विद्यावाचस्पती प्रा.स्वानंद गजानन पुंड sgpund@rediffmail.com

आद्य, वेदप्रतिपाद्य, स्वसंवेद्य, आत्मरूप असणारा मोरया ज्ञानेश्वर माउलींच्या वंदनाचा विषय आहे. ज्याला उपनिषद्, वेदांत तत्त्वज्ञान परब्रह्म स्वरूपात वर्णन करते, ज्याला शास्त्रात ओंकार ब्रह्म स्वरूपात निर्देशिले जाते, त्याच तत्त्वासाठी माउलींचे कथन आहे,  ‘देवा तूंचि गणेशु!’ अर्थात ते निर्गुण निराकार परब्रह्म तत्त्व हेच माउलींचे प्रतिपाद्य असले, तरी ते अवर्णनीय आहे. ज्ञानदेवांच्या ओव्यामधील गणेश स्वरूपाचे हे निरूपण.

boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..

माउली ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ‘भावार्थदीपिका’ या भगवद्गीतेवरील अलौकिक टीकेच्या आरंभी मंगलाचरण स्वरूपात भगवान गणेशांचे वंदन केले आहे. आपल्या लोकविलक्षण प्रतिभेने माउली ज्या गणेशांना वंदन करतात त्यांचे स्वरूप आपल्या मनात वसलेल्या स्वरूपापेक्षा खूपच वेगळे, वास्तव आणि शास्त्रसंमत आहे.

माउली ना पार्वतीपुत्र गणेशाला वंदन करत, ना शिवपुत्राला. त्यांचे प्रतिपाद्यही शिवगणांचे प्रमुख नाहीत. पहिल्याच ओळीत आपल्याला हे स्वरूप स्पष्ट होते. आद्य, वेदप्रतिपाद्य, स्वसंवेद्य, आत्मरूप असणारा मोरया माउलींच्या वंदनाचा विषय आहे. ज्याला उपनिषद्, वेदांत तत्त्वज्ञान परब्रह्म स्वरूपात वर्णन करते, ज्याला शास्त्रात ओंकार ब्रह्म स्वरूपात निर्देशिले जाते, त्याच तत्त्वासाठी माउलींचे कथन आहे, ‘देवा तूंचि गणेशु!’ अर्थात ते निर्गुण निराकार परब्रह्म तत्त्व हेच माउलींचे प्रतिपाद्य असले तरी ते अवर्णनीय आहे. माउली मात्र गीतार्थ निरूपणासाठी सज्ज झाली आहे. त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञा केली आहे,

तेणेकारणे मी बोलीन।

बोली अरूपाचे रूप दावीन।

अतींद्रिय परी भोगवीन। इंद्रियाकरवी।।

त्यामुळे त्यांना त्या निर्गुण निराकार तत्त्वाला सगुण, साकार स्वरूपात आपल्यासमोर सादर करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र ते करीत असताना त्याच्या निर्गुणत्वाला बाधा येणार नाही याची माउली पुरेपूर काळजी घेत आहेत.

नेमक्या याच स्थानावर श्री गणेशाचे वैभव लक्षात येते. त्यांच्या सगुण स्वरूपाचे वर्णन करताना देखील त्यांच्या निर्गुणत्वाला बाधा येत नाही. मोरयाचे हे स्वरूपसिद्ध वैशिष्टय़ आहे. आता परब्रह्माला सगुण-साकार करायचे म्हटल्यावर माध्यम देखील तसेच लागणार. माउलीच्या अद्वितीय प्रतिभेने त्यासाठी निवडलेले माध्यम आहे शब्दब्रह्म. परब्रह्माचे वर्णन शब्दब्रह्मच करू शकतात, ही माउलींची भूमिका नितांत चिंतनीय आहे.

शब्दब्रह्म अर्थात ओंकार किंवा वेदवाङमय अर्थात श्रुतींच्या निस्वार्थ असल्यामुळे निर्दोष असणाऱ्या शब्दांना माऊली मोरयाचे वर्णवपू रूपात वर्णन करते.

पुढे स्मृती म्हणजे अवयव, पुराणे म्हणजे मणिबंध अर्थात दागिने, पद बंध म्हणजे वस्त्र, काव्य नाटक म्हणजे त्यावर जडवलेल्या अत्यंत आकर्षक क्षुद्रघंटिका- छोटी छोटी घुंगरे, अशी माउलींनी केलेली प्रत्येक मांडणी अद्वितीय रमणीय आहे,अनुपमेय अशी चिंतनगर्भ आहे.

या प्रत्येक घटकातील साधम्र्य आपण जितके पाहत जाऊ तितके थक्क होऊ. हालचाल, कृती यांचा संबंध स्मृती अर्थात नियमांशी असल्याने स्मृती तेची अवयव, पुराणांच्या मुळे ते प्रतिपाद्य तत्त्व सहज आणि आकर्षक स्वरूपात कळते. त्यामुळे पुराण म्हणजे मणिबंध, दागिने अशा स्वरूपात प्रत्येक सहसंबंध समजून घेता येतो.

अर्थात हे सर्व सांगत असताना माउली आपले लक्ष कायम प्रमेयाकडे आकर्षित करते. अगदी काव्य नाटक वाचत असतानादेखील आपले लक्ष त्या अर्थस्वरूप प्रमेयावरच असले पाहिजे हा माउलींचा कटाक्ष अत्यंत महत्त्वाचा आहे.

ते प्रमेय आहे, ‘ देवा तूंचि गणेशु!’

माउलींच्या गणेश वर्णनाच्या दुसऱ्या टप्प्यात आरंभी माउलींनी षट्भुज गणेशाचे वर्णन केले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये वर्णन केलेली सहा दर्शने ही श्री मोरयाच्या हातातील सहा आयुधे आहेत, हे माउलींना विशेषत्वाने सांगायचे असल्याने त्यांनी सहा हाताच्या गणेशाचे वर्णन केले. या सहा आयुधांचा विचार करताना तर्कशास्त्र अर्थात न्यायदर्शन म्हणजे परशु, नीतिशास्त्र अर्थात वैशेषिक दर्शन म्हणजे अंकुश, वेदांत अर्थात उत्तर मीमांसा दर्शन म्हणजे मोदक, योगदर्शन म्हणजे दन्त, सांख्य दर्शन म्हणजे कमळ  आणि धर्मशास्त्र अर्थात पूर्वमीमांसा म्हणजे अभय हस्त ही माउलींची अद्वितीय रचना आहे.

या प्रत्येक गोष्टीमधील साम्य समजून घेणे हा केवळ एखाद्या निबंधाचा नव्हे तर प्रबंधाचा विषय आहे.

अर्थात एवढे सगळे केले तरी या सर्व दर्शनाच्या माध्यमातून जे ज्ञान होणार आहे, ते शेवटी सगुण-साकार स्वरूपाचेच होणार आहे. त्यामुळे या वर्णनापर्यंतचा सर्व भाग हा शरीराच्या वर्णनाचा असल्याने शेवटी तो अशाश्वताच्याच क्षेत्रातील आहे, ही माउलींची भूमिका अत्यंत शांतपणे समजून घ्यायला हवी.

या स्तरावर माउली विवेकाचे महत्त्व सांगते. विवेक शब्दासाठी शास्त्रात ‘नित्यानित्य वस्तू विवेक’ असा शब्दप्रयोग केला जातो. अनित्य गोष्टीला ‘जग’ असे म्हणतात. त्याचा विपरीत त्याला ‘गज’ असे म्हणतात. हे गज अर्थात निर्गुण निराकार तत्त्व हीच मोरयाची खरी ओळख आहे. त्यासाठीच मोरयाला गजानन असे म्हणतात. अनित्य त्याग करीत नित्य गजाचा ध्यास मनात जागवते त्या सोंडेला माउली यासाठीच विवेक असे म्हणत आहेत.

त्या सोंडेच्या वर गेल्यावर माउलींनी मोरयाच्या दोन दातांचे वर्णन केले आहे.

त्या दोन दातांपैकी एक खंडित झालेला आहे. दोन अर्थात द्वैत. ते मोरयाच्या जवळ आले की खंडित होते. द्वैतात वाद असतात. अद्वैतामध्ये संवाद आहे. त्यामुळे माउली दातांना संवाद असे म्हणते. तो संवाद शांतता प्रदान करतो. त्यामुळे शांततेचा पांढरा रंग माउलींनी विशेषत्वाने वर्णिला आहे.

त्या पुढे दोन मीमांसा अर्थात धर्मशास्त्र आणि वेदांत यांना माउली मोरयाचे कान म्हणताहेत. धर्मशास्त्रानुसार केलेली भक्ती आणि वेदांतानुसार प्राप्त होणारे ज्ञान यांचेच श्रवण भगवान करतात हे किती सुंदर वर्णन आहे.

त्या कानांपाशी आत्मबोधाची मदरेषा निर्माण झालेली आहे. आत्मबोधाची म्हणत असताना त्यामध्ये सामान्य हत्तीचा मद असणार  नाही, तेथे कामवासनेचा भाव नाही, हे माउली किती सहज अधोरेखित करते. सामान्य हत्तीच्या मदामुळे माशा आकर्षित होतात आणि त्या त्यात फसतात. मोरयाच्या कृपा मदाने जीव उद्धरून जातात हे सांगण्यासाठी माउली त्यावर येणाऱ्या ऋषी-मुनी रूप भ्रमरांचा विचार मांडत आहे. जे अखंड तत्त्वज्ञानाचे किंवा भक्तीचे निरूपण करीत असतात. त्या आनंदात मोरया डोलत असतो ही अवस्था अत्यंत मनोवेधक आहे.

शेवटी ज्ञानरूपी मकरंदाने भरलेली दहा उपनिषदे मोरयाच्या मस्तकावरील पुष्प आहेत असे म्हणत, यांचे सर्व श्रेष्ठत्व सांगत माउली या वर्णनाचा कळस साधते. माउलींच्या गणेश वंदनेतील सर्वोपरी श्रेष्ठ ओवी म्हणजे,

अकार चरणयुगुल ।  उकार उदर विशाल ।

मकारू महामंडल । मस्तकाकारे ।।

या ओवीमध्ये माउली मोरयाच्या ओंकार ब्रह्मस्वरूपाला अत्यंत सुस्पष्टरीत्या आपल्यासमोर स्थापित करीत आहे. ओंकार तत्त्वात असणाऱ्या अ,उ आणि म् या तीन मात्रांना माउली मोरयाचे अनुक्रमे चरण, उदर आणि मस्तक अशा तीन अवयव स्वरूपात सांगून अत्यंत निसंदिग्धरीत्या मोरया म्हणजेच ओंकार आणि ओंकार म्हणजेच मोरया हे ठासून सांगत आहे. या तिन्ही मात्रा जेव्हा एकवटतात त्या वेळी जे परिपूर्ण शब्दब्रह्म, ओंकारब्रह्म, परब्रह्म शास्त्रात निर्देशिले जाते त्यालाच माउली म्हणते,‘ देवा तूंचि गणेशु !’

या गणेशोत्सवाच्या काळात मोरयाची आराधना करताना हे सर्व चिंतन आपल्या मनात रुंजी घालत राहावे, मोरयाचे हे परम वास्तव स्वरूप आपल्याला यथार्थरीत्या कळावे यासाठी श्री गणरायाच्या चरणी विनम्र प्रार्थना.