पुसाठीत सुरू केलेल्या बागकामाच्या छंदाने त्यांना १००८ पुरस्कार मिळवून दिले. सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, फळझाडं, फुलझाडं, शेंगभाज्या, कंदमुळं यांच्या सतत बहरलेल्या बागेने त्यांनाही चिरतारुण्य दिलं, सदाहरित ठेवलं. आज ८७व्या वर्षीही आपला बागकामाचा आणि गाण्याचा छंद जोपासणाऱ्या
विमलताई आलेगावकरांविषयी..
लंचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, ‘पोटापाण्याच्या उद्योगाबरोबर एखाद्या कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला का जगायचं ते सांगून जाईल..’ महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताने कागदावर लिहिलेला हा कानमंत्र पुण्याच्या ८७ वर्षांच्या विमलताई आलेगावकरांनी काळजावर कोरला आणि कृतीतून सप्रमाण सिद्ध केला. वयाच्या साठीत त्यांनी आपले पती हरी महादेव आलेगावकर यांच्यासह बागकामाच्या छंदाचा श्रीगणेशा केला आणि पुढच्या २२/२३ वर्षांत या हिरव्या छंदाने त्यांना १००८ बक्षिसं मिळवून दिली.
या वेगळ्या वाटेवरून चालण्यासाठी निमित्त ठरली ती हरीभाऊंची सेवानिवृत्ती! खडकी येथील दारूगोळा कारखान्यातून १९८१ साली ते निवृत्त झाले तेव्हा विमलताई संसार आणि मुलंबाळं सांभाळून गाणं शिकत होत्या. त्यानंतर मात्र ‘यापुढे जे काही करायचं ते जोडीनं’ असं ठरवून त्यांनी गायनाचं शिक्षण थांबवलं व दोघांनी मिळून वृद्ध आईची सेवा करत घरातल्या घरात बागकामाचा छंद जोपासायचं ठरवलं.
पुण्यातील म्हात्रे पुलाजवळील शामसुंदर सोसायटीमध्ये वसलेल्या त्यांच्या १२२५ स्क्वेअर फुटांच्या बंगल्याभोवती चहू बाजूंनी ५ ते ७ फूट जागा मोकळी होती. या जागेभोवती कुंपण घालायचं काम प्रथम पार पडलं. त्यानंतर माळी किंवा कोणीही मदतनीस न घेता दोघांनी सर्व जमीन एक-दीड फूट उकरून काढली आणि त्यातील दगडगोटे, सिमेंट विटांचे तुकडे, चुना इ. बाजूला करून त्या मातीत एक ट्रकभर शेणखत व वाळू मिसळून जमीन छान सपाट केली. पावसाचं पाणी कुठेही साठू नये म्हणून तिला व्यवस्थित उतार दिला.
त्यानंतरची पायरी म्हणजे कोणती झाडं कुठे लावायची याचं नियोजन! श्रीफळाने मुहूर्त करावा म्हणून त्यांनी ३ सिंगापुरी व १ बाणवली नारळाची रोपं आणली व (दोघांनी) मिळून ३ बाय ३ बाय ३ आकाराचे खड्डे करून ती लावली. याच सुमारास विमलताईंच्या एका मैत्रिणीने सुचवल्याप्रमाणे दोघांनी ‘भाजीपाला समिती’च्या वर्गात नाव घातलं. तिथल्या मार्गदर्शनाचा त्यांना फायदा झाला.       
घराच्या पूर्व दिशेला जी जागा होती त्यात त्यांनी ५ बाय ५ फुटांचे वाफे केले आणि कडेने विटा लावल्या. जेणेकरून तण काढणं, खत घालणं, पाणी देणं अशा कामांसाठी मातीवर पाय द्यावा लागणार नाही. अशा प्रकारे तयार झालेल्या १०/१२ वाफ्यांत त्यांनी चवळी, लाल/हिरवा माठ, चाकवत, राजगिरा, करडई, मेथी, अंबाडी, पालक, चुका, शेपू.. अशा सर्व प्रकारच्या पालेभाज्या लावल्या. पश्चिमेला सीताफळ, डाळींब, सफरचंद, पेरू, पपई, केळी, चिकू ही झाडे लावली. नारळाची झाडे वाढू लागल्यावर त्याखाली अळूचे वाफे केले. बागेच्या एका कोपऱ्यात खड्डा खणून त्यात हिरव्या कचऱ्याचं खत बनवायला सुरुवात झाली. घरच्याघरी स्वकष्टार्जित ताज्या भाज्या, फळं मिळू लागल्यावर त्यांचा उत्साह वाढला.
तज्ज्ञांशी नियमितपणे केलेली सल्लामसलत व स्वत:चा अनुभव यामुळे काही वर्षांतच आलेगावकर दाम्पत्य इतरांना धडे देण्याइतकं तयार झालं. विमलताई म्हणाला, ‘स्वयंपाकात क्षणोक्षणी लागणारी कोथिंबीर घरच्या कुंडीतही छान होते. त्यासाठी प्रथम धणे किंचितसे भरडून आदल्या रात्री भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी कापडावर उपसावे आणि मग एका तासाने वाफ्यात ओळीने टाकून त्यावर थोडी माती पसरावी. आठवडय़ाभरात छान हिरवीगार कोथिंबीर रुजून येते.
त्यांनी लावलेली फळझाडं १२-१३ वर्षांत मोठी झाली आणि त्यांची सावली पश्चिमेला व दक्षिणेला पडू लागली, तेव्हा या परसबागेला पर्याय म्हणून त्यांनी गच्चीवर झाडं लावायला सुरुवात केली. त्यासाठी प्रथम गच्ची वॉटरप्रूफ करून घेतली. सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, शेंगभाज्या, कंदमुळं तसच पपई, पेरू, केळी, शेवगा, बेलफळ, संत्र अशी फळझाडं व गुलाब, डेलिया, जाई-जुई, संकासुर, तेरडा, तगर, शेवंती, ब्रह्मकमळ, बोगनवेल.. अशी अनेक फुलझाडं लावल्यामुळे गच्चीचं नंदनवन झालं. त्याबरोबर तुळस, गवती चहा, पानफुटी, कोरफड, वेखंड, शतावरी.. अशा औषधी वनस्पतींचीही त्यांनी लागवड केली. ही वृक्षसंपदा सदाहरीत रहावी म्हणून गच्चीतल्या गच्चीत पाण्याची दोन कारंजी स्वत:चं डोकं लढवून बसवली. मुख्य म्हणजे हे सर्व त्यांनी केलं ते अगदी कमीत कमी खर्चात. त्यासाठी मातीच्या कुंडय़ांबरोबर, प्लॅस्टिकच्या पिशव्या/गोणी, लहान खोकी, थर्मोकोलचे कंटेनर, कारच्या वाया गेलेल्या बॅटऱ्या यांचा वापर केला. अननस कुंडय़ांतून लावल्यामुळे ते प्रदर्शनात ठेवता आले.
मनापासून घेतलेल्या निगराणीचं फळही तसंच मिळालं. पोत्यात लावलेल्या आंब्याला पोत्यांनी आंबे लागले. चायनीज संत्र्याच्या एकेका झाडाला शेकडय़ांनी संत्री लगडली. ३ पट लांब व सशक्त अशा दुधी भोपळ्यांनी डोळ्याचं पारणं फेडलं. काळी द्राक्ष, सफरचंद, स्ट्रॉबेरी ही पुण्याच्या मातीत न पिकणारी फळंही आलेगावकरांच्या बागेत बहरली. हे पाहून अनेकांनी त्यांचा कित्ता गिरवला. नारळांपासून, फळांपासून उत्पन्न मिळू लागलं तसं विमलताईंनी गुलाबांच्या पाकळ्यांपासून गुलकंद, द्राक्षांचे बेदाणे करायला करायला सुरुवात केली. त्यांच्या जाम, जेली, रसवंतांनी व बेदाण्यानेही बक्षिसं पटकावली.
त्याच्या बक्षीसगाथेची वाटचाल अशी.. आपल्या फळा-फुलांचा दर्जा पडताळण्यासाठी आलेगावकर जोडप्याने निरनिराळ्या प्रदर्शनांतून भाग घ्यायला सुरुवात केली. सकाळ भाजीपाला समिती, पुणे महानगरपालिका, पुणे विमेन्स कौन्सिल, रोझ सोसायटी, इम्प्रेस गार्डन.. अशा पुण्यातील विविध संस्थांनी भरवलेल्या प्रदर्शनांतून त्यांना १००८ बक्षिसं मिळवली. साहजिकच त्यांच्या पारसबागेची कीर्ती दूरदर्शनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या अनेक भागांत पसरली, तिथून अक्षरश: देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली. दैनिकाच्या पुरवणीत ‘परसबागेतून’ हे सदर उभयतांनी दीडवर्ष चालवलं. मुलाखती व भाषणं तर किती दिली याची गणतीच नाही. बागकाम विषयात शिक्षण घेणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी आलेगावकरांची बाग म्हणजे एक पंढरीच बनली. याचं पुढचं पाऊल म्हणजे पुणे महानगर पालिकेतर्फे २००३ च्या १५-१६ फेब्रुवारीला जे फळं, फुलं, भाजीपाला यांचं प्रदर्शन भरलं होतं त्यात एक स्टॉल खास आलेगावकरांना मिळालेली सर्व बक्षिसं व त्यांच्या बागेवर छापून आलेलं साहित्य मांडून ठेवण्यासाठी राखून ठेवला होता. याच प्रदर्शनात या जोडप्याने लिहिलेल्या ‘परसबाग’ या पुस्तकाचं प्रकाशन पुण्याच्या महापौर दीप्ती चौधरी यांच्या हस्ते झालं. कळस म्हणजे या कार्यक्रमाचं स्वागतगीत ही विमलाताईंनी स्वत: रचून गायलं होतं.
त्यांचं ‘परसबाग’ हे पुस्तक घरच्याघरी बाग करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अलिबाबाची गुहाच आहे. या पुस्तकाच्या नुसत्या अनुक्रमणिकेकडे नजर टाकली तरी (बियांची निवड, खतांचा वापर, उन्हाळा आला झाडांची प्रकृती सांभाळा, कारंजं बनवा घरच्या घरी, दरमहा उत्पन्न देणारा भाजीपाला इ.) या पुस्तकाची उपयुक्तता लक्षात येते.
विमलताई सांगतात, ‘गाणं गुणगुणत झाडांना पाणी घालणं हा माझा एक अत्यंत आनंदाचा, मन प्रसन्न करणारा अनुभव. या वेळी झाडं हलतात, डुलतात, सळसळतात आपल्या पद्धतीनं प्रेमाला प्रतिसाद देतात. तापलेल्या मातीवर पाणी शिंपडलं की दरवळणारा मृदगंध, अबोलीच्या बियांचा तुडतुड आवाज, पान कुरतडणारी हिरवीगार अळी, अलगद पानामागून डोकावणारा एखादा कोंब, फळांवर ताव मारणारे पक्षी, भिरभिरणारी फुलपाखरं.. अशा समृद्ध निसर्गाच्या सान्निध्यात आमचा दिवस कधी मावळायचा ते आम्हाला कळतही नसे.’ झाडामाडांच्या सहवासात एवढा काळ व्यतीत केल्यामुळे असेल कदाचित ८७ वर्षांच्या विमलताईंच्या डोळय़ावर आजही चष्मा नाही की हातात काठी नाही.
२००८मध्ये त्यांचे पती वारले. त्यानंतर कालौघानुसार त्यांच्या मुलांनी आपल्या बंगल्याचं रूपांतर तीन मजली इमारतीत केलं. साहजिकच बाग सीमित झाली. हे वास्तवही त्यांनी सहजतेनं स्वीकारलं आणि त्या पुन्हा गाण्याकडे वळल्या. आजही त्या चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडे (बालगंधर्वाचे साथीदार कै. हरीभाऊ देशपांडे यांचे पुत्र) शास्त्रीय संगीत शिकायला जातात. पेटीही वाजवतात. त्यांच्या ग्रुपचा ठिकठिकाणी कार्यक्रम होतो. पण छोटय़ा प्रमाणात का होईना बागकाम सुरूच आहे.
आलेगावकरांचं घर हे बक्षिसांचं घर आहे. विमलताईंचे तिन्ही मुलगे इंजिनीअर. त्यांतील धाकटे चारुदत्त त्यांच्याजवळ राहतात. त्यांच्या पुणे पॉलिट्रॉनिक्स प्रा. लि. या कंपनीला राष्ट्रीय उद्योग अवॉर्ड (१९९८) मिळालंय. चारुदत्तांची पत्नी मंजिरी या एक प्रख्यात शास्त्रीय संगीत गायिका, पुणे आकाशवाणीच्या टॉप ग्रेड आर्टिस्ट. त्यांचे देश-विदेशात कार्यक्रम होत असतात. त्यांच्या पारितोषिकांनीही एक शोकेस ओसंडून चाललीय. गंमत म्हणजे पूर्वी विमलताई मंजिरीकडे गाणं शिकत होत्या. आईला आणायला-पोहचवायला येणाऱ्या चारुदत्तांशी तिचे सूर जुळले आणि आपल्या शिष्येची सून बनून मंजिरीने आलेगावकरांच्या घरात प्रवेश केला. विमलताईंची मोठी नात चैत्राली इंन्स्ट्रमेंटेशन इंजिनीअरिंगमध्ये पुणे युनिव्हर्सिटीत टॉपर तर धाकटी स्वरला नावाप्रमाणे गाण्याची परंपरा पुढे नेणारी.
घराण्याचा हा लढाऊ बाणा विमलताईंमध्ये परावर्तित झालाय. म्हणून तर गेल्याच महिन्यात वयाच्या ८७ व्या वर्षीही (मेमध्ये ८८ पूर्ण होतील) त्या कोणाच्याही आधाराशिवाय पर्वती चढून आल्यात झाडाझाडांवरील प्रेम, संगीत आणि मित आहार या त्रयीने त्यांना चिरतरुण ठेवलंय.