‘‘कधीतरी कातरवेळी राष्ट्रीय उद्यानात मी वाढवलेल्या प्राण्यांची आठवण येते. त्यांच्या सहवासात घालवलेले ते क्षण आजही मनाच्या कोपऱ्यात कायमचे कोरले गेलेत. मग ती जखमी घार असो, चितळ असो की बिबटय़ा; सगळ्याच प्राण्यांनी मला जे प्रेम दिलं, माया दिली ती शब्दातीत आहे..’’
 ‘पक्षी-प्राण्याशीही आपले ऋणानुबंध जुळतात, याचा प्रत्यय आलेल्या पशुवैद्य डॉ. विनया यांचे हे अनुभव येत्या जागतिक वन्य दिनानिमित्ताने.
शहापूरच्या जंगलात वनखात्याचे वनरक्षक गस्त घालत असताना त्यांना दोन बिबटय़ांची पिल्लं दिसली. अजून डोळेही उघडायचे होते त्यांचे! पिल्लं होती म्हणजे त्यांची आईही कुठेतरी आसपासच असणार या विचाराने ते सतर्क झाले. बराच वेळ तेथेच वाट पाहिली, मादी काही आलीच नाही. आईला शोधणारी त्यांची भिरभिरती नजर आणि तोंडातून कुई-कुई आवाज ऐकून त्यांची दया येत होती. जन्मत:च आईविना त्यांचं जंगलात असं फिरणं जंगली श्वापदांना आयतं सावज हाती देण्यासारखं होतं. वनरक्षकांनी ही गोष्ट वरिष्ठांना कळवली. त्यांनी किमान २४ तास या पिल्लांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. वनरक्षक २४ तास जंगलातच मुक्काम ठोकून बसले. २४ तासांनंतरही पिल्लांची आई त्यांच्याजवळ फिरकली नाही. तेव्हा त्या पिल्लांना बोरीवलीच्या राष्ट्रीय उद्यानात आणलं गेलं. मी त्यावेळी उद्यानाची पशुवैद्य अधिकारी होते.
 मी त्या पिल्लांकडे पाहिलं. एकाचं वजन तोळामासाच होतं, जेमतेम एखादकिलोच्या आसपास. करडय़ा रंगावर काळसर ठिपके, चमचमते, पाणीदार डोळे, पण त्यातून आईपासून दुरावल्याची केविलवाणी खंत मला स्पष्ट दिसत होती. दुसरं चांगलं गुबगुबीत होतं. मी हळूच त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. उत्स्फूर्तपणे आम्ही त्यांची नावं भीम आणि अर्जुन ठेवून बारसंही केलं. आता त्यांना आम्हीच मायेची ऊब देणार होतो. म्हणजे तसा प्रयत्न करणार होतो. म्हणून ऑफिसमध्येच एक खोली तयार केली.  त्यात दिवे लावले.
     जंगलात आई पिल्लांचा मागचा भाग जिभेने चाटते, त्यानंतर ही पिल्लं विष्ठा, लघवी करतात. हे माहीत असल्यानं ऑफिसचा कर्मचारी नामदेव झिरवेने कापसाचा एक बोळा कोमट पाण्यात बुडवला आणि पिल्लांच्या मागच्या भागावर हळुवार हाताने फिरवला. थोडय़ाच वेळात त्यांनी विष्ठा व लघवी केली. पिल्लांना एकदम तरतरी आली. आता त्यांना थोडय़ाच वेळात भूक लागेल म्हणून गाईचे दूध उकळवून थंड करून बाटलीत भरलं आणि बाटली त्यांच्या तोंडाला लावली. दोघेही बाटलीला लुचू लागली. दुग्धपान झाल्यावर दोन्ही बछडय़ांना झोपण्यासाठी मऊ बिछायत केलेलीच होती. त्यांच्यावर २४ तास लक्ष ठेवण्यासाठी वनरक्षकांनी आपापल्या डय़ुटी लावून घेतल्या. एवढं सगळं झाल्यावर रात्री नऊच्या दरम्यान घरी जाण्यासाठी निघाले तर, दोन्ही पिल्लं मांजरीच्या पिल्लांप्रमाणे पायात घुटमळू लागली. मला घरी जाऊ द्यायचं नव्हतं त्यांना. पुन्हा एकदा गोंजारलं आणि हळूच बाहेर पडले. माझ्या घरी माझं पिल्लू ‘नील’ वाट बघत होता ना? मला घरी आलेली बघून नील आवेगाने माझ्याकडे झेपावला. त्याला जवळ घेतलं. जवळपास ८-१० तासांनंतर आई भेटल्याचा त्याला कोण आनंद झाला होता म्हणून सांगू? मला भेटल्यावर नील निर्धास्तपणे माझ्या कुशीत विसावला होता, पण माझ्या डोळ्यासमोर सतत येत होते ते अनाथ बछडे.
 सुरुवातीला आम्ही त्यांना बाटलीनं दूध पाजत होतो. त्यानंतर हळूहळू चिकन सूप सुरू केलं. सकाळचं सूप पाजण्याचं काम नामदेव झिरवे करायचा. तो ऑफिसमध्ये आलेला त्यांना आतल्या खोलीत बरोबर कळायचं. दोघंही पायांनी दरवाजाला आतून ओरखडे मारणे सुरू करायचे. जणू ‘ओ झिरवेकाका, लवकर द्या सूप. आम्हाला भूक लागलीय.’ अशी भुणभुण करायचे. माझ्या गाडीचा आवाजही त्यांना बरोबर कळायचा. मी लांबवर असतानाच दोघेही खिडकीच्या गजांवर पुढच्या पायांचे पंजे टेकवून उभे राहायचे. तोंडातून ‘कुई कुई’ करायचे. ते ऐकलं की न राहवून ऑफिसच्या कामाची सुरुवात करण्याअगोदर मी त्यांच्या खोलीत जाऊन यायचे. मी दिसले रे दिसले की, दोघेही माझ्या अंगावर झेप घेण्याइतके धाडसी झाले होते. थोडं कुरवाळलं, लाड केले की मग शांत व्हायचे. मी म्हटलं, ‘भीम, अर्जुन खाली उतारा.’ की निमूटपणे उतरायचे. नंतर मी माझ्या कामाला लागायचे. बघता बघता हे दोन्ही बछडे कधी माझे मित्र झाले ते कळलेच नाही. ऑफिसला आल्याआल्या पाचदहा मिनिटं त्यांच्याशी खेळायचं हा नित्यक्रमच झाला होता.
  जंगली प्राण्यांना काही अपरिहार्य परिस्थितीत जंगलातून रेस्क्यू सेंटरला किंवा अनाथालयात आणावं लागतं. आज सर्वत्र वाढत चाललेल्या प्राणी व मानव संघर्षांमुळे हे प्रमाण कित्येक पटीने वाढले आहे. मुंबई व आजूबाजूच्या मानव व वन्यप्राणी यांच्यातील संघर्षांवर काम करताना मला याचा वारंवार अनुभव आला. मानव बिबटय़ा संघर्षांपासून तो मानव माकड संघर्षांवरही काम करायला मिळालं. बऱ्याचशा जंगली प्राण्यांना जवळून हाताळायला मिळालं. त्यांच्या मानसिकतेचं निरीक्षण करून त्यांचं भावविश्व समजून घेता आलं.     
एव्हाना, भीम आणि अर्जुन आमच्यात चांगलेच रुळले होते. पण सगळेच प्राणी काही असे रुळत नाहीत याचाही अनुभव घेतला. एकदा बोरिवलीला उद्यानाच्या जंगलात एक सांबराचं पिल्लू आईपासून भरकटलं. खूप शोध घेऊनही त्याची आई सापडली नाही. मग ते पिल्लू आमच्या मृगविहारात आणलं. वजन १४-१५ किलो असेल. तपकिरी रंग, निमुळते पाय, डोळयातील भाव काहीतरी हरवल्याचे, तोंडाने करुण आवाज काढत ओरडत होतं. आपल्या आईला हाक मारत होतं. त्याला आम्ही दूध पाजायचा, जवळ घ्यायचा खूप प्रयत्न केला, पण  शेवटपर्यंत ते पिल्लू आपल्या आईला विसरू शकलं नाही. पाचव्या दिवशी त्याची नजर शून्यात हरवली ती कायमीच..
वयाने लहान असलेली पिल्लं बऱ्याचदा पटकन रुळतात. पण मोठय़ा वयाच्या जंगलात भरकटलेल्या प्राण्यांना मात्र पकडलं की त्यांना मोठा मानसिक धक्का बसतो. मला आठवतं, आम्ही एक जखमी बिबटय़ा डहाणूच्या जंगलात पकडला होता. जखमी असल्यानं त्याला जंगलात सोडता येत नव्हतं. त्याला समोर कोणी माणूस आलेलाही सहन व्हायचा नाही. डरकाळी फोडून सरळ पिंजऱ्यातून तो लोकांच्या अंगावर धावायचा. गुरगुरण्याच्या नादात त्याला मधल्या गजांचं भानच नसायचं. या धडपडीत तो स्वतला जखमी करून घ्यायचा. हळूहळू त्याच्या लक्षात यायला लागलं की आता या परिस्थितीतून आपली सुटका होणार नाही. मग तो खिन्न होऊन पुढच्या दोन पायात आपली मान खुपसून बसायचा. इतका निराश व्हायचा, की, जिवंत कोंबडी समोर टाकली तरी तिच्याकडे ढुंकूनही बघायचा नाही. आम्ही त्याच्या पिंजऱ्याकडे कोणालाच जाऊ द्यायचो नाही. मोजकी माणसंच तिकडे जाऊ शकत होती. पण एकेदिवशी आमच्या मेहनतीला फळ आलं. हळूहळू तो सावरला. त्याच्या जखमाही बऱ्या झाल्या. पिंजऱ्यात रुळू लागला. मात्र, शेवटपर्यंत त्याचा जातिवंत िहस्रपणा काही कमी झाला नाही.
संक्रांतीच्या काळात कितीतरी जखमी घारी, कबूतरे उद्यानात उपचारासाठी आणले जायचे. धारदार मांज्याने त्यांना प्राणांतिक जखमा झालेल्या असायच्या. एकदा एक अशीच जखमी घार उद्यानात कोणीतरी आणली. तिचा उजवा पंखच फाटला होता. बराच रक्तस्त्राव झाल्याने मलूल झाली होती ती. तिला सर्वप्रथम ग्लुकोजचं पाणी पाजलं. त्यामुळे तिला थोडी तरतरी आली. आम्ही हळुवारपणे तिच्या पंखाला टाके घातले. चोचीतून औषधं पाजली. रोज तिला चिकन आणि बीफचं सूप पाजायचो. आमचे प्रयत्न सार्थकी लागले. एक दिवस तिला पिंजऱ्यातून बाहेर काढले. आता तिच्या जखमा व्यवस्थित बऱ्या झाल्या होत्या. आता मोकळा श्वास घेण्याची गरज असल्यामुळे तिला जंगलात सोडण्यासाठी आम्ही तुळशी तलावाच्या परिसरात गेलो. पिंजऱ्यातून तिला बाहेर काढलं आणि हवेत सोडलं. स्वच्छंद जीवनाची सवय असलेली ही घार थोडीशी उडाली, पण पुन्हा आमच्या जवळजवळ येऊ लागली. आम्ही तिला उडवण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा ती आमच्याजवळच येऊन थांबायची. मला थोडं विचित्र वाटलं. कोणताही पक्षी जंगलात सोडल्यासोडल्या ताबडतोब निघून जातो, असा माझा आजवरचा अनुभव होता, पण ही घार काही केल्या जायला तयारच नव्हती. पण पुन्हा तिला पिंजऱ्यात घेणंही योग्य नव्हतं. त्यामुळे आम्ही तेथून निघालो. थोडा वेळ चुकल्या चुकल्यासारखं वाटत राहिलं. दुसऱ्या दिवशी का कोण जाणे, माझी पावलं पुन्हा ‘मृगविहारा’कडं वळली. तेथे उंच तारेवर बसलेली तीच घार मला दिसली. पंखावरच्या जखमेच्या व्रणामुळे लगेच ओळखू आली. आमचा मृगविहाराचा पाणीरक्षक भोईर म्हणाला, ‘ती घार आज सकाळीच आली.’ मी तिला जवळ बोलवून बीफचे तुकडे टाकले तर लगेच आणखी जवळ आली. त्यानंतर बरेच दिवस ती मृगविहारातच राहत होती. हळूहळू दिसेनाशी झाली. मनात म्हटलं, ‘‘बरं झालं जंगलात आपल्या सहकाऱ्यांमध्ये रुळली असेल.’’
जंगली प्राण्यांना समजून घेणं. त्यांचे आजार ओळखून त्यांच्यावर उपचार करणं खूपच आव्हानात्मक असतं. त्यात माणसाच्या वाऱ्यालाही उभ्या न राहणाऱ्या वन्य प्राण्यांच्या उपचाराचं आव्हान अधिकच कठीण असतं. एकदा जंगलातल्या जखमी चितळावर उपाचार करण्याचा मला निरोप मिळाला. मी आणि माझे सहकारी मुकेश मोरे, नामदेव झिरवे आणि राजा भोईर त्या ठिकाणी गेलो. चितळांचा कळप जवळच गवताच्या माळावर चरत होता. एक नर चितळ मात्र बाजूला विमनस्क मनस्थितीत उभा होता. त्याच्या पोटाला मोठी जखम झालेली दिसत होती. आम्ही त्याच्याजवळ जायला लागलो तर तो अधिकच वेगाने दूर पळायला लागला. मग आम्ही एका झाडाखाली थांबलो. उपचारासाठी त्याला बेशुद्ध करणं आवश्यक होतं. मग आम्ही चितळांना बेशुद्ध करायची बंदूक काढली. एका झाडाच्या मागे थांबून तो थोडा जवळ येण्याची प्रतीक्षा करू लागलो. दिसल्याबरोबर बंदुकीचा चाप ओढला. सीिरज बरोबर त्याच्या स्नायूंमध्ये घुसली. हे दृश्य पाहताच बाकीचा कळप चौखूर उधळला. बघताबघता हा चितळ हातपाय झाडू लागला आणि थोडय़ाच वेळात खाली पडून बेशुद्ध झाला. आम्ही पाहिलं तर त्याच्या पोटावर एक मोठ्ठं गळू झालं होतं. तो ब्लेडने फोडल्याबरोबर त्यातून पू बाहेर आला. पूर्ण जखम साफ केली, औषध लावलं. प्रतिजैविकाचं इंजेक्शन दिलं. मग तो पुन्हा शुद्धीवर यायचं इंजेक्शन दिलं. एक दोन तास तो पूर्ण शुद्धीवर येइपर्यंत आम्ही तेथे जंगलातच थांबलो. हळूहळू तो शुद्धीवर आला. इकडे तिकडे पाहिलं. आम्हाला बघताच तो वेगाने पळत जाऊन आपल्या कळपात सामील झाला. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा त्याला शोधत जंगलात गेलो तर तोच चितळांचा कळप दिसला. आमचा कालचा रुग्ण लांबूनच आम्ही ओळखला. त्याने कान टवकारून आमच्याकडे पाहिलं. मी लांबूनच दुर्बिणीने त्याच्या जखमेचं निरीक्षण केलं. जखम चांगलीच सुकली होती. आता पुन्हा उपचार करायची गरज नव्हती. म्हणून आम्ही तेथून परतलो. बऱ्याच दिवसांनंतर एकदा अचानक जंगलातून जाताना एक चितळ बराच वेळ आमच्याकडे रोखून बघताना दिसला. मला आश्चर्य वाटलं. हा असा का बघतोय असा विचार करतच होते तर त्याच्या पोटाकडे लक्ष गेलं. त्यावर जखमेचे व्रण दिसले. आणि मी त्याच्याकडे बघून ओळखीचं हसले. मी त्याला विसरले होते, पण तो आम्हाला विसरला नव्हता. त्यावेळी मला जो आनंद आणि त्याला बरं केल्याचं जे आत्मिक समाधान मिळालं ते शब्दात वर्णन करता येण्यापलीकडलं होतं.
    माझी आता बोरिवलीच्या उद्यानातून रत्नागिरी जिल्ह्य़ात बदली झाली आहे. मी मध्यंतरी उद्यानातल्या माझ्या जुन्या सहकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. बिबटय़ांच्या पिंजऱ्याजवळून जाताना दोन मोठे बिबटे दिसले. मला पाहताक्षणी लाडात जवळ आले. पिंजऱ्याच्या जाळीला अंग घासू लागले. जाळीजवळ येऊन लोळण घेऊ लागले. वनरक्षक  संजय पगारे आणि मुकेश मोरे मला मिश्कीलपाणे म्हणाले, ‘मॅडम ओळखलं, आपले भीम आणि अर्जून आहेत ते.’ आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहतच राहिले. एवढे मोठे झाले तरी माझ्याकडून लाड करून घेण्याची त्यांची जुनी सवय दोघही विसरले नव्हते. मी जाळीतून हात घालून त्यांच्या डोक्यावरून लडिवाळपणे हात फिरवला. त्यांनी आपलं अंग माझ्या हाताला घासलं. जणू काही सांगत होते, ‘आम्ही ओळखलं हं तुला’. कोणीतरी त्यांची आई हिरावून घेतल्यामुळे त्यांना आज या पिंजऱ्यात जीवन कंठावं लागत होतं. शिकार कशी करावी याचं शिक्षण नसल्यामुळे त्यांना पुन्हा जंगलातही सोडता येणार नव्हतं या विचारानं गलबलून आलं. खरं सांगायचं तर तेथून पाय निघत नव्हता. भीम आणि अर्जुनचा माझा ‘सरकारी’ संबंध आता संपला होता, पण आमचा भावनिक संबंध कोणीच संपवू शकणार नव्हतं. कधीतरी कातरवेळी राष्ट्रीय उद्यानात मी वाढवलेल्या प्राण्यांची मला आठवण येते. त्यांच्या सहवासात घालवलेले क्षण, त्यातून मनावर कायम कोरल्या गेलेल्या त्यांच्या आठवणींचे स्मरण होते तेव्हा त्यांच्या मूक भावनांशी जुळलेले भावबंध मनाच्या एका कुपीत मी साठवले आहेत. त्यांच्या सहवासातील सुंदर, सुंदर आठवणींनी आजही मी पुलकित होते, दिवसाचे काही क्षण सुगंधित होतात. त्यात रमत असतानाच एकदम भानावर येते तेव्हा डय़ुटीची वेळ झालेली असते. आणि आपोआप पावलं वळतात दवाखान्याकडे नव्या सवंगडय़ाच्या उपचारासाठी.