सोनाली राहुल कुळकर्णी

chaturangnew@gmail.com

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?

स्नेहा  मनवाचं निरीक्षण करत होती.. तिच्या हातातलं डायमंड-स्टडेड, ब्रँडेड घडय़ाळ, रंगवलेली सुंदर नखं, ब्रेसलेट, मागील टेबलावरची महागडी हँडबॅग, शेल्फवर ठेवलेल्या ट्रॉफीज आणि डोळ्यांत रोखून बघत, ओठ विलग न करता हसायची तिची पद्धत.. सगळं-सगळं ती मनात साठवत होती. स्नेहाच्या मनात पुढची वाटचाल आणि लक्ष्य निर्धारित होत होतं. पुढची व्यावसायिक वाटचाल करताना आपल्याला काय हवंय, हे तिच्या मनात त्याचक्षणी नक्की झालं होतं..

‘कथा दालन’ हे कथालेखिकांसाठीचं सदर दर पंधरवडय़ाने..

स्नेहानं आपला रिकामा ड्रॉवर आणि डेस्कवर पुन्हा एकदा प्रेमानं नजर फिरवली. जणू काही नजरेनंच ती त्यांना पुन: पुन्हा ‘थँक्स’ म्हणत होती. ऑफिसमधल्या सगळ्या घडामोडींचे ते साक्षीदार होते. वर्षांनुवर्ष ‘मीटिंग्ज’, ‘थिंग्ज टू डू’ वगैरेने भरलेला आणि पिन केलेला बोर्ड आज अगदी मोकळा झाला होता. त्याच्यावरही तिनं मायेनं हात फिरवला. अगदी एखाद्या आईनं आपल्या जेवणाऱ्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवावा तसा. सगळे निरोपाचे सोपस्कार पार पडल्यावर तिनं शेवटी आपला लॅपटॉप आणि चाव्या एच.आर.कडे सोपवल्या आणि लिफ्टकडे निघाली..

रिसेप्शनजवळ ‘इंटरव्ह्य़ूसाठी’ आलेल्या तरुण-तरुणी तिला दिसल्या आणि त्यामध्ये तिला दिसली दहा वर्षांपूर्वीची ती स्वत:. अवघ्या २० वर्षांची, पण ‘काम करेन तर अशा प्रथितयश दैनिकातूनच करेन,’ या जिद्दीने ठसठसलेली. एका विशिष्ट ध्येयानं झपाटलेली आणि त्या कंपनीच्या सर्वदूर असलेल्या लोकप्रियतेनं भारावलेली.. आणि तेच झालं, ज्याचा तिला विश्वास होता ती नोकरी तिनं मिळवलीच, तीसुद्धा तिला हव्या असलेल्या पगारावरच. त्यानंतर मात्र तिचा आत्मविश्वास दुणावतच गेला..

‘कॉपरेरेट कल्चर’ तिनं चांगलंच आत्मसात केलं. किती तरी नोकऱ्या बदलल्या. कधी चांगल्या पगारासाठी, कधी पदासाठी, तर कधी चांगल्या संधीसाठी. ‘अलिप्तपणा’ हा तर तिचा गुरुमंत्रच बनला. कोणाच्याही अध्यातमध्यात न पडता, कोणाशीही जास्त बांधिलकी न ठेवता, एकटीनंच लढाया जिंकल्या. आपण आपल्या सहकर्मचाऱ्यांसाठी असूयेचा विषय बनत चाललो आहोत, याची तिला कधीच फिकीर वाटली नाही की आपला प्रवास दिवसेंदिवस अधिकच खडतर होत चालल्याची तमा तिनं बाळगली नाही. तिच्या सासरच्यांनीही तिला नेहमीच साथ दिली. त्यामुळे मागे वळून बघण्याची तिला गरजच वाटली नाही..

..अचानक लिफ्टचा दरवाजा उघडला आणि ती भानावर आली. नेहमी झपाझप ‘क्लायंट ऑफिस’ अथवा ‘ओला/उबर’च्या दिशेनं चालणारी पावलं आज संथ गतीनं पडत होती. अचानक रोहिणीनं तिचा हात पकडला.

‘‘काय गं, निघालीस? कॉफी घेणार? आता काय घाई नसेलच तुला? चल, माझ्याकडून ‘फेअरवेल’ समज,’’ असं म्हणत रोहिणीनं जवळजवळ ओढतच लॉबीतल्या त्या आलिशान ‘कॉफीहाऊस’मध्ये नेलं. स्नेहाला तिचा कॉफी पाजण्याचा उद्देश माहीत होताच, तरीपण आता लपवण्यासारखं काहीच नसल्यानं ती तिच्याबरोबर कॉफी प्यायला बसली आणि समोरून अपेक्षित प्रश्न आलेच, खरं तर सरबत्तीच!

‘‘मग आता? ‘हाऊसवाइफ’ की स्वत:चं काही सुरू करणार आहेस? ..आणि असं मध्येच कसं सोडलंस? कोणाशी काही भांडण?.. की घरी काही प्रॉब्लेम?’’ रोहिणी.

कॉपरेरेटमध्ये कसलेल्या स्नेहानं चेहऱ्यावरचे भाव अजिबात न बदलता कॉफीचा घोट घेतला आणि म्हणाली, ‘‘काही नाही. सहजच गं. तू सांग. तू त्या दिवशी अंधेरीला ‘इंटरव्ह्य़ू’ द्यायला गेली होतीस ना? त्याचं काय झालं? माझी एक मैत्रीण तिथं सरव्यवस्थापक आहे, विचारत होती मला तुझ्याबद्दल.’’

रोहिणीला तिचं उत्तर मिळालं होतं. दोघींनीही कॉफी संपवून ‘काळजी घे’चं ‘शो ऑफ’ केलं आणि आपापल्या मार्गानं चालत्या झाल्या.

स्नेहानं नवऱ्याला फोन केला. कॉफीमुळे तिला खरं तर तरतरी आली होती. आज चक्क ती फोनवर २५ मिनिटं सलग बोलली. कोणीही ‘सेकंड लाइन’वरून त्यांचं बोलणं मध्येच तोडणार नव्हतं किंवा अचानक काही तरी लक्षात आल्यानं ती फोन ‘नंतर करते’ या अधांतरी आश्वासनावर ठेवणार नव्हती. आज ती सुखावली होती.. तिच्या नवऱ्याचा.. सुहासचा, आनंदी आणि समाधानी स्वर ऐकून. बोलता-बोलता ती कधी स्टेशनवर आली, तिचं तिलाच कळलं नाही. ट्रेन येतच होती. गर्दीमुळे आज चक्क तिनं ट्रेन सोडायची ठरवलं आणि शांतपणे दुसऱ्या ट्रेनची वाट बघत उभी राहिली. दुसऱ्या ट्रेनमध्ये अनपेक्षितपणे सहज चढायला मिळालं. नेहमीप्रमाणे ‘कुठे उतरणार’ वगैरे न विचारता ती एका बाजूला जाऊन उभी राहिली. इतक्यात एका बाईनं खुणेनंच तिला ती नंतरच्या स्टेशनवर उतरणार असल्याचं सांगितलं. आयत्या चालून आलेल्या या सुखानं ती मोहरली. त्या आनंदातच तिनं आईला फोन लावला. आजकाल तिचं आईशी निवांतपणे बोलणंच होत नव्हतं. आज तिच्याकडे वेळच वेळ होता.

‘‘हॅलो, बोल गं स्नेहा.. काय म्हणतेस?’’

‘‘मी बरी आहे. जेवलीस?’’

‘‘झालं कधीच.. बाकी आता मीटिंगला जात असशील ना? आहे ना गं वेळ? नाही तर मी आपली बडबडत बसेन. मी काय रिटायर्ड आहे. तुम्ही नोकरदार..’’

‘‘आई..’’ ती मध्येच आईला थांबवत म्हणाली, ‘‘अगं, आज माझा इथला शेवटचा दिवस होता. आपण बोललो होतो ना त्याविषयी?’’

‘‘अरे हो.. बरी आहेस ना तू?’’ आई बरंच काही विचारत, सांगत राहिली. स्टेशन आल्यावर स्नेहा म्हणाली, ‘‘आई, स्टेशन आलं. मी ठेवते हं फोन.’’ आई सवयीनं बोलून गेली, ‘‘बघ हं, उतरताना लॅपटॉप वगैरे घेतला का ते?’’ आईची ही नेहमीची सवय. कधीही तिनं फोन केला, की स्नेहा नेहमी कशात तरी व्यग्र असायची. मग फोन खांदा आणि मान यात पकडून लॅपटॉपवर टाइप करणं असो, ब्रीफकेसमधले पेपर शोधणं असो किंवा मध्येच दुसऱ्या फोनवर बोलणं असो. मग शेवटी आईच म्हणायची, ‘‘तू बिझी दिसतेस.  नंतर बोलू आणि बघ हं, टॅक्सीत विसरशील काही तरी. लॅपटॉप, मोबाइल घे बरोबर.’’

ट्रेनमधनं उतरून स्टेशनबाहेर आल्यावर समोरच मोठं मिठाईचं दुकान दिसलं. आजचा दिवस साजरा करण्यासाठी तिनं खास सुहासला आवडणारी गरमागरम जिलेबी घेतली. किती तरी दिवसांनी तिनं ‘डाएटला’ सुट्टी दिली होती. सगळ्या सामानासकट पायऱ्या उतरताना तिला समोरच पांढऱ्या होंडा सिटीतून उतरणारी चाळिशीतली ‘मॉडर्न’ स्त्री दिसली. ती सतर्क झाली. नाही, मनवा नव्हती ती. ‘कसं शक्य आहे?’ ती स्वत:वरच डाफरली; पण तरीही तिच्यासमोरून मनवा जाईना..

मनवा तिची ऑफिसमधील सीनिअर. स्नेहानं बऱ्याच सीनिअर्सबरोबर काम केलं, पण मनवाची गोष्टच वेगळी.. स्नेहानं या नवीन ऑफिसमध्ये ‘सीनिअर मॅनेजर’ म्हणून चार्ज घेताना एच.आर.ने सगळ्या अधिकाऱ्यांशी भेट घडवून आणली. प्रत्येक केबिनमध्ये जाऊन, हस्तांदोलन करून, स्नेहा आत्मविश्वासानं मागील यशस्वी कामगिरी सांगताना प्रत्येकाची दाद घेत होती. मात्र, एका केबिनमधील व्यक्ती तिचं आयुष्य पार बदलून टाकणार आहे, याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती.

ती आता शेवटच्या केबिनसमोर उभी होती. एच.आर. पुटपुटली, ‘‘सीनिअर व्हाइस प्रेसिडेंट – कॉर्पोरेट, मनवा प्रधान.’’ दारावर टकटक करून आत जाण्याआधी तिची अपेक्षा एका पन्नाशीकडे झुकलेल्या बाईची होती; पण टकटक केल्यावर आलेला ‘कम इन’ हा आवाज अतिशय तरुण आणि आकर्षक होता आणि आत गेल्यानंतर झालेलं मनवा प्रधानचं दर्शन तर भारावून टाकणारं होतं. स्क्वेअर शेपचा फ्लोरल स्लिम टॉप आणि खाली वाइन रेड शेडचा पेन्सिल शेप स्कर्ट. लांबसडक, रेशमी मोकळे केस आणि नखशिखांत रुबाबदार..! चेहऱ्यावर श्रीमंती आणि अधिकाराचं तेज होतं. स्नेहा स्वत:बद्दल काय सांगायचं तेच विसरून गेली. ती फक्त मनवाचं निरीक्षण करत होती. तिच्या हातातलं डायमंड-स्टडेड, ब्रँडेड घडय़ाळ, रंगवलेली सुंदर नखं, ब्रेसलेट, मागील टेबलावरची महागडी हँडबॅग, शेल्फवर ठेवलेल्या ट्रॉफीज आणि डोळ्यांत रोखून बघत, ओठ विलग न करता हसायची तिची पद्धत.. सगळं-सगळं ती साठवत होती. कुठे तरी स्नेहाच्या मनात पुढची वाटचाल

आणि लक्ष्य निर्धारित होत होतं. पुढे तिला व्यावसायिक वाटचाल करताना काय हवंय, हे नक्की झालं होतं..

स्नेहा येणाऱ्या-जाणाऱ्या रिक्षांना हात दाखवून ‘प्रतापनगर’चा जप करत होती. शेवटी एक थांबली. ती पटकन रिक्षात  बसली. एवढय़ात तिच्या मोबाइलवर सुहासचा मेसेज आला. ‘काय मॅडम, कसं वाटतंय? आधी मुव्ही, शॉपिंग की लाँग ड्राइव्ह?’ मेसेज वाचून तिला जणू सुहासनं डोळे मिचकावल्याचाच भास झाला.. आणि त्याचा हसरा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर तरळला. सुहास, तिचा नवरा, तिच्यावर नितांत प्रेम करणारा. तिच्या प्रत्येक निर्णयात तिच्या पाठीशी ठाम उभा राहणारा. अगदी तिनं ‘एवढय़ात मूल नको’ म्हटल्यावरही शांतपणे व्यक्त होणारा.

‘‘मला समजतंय स्नेहा, तुला काय म्हणायचंय ते.. फक्त काही गोष्टी वेळेत झालेल्या चांगल्या. उगीचच त्यामुळं तुझ्या किंवा होणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर काही विपरीत परिणाम नको.’’ यावर हसून स्नेहानं, आजकाल विज्ञान किती पुढं गेलंय, डॉक्टर कसे मार्ग काढतात, मनवा कशी उशिरा मूल होऊनही ‘फिट’ आहे, तिच्या ऑफिसच्या लॅपटॉपवर कसा दोघांचा हसरा फोटो आहे, वगैरे सांगून त्याचं बौद्धिक घेतलं. मनवाचं नाव घेतल्यावरच सुहास समजून गेला. ‘मनवा कशी आदर्श आहे, वयाच्या छत्तिसाव्या वर्षी मूल होऊनही कशी फिट आहे, वयाच्या एकोणचाळिसाव्या वर्षी ती सगळ्यात तरुण व्हाइस-प्रेसिडेंट कशी बनली’ याची पुन्हा उजळणी होणार. ‘बरं’ म्हणून त्यानं वर्तमानपत्र वाचायला घेतलं.

स्नेहाची ऑफिसमध्ये जोरात घोडदौड चालू होती. मनवानं तिला आपल्या टीममध्ये मागून घेतलं होतं. आता ती फक्त मनवाभोवतीच होती. तिच्याही नकळत तिचं डाव्या हातावरचं घडय़ाळ मनवासारखंच उजव्या हातावर आलं. परफ्युम, हँडबॅग, कपडे, यातले सगळे ब्रँड मनवाशी साधर्म्य सांगू लागले. स्नेहा आता करिअरच्या अतिशय आकर्षक अशा वळणावर होती; पण मनवा कटाक्षानं फक्त आणि फक्त कामापुरतंच बोलायची. एकदा ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देताना मनवा चक्कर येऊन कोसळली होती. तेव्हा स्नेहानंच सगळी धावपळ केली. मनवानं ‘थँक्स’ वगैरेचे सोपस्कार टाळत सरळ घरचा रस्ता धरला होता..

त्या प्रकरणानं ऑफिसमध्ये मनवाच्या ‘फॅड डाएट’च्या चर्चेला ऊत आला. दुसऱ्या दिवशीही मनवा ऑफिसला आली नव्हती. तिसऱ्या दिवशी स्नेहाला सकाळीच ‘डील कन्फर्म’ असल्याचा ‘मेल’ आला. आतापर्यंतचं सगळ्यात मोठं डील मिळवण्याचा बहुमान त्या दोघींना मिळणार होता. स्नेहा मनवाच्या अजून दहा पावलं जवळ जाणार होती. तिनं मनवाला मेसेज केला आणि तिची वाट पाहू लागली; पण अकरा वाजले तरी मनवाचा पत्ता नव्हता. सहज म्हणून ती रिसेप्शनकडे गेली. तिला दरवाजातून पोलीस आत येताना दिसले. मीडियाच्या ऑफिसमध्ये पोलीस, वकील दिसणं ही नवीन बाब नव्हती; पण थोडय़ाच वेळात तिला डायरेक्टर साहेबांनी मीटिंग रूममध्ये बोलावलं. पोलीस तिथं आधीच बसलेले होते. डायरेक्टरसाहेब जाताना एवढंच म्हणाले, ‘‘हीदेखील मनवा प्रधानच्या टीममध्ये आहे.’’ पोलिसांनी स्नेहाकडे मोर्चा वळवला.

‘‘तुम्हाला मनवा प्रधाननं आत्महत्या केली त्याबद्दल काही माहिती आहे?’’ – पोलिसांनी विचारलं.

स्नेहा काही क्षण सुन्न झाली. तिचे डोळे आपोआपच विस्फारले गेले. घसा कोरडा पडल्यागत झाला. तिनं फक्त नकारार्थी मान हलवली.

‘‘त्यांना काही टेन्शन्स? ऑफिसमध्ये कोणाशी भांडण वगैरे?’’

‘‘नाही.. शी वॉज परफेक्ट. त्या दिवशी फक्त तिला चक्कर..’’

‘‘अँटिडिप्रेसंट्सचा ओव्हरडोस झाला होता त्यांना. म्हणूनच विचारतोय.’’

स्नेहा पुतळ्यासारखी स्तब्ध होती.

‘‘या तुम्ही.. काही लागलं तर बोलवू. तुमचं नाव आणि नंबर द्या त्या मॅडमकडे.’’

स्नेहा मीटिंग रूममधनं बाहेर आली. तिला काय करावं तेच सुचत नव्हतं. तेवढय़ात एक लेडी कॉन्स्टेबल तिथे कॉफी मशीनशी झटापट करताना दिसली. तिनं तिला कपात कॉफी काढून दिली आणि विचारलं, ‘‘मनवा प्रधाननं कधी केली आत्महत्या?’’

‘‘काय नाय ओ मॅडम. गेले वर्षभर कोर्टात केस चालली होती त्यांची, मुलाच्या कस्टडीसाठी. हरल्या त्या मागच्या आठवडय़ात. घेतल्या मग दुपारी झोपेच्या गोळ्या. आम्ही आपलं शक्यता बघायचं काम करतोय.. काय या मोठय़ा बायका? आधी संसारात मन नाही म्हणून घटस्फोट घेतात आणि मग हट्ट म्हणून मुलांच्या कस्टडीसाठी भांडत बसतात. आमची इथं कामं वाढवतात. लय बघितल्यात हो अशा..’’

स्नेहानं स्वत:साठी घेतलेली कॉफी बेसिनमध्ये ओतली आणि चेहऱ्यावरचा सगळा मेकअप फेसवॉशने धुऊन टाकला. कोणालाही न कळवता ती तडक घरी गेली. सुहास संध्याकाळी आला तेव्हा स्नेहाला घरी बघून आश्चर्यचकित झाला. स्नेहाचा बांध अनावर झाला. ‘‘कधी वाटलं नव्हतं रे, ती इतकी पोकळ असेल आतून. का मुलापासून तुटल्यानं ती अशी कोसळली मनानं? खंबीर म्हणवत होती ना स्वत:ला? मग स्वत:चं अस्तित्वच असं संपवलं?’’ ती फक्त रडतच राहिली. सुहास फक्त पाठीवरून हात फिरवत राहिला.

‘‘सुहास.. मी काही महिन्यांचा ब्रेक घेऊ? दमल्यासारखं वाटतंय. माझंही मनवासारखंच होतंय का रे?’’

‘‘अगं, तिच्याकडे कोणी नव्हतं, पण तुझ्याकडे मी आहे ना? आणि तुझं ‘अस्तित्व’ म्हणजे फक्त तूच नाहीस. त्यात मीसुद्धा आहे, आई-बाबा आहेत, तुझे आई-बाबा आहेत. आपण सगळे आहोत..’’ सुहास तिला कुशीत घेत म्हणाला. ती सुहासला घट्ट बिलगली.

रिक्षानं करकचून ब्रेक मारला तेव्हा ती विचारातून बाहेर आली. मागच्याच आठवडय़ात तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर तिनं सुहास आणि घरच्यांसाठी मस्त खरेदी केली होती. त्याला तिनं सुंदर गिफ्टरॅप केलं होतं. तोपर्यंत सुहासचा दुसरा मेसेज आला होता, ‘मॅडम, फ्रॉम व्हेअर टू स्टार्ट?’ तिनं रिप्लाय केला, ‘लेट्स स्टार्ट अ फॅमिली..’ त्यावर उत्तर म्हणून सुहासनं पाठवलेला ‘स्माईली’ हा आतापर्यंत मिळालेल्या सर्व ‘ऑफर लेटर्स’मध्ये सगळ्यात आकर्षक होता.