ch18‘‘मुंबई महापालिकेत अधिकारीपदावर आल्यापासूनच अनधिकृत गोष्टीच्या विरोधात माझी कारवाई सुरू झाली. अनेक अनधिकृत बांधकामे तोडली, स्टॉल्स, फेरीवाल्यांवर कारवाई केली. अर्थात शत्रू वाढत होते. माझ्यावर हल्ले झाले, गोळीबार झाला. याच्याच जोडीला माझ्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली, पण मी थांबलो नाही. आज निवृत्तीनंतरही मी लोकहिताचे काम जारीच ठेवले आहे..’’
आयुष्याच्या वाटेवर अनेक वळणे आली; परंतु सत्याची कास कधी सोडली नाही. मनाला पटेल तेच केले. जे केले ते प्रामाणिकपणे केले. कोणाला त्रास व्हावा म्हणून काही केले नाही. खरे तर ‘खैरनार’ या नावाची ओळख ‘अनधिकृत बांधकामांचा कर्दनकाळ’ अशी असली तरी मी मनाने खूप हळवा आहे. गरिबांच्या झोपडय़ा पाडताना, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना वाईट नक्कीच वाटायचे पण.. कायद्याचे पालन आणि कर्तव्य बजावताना सारे काही बाजूला ठेवावे लागतेच.
ज्या गावात माझा जन्म झाला ते दुष्काळी गाव होते. नाशिक जिल्ह्य़ातील पिंपळगाव हे तसे अठराशे लोकवस्तीचे गाव. माझ्या लहानपणी शेतकऱ्याची मुले फारशी शिकत नसत. आमच्याही घरची थोडी शेती असली तरी कुटुंब मोठे असल्यामुळे बरेच वेळा खाण्यापिण्याची आबाळ असे. दोन भाऊ व तीन बहिणींच्या मागे माझा जन्म झाला. परिस्थितीने कोणाला शिकता आले नाही. मी मास्तर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यामागेही कारण असावे, तेव्हा सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले की मास्तर होता यायचे. घरातले सर्वच जण शेतीत होते आणि दुष्काळामुळे अनेकदा शेतीत कामच नसायचे. मी मास्तर झालो तर दुष्काळात किमान घर तरी चालेल, असा विचार त्यामागे असावा. त्यामुळे आमची स्वारी एकदाची शाळेत गेली.
घरात चांगले संस्कार होते. आईची शिकवण कडक असायची. अभ्यासात मला चांगले गुण मिळावे यासाठी ती गावातल्या खंडोबाच्या देवळात नियमित अगरबत्ती-दिवा लावायची. मीही देवाला निष्ठेने नमस्कार वगैरे करायचो. सुरुवातीला म्हणजे चौथीपर्यंत चांगले मार्क मिळायचे. वाटायचे देवाचीच कृपा. पाचवी व सहावीला कमी गुण मिळाले. तेव्हा देवळात जाऊन देवाला विचारले, ‘अरे एवढी तुझी भक्ती करतो मग मार्क कमी कसे मिळाले?’ आमच्या मुख्याध्यापकांनी मला समजावले, ‘अरे तू चांगला अभ्यास केला तरच तुला चांगले मार्क मिळतीत. तुझा पेपर कोण लिहितो? देव लिहितो की तू लिहितोस?’ ..मास्तरांनी माझे डोळे उघडले. तरीही देवळात जाणे सुरूच होते. एक दिवस काही लोक देवापुढचे पैसे व गूळ-खोबरे उचलून नेताना पाहिले. म्हटले यांना आता देव नक्की शिक्षा करेल; परंतु तसे काही झाले नाही! गावातली ही मंडळी देवापुढचे पैसे नेहमीच उचलत असल्याचे दिसून आले. लोक जर पेढे, पैसे नेतात तर मी का नेऊ नये या विचारातून एक दिवस मीही पेढे व पैसे घेतले. त्या पैशातून पेन्सील विकत घेतली. तेव्हा पेन्सील-पाटी तुटली-फुटली तर नवीन घेणे अशक्य होते. परंतु ‘देवा’नेच माझा प्रश्न सोडवला. तरीही आमच्या मुख्याध्यापकांनी जी दृष्टी दिली त्यामुळे देव या संकल्पनेला तडा गेला तो कायमचाच. आणि आयुष्याला एक वेगळाच दृष्टिकोन, वळण मिळाले- या दुनियेत मेहनत करणाऱ्याला यश आहे. ते यश तुमचे कष्टच तुम्हाला मिळवून देतात. यात देवाचा काहीही संबंध नसतो, या मतावर ठाम होता आले. सातवी झाल्यानंतर वडिलांनी सांगितले, आता मास्तर बन. परंतु मास्तरपेक्षा ‘सर’ मोठा असतो. त्यासाठी आणखी थोडे शिकावे लागेल हे वडिलांना पटवले.  दहावी झालो. वडिलांचे निधन झाले होते. मला पुढचे शिक्षण घ्यायचे होते. मोठय़ा भावांना विनंती केली. त्यांनी शेतीत लक्ष घालण्यास सांगितले. अखेर माझे म्हणणे मान्य करून शेतीचा काही भाग विकून शिक्षणाला पैसे दिले. एका मारवाडी व्यक्तीनेही शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज दिले होते. नाशिकच्या ‘बीवायके’ महाविद्यालयातून वाणिज्य विषयातील पदवी घेतली. महाविद्यालयात असताना ‘एनसीसी’मध्ये होतो. तेथे ‘बेस्ट कॅडेट’ म्हणूनही निवड झाली. एनसीसीमुळे एक वेगळे वळण मिळाले. आत्मविश्वास मिळाला.
महाविद्यालयातही काही प्रसंगी अन्यायाविरोधात आवाज उठवला होता. त्या वेळी एक लक्षात आले ते म्हणजे, तुम्ही आवाज उठवला तर रस्ता निश्चितपणे मिळतो. पुढे अहमदनगरला लष्करात शॉर्ट सव्‍‌र्हिसही केली. भावांनी त्या वेळी शंभर रुपये देऊन ‘तुझे तू पाहा,’ असे सांगितले. ते शंभर रुपये घेऊन मुंबईत आलो. पोलिसात नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न केले. पुढे जिल्हाधिकारी कार्यालयात तात्पुरती लिपिकाची नोकरी मिळाली. सेवायोजना कार्यालयातही नाव नोंदवून ठेवलेच होते. त्यातून ‘पे अ‍ॅण्ड अकाऊंटस्’मध्ये लिपिकाची नोकरी मिळाली. त्या वेळी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षाही दिली. या परीक्षेत मी राज्यात नववा आलो. विशेष म्हणजे इंग्रजीत पहिला आलो. तोपर्यंत इंग्रजीबाबत माझ्यात प्रचंड न्यूनगंड होता. पहिला आल्यामुळे तो गेला.
१९७४ मध्ये महापालिकेच्या सेवेत आलो आणि दोनच वर्षांत लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन विभाग अधिकारीही बनलो. अधिकारी म्हणून गाडी, स्वतंत्र केबिन साराच थाट होता. पालिकेच्या ‘ए’ विभागात होतो तेव्हा. एक दिवस तत्कालीन आयुक्त बी. जी. देशमुख यांनी बोलावून घेतले. ‘खैरनार, गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरातील अनधिकृत फेरीवाले व स्टॉल्सवर कारवाई करायची आहे.’ मी म्हटले, ‘ठीक आहे.’ त्यानंतर माझ्या उपायुक्तांचा दूरध्वनी आला. त्यांनी कारवाई करण्याची काही गरज नसल्याचे सांगितले. मी शांत राहिलो तर पुन्हा आयुक्तांनी विचारणा केली. त्यांना मी उपायुक्तांच्याआदेशाची माहिती दिली. आयुक्तांनी माहिती घेऊन उपायुक्तांची थेट बदलीच केली. साहजिकच अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याची आणि अधिकृत स्टॉल्सच्या पुनर्वसनाची कामगिरी सहज पार पडली.
माझ्या कारवाईनंतर महापालिका सभागृहात मात्र माझ्या निषेधाचा ठराव मांडण्यात आला. तसेच बदलीचीही मागणी करण्यात आली. तथापि लोकांचेही मला समर्थन मिळाल्यामुळे बदली झाली नाही. माझ्यासाठी हे सारे नवीन होते. यातून खूप काही शिकता आले. अधिकारी, नेते तसेच दलाल लोकांचे संबंध कसे असतात ते लक्षात आले. आयुक्त देशमुख हे खूप चांगले गृहस्थ होते. माझ्या पाठीशी कायम उभे राहिले. पुढे कुर्ला येथे माझी बदली झाली. त्या वेळी तेथील एका आमदारांचे मोठे प्रस्थ होते. प्रथम त्यांच्याशीच संबंधित अनधिकृत बांधकामावर घाव घातला. त्या वेळी पैसे दिल्याशिवाय पालिकेत काहीच कामे होत नाहीत, असा समज होता. तो मोडून काढणे आवश्यक होते. त्यामुळे थेट लोकांशी संपर्क साधून कामांची व तक्रारींची माहिती घेण्यास सुरुवात केली. यातून विभाग कार्यालयातील अधिकारी व भ्रष्ट कर्मचाऱ्यांनाही चाप बसू लागला. एकीकडे चांगली कामे घेऊन येणाऱ्या नगरसेवकांना मदत करायची तर दुसरीकडे अनधिकृत बांधकामावर कारवाई करायची यामुळे लोकांचा तसेच लोकप्रतिनिधींचाही विश्वास जिंकू शकलो.
याच काळात कधी पैशाचं आमिष, तर कधी धमक्या तर कधी राजकीय दबाव यांना वेळोवेळी सामोरे जावे लागले. कुर्ला येथे एका कामगार नेत्याशी संबंधित बांधकाम तोडण्याचे आदेश मी अधिकाऱ्यांना दिले. बांधकामाच्या जागेवर गुंड आल्यामुळे कारवाई करणे शक्य नसल्याचे त्या अधिकाऱ्यांनी मला सांगितले. मी तत्काळ त्या अधिकाऱ्यांना तेथून परतण्याचे आदेश दिले व माझे काम संपल्यानंतर मी त्या साईटवर गेलो तर तेथे कोणीच नव्हते. तत्काळ मी ते बांधकाम तोडून टाकले. या कारवायांमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये एक धाक निर्माण झाला आणि मलाही लोकहिताची कामे करण्याचा हुरूप आला. अर्थात शत्रू वाढत होते. फेरीवाल्यांवरच्या कारवाईनंतर तर एके दिवशी कुर्ला येथील कार्यालयात तीनशे जणांचा जमाव शिरला आणि त्यांनी तोडफोड सुरू केली. तथापि पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे थोडय़ाच वेळात जमाव पांगला.
दरम्यानच्या काळात दादर- माहीम-माटुंगा विभागात माझी बदली झाली. हा विभाग तसा शांत असल्याचा माझा समज.. तो वरदराज मुदलियार ऊर्फ वरदाभाईचा ‘एरिया’ असल्याचे पुढे समजले. त्यालाही एक कारण झाले. माटुंगा रेल्वे स्थानकाबाहेर वरदाभाईचा गणशोत्सव व्हायचा. उत्सवानंतर खड्डे बुजविण्यासाठीची फी त्यांच्या मंडळाने न भरल्यामुळे मी मंडप घालण्यास परवानगी नाकारली. बरोबरचे अधिकारी घाबरले. मला समजावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणाले, ‘वरदाभाईचा गणपती आहे.. परवानगी देऊन टाका.’ मागच्या तीन वर्षांचे पैसे याने भरले नाही, तेव्हा परवानगी मिळणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. एक दिवस थेट वरदाच माझ्या कार्यालयात आला. सामाजिक काम करतो अशी स्वत:ची ओळख करून दिली. पैसे भरावे लागतील असे सांगितल्यानंतर पैसेही भरले आणि कधी मदतीची गरज लागली तर सांगा असेही म्हणाला! पुढे सायन रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांवर कारवाई केली आणि प्रकरण चिघळले. माझ्यावर एका गुंडाने बांबूने हल्ला केला. डोक्याला मार लागला. त्याच्याच हातातील बांबू हिसकावून त्याला एक फटका मारला तर तो खाली पडला. थोडय़ाच वेळात अनेक गुंडांनी मला घेरले. मनातून मी घाबरलो होतो; परंतु उसना आव आणून हिम्मत असेल तर पुढे येण्याचे आव्हान देत खाली पडलेल्या त्यांच्या साथीदाराच्या छातीवर पाय देऊन उभा राहिलो. तेवढय़ात बेस्टची एक बस आली आणि ती बस पकडून मी सटकलो खरा; परंतु कंडक्टरने रक्ताळलेल्या मला पाहिले व पाठीमागे लागलेले गुंड पाहून मला बसमधून ढकलून दिले. तसाच पळत पळत एका गल्लीत पोहोचलो. एका ओळखीच्या व्यक्तीने तेथून बाहेर काढल्यामुळे थोडक्यात जीव वाचला.
सायन सर्कलच्या जंक्शनजवळ पालिकेची एक चाळ होती. रस्ता मोठा करण्यासाठी चाळ पाडणे गरजेचे होते. तेथे असलेल्या मटक्याचा अड्डय़ामुळे कारवाईसाठी कोणी तयार होत नव्हते. एक दिवस त्या चाळीवर मी हातोडा घातला आणि चाळ जमीनदोस्त केली. रस्ते विभागाचे अधिकारी खूश झाले खरे; परंतु दुसऱ्या दिवशी या कारवाईमुळे माटुंगा बंद ठेवण्यात आला. वरदाभाईच्या गुंडांनी ‘माटुंगा बंद’ केला होता. तेव्हाही कारवाईसाठी पोलीस मिळण्यात अडचणी येत असे. त्यामुळे एक दिवस कार्यालयात अधिकाऱ्यांशी गप्पा मारताना रिव्हॉल्वरचा परवाना कसा काढायचा याची माहिती विचारली. आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी वरदाभाई थेट कार्यालयात आला आणि रिव्हॉल्वरचे लायसन हवे तर लायसन व रिव्हॉल्वर दोन्ही देतो, असे म्हणाला. त्याच्या दरबारातही तो मला घेऊन गेला. तेथे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांपासून नगरसेवकांपर्यंत सारे जण येत असल्याचे दिसले. कोणत्या प्रकारचे ‘समाजकार्य’ तेथे चालते ते चांगलेच समजले. खरे तर मला ‘समजावण्यासाठी’च वरदाने बोलावले होते. मनात म्हटले, याची ओळख खरेच कोठपर्यंत आहे ते पाहावे. कुतूहल म्हणून मला रिव्हॉल्वरचे लायसन कसे देणार, असे विचारले तेव्हा एक अतिरिक्त पोलीस आयुक्त माझा मित्र असून तो तुमचे काम करेल, असे त्याने सांगितले. एवढेच नव्हे तर आजच त्यांना भेटू या असे म्हणाला. त्याच्या गाडीतून ग्रँटरोड येथील एक इमारतीतील एका घरी घेऊन गेला. तेथे अधिकारी दर्जाचा एक जण राहत असल्याचे कळले. टेबलावर दारूचा ग्लास,  खाण्याचे पदार्थ  होते. त्याने मला रिव्हॉल्वरची गरज काय, असा सवाल केला. वरदाभाईला सहकार्य केलेस तर तोच संरक्षण देईल, असे सांगितले. तेथून आम्ही निघालो खरे, परंतु नंतर कळले, ना तो बडा अधिकारी होता ना परवाना देण्याची त्याची ताकद होती. त्यानंतरही वरदाने थेट माझ्या घरी येऊन समजावण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्याचा उपयोग होणार नव्हता.
दादर-माटुंगा परिसरातील रस्त्यावरील मंदिरे हा काही लोकांच्या कमाईचा तसेच चरसी लोकांचा अड्डा बनला होता. माटुंगा रोडवरील मंदिरामुळे तेथील ब्रिजचे काम रखडले होते. त्यामुळे त्याच्यावर हातोडा घालणे भाग होते आणि मी तो घातला. एका रात्रीत सर्व मंदिरे दूर केली. वर्तमानपत्रांनी त्याला मोठी प्रसिद्धी दिली. तथापि दादर येथील मंदिरे तोडल्यामुळे राजकारण्यांच्या नाराजीचा ‘सामना’ करावा लागला. मुख्यमंत्री नाराज झाल्याचे मला सांगण्यात आले. या साऱ्याला न जुमानता दादरच्या फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई सुरू केली. तेव्हा कोणती तरी मोठी गँग तेथे होती. हे फेरीवाले त्यांचेच असल्याचे सांगण्यात आले. एक दिवस एक ‘भाई’ कार्यालयात आला व म्हणाला, ‘मी दादागिरी सोडून शांततेने स्टॉल टाकून बसलो आहे तेव्हा मला त्रास देऊ नका.’ त्यावर, जे अनधिकृत असेल त्यावर कारवाई करावीच लागेल, असे मी त्याला समाजवले तेव्हा तुकडे करण्याची धमकी त्याने दिली. दुसऱ्या दिवशी त्याच्या त्या अनधिकृत स्टॉलचे तुकडे रस्त्यावर पडले होते.  एका मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या हॉटेलच्या वाढीव अनधिकृत बांधकामावरही हातोडा घातला. त्या वेळी मंत्रालयातून माझ्या बदलीचे आदेश जारी होणार असल्याचे समजले,  पण माझी बदली होऊ नये यासाठी माजी आयुक्त कांगा साहेब, रिबेरो व  द. शं. सोमण यांनी मुख्यमंत्र्याशी चर्चा केल्याचेही सांगण्यात आले.
एकाच वेळी राजकारणी, अधिकारी व गुंड सारेच नाराज होते. यातूनच जी-नॉर्थ विभाग कार्यालयात एक दिवस सकाळी माझ्यावर गोळीबार झाला. पायाला गोळी लागली. गोळी मारणाऱ्याला पकडण्यासाठी पाठलागही केला. परंतु हल्लेखोर टॅक्सीमधून पळून गेले. प्रसारमाध्यमांनी मात्र मला कायमच पाठिंबा दिला. खरे तर माझी कवचकुंडले ही प्रसारमाध्यमेच राहिली. पोलिसांचा बदोबस्त कधी मिळायचा तर कधी त्यात अडथळे आणले जायचे. महंमद अली रोड, मुसाफिरखाना, डोंगरीसारख्या भागात कारवाईला कोणी जायला तयार व्हायचे नाही. परंतु प्रसारमाध्यमांच्या संरक्षणामुळे माझा ताफा घेऊन तेथे अनेकदा कारवाईला गेलो.
माझ्या या वाटचालीत अनेक चांगल्या आयुक्तांची मला साथ मिळाली. यामध्ये सदाशिवराव तिनईकरांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. तेव्हाच्या अतिरिक्त आयुक्तांनी माझे ‘खराब केलेले’ गोपनीय अहवाल तिनईकर यांनी जातीने लक्ष घालून ‘दुरुस्त’ केल्यामुळे उपायुक्त होण्याचा माझा मार्ग मोकळा झाला. दुसरे आयुक्त शरद काळे यांनीही मला खूप संधी दिली. एक सज्जन माणूस म्हणून काळे यांचे नाव घ्यावे लागेल. राजकारण्यांच्या मदतीशिवाय अनधिकृत झोपडय़ा व मोठी बांधकामे होऊ शकत नाहीत हे वास्तव आहे. उपायुक्त बनल्यानंतर एक दिवस तत्कालीन आयुक्त शरद काळे यांनी मला बोलावून घेतले व अतिक्रमण विभागाची जबाबदारी पाहण्यास सांगितले. एकूणच मुंबईत त्या वेळी मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण व फेरीवाले वाढत होते. त्यामुळे मध्यवर्ती ठिकाणाहून कारवाई करण्याची काळेसाहेबांची संकल्पना होती. त्यानुसार दिवसरात्र एक करून माहिती गोळा केली. एकीकडे अनधिकृत झोपडय़ा व फेरीवाल्यांवर कारवाई तर दुसरीकडे बडय़ा बिल्डरांच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा घालायचो. एक दिवस एक मुस्लीम महिला आली. तिने दाऊदच्या मेहजबीन मॅन्शनची माहिती दिली. दाऊदच्या लोकांकडून तिच्या मुलांना ठार मारण्याच्या धमक्या येत होत्या, असे तिचे म्हणणे होते. सारेच संतापजनक होते. माहिती घेऊन एक दिवस पोलीस बंदोबस्तात मेहजबीन मॅन्शनवर हातोडा घातला.
‘‘राजकारणी, अधिकारी व गुंडांच्या साटेलोटय़ातून मुंबईत अनधिकृत बांधकामे, झोपडय़ा व फेरीवाले उदंड झाले आहेत. महापालिका हतबल असून एकटी महापालिका काही करू शकणार नाही. अनधिकृत बांधकामातून अनेक जण गब्बर झाले. करदात्याला मात्र खऱ्या अर्थाने नागरी सुविधांना वंचित राहावे लागत आहे. हे सारे कधी थांबणार माहीत नाही. पोटापाण्यासाठी लोक येतच राहणार. त्यांच्यासाठी ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. अनेक खैरनारही आता याला पुरे पडणार नाहीत.’’
बहुतेक सर्व मोठय़ा प्रकरणांत मी स्वत: बांधकाम तोडण्यास सुरुवात करत असे. यातूनच दक्षिण मुंबईतील अनेक अनधिकृत बांधकामांची माहिती हाती आली. राजकारण्यांचा त्यातही मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद यामागे असल्याशिवाय एवढी बांधकामे कशी होतील हा प्रश्न मला पडला. कारण यात प्रचंड पैसा होता. यातूनच तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर मी टीका केली. ट्रकभर पुराव्याचे आरोप त्यातून झाले. ‘ट्रकभर पुरावा’ हा वाक्प्रचार आहे. त्या वेळी अनधिकृत बांधकामांच्या वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यांची कात्रणे जरी कोणी काढली असली तरी ती ट्रकभर झाली असती हा भाग वेगळा! यातून शरद पवार यांच्या विरोधात शिवसेना-भाजपने लोकमत निर्माण केले आणि ते सत्तेत आले. तसे शिवसेना व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही माझे अनेकदा वाद झाले. महापालिकेत त्यांचीच सत्ता असल्यामुळे त्यांनी अनधिकृत बांधकामावर नियंत्रण आणण्यासाठी काय केले, हा माझा सवाल होता. आज माझेच म्हणणे खरे ठरत आहे. मुंबई पुरती बकाल झाली आहे. मुंबईला वाली कोण, हा प्रश्न आहे. राजकारणी, अधिकारी व गुंडांच्या साटेलोटय़ातून मुंबईत अनधिकृत बांधकामे, झोपडय़ा व फेरीवाले उदंड झाले आहेत.
महापालिका हतबल असून एकटी महापालिका काहीही करू शकणार नाही. अनधिकृत बांधकामातून अनेक जण गब्बर झाले. करदात्याला मात्र खऱ्या अर्थाने नागरी सुविधांना वंचित राहावे लागत आहे. हे सारे कधी थांबणार माहीत नाही. पोटापाण्यासाठी लोक येतच राहणार. त्यांच्यासाठी ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. अनेक खैरनारही आता याला पुरे पडणार नाहीत.
या लढाईत १९९४ साली मला निलंबित करण्यात आले. २००० पर्यंत हे निलंबन होते. पुढे परत घेतल्यानंतर सहा महिने मुदतवाढही देण्यात आली. नंतर निवृत्ती आलीच. पण त्यानंतरही मी शांत बसलो नाहीच. जरबदस्तीने वेश्या व्यवसाय करायला लागणाऱ्यांना सोडविण्याचे काम हाती घेतले. सुमारे पाच हजारांहून अधिक मुलींची कामाठीपुरा, सोनापूर आदी भागांतील कुंटणखान्यातून सुटका करून त्यांच्या घरी पोहोचविले. गुजरातच्या भूकंपानंतर तेथे जाऊन पुनर्वसनाचे काम केले. कुरणगाव तसेच अन्य काही गावांत दोन वर्षे पुनर्वसनाचे काम करून शेकडो घरे उभी केली. मधल्या काळात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यापासून अनेक राजकारण्यांशी संबध आला. महापालिका निवडणुकीत चांगले उमेदवार उभे करण्याचा प्रयोगही करून पाहिला. अर्थात तो फसला. अण्णा हजारे यांच्या व्यक्तिमत्त्वाची दुसरी बाजूही जवळून पाहता आली. त्यामुळे त्यांच्या तथाकथित चळवळीतून बाजूला झालो. माझ्या या लढाईत पत्नीने मनापासून साथ दिली. मुलांचेही आपल्या क्षेत्रात चांगले चालले आहे. २००४ पासून मुंबईत जुहू येथे राहत असून मधल्या काळात आजारी पडल्यानंतर नोकरी करण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे मुंबईतील काही विकासकांबरोबर काम करतो आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाच्या कामात मदत करण्याचे तसेच कायदेशीर सल्ला देण्याचे काम करत आहे. यातून मला उपजीविकेसाठी पैसेही मिळतात तसेच गोरगरिबांचे पुनर्वसन करण्यास मदतही करता येते.
वयाच्या ७४ वर्षी मी समाधानी आयुष्य जगत असलो तरी ज्या मुंबईने मला सारे काही दिले तिला बकाल होत चाललेली पाहताना वाईट वाटते, हे मात्र आवर्जून सांगावेसे वाटते.
गो. रा. खैरनार
शब्दांकन- संदीप आचार्य -sandeep.acharya@expressindia.com

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ