आफ्रिकेतील देशांमध्ये सध्या इबोला विषाणूमुळे पसरलेली साथ हा आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचा विषय ठरतो आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या साथीला आरोग्य आणीबाणी असल्याचे जाहीर केले आहे. या आजाराशी लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय यांविषयी..
आफ्रिका खंडाच्या पश्चिमेकडील ५ देशांत गिनी, लायबेरिया, सिआरो, स्किऑन, नायजेरिया आणि सेनेगल येथे सध्या ‘इबोला’(EBULA)  या आपल्याकडे अपरिचित असलेल्या विषाणूजन्य (viral)   आजाराच्या साथीने थैमान घातले आहे. सध्या (२०१४ ची साथ) ५००० लोकांना लागण झाली असून २४०० रुग्ण दगावले आहेत. त्यांपैकी अनेक जण रुग्णालयांमध्ये काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस व इतर कर्मचारी आहेत. हा विषाणू प्रथम १९७६ मध्ये सुदान व कांगो भागातील इबोला नदीकाठी सापडला म्हणून हे नाव पडले. या विषाणूसदृश दुसरा एक आजार मारबर्ग आफ्रिकेत याच भागात प्रचलित होताच. इबोलाचे हे विषाणू ‘फ्रुट वटवाघुळे’ या प्राण्यात कोणतीही आजाराची लक्षणे न दिसता वास्तव्य करतात व त्यांच्या विष्ठेतून जमिनीवर पडतात. चिंपाझी व इतर माकडे आदी प्राण्यांमध्ये प्रवेश करतात. त्यांचा माणसाशी संपर्क आला की मनुष्याला त्याची लागण होते. एका माणसामधून दुसऱ्याला लागण होण्याची माध्यमे म्हणजे रक्त किंवा रक्तघटक, वीर्य, विष्ठा. चांगली गोष्ट म्हणजे याचा प्रसार हवा, श्वास व डास आदींतून होत नाही, त्यामुळे साथ झपाटय़ाने पसरत नाही व ती आटोक्यात आणणे शक्य आहे. परंतु लागण त्या मानाने संथ तरीही सातत्यपूर्ण पद्धतीने पसरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या(World Health Organisation WHO)  अंदाजानुसार लवकरच २०,००० लोकांना संसर्ग होईल व नंतर साथीचा जोर ओसरेल. मात्र संसर्गबाधित रुग्णांपैकी ५० ते ९० टक्के (संसर्गाच्या तीव्रतेनुसार) लोक दगावतात ही भयानकता लक्षात घेतली तर स्थिती किती गंभीर आहे हे जाणवते.
इबोला विषाणूंचे ५ प्रकार असून त्यातील ४ प्रकार माणसात ‘इबोला विषाणू आजार’ इथवा ‘इबोला हिमोरेजिक तत्त्व’ हे आजार आफ्रिकेतील रुग्णांना जबाबदार आहेत, तर ५ वा प्रकार आशियातील माकडे व उंदीरसदृश प्राण्यात आढळले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास व गतिमान जीवन यांमुळे हा आजार (किंवा डेंग्यू, स्वाइन फ्ल्यू आदी.) सर्वदूर, सर्व खंडांत पसरू शकतो ही भीती आहे आणि म्हणून तो आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे व WHO मान्यवर मातब्बर संस्था रात्रंदिन युद्धपातळीवर दक्ष व कार्यरत आहेत.
इबोलाचा जंतू शरीरात शिरला की २ ते १० दिवसांत (सर्वसाधारणपणे ७ ते १४ दिवस) प्राथमिक लक्षणे दिसू लागतात. ती इतर सर्वसाधारण विषाणूजन्य आजारासारखीच असतात. उदा.- ताप, डोकेदुखी, अशक्तपणा, उलटय़ा, जुलाब, पोटदुखी, सांधेदुखी, सर्दी, खोकला इ. सर्वसाधारणपणे ५० टक्के रुग्णांमध्ये अंगावर पुरळ येते. कित्येकदा त्यांचे मोठय़ा फोडात रूपांतर होते व त्यात रक्त पाझरते (रक्ताळलेले फोड) रक्तस्राव- बाह्य़ व अंतर्गत हे या आजाराचे भयानक वैशिष्टय़ आहे. उदा. त्वचेखाली रक्ताळलेले पुरळ, नाका-तोंडातून, लघवी, शौचावाटे रक्तस्राव, यकृत, मूत्रपिंडे, आतडे यांतून रक्तस्राव वा सूज व ती निकामी होणे आदी मेंदूत रक्तस्राव झाल्यास बेशुद्धी, झटके आदी होऊ शकते. तसेच उलटय़ा, जुलाब, अतिरक्तस्रावाने रक्तदाब कमी किंवा अगदी शून्य होऊन मृत्यू संभवतो.
या आजाराची लक्षणे ही इतर असल्याने (उदा. हिवताप, टॉयफॉइड, डेंग्यू, फ्लू, स्वाइन फ्ल्यू, न्यूमोनिया, कावीळ, इ. इ.) रोगनिदान करणे जिकिरीचे ठरते. म्हणून थोडी जरी शंका आली, उदा. वर वर्णन केलेली लक्षणे दिसली किंवा पश्चिम आफ्रिकेत अलीकडे प्रवास झाला असेल तर पुढील तपासण्या आवश्यक आहेत. एलायझा (ELISA) rna-pcr किंवा  viral culture आजारानंतर दोन आठवडय़ांनी प्रतिपिंड चाचणी उपयुक्त ठरते. (Antibody testing) परंतु लवकरच्या अवस्थेत रोगनिदानासाठी ती उपयुक्त ठरत नाही.
प्रतिबंधात्मक उपाय –
१. सध्या पश्चिम आफ्रिकी देशांत प्रवास टाळणे.
२. संशयित किंवा सिद्ध झालेल्या व्यक्तीचा संपर्क टाळणे.
३. संशयित व सिद्ध झालेल्या रुग्णांना उपचार करताना सर्व संबंधित व्यक्तींनी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी अतिदक्षतेचा  Z- Kit   असा पोषाख वापरणे. तसेच रुग्णांचे रक्त, मूत्र इ. तपासण्या करणाऱ्या प्रयोगशाळेतील लोकांनी १०० टक्के अतिदक्षता सांभाळणे.
४. मृत व्यक्ती/ प्राणी यांच्यातूनही संसर्ग उद्भवत असल्याने त्यांना स्पर्श करताना वरील काळजी घेणे, दफन-दहन दक्षतापूर्वक करणे.
५. इतके सर्व जरी पाळले तरी रुग्णाला हात लावण्यापूर्वी व नंतर साबणाने पाण्याखाली किमान ५ मिनिटे हात धुणे व र्निजतुकीकरणाचे द्राव (disinfectants) वापरणे. (हस्तांदोलनाऐवजी नमस्ते करणे.)
६. प्रत्येक संशयित रुग्णाची माहिती सरकारी यंत्रणेला नोंदीसाठी व खबरदारीसाठी कळविणे.
७. सरकारी व खासगी वैद्यकीय आस्थापनांनी सजग व दक्ष राहणे व तत्परतेने खबरदारीचे उपाय अमलात आणणे.
उपाययोजना –
सध्या तरी कोणतीही खात्रीशीर उपाययोजना नाही. सलाईन, रक्त, प्लेटलेट्स इ. जरुरीप्रमाणे देणे, प्राणवायू, कृत्रिम श्वास इ. तसेच डायलिसिस हेही सपोर्टिव्ह उपाय म्हणून द्यावे लागते.
monoclonal antibodies  चा कदाचित उपयोग होत असावा, अशी द्रव्ये वनस्पतींच्या साह्य़ाने तयार करून ZMapp   हे औषध प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यास एफडीए व WHO ने परवानगी दिली आहे. ते काही प्रमाणात उपयुक्त ठरत आहे; परंतु शास्त्रीय कसोटय़ांवर ते सिद्ध होणे बाकी आहे. तसेच TKM-Ebola  हे RNA-Interference औषध असून त्याच्या चाचण्या सुरू आहेत.
प्रतिबंधक लस – याच वर्षी ३० ऑगस्ट रोजी इंग्लंडमधील ग्लेक्सो-स्मिथक्लाइत (GSK) ने इबोलाविरुद्धची लस ६ महिन्यांत मानवी वापराकरिता उपलब्ध होईल असे जाहीर केले आहे. ती भविष्यवाणी खरी ठरेल अशी आशा करू या!
वैद्यकशास्त्राचा इतिहास पाहता जंतू व प्राणीजीवन यांचा संघर्ष सतत चालूच आहे. पेनिसिलीनचा शोध १९४०च्या सुमारास लागण्याआधी जंतुसंसर्ग, न्यूमोनिया, घटसर्प आदी  सांसर्गिक आजारांनी माणसे दगावत. देवी, कांजिण्या, विषमज्वर इत्यादींवर प्रभावी लसी होत्या. सिफिलिस हा आजार लैंगिक संबंधांतून उद्भवे व त्यानेही नरसंहार केला. आता तो परिणामकारकरीत्या प्रतिबंधित करता येतो व औषधांनी बरा होतो. १९८०-९० या दशकात एड्स उद्भवला व त्याचा प्रपात कधी होतोय असे वाटतानाच इबोला हा त्यामानाने अनिश्चित आजार भस्मासुर म्हणून उदयास येतोय..
उत्तम आरोग्यसंवर्धन, सार्वजनिक स्वच्छता व डोळसपणे अन्नभक्षण यांनी रोगप्रतिबंध जोपासणे हेच फार महत्त्वाचे. त्यातूनच नवीन-नवीन आजारांचीसुद्धा कवचकुंडले आपल्यास मिळतील!