|| सोनाली नवांगुळ

वस्त्रोद्योगाच्या, फॅशनच्या जगभरातल्या प्रचंड मोठय़ा ‘ब्रँडेड-नॉनब्रँडेड’च्या पसाऱ्यात अपंग माणसांचं एक जग अस्तित्वातच नसणं हे धक्कादायक कटू सत्य, पण तिथेही आशेचा किरण दिसू लागला आहे. काही फॅशन डिझायनर्स आणि संवेदनशील लोक एकत्र येऊन दिव्यांगांना सोयीचे, शिवाय आकर्षक आणि आरामदायी ठरतील असे कपडे आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी ‘अ‍ॅड-ड्रेस नाऊ’  या नावाची एक चळवळ उभी राहाते आहे, साहजिकच एखाद्या मतिमंद मुलाला कंटाळवाण्या टी-शर्टला वगळून बटणांशिवायचा एखादा झकास शर्ट व झिपची कटकट नसलेली रुबाबदार पँट मिळू शकेल किंवा व्हीलचेअरवरच्या एखादीला ‘कॅथेटर बॅग’ सहजपणाने वागवता येईल व जरूर तेव्हा कुणाच्याही मदतीशिवाय रिकामी करता येईल अशी ट्राऊजर्स मिळू शकेल.. याने होईल काय तर हे कपडे अपंगत्वाच्या पलीकडे जाऊन जगायला शिकवतील, स्वावलंबन वाढवून आत्मविश्वासाचं नवं रोपण करतील..

सेल्मा ब्लेअर या अभिनेत्रीनं ‘व्हॅनिटी फेअर ऑस्कर्स’च्या पार्टीत रेड काप्रेटवरून अतिशय आत्मविश्वासानं पावलं टाकत प्रवेश केला तेव्हा सगळे आनंद नि आश्र्चयानं पाहातच राहिले होते. तिचे चमकणारे डोळे नि हसू, तिचा तो सुंदर गाऊन आणि तिच्या हातातली तिच्या नावाच्या आद्याक्षरांची गुलाबी खडे जडवलेली विशेष लेदर केन. ‘इट टुक ए लॉट टू कम आऊट हिअर!’ असं म्हणताना तिला भावना अनावर झाल्या होत्या..

गेल्या वर्षी सेल्मावर अपंगत्व आणणाऱ्या ‘मल्टिपल स्क्लेरॉसिस’चा हल्ला झाला नि तिचं जगणं बदलून गेलं. हे निदान होण्यापूर्वीची पाच वर्ष अतिशय गोंधळात टाकणाऱ्या लक्षणांनी ती त्रासलेली होती. कधी चक्कर आल्यासारखी वाटते, कधी चालताना अडखळल्यासारखं होतं तर कधी कमरेखाली पायच जाणवत नाहीत. शिवाय भीती नि निराश वाटणं हे होतंच. सेल्माची नजर थोडीशी अंधुक झाली. हात वर उचलून केस विचरणं म्हणजे प्रचंड दमणूक वाटायला लागली नि आजवर जे कपडे आरामदायक वाटायचे ते घालणं म्हणजे तर दिव्यच! हॉलीवूड सिनेसृष्टीतून या कारणानं अचानक बाजूला जावं लागल्यानंतर सेल्मानं उपचार घेतले, अपंगत्वाचा स्वीकार करण्याचं मोकळेपण मिळवलं.. फक्त मिळत नव्हती ती एकच गोष्ट. वर्षांपूर्वी ती ज्या तऱ्हेचे वेगवेगळे, आरामदायी कपडे वापरायची ते कपडे आता तिच्यासाठी निरुपयोगी ठरले होते. शरीराच्या नव्या स्थितीशी जुळवून घेत आरामदायक वाटतील, आजूबाजूला चालू असलेल्या ट्रेंड्सचे असतील असे ‘अ‍ॅडॅप्टेबल’ कपडेच तिला मिळत नव्हते. नव्या आयुष्याला सामोरं जाताना आपल्या स्टाइलचा त्याग करायची गरज नाही व आधारासाठी हातात घेतलेल्या केनची लाज वाटायचंही कारण नाही हे सेल्मानं ठरवलं व स्वत:च्या गरजा सांगत कपडे घडवून घेतले. हातात आधारासाठी असणारी ‘केन’ तर ‘फॅशन अ‍ॅक्सेसरी’ म्हणून मिरवली. थेट प्रतिकारशक्तीवरच हल्ला करणाऱ्या या आजारातून शरीराच्या बदललेल्या रचनेसह जगता येतं, जर तुम्ही ‘कम्फर्टेबल इन स्किन’ असाल तर. अशानं त्या स्थितीतही फॅशन व त्यातली अभिजातता तुम्ही टिकवू शकता हे सेल्मानं दाखवून दिलं. तिच्या या दृष्टिकोनाची चर्चा झाली नि कौतुकही. अशा खास ‘अ‍ॅडॅप्टिव्ह क्लोद्स’ वा स्वीकारार्ह कपडय़ांबद्दलच्या गरजेला सेल्मानं नव्यानं व्यासपीठ मिळवून दिलं.

कुठलेही नवे आजार किंवा अपंगत्व अपघातानं सामोरं येऊ दे की जन्मापासून असू दे, कपडय़ांचा प्रश्न किती भीषण असतो हे या स्थितीतल्या माणसांना नि त्यांच्या आसपास असणाऱ्या कुटुंबीय अथवा मदतनीसांना चांगलंच ठाऊक असतं. पण यावर करायचं काय याबद्दल चाचपडणं चालू राहातं. मला स्वत:ला अपघातातून पॅराप्लेजिया झाला. नसíगक विधींवर नियंत्रण नसण्यातून कपडे सारखे बदलावे लागायचे. लहान होते तोवर फ्रॉक नि वन पीस सोयीचा वाटायचा. पण तरी सलवार-कमीझ घालायचं खूप आकर्षण वाटे. माझ्या आजूबाजूला असणाऱ्या माझ्या वयातल्या मुली सलवार कुर्ता, लाँग स्कर्ट, पॅरलल असं काही-काही घालायच्या पण मला ती सोयच नव्हती. कपडे खराब झाले तर बदलायला सोपे म्हणून फ्रॉक्सच घालावे लागायचे. त्यातून बारीक झालेले पाय दिसायचे. स्वत:बद्दल फार बरं वाटायचं नाही. इतरांनाही माझ्याकडं पाहाताना बरं वाटत नसणार असं वाटायचं. पुढे गाव सोडून शहरात यायचं ठरलं नि सलवार कुर्ता शिवून घेतला. ओढणी गळ्यात घेताना काय आनंदून गेले होते मी! पण तरी एकूण शरीराचा बदलेला तोल समजून घेत अचेतन पाय हाताने उचलून सलवारमध्ये घालणं हे अध्र्या-पाऊण तासाचं काम असायचं. कारण तसं करताना मी तोल जाऊन पडायचे. कमरेपर्यंत सलवार सरकवून नाडी बांधणं आणखीनच कष्टाचं. मग कमरेला नाडीऐवजी इलॅस्टिक लावलं. मात्र संवेदना नसलेल्या कमरेच्या भागात ते रुतत राहिल्यानं रक्त साकळायचं. जखम होण्याची शक्यता बळावायची. अशा वेळी हळूहळू काहीतरी बदल करत मला कपडे सोयीचे करून घेता आले, पण आजूबाजूच्या मत्रिणींच्या कपडय़ात काळानुसार जी गंमत व ताजेपणा येत होता तो मी कुठून आणायचा? दुकानांमध्ये माझ्यासारख्यांसाठी उंची, जाडी, अडचणींचा विचार करून आणलेले कपडे नसायचेच. अपंग व्यक्तींसाठी जर काही करायचं तर त्यांना त्यातल्या त्यात वेळ न चुकवता जेवाखायला घालावं, कृत्रिम साधन मिळावं, शिक्षण जमेल तसं घेता यावं, याहून वेगळा विचार जनमानसात त्यावेळी रुळलेला नव्हता, अजूनही सरावाचा नाही. एखाद्या ‘व्हीलचेअर बाऊण्ड’ सर्वसामान्य मुलीनं डार्क लिपस्टिक लावून, खास अशा हेअरकटमध्ये घराबाहेर पडण्यासारख्या गोष्टीलाही दचकणाऱ्या बहुतांश समाजाला कपडय़ांमुळं येणारी आत्मविश्वासाची व समतेची भावना नि त्यातून व्यक्तिमत्त्वाची होणारी निरोगी वाढ कशी कळावी!

मात्र प्रत्यक्ष वागण्यातून, कृतीतून ते दाखवता येऊ शकतं. विविध प्रकारच्या नि वयातल्या अपंग स्त्री-पुरुषांना सोयीचे व काळानुरूप तजेलदार फॅशनचे विशेष घडवलेले कपडे म्हणजे ‘अ‍ॅडॅप्टिव्ह क्लोद्स’च्या उपलब्धतेनं हा प्रश्न सुटू शकतो. हा विषय आजवर महत्त्वाचा म्हणून टेबलावर आणलाच न गेल्यानं पुण्यातील ‘एकांश ट्रस्ट’ने आपल्या या चळवळीचं नाव ठेवलं ‘अ‍ॅड-ड्रेस नाऊ’, ‘आता इकडे पाहाच’ असा नि ‘कपडय़ांच्या महाकाय यंत्रणेत या ही कपडय़ांची भर घालणं गरचेचं!’ असाही याचा अर्थ. गेली १० वषर्ं ‘एकांश’ एक विशिष्ट ध्येय घेऊन काम करतेय. अपंगत्वाचा प्रश्न समग्रपणे पाहण्याचं व पाहायला लावण्याचं त्यांचं ध्येय आहे नि त्यासाठीचे मार्ग आहेत : जाणीवजागृती, स्वीकार, संवेदनाक्षम करणं आणि समावेश.

‘एकांश’च्या संस्थापक, कार्यवाह अनिता अय्यर स्वत:च्या अनुभवातून या प्रश्नाकडे वळल्या होत्या. नवऱ्याचा पाय फ्रॅक्चर होण्यातून किंवा सासूला वृद्धत्वामुळे आलेल्या अपंगत्वातून रोजच्या जगण्यात जी नवी उस्तवार करावी लागत होती त्यामुळं अपंगत्वाशी मत्रीपूर्ण कपडय़ांच्या समस्येचा त्या विचार करायला लागल्या होत्या. पाय दुखावला गेला असताना येणारी पँट घालण्याची अडचण असेल, ती न घालता आल्यानं लुंगीसारखं डिझाइन वेगळं बनवावं लागणार. प्रश्न केवळ डिझाइनमध्ये बदलाचा नाहीये, तर कॅलीपर्सच्या ज्या विशिष्ट भागात कपडा घासून फाटतो किंवा झिजतो, कुबडी घासून ज्या भागात कापडाची रचना बदलते त्याबद्दल विचार करून मुळात कापड निवडण्याची इथे गरज भासते.

‘व्हीलचेअरबाऊण्ड’ना बेडवरून व्हीलचेअरवर किंवा व्हीलचेअरवरून गाडीत नेताना सोपं पडावं यासाठी सुटसुटीत डिझाइन लागणार. त्यांच्यासाठी कपडे तयार करताना प्रत्येक अपंग व्यक्ती वेगळी असते याचा संपूर्ण विचार करून अतिशय काळजीपूर्वक कपडा व स्टाइलची निवड करणे गरजेचे असते.

अंध व्यक्तीला आपल्या कपडय़ांच्या कपाटातून योग्य निवड करण्याकरिता बा मदतीची गरज भासू शकत असेल. त्यांच्याकरिता कपडे तयार करायचे तर त्यांच्या गरजांच्या खूप खोल आकलनाची गरज आहे. मतिमंद मुलांपकी बहुतांश मुलं आपल्या मदतनीसाकरवी कपडे घालतात त्यामुळे इथे त्यांच्या कपडय़ांची रचना करताना दोघांच्याही गरजांचा व सोयींचा विचार करणं गरजेचे आहे. या मुलांपकी काहींच्या बाबतीत अंगावरचा कपडा आरामदायी नसेल तर ते अवघडून हालचाली करत राहातात, चिडचिड करतात, अनेकदा कपडे फाडून टाकण्याची घटना घडते. या मन:स्थितीचा विचार करता यायला हवा. अपघातामुळं हात, पाय किंवा बोटं फ्रॅक्चर होतात तेव्हाही ‘अ‍ॅडॅप्टिव्ह क्लोदिंग’ उपलब्ध असतील तर अडचणी कितीतरी सुस होऊ शकतात. आणि शेवटी हे लक्षात घ्यायलाच हवं की, ज्या अपंग व्यक्तींना अंघोळ, कपडे काढणं-घालणं यासारख्या गोष्टींसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं तिथं ‘अ‍ॅडॅप्टिव्ह क्लोदिंग’सारख्या गोष्टीला दुसरा पर्यायच नाही.

म्हणूनच आता भारतात या प्रश्नाचा विचार करण्याची खूप गरज निर्माण झाली आहे. आधी  सांगितल्याप्रमाणे परदेशांमध्ये काही प्रमाणात काही ब्रँड्स, मोठय़ा कंपन्या ‘अ‍ॅडॅप्टिव्ह क्लोदिंग’बाबत विचार, काम करताहेत पण भारतात मात्र या विचाराची सुरुवात व तिचे कृतीत रूपांतर होण्याची गरज निर्माण झाली आहे. मुळात ‘ही गरज आहे.’ याची जाणीवजागृती करण्यापासून आम्ही कामाला सुरुवात केली आहे. त्यातून भारतात मोजक्या डिझाइनर्सनी व्यक्तिगत स्तरावर विशिष्ट अपंग व्यक्तीशी किंवा काही एनजीओंशी जोडून घेत कामाला सुरुवात केलीय. अर्थातच हे पुरेसं नाही तर टेक्स्टाइल, फॅशन डिझाइन याबद्दल प्रत्यक्ष शिक्षण देणाऱ्या संस्था, महाविद्यालये, विद्यापीठं यातले विद्यार्थी हे उद्याचे उद्योजक असणार आहेत. तेच ही चळवळ पुढे नेऊ शकतात, म्हणून आमचं लक्ष्य हे त्यांना यातल्या बारीक-बारीक गोष्टींबद्दल संवेदनशील वा जागरूक करणं यात गुंतलेली आहे.

केवळ योग्य तऱ्हेचे मत्रीपूर्ण कपडे नसल्याने अपंग व्यक्तींच्या रोजच्या जगण्यात किती तऱ्हेच्या आव्हानांना त्यांना सामोरं जावं लागतं याची चर्चा व संवाद करत राहणं गरजेचं आहे. अगदी एखाद्या डिझाइन स्टोअर किंवा मॉलमध्ये कपडय़ांचे अल्टरेशन करण्यासाठी एखाद्या टेलरची उपलब्धता असण्यातूनही या प्रश्नांवर उत्तर द्यायला सुरुवात केल्यासारखं होईल.

टेक्स्टाइल व फॅशनचे शिक्षण देणाऱ्या संस्थांनी अभ्यासक्रमांमध्ये ‘अ‍ॅडॅप्टिव्ह क्लोदिंग’ हा विषय घ्यावा किमानपक्षी त्यांनी याबद्दलचा एखाद-दुसरा प्रकल्प करायला तरी विद्यार्थ्यांना जरूर द्यावा व त्यातून याबद्दलची संवेदनशीलता घडवावी, त्यातून काही वेगळे विचार पुढे येतील यासाठी भारतभरातल्या महाविद्यालयं व विद्यापीठांशी आम्ही बोलतो आहोत. त्यांच्यापर्यंत पोहोचतो आहोत. गेली दोन वर्ष हे काम करताना विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या बदलामुळं मी आशावादी आहे.

अपंग माणसांच्या अडचणी, स्वप्रतिष्ठा जपण्यात पोशाखाचा असणारा वाटा, आजच्या फॅशनच्या आधुनिक जगात वावरता आल्याने त्यांचा वाढणारा आत्मविश्वास या गोष्टी एकूण देशाबद्दलच्या चित्रातही अतिशय महत्त्वाच्या आहेत.

अपंग माणसांचं आयुष्य व काम अधिक परिणामकारक व्हावं म्हणून कॉर्पोरेट व अन्य क्षेत्रात म्हणूनच आम्ही विशेष कार्यशाळाही घेत आहोत. शेवटी प्रश्न आत्मप्रतिष्ठेचा आहे. तिथं नेमकं व मुद्देसूद शिवाय भावनांसहित काम करावं लागतं. हे इतकं कळकळीने सांगत यासाठी राहायचं की ‘अ‍ॅड ड्रेस नाऊ’ ही केवळ राष्ट्रीय नाही तर जागतिक पातळीवरची चळवळ बनायला हवी आहे. अपंग माणसांच्या जगण्यात ‘फॅशन’ने अतिशय दिमाखात प्रवेश करण्याचं (रुजवण्याचं) काम एकटय़ादुकटय़ाचं नाही, यात सगळ्यांनीच उत्कट इच्छाशक्तीने उतरण्याची, ध्येयाने सतत)पुढे चालत राहण्याची गरज आहे.

geetacastelino@gmail.com

chaturang@expressindia.com