07 August 2020

News Flash

कुठेतरी बी रुजतंच रुजतं!

आमच्या प्रौढ शिक्षणाचा आणि अनौपचारिक शिक्षणाचा त्यांना काय फायदा झाला असेल तर पाच-सहा वर्षांनी एक मुलगी भेटली. तिचं लग्न झालं होतं. कडेवर वर्ष-दोन वर्षांचं मूल

| June 6, 2015 01:01 am

ch15आमच्या प्रौढ शिक्षणाचा आणि अनौपचारिक शिक्षणाचा त्यांना काय फायदा झाला असेल तर पाच-सहा वर्षांनी एक मुलगी भेटली. तिचं लग्न झालं होतं. कडेवर वर्ष-दोन वर्षांचं मूल होतं. ती सांगत होती, ‘बाई तुम्ही शिकविल्याली गानी मी याला म्हनून दाखवते. आन कामं का करायला लागंनात मी याला शिकिवनार म्हंजी शिकिवनारच. हे बघा येक पुस्तकबी म्या इकत आनलं याच्यासाठी.’
वस्तीतल्या बाया जशी पदोपदी आमची परीक्षा घ्यायच्या तसं मुलं करायची नाहीत. मुलांचा विश्वास मिळवायला फार वेळ लागला नाही. कचरा वेचणाऱ्या एका मुलानं एक पाटीचा फुटका तुकडा आणि पेन्सिलीचा छोटा तुकडा आणला आणि ऐटीत म्हणाला, ‘आता शिकवा बाई!’ तेव्हा डोळय़ांत पाणीच आलं.
एकदा एका मुलीने कचऱ्यातला कोरा कागद सारखा केला आणि त्यावर खूप छोटे-छोटे आकार ओळीनं काढले. सगळं पान भरलं होतं आणि ते मला दाखवून म्हणाली, ‘बाई, बगा की वं म्या कसं काडलंय! पुस्तकात बी आसंच किडं किडं असत्यात का न्हाई?’ अक्षरांना ती किडे किडे म्हणत होती! मला तिची दृष्टी समजली होती. ‘माझी वेणी आज तुम्हीच घालून द्या,’ असा हट्ट मुली करायच्या. आम्ही निघालो की बसस्टॉपपर्यंत पोचवायला यायच्या. रेडिओवर कधी माझा आवाज ऐकला की सगळी फौज घरी यायची आणि सांगायची, ‘आज तुमचा आवाज ऐकून का न्हाई, तुमाला लई बगूशी वाटलं म्हणून आलो चालत चालत.’ वर मला ‘बाई, तुमचं घर बी तुमच्यावानीच सादंभोळं हाय.’ असं प्रशस्तिपत्रक मिळायचं.
गप्पा तर अनेक विषयांवर चालत. सगळी मुलं भोवती जमली की बाईंच्या मांडीवर बसणंच बाकी राहायचं, इतकी चिकटून बसायची. मग त्यावरून भांडणंपण व्हायची. कित्येक झोपडय़ांना दारं नसायची. मग मुलांना घर राखायला ठेवून आया कामाला जायच्या. एकदा एका मुलाने मला विचारले, ‘तुमचा पोरगा का न्हाई आला आज?’ मी म्हटलं, ‘त्याला घर राखायला ठेवून आले.’ तर तो अविश्वासानं माझ्याकडे पाहत म्हणाला, ‘तुमचा तर बंगला आसंल की बाई! पोरगा कशानं घर राखील तुमचं?’ उगाच चेष्टा केली असं मला झालं!
घरकाम करणाऱ्या पोरीबाळी सांगायच्या, ‘बाई आमच्याकडं कुणी आलं तर आम्ही म्हनताव, जेवल्याबिगर जाऊ नगा. आन तुमच्यासारख्याकडं कुणी गेलं तर तुमी नुसता च्याच शिजवून घालत्याल.’ यावर आम्ही बोलणार तरी काय?
आमच्याकडे खूप मुलं-मुली शिकायला यायच्या. वस्तीत बसायला जागा नव्हती. मग आम्ही जवळच्या एका मोकळ्या मदानात झाडाखाली जाऊन बसायचो. कागद वेचणाऱ्या मुली, घरकाम करणाऱ्या मुली, हॉटेलमध्ये काम करणारे मुलगे, अनेक मुलं येत. एकदा एक सहा वर्षांची पंचफुला सांगत होती, ‘मी हाय ना बाई, कागदं वेचून पाच रुपये साठवलं व्हतं. मंग गावाकडनं माजी आज्जी आली, तिला दीड रुपया बांगडय़ा भराया दिला. दीड रुपयाचं वशाट आनलं आन आता नागपंचमीला मला बी बांगडय़ा भरायच्या. मी कागदं वेचून लई पसं साठवणार हाय.’ आई-बापाच्या संसाराला हातभार लावणारी ती गुडघ्याएवढी पंचफुला नेहमी आठवते.
हॉटेलमध्ये काम करणारा नितीन हॉटेल मालक कसा ओरडतो, त्याच्या नकला करून दाखवायचा. कपबशी फुटली तर नितीनच्या पगारातून तो पसे कापून घ्यायचा. एकदा आठ-नऊ वर्षांची आक्का एकदम गळ्यात मंगळसूत्रच घालून आली. आम्ही विचारलं, ‘लग्न झालं काय गं तुझं?’ तर अलिप्तपणे ती म्हणाली, ‘व्हय बाई, आता मी जाणती झाली का मंग मला सवतीवर नांदायला जायचं.’ कालपर्यंत परकराचा काचा घालून लंगडीत सर्वाना हरवणारी आक्का सवत झाली होती!
आमची एक मत्रीण पँट आणि टॉप घालून यायची. तिचे केसही बारीक कापलेले. तिच्याकडे एकटक बघत पंचफुलाने विचारलं होतं. ‘ओ बाई, तुम्ही सर हाय का हो?’ एकदा आमच्याबरोबर ऑफिसमधल्या एक उच्चभ्रू, लिपस्टिक लावणाऱ्या, नाजूक बोलणाऱ्या बाई आल्या तर एक जण त्यांना म्हणाली, ‘तुमची व्हटं कशानी लाल झाल्याती?’ तर दुसरी म्हणाली, ‘तुमी येवडं हाळू कशापायी बोलताव? जरा आरडून बोला की!’
ही मुलं उपाशीतापाशी शिकायला यायची. त्यांचं लक्ष लागायचं नाही अभ्यासाकडे. आम्हाला वाटायचं, आपण रोज यांना एकेक मोठ्ठं केळं खायला दिलं आणि मग अभ्यास घेतला तर त्यांचं लक्ष तरी लागेल. आम्ही तसं संस्थेत म्हटलं. केळ्याचे पसे आम्ही खर्च करू, असंही म्हटलं. तेव्हा नकार अधिकच पक्का झाला. आमच्या संचालकांनी म्हटलं, ‘हा प्रयोग आहे. तुम्ही देशातल्या प्रत्येक मुलाला एकेक केळं द्यायचं ठरवलं तर किती खर्च येईल, तो परवडेल का?’ आमचा हिशेब साधा होता. तीस मुलं आमच्याकडे प्रेमानं येत होती. त्यांचं तरी शिक्षण व्हायला हवं की नको? पण आपली पद्धत अशीच आहे. आताही करायचं नाही आणि नंतरही नाही. मुलं उपाशी ती उपाशीच!
मुलं खेळ खेळत तेव्हा ‘रामलीला’ करून दाखवत. ‘तुमने मेरे भाई को क्यो मारा?’ म्हणून राम रावणावर धावून जायचा आणि त्याला खाली पाडून छाताडावर बसायचा. राम-सीता यांना दोन खुच्र्यावर बसवून त्यांच्यासमोर मुली ‘नजरों के तीर मारे कस्सं कस्सं कस्सं’ म्हणून गाणं म्हणून त्यावर नाच करायच्या. कधी भांडीकुंडी (भातुकली) खेळताना नवरा बायकूला हाणायचा आन् म्हनायचा, ‘भाकरी करायला येत न्हाईत तुला, जा तुझ्या घरला आन् भाकरी शिकून ये.’

एखादी ८ वर्षांची रंजू बापाला दारू आणायला जायची गुत्त्यावर. नेमकी त्याच वेळी पोलिसांची धाड पडली. रंजू हुशार होती. ती ओढय़ाकाठी गेली. ओढय़ात बाटली टाकली आणि तिथेच विधी करायला आल्यासारखे बसली. पोलीस तिच्या मागे आले तेव्हा म्हणाली, ‘मी हिकडं पानी भरायला आले.’ आणि मग पोलीस गेल्यावर परत ओढय़ात उतरली आणि बाटली घेऊन आली.
एका मुलीच्या पायाला एकदा खोल जखम होती. जखमेत किडे दिसत होते. पण डॉक्टरांनी गोळ्या दिल्या आणि पाठवून दिले. मग आम्ही तिला ओळखीच्या दवाखान्यात नेलं आणि पूर्ण उपचार केले. तरीही त्यांचा देवऋषीवरचा विश्वास ढळत नाही.
वस्तीतल्या पुरुषांशीही आम्ही आवर्जून बोलायचो. कोणी मोचीकाम करणारे होते, तर कोणी गवंडीकाम करणारे. दारू पिणारे होते, बायकांना-पोरांना मारणारे होते. बायकोचं तोंड चुलीत दाबून धरणारे होते. गरोदर भावजयीला खाली पाडून मारणारे होते. दारू किती वाईट असते ते सांगणारं एक पोस्टर त्यांना दाखवलं. त्यात पिणाऱ्याच्या शरीराचा सापळा दाखवला होता. तो पाहून एक जण तारेतच म्हणाला, ‘तो पीत आसंल पन खात नसंल. खाल्लं तर असं होणारच न्हाई.’ दारू किती विषारी असते हे दाखविण्यासाठी प्रयोग केला. दारूच्या ग्लासात किडे टाकले. ते लगेच मेले. तर एका प्रेक्षकाने सांगितलं, ‘दारू लई औषधी असती. ती पेल्यानं पोटातलं किडं मरत्यात.’
एकदा नवरा-बायकोची भांडणं हा विषय चच्रेला घेतला होता. तेव्हा बायकोला तुम्ही मारता ते चांगलं नाही, असं सांगितलं. तेव्हा पुरुषांना आणि बायांना दोघांनाही गहन प्रश्न पडला होता, ‘आता दादल्यांनी आपल्या बायकूला न्हाई हानायचं तर कुनाच्या बायकूला हानावं?’ अशा प्रकारे चच्रेत समोरच्याला ते निरूत्तर करून टाकत.
जवळ पसे नसले तरी मुलं दिलदार होती. एकदा माझ्या मुलीला मी त्यांच्याशी खेळायला घेऊन गेले तर सगळ्या मुली तिला ‘माजी हरणी गं’ म्हणून उचलून घेत होत्या. एकीनं तिची नवी मोत्याची माळ माझ्या मुलीच्या गळ्यात घातली. मी जाताना काढून दिली तर तिचे डोळे भरून आले. म्हणाली, ‘बाई कशाला व काढून दिली? न्या की. ती माज्या भयनीसारखीच हाय की वो!’
या मुलीच्या आईची एक आठवण माझ्या मनात कायमची कोरली आहे. आम्ही एकदा बायकांना जमवून कुटुंब कल्याणाबद्दल बोलत होतो. ‘पहिले लगेच नको, दुसरे पाठोपाठ नको, तिसरे नकोच नको’ अशी घोषणा होती. ती ऐकून पारूबाई म्हणाल्या, ‘म्हंजी आमी कसं म्हनताव- पयल्याला आवकास, दुसऱ्याला सावकास, तिसऱ्याला बास’. आता या कवयित्रीला कुठे ठेवू असं मला झालं!
आमच्या या सगळ्या प्रौढशिक्षणाचा आणि अनौपचारिक शिक्षणाचा त्यांना काय फायदा झाला असेल, असा मी विचार करत होते. पाच-सहा वर्षांनी एक मुलगी भेटली. तिचं लग्न झालं होतं. कडेवर वर्ष-दोन वर्षांचं मूल होतं. ती सांगत होती, ‘बाई तुम्ही शिकविल्याली गानी मी याला म्हनून दाखवते. त्याच्याशी लई खेळते. आन कामं का करायला लागंनात, मी याला शिकिवनार म्हंजी शिकिवनारच. हे बघा येक पुस्तकबी म्या इकत आनलं याच्यासाठी.’
कुठेतरी बी रुजतंच रुजतं!
शोभा भागवत – shobhabhagwat@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2015 1:01 am

Web Title: elder education
Next Stories
1 छळ, अत्याचारही पारंपरिकच?
2 शाश्वत जीवनमूल्यांची ओंजळ
3 विवाहाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’!
Just Now!
X