22 November 2019

News Flash

अवघड जागेचं दुखणं!

मूळव्याध या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे. हे दुखणे फक्त गुदद्वाराचे नसून यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आपण जे खातो त्याचेच पचन होऊन

| November 15, 2014 01:19 am

01-samnaमूळव्याध या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे. हे दुखणे फक्त गुदद्वाराचे नसून यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आपण जे खातो त्याचेच पचन होऊन उरलेला मल शरीराद्वारे बाहेर फेकला जातो. त्यामुळे तिखट, मसालेदार, चमचमीत पदार्थ खाणे, काही स्ट्राँग औषधे घेणे, वेळच्या वेळ शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबीही यासाठी कारणीभूत ठरू शकतात. योग्य वेळी त्यावर उपचार करणे हाच त्यावरचा उत्तम मार्ग आहे.गुदद्वाराची दुखणी सहजासहजी न दिसणारी, सांगायला अवघड वाटणारी, पण उठता-बसता कष्टप्रद अशीच असतात. स्वत:ला दिसत नाहीत- बघता येत नाही; परंतु हे दु:ख रात्रंदिवस पिच्छा सोडत नाही. विशेषत: शौचाला जायच्या कल्पनेनेसुद्धा डोळय़ांसमोर काजवे चमकू लागतात. त्यातून रक्तस्राव होत असेल, तर परिस्थिती आणखीनच गंभीर बनते. अनेकदा जाहिरातींना भुलून वैद्य, भोंदू, बंगाली बाबा आदीं कडून अघोरी उपचार घेतले जातात आणि मग जंतुसंसर्ग, वेदना इ. गुंतागुंत वाढून जगणे असह्य़ होऊ शकते.

सर्वप्रथम मूळव्याध म्हणजे नेमके काय हे नीट समजून घेऊ. मूळव्याधामध्ये गुदद्वारा (Anus) बाहेरील (External) आणि आतील (internal) आवळशक्ती स्नायूंच्या द्वारा (Sphincter) मल विसर्जनावर नियंत्रण ठेवीत असतो. त्यायोगे आपण अनुकूल परिस्थिती नसल्यास शौचाची प्रक्रिया रोखून धरू शकतो. सकाळी जेव्हा शौचाची भावना होते तेव्हा डावीकडचे मोठे आतडे आकुंचन पावून मल पुढे ढकलण्यास संदेश देते. ही प्रक्रिया नीटपणे पार न पडल्यास जोर करावा लागतो. मल घट्ट असल्यास जखम होणे किंवा फार काळ अंगावर काढल्यास चुंबळ बाहेर येणे असा त्रास होतो. ‘गुदद्वार बंद करताना लंबगोल आकाराचे दिसते; परंतु पूर्णपणे उघडल्यावर गोलाकार होते.
एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे. हे दुखणे फक्त गुदद्वाराचे नसून यात अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. आपण जे खातो त्याचेच पचन होऊन उरलेला मल शरीराद्वारे बाहेर फेकला जातो. त्यामुळे तिखट, मसालेदार, चमचमीत पदार्थ खाणे, काही स्ट्राँग औषधे घेणे, वेळच्या वेळ शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबी यासाठी कारणीभूत ठरू शकतात. पूर्वी चाळिशीनंतर मुख्यत्वे करून होणारा हा आजार हल्ली तरुण वर्गात विशेष आय.टी.,बी.पी.ओ.मध्ये काम करणाऱ्या मुलामुलींमध्ये मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे.
या सर्व प्रक्रियेची सुरुवात मलावरोध (constipation) पासून होते. बहुतांश वेळा ‘रात्री पार्टीला गेलो, सकाळी ऑफिसला जायला उशीर झाला आणि शौचाला खडा झाला आणि खूप दुखले’ इथून सुरुवात होते. अशा वेळी संडासच्या जागी फाटून फिशरची सुरुवात होते. सुरुवातीला ही जखम फारसे काही न करता भरतेदेखील! परंतु वेळीच सावध न होऊन खाण्या-पिण्याच्या सवयी न बदलल्यास हे दुखणे बळावत जाते. मग हाताला कोंब (सेंटीनल पाइल) लागायला सुरुवात होते. कधी तरी हा कोंब सुजतो, अचानकपणे फुगतो आणि मग बसणेही कष्टप्रद होऊन जाते.
संडासला कायम जोर करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे मूळव्याध होऊ शकते. मूळव्याधीचे अंतर्गत मूळव्याध (internal piles) आणि बाहेरील मूळव्याध (External piles) असे दोन प्रकार आहेत. मूळव्याधीचे तीन मुख्य कोंब घडय़ाळातील २ .७ . ११ स्थानांप्रमाणे आढळून येतात. यांना प्रायमरी पाइल्स असे म्हणतात. इतर जागी असणाऱ्या कोंबांना सेकंडरी पाइल्स असे संबोधले जाते. या मूळव्याधीमध्ये रक्तस्राव होण्याचे प्रमाण जास्त असते. फार काळ दुर्लक्ष केल्यास अंतर्गत कोंब बाहेर येऊन गुदद्वाराची संपूर्ण चंबळच बाहेर येते.
काही वेळेस जंतुसंसर्ग होऊन गुदद्वाराच्या बाजूला गळू तयार होते. त्याचा शस्त्रक्रियेद्वारा योग्य पद्धतीने निचरा न केल्यास ते रेक्टरमध्ये फुटते आणि ‘भगंदर’ तयार होते. छोटी पुटकुळी येऊन ती फुटून त्यातून पू निघणे असा त्रास अंगावर काढल्यास जंतुसंसर्ग वरच्या दिशेने पसरून गुंतागुंतीचा ‘हाय अनल फिस्तुला’ होऊ शकतो.
मूळव्याध ही आनुवंशिक असतो का? असा प्रश्न अनेक जण विचारतात. आनुवंशिकतेबद्दल खात्रीपूर्वक सांगता येत नाही, परंतु एकाच कुटुंबातील काही लोकांना हा त्रास होत असल्यास जेवणा-खाण्याच्या सवयी, जेवण्याच्या वेळेतील अनियमितता, व्यायामाचा अभाव, रात्री उशिरापर्यंत जागणे आदी सवयी विचारात घ्याव्या लागतात. भारतीयांमध्ये सकाळी उठून शौचास जाणे, खाली बसून मलविसर्जन करणे आदी चांगल्या सवयींमुळे मूळव्याधीचे प्रमाण पाश्चात्त्य देशांतील लोकांपेक्षा कमी आहे. हल्ली कमोडचा वापर आणि अनियमित जीवनशैली यामुळे आपल्याकडेही, विशेषत: तरुण वर्गात मूळव्याधीचे प्रमाण वाढते आहे.
उपचार पद्धतीत शस्त्रक्रिया हा शेवटचा उपाय. त्याआधी ज्या कारणांनी किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे संडासला खडा होतो त्यात बदल करणे गरजेचे आहे. मधुमेह, कृमी, अमिबियासिस किंवा पोटातील जंतुसंसर्ग यापैकी काही त्रास असल्यास यावर उपचार करणे गरजेचे आहे. तसेच कायमस्वरूपी खडा न होईल याबाबत खबर घेणे गरजेचे आहे.
हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घेणे किंवा दही, ताक याचा वापर करणे, रोज अडीच ते तीन लिटर पाणी पिणे, नाश्ता व जेवण वेळच्या वेळी घेणे, जेवणानंतर शतपावली करणे, तिखट, मसालेदार, तळलेले चमचमीत पदार्थ टाळणे, रात्रीची झोप व्यवस्थित घेणे, जागरण टाळणे, सकाळी उठल्यावर नियमितपणे शौचास जाणे आदी उपायांची मदत होते. मल मऊ होण्याकरिता इसबगोल, लिक्ड पॅराफीन एरिडेल, क्रिमॅफीन, मिल्क मॅग्नेशिया, लॅक्टय़ुलोझ यांसारखी औषधे वापरता येतात. गुदद्वाराचा दाह कमी करण्याकरिता अनेक प्रकारची वेदनाशामक मलमे उपलब्ध आहेत. वेदना फार असल्यास वेदनाशामक गोळय़ा आणि जंतुसंसर्ग असल्यास प्रतिजैविकांचाही वापर केला जातो. संडासला जाऊन आल्यावर टपात कोमट पाण्यात बसून शेक घेण्याने दाह कमी होतो. वरील सर्व उपचारांनी आराम न मिळाल्यास शस्त्रक्रियेचा मार्ग अवलंबिण्यात येतो.

१) फिशर- फिशरसाठी संडासचा मार्ग मोठा करणे (stretching) आणि जुनाट फिशर असल्यास किंवा कोंब असल्यास तो काढून टाकणे हे उपाय असतात. संपूर्ण भूल किंवा स्पायनल अॅनेस्थेशिया देऊन ही शस्त्रक्रिया केली जाते. आठवडाभर विश्रांती, पाण्यात बसून शेक घेणे, ड्रेसिंग करणे, शौचाला खडा होऊ न देणे अशी खबरदारी घेतल्यास सहसा पुन्हा हा त्रास होत नाही.

२) मूळव्याध-
(अ) इंजेक्शन : लहान कोंब असल्यास मूळव्याधीच्या कोंबात फिनॉल आणि बदामाच्या तेलाचे इंजेक्शन देऊन फायदा होऊ शकतो. सहा आठवडय़ांच्या अंतराने तीन वेळा अशा प्रकारचे इंजेक्शन देता येते.
(ब) बँडिंग : मूळव्याध मोठा असल्यास बॅरनच्या उपकरणाच्या साहाय्याने बँड लावून कोंबाचा रक्तप्रवाह बंद केला जातो. यामुळे काही दिवसांत कोंब वाळतो आणि गळून पडतो. एका वेळी दोनच कोंबांवर अशा प्रकारे उपचार करता येतात. ही शस्त्रक्रिया वेदनारहित असून पेशंट काही वेळाने घरी जाऊ शकतो.
(क) क्रोयोसर्जरी : लिक्विड नायट्रोजनद्वारे मूळव्याध गोठवला जातो. हा कोंब नंतर गळून जातो. हल्ली अशा प्रकारे शस्त्रक्रिया केली जात नाही, कारण गोठविलेल्या कोंबातून बरेच दिवस स्राव होत राहतो आणि वेदनाही होतात.
(ड) इन्फ्रारेड फोटोकोअॅगुलेशन : या पद्धतीत विशिष्ट उपकरणाचा वापर केला जातो. मूळव्याधीचे कोंब बाहेर येत नसतील तरच अशा प्रकारे शस्त्रक्रिया करणे उचित आहे.
(इ) मूळव्याध काढून टाकणे : कोंब मोठे असल्यास, गुदद्वाराच्या बाहेर येत असल्यास किंवा खूप जुनाट असल्यास शस्त्रक्रियेशिवाय उपाय नसतो. पोट साफ होण्याचे औषध आणि एनिमा ऑपरेशनच्या आधी घेणे गरजेचे असते. भूल देऊन संडासचा मार्ग मोठा करून मूळव्याधीचे कोंब सोडवून बांधले जातात. रक्तस्राव पूर्णपणे थांबविणे गरजेचे असते. शस्त्रक्रियेनंतर १०-१२ दिवस मलमपट्टी, शेक घेणे, संडास साफ होण्याकरिता औषधे घेणे गरजेचे असते.
(ई) अल्ट्रासाऊंड सर्जरी हा एक पर्याय उपलब्ध आहे.
(फ) लेझर सर्जरी नव्याने विकसित झाली आहे.

३) भगंदर (fistula inano) : क्षारयुक्त भगंदराच्या आतून गुदद्वारातून बाहेर काढून बांधले जाते. कालांतराने हा धागा हळूहळू बाहेर येतो आणि भगंदर बरा होतो.
* शस्त्रकर्म –
१) भगंदर वरवरचा असेल तर तो मार्ग कापून उघडा ठेवला जातो. २) भगंदराचे तोंड जर पुढच्या बाजूस असेल तर शस्त्रक्रिया सुलभ असते आणि जखम लवकर भरून येते. ३) भगंदर खूप जुनाट आणि खोलवर गेलेला असेल तर बऱ्यापैकी मोठी शस्त्रक्रिया करून सर्व पाळंमुळं काढून टाकावी लागतात. हा उघडा असलेला भाग भरून येण्यास क्वचित प्रसंगी ३-४ आठवडे लागू शकतात. भगंदराबरोबर इतर काही आजार उदाहरणार्थ- क्षयरोग, कर्करोग, अल्सेरेटिव्ह कोलायटिस् फ्रॉन्स डिसीज असल्यास डाव्या बाजूला कोलॉस्टॉमी करून फिस्टुला पूर्ण बरा होईपर्यंत मलमार्ग पोटावर काढून दिला जातो.
एकूणच तात्पर्य सांगायचे झाले तर संडासला खडा होणे, बद्धकोष्ठ होणे या बाबी मुळातच दुरुस्त केल्या आणि सुरुवातीलाच लक्ष देऊन, दुर्लक्ष न करता योग्य उपचार केल्यास पुढील गुंतागुंत आणि वेदना टाळता येतात.

First Published on November 15, 2014 1:19 am

Web Title: how to cope with painful piles
टॅग Health
Just Now!
X