19 September 2020

News Flash

प्रत्येक जीव मोलाचा

नुकत्याच झालेल्या आत्महत्या प्रतिबंधक दिवसाच्या निमित्तानं एका आत्महत्याप्रवृत्त व्यक्तीस हे अनावृत्त पत्र-

प्रत्येक आत्महत्या हा एक असा अपघात असतो- जो फक्त माणसाचा जीव घेत नाही, तर संपूर्ण कुटुंब व्यवस्थेवर आघात करतो.

मृणालिनी ओक

१० सप्टेंबर हा ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस’ म्हणून पाळला जातो. दर ४० सेकंदाला जगभरात कुणी ना कुणी आत्महत्या करतं. ही आत्महत्या टाळायची असेल तर सगळ्यांनी काही गोष्टींचं भान ठेवायला हवंच आणि ज्यांच्या मनात असे आत्महत्याप्रवण विचार येतात त्यांनी मदतीच्या हाताचा स्वीकार करायला हवा.

प्रत्येक आत्महत्या हा एक असा अपघात असतो- जो फक्त माणसाचा जीव घेत नाही, तर संपूर्ण कुटुंब व्यवस्थेवर आघात करतो. यात मृत्यूचा मार्ग एकच व्यक्ती स्वेच्छेनं निवडत असली तरी बळी  मात्र सबंध कुटुंबाचा जातो. १० सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस’ म्हणून पाळला जातो. ‘आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध संघटना’ आणि ‘जागतिक आरोग्य संघटना’ (डब्ल्यूएचओ) यांच्या संयुक्त विद्यमाने पाळल्या जाणाऱ्या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसाचं ब्रीदवाक्य ‘एकत्र येऊन आत्महत्या थांबवूया’ असं आहे. ‘डब्ल्यूएचओ’च्या माहितीनुसार अंदाजे आठ लाख व्यक्ती दरवर्षी आत्महत्येचा मार्ग निवडतात. याचा अर्थ दर ४० सेकंदांना जगात कुणी तरी आत्महत्येचा मार्ग निवडतं.  या वर्षी ‘करोना’सारख्या साथीच्या रोगामुळे संबंध जगावर चिंतेचं सावट पसरलेलं असतानाच आत्महत्येसारख्या सामाजिक प्राधान्य असलेल्या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या प्रश्नाचं आव्हान ओळखून त्यावर मात करण्यासाठी मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक, संस्था, शाळा व महाविद्यालयं, शिक्षक, प्राध्यापक, पालक, पोलिस यंत्रणा, प्रसारमाध्यमं यांच्यात सहयोग आणि सहकार्य असणं महत्त्वाचं आहे.

‘समारिटन्स मुंबई’ ही आमची स्वयंसेवी संस्था आत्महत्या प्रतिबंधासाठीच्या कार्यात तत्पर आहे. सध्याच्या ‘करोना’काळात आम्ही ‘रिमोट टेलीबीफ्रेंडिंग’ करतो. रोज सायंकाळी ५ ते ८ या वेळात आमची हेल्पलाइन सुरू असते. त्याचप्रमाणे हताश, निराश आणि आत्महत्याप्रवृत्त व्यक्तींसाठी आमची ई-मेल सेवाही २४ तास उपलब्ध आहे. ‘करोना’च्या संकटकाळात या दोन्ही माध्यमांद्वारे संपर्क करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. या पाश्र्वभूमीवर नुकत्याच झालेल्या आत्महत्या प्रतिबंधक दिवसाच्या निमित्तानं एका आत्महत्याप्रवृत्त व्यक्तीस हे अनावृत्त पत्र-

आत्महत्येचा विचार करणाऱ्या तुला..

 प्रिय,

आपली काही ओळख नसताना अशी हाक ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना? मित्र किंवा मैत्रीण अशी व्यक्ती असते जिच्याशी आपलं दीर्घकाळापासून प्रेमाचं किंवा जिव्हाळ्याचं नातं असतं. आपला तसा  परिचय नसताना मी अशी परिचयाची हाक मारली आहे. आज तुझ्याशी मोकळेपणानं बोलायचं ठरवलं आहे. नव्हे, तुला जे काही सांगायचं आहे ते मोकळ्या मनानं ऐकायचं ठरवलं आहे.

तुझा ई-मेल वाचला. तुझं म्हणणं आहे की तुला मरायचं आहे, कारण तुला जगण्याचं काही कारण दिसत नाही. माझ्या मनात हा विचार आला की असं काय घडलं असावं, की तू हा टोकाचा निर्णय घ्यावास? मला सांग, तुझा निर्णय पक्का आहे का? त्या दृष्टीनं तू काही वाटचाल केली आहेस का? घाबरू नकोस, तू सांगितलेलं सगळं माझ्याजवळ गुपित राहील. तू सांगितलेल्या गोष्टींचा मी न्यायनिवाडा करणार नाही यावर विश्वास ठेव. मला तुझ्या भावनांचा आदर आहे आणि तुला वाटण्याऱ्या तीव्र भावनांची कारणं जरी मला माहीत नसली, तरी तुला तसं वाटू शकतं, हे मी समजू शकते. मला जाणीव आहे, की तुझ्या मनामध्ये विचारांचं काहूर उठलं असेल आणि भावनांचा गुंता इतका वाढला असेल की काहीच सुचेनासं झालं असेल. या भोवऱ्यात तुला तुझ्याच मनाचा थांगपत्ता लागत नाहीये ना? असं वाटतंय, तुझ्या आत्मविश्वासाला तडा गेला आहे आणि स्वत:च्या क्षमतेवरचा तुझा विश्वास उडाला आहे.

मला सांगशील आतापर्यंतचा हा कठीण प्रवास तू कसा केलास? कसं सोसलंस हे सर्व? जे काही वाटत होतं या दरम्यान, ते कुणाला सांगून पाहिलंस? काय-काय विचार मनात आले तेव्हा आणि नक्की कुठल्या क्षणी हे जाणवलं की आता बास झालं? जगण्याची उमेद तुझ्या मनातून कधी नाहीशी झाली? कसं असतं ना, शरीरावरचे घाव पटकन लक्षात येतात. त्याबद्दल सहानुभूती पण आपण सहज मिळवतो. परंतु मानसिक यातना या बऱ्याचदा अदृश्य असतात. या यातनांची सुरुवात नक्की कधी आणि कशी झाली हे आज आणि आत्ता सांगताना तुला अधिक त्रासाचं (किंवा नकोसं) वाटत असेल. पण माझ्याजवळ मन मोकळं करशील? मी असेन तुझ्यासोबत. या कठीण प्रसंगी तू स्वत:ला एकटं नको समजू. मी आहे तुला साथ द्यायला.

तू म्हणशील की मला सांगून काय उपयोग? मला सांगितल्यामुळे तुझ्या समस्यांचा अंत होणार आहे का? मन मोकळं केल्यानं तुझ्या मनातलं द्वंद्व नाहीसं होणार आहे का? तर निश्चितच त्याची खात्री देता येणार नाही मला. परंतु प्रिय, तुला मी आश्वासन देत आहे की तुझं म्हणणं मी अतिशय गांभीर्यानं घेणार आहे. कोणतेही पूर्वग्रह मनात न बाळगता ऐकणार आहे मी तुला. तू स्वत:ला गुन्हेगार किंवा दोषी मानत असो वा नको, मी तुझ्याकडे साशंक नजरेनं बघणार नाही आणि तुझ्या विचारांचा पूर्ण स्वीकार करीन. तुला जरी वाटत असलं की तुला जे वाटतंय ते समजण्याजोगं नाही, तरी मी ते समजून घेण्याचा मात्र पूर्ण प्रयत्न करणार आहे. आपण एकत्र तुझ्या मनातले चोरकप्पे हळूहळू उघडून बघू या. विस्कटलेल्या घडय़ा नीट करू या.

हे बघ, कोणताही सल्ला मी तुला अजिबात देणार नाहीये याची खात्री बाळग. तुला आज जर संधी मिळाली हे जाणून घ्यायची, की तुला नक्की कशामुळे उदास आणि हताश वाटतंय, तर तू ही संधी घेशील? आज तुलाच स्वत:च्या प्रश्नांना वेगळी उत्तरं सापडतात का हे आपण बघू या? स्वत:बद्दल अशा प्रकारे विचार करण्याची संधी स्वत:ला देशील? मला पूर्ण विश्वास आहे की तू योग्य निर्णय घेण्याचं सामथ्र्य बाळगून आहेस, आत्ता जरी तुला तसं वाटत नसलं तरी.

आणि खरं सांगू? मैत्रीची व्याख्या अशीच असावी, नाही का? मी हळुवारपणानं तुझ्या आंतरिक विश्वात शिरेन पण तुझ्यावर अधिकार गाजवणार नाही. मला तुझा दृष्टिकोन पटो अथवा न पटो, मी तो हळूहळू समजून घेण्याचा जरूर प्रयत्न करीन. आणि तुझ्या हातून चूक जरी घडली असलीच, तरी मी तुला गुन्हेगार मानणार नाही. कारण मी इथे आहेच मुळी तुझी बाजू समजून घ्यायला. मला प्रामाणिकपणे वाटतं, तुला तुझ्या आयुष्यातील सर्व निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि मला तुझ्या या क्षमतेबद्दल आदर आणि विश्वास आहे.

याबद्दल तुला काय वाटतं हे ऐकायला आम्हाला आवडेल. मला तू लिहीच. वेळ दडवू नकोस. आम्ही वाट पहातोय.

 कळावे,

 

टीम समारिटन्स

talk2samaritans@gmail.com

हेल्पलाइन वेळा: दररोज सायंकाळी ५ ते ८

हेल्पलाइन क्रमांक –

८४२२९८४५२८/ २९/ ३०

नैराश्याची लक्षणं असण्याऱ्या व्यक्तींबरोबर काय बोलावं?

 •   तू एकटा/एकटी नाहीस.
 •   तुझं माझ्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे.
 •   तुझ्या जवळ कुणी असावं/ तुला कुणी मिठी मारावी असं वाटतंय का?
 •   तुला वेड लागलेलं नाहीये.
 •   या तीव्र भावना जेव्हा ओसरतील, तू इथेच असशील आणि मीसुद्धा.
 •   तुला काय होतंय मला कळत नाहीये,
 • पण समानुभूती मनात बाळगून मी तुझं ऐकणार आहे.
 •   मी इथेच आहे आणि तुला या अवस्थेत एकटं सोडणार नाहीये.
 •   तुझ्या प्रतिसादानं मी दु:खी होईन याची तू काळजी करू नकोस.
 •   तुझी ही अवस्था तुला किती क्लेशदायक आहे हे कळतंय मला.

काय बोलू नये?

 •   जगात आणखी खूप माणसं आहेत तुझ्याहून दु:खी.
 •   आयुष्य असंच असतं. सगळं नेहमी मनासारखं कसं होणार?
 •   तुला एवढं कशाचं वाईट वाटतंय?
 •   तू कायम काय रडत असतेस/असतोस?
 •   बदल हा दु:खी चेहरा!
 •   तुझंच चुकलं असेल/आहे.
 •   मला माहीत आहे तुला कसं वाटतंय.
 • मी पण मागे हे अनुभवलंय.
 •   तुझ्यामुळे सगळ्यांच्या आनंदावर विरजण पडतंय.
 •   जरा बाहेर पड. योगाचा क्लास वगैरे कर. तुला बरं वाटेल.
 •   तू चहा-कॉफी सोड. फक्त ‘हर्बल टी’ घेत जा.

(लेखिका ‘समारिटन्स’ संस्थेच्या स्वयंसेविका आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2020 5:51 am

Web Title: each life is important dd70
Next Stories
1 आम्ही शिक्षक!
2 शिक्षक घडवणाऱ्या ‘शाळा’
3 बालशिक्षकांचं विद्यामंदिर!
Just Now!
X