. आगामी काळात डिजिटल साक्षरतेचा खूप मोठय़ा प्रमाणावर प्रचार आणि प्रसार करण्याची गरज असणार आहे. शाळकरी मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटांतल्या लोकांना डिजिटल विश्वातल्या धोक्यांविषयी आणि सुरक्षित वावराविषयी सततचं प्रशिक्षण देत राहाणारी एखादी व्यवस्था उभी करणं गरजेचं झालं आहे. ‘डिजिटल विश्वातली सुरक्षितता’ याचा समावेश शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमांमध्ये करणं, सर्व शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये डिजिटल सुरक्षितेविषयीचा सततचा प्रशिक्षण कार्यक्रम राबवणं, पालकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही तंत्रज्ञान साक्षरता आणि सुरक्षिततेसाठी स्वमदत गट उभे करणं अशा अनेक कायमस्वरूपी उपाययोजना करणं आवश्यक आहे. अर्थात, अनेक खासगी कंपन्या, स्वयंसेवी संस्था आणि संघटना यातले अनेक उपाय आणि प्रकल्प सध्या करतही आहेत. महाराष्ट्रातील ‘रिस्पॉन्सिबल नेटिझन्स’, दिल्लीची ‘सायबरपीस फाऊंडेशन’, केरळमधील ‘डिस्क फाऊंडेशन’ यांच्यासारख्या स्वयंसेवी संस्था अनेक र्वष सायबर सुरक्षिततेच्या क्षेत्रात नेटानं काम करत आहेत. अशा अधिकाधिक संस्था पुढे येणं आणि त्यांना आर्थिक पाठबळ उभं राहाणं, शासकीय व्यवस्थेतून सहकार्य मिळत राहाणंही गरजेचं आहे.

सरतेशेवटी

आपल्या आयुष्यात डिजिटल युगाची पहाट वगैरे झाली होतीच. त्या पहाटेतून निवांतपणे सकाळ होण्याऐवजी अचानक सूर्य डोक्यावरच आल्यासारखं झालं आहे २०२०च्या जागतिक संकटामुळे! या बदलाच्या झपाटय़ापुढे टिकून राहाणं, त्याचा आपल्या आयुष्यात सकारात्मक वापर करणं आणि त्यामध्ये असलेल्या ‘महामोहजाला’मध्ये न अडकणं हे सारं आपल्या हातात आहे. ‘महामोहजाल’ लेखमालेच्या सर्व वाचकांना नवीन वर्षांच्या आणि डिजिटल युगाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

(लेखक मुक्तस्रोत तंत्रज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रशिक्षक आणि वक्ते आहेत.)

(सदर समाप्त)