करून बघावे असे काही

० फ्रिज भिंतीपासून ५-६ इंच आणि गॅसपासून ६ फूट लांब ठेवावा किंवा हवेशीर जागेवर ठेवावा. कारण कॉम्प्रेसरमधून येणारी गरम हवा खेळती राहिली नाहीतर पुन्हा येणाऱ्या हवेमुळे उष्णता वाढून त्याचा परिणाम फ्रिजच्या तापमानावर होतो.
० फ्रिज नेहमी सपाट जागेवर ठेवावा. उंचसखल भागावर तो हलता राहिल्यास त्याचा कॉम्प्रेसर खराब होण्याची शक्यता असते.
० फ्रिजमध्ये कधीही गरम पदार्थ ठेवू नये. गरम पदार्थामुळे कॉम्प्रेसरवर दबाव येवून फ्रिजची क्षमता कमी होते व फ्रिजमध्ये जीवाणू वाढून इतर पदार्थ खराब होण्याची शक्यता असते.
० फ्रिज चालू असताना त्याचा दरवाजा २०-२५ सेकंदापेक्षा जास्त वेळ उघडा ठेवू नये. दरवाजा जास्त वेळ उघडा राहिल्यास फ्रिजच्या आतील तापमानात वाढ होवून कॉम्प्रेसर थंडावा मिळविण्यासाठी जास्त वेळ घेतो त्यामुळे वीज बीलही वाढते.
० आठवडय़ातून एकदा फ्रिजमध्ये काय शिल्लक आहे हे तपासून पहावे. दुर्लक्ष झाल्याने पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. नको असलेल्या गोष्टी टाकून द्याव्यात.
० फ्रिजमध्ये भांडी किंवा इतर वस्तू ठेवताना फ्रिजच्या कडांना चिकटून ठेवू नये. सर्व बाजूने हवा खेळती राहिल्यास पदार्थाना व्यवस्थित थंडावा मिळतो.
० फ्रिजच्या प्रत्येक भागाचे तापमान वेगळे असते. प्रत्येक रॅकचे तापमान लक्षात घेऊन त्याप्रमाणे पदार्थ ठेवल्यास पदार्थ जास्त टिकेल, घाईघाईत पदार्थ काढताना सांडासांड होणार नाही.
० फ्रिजच्या अगदी तळाच्या भागात थंडावा जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी भाज्या, फळे, ठेवावी. फुले, पालेभाज्या कागदात किंवा कपडय़ात गुंडाळून ठेवाव्या.
० फ्रिजमध्ये भाजीच्या ट्रेमध्ये स्पंज ठेवावा. त्यामुळे ट्रेमधला दमटपणा शोषून जातो. स्पंज न मिळाल्यास टर्किशचा नॅपकीन भाज्यांवर पसरून घालावा म्हणजे भाज्यांवर पाणी जमून त्या कुजणार नाहीत.
० फ्रिजरमध्ये बर्फ करण्यासाठी ट्रे खाली बटर पेपर किंवा पॉलिथिन पसरून ठेवावा व नंतर ट्रेमध्ये पाणी भरून ट्रे त्यावर ठेवावा म्हणजे बर्फ झाल्यावर ट्रे बाहेर सहजपणे काढता बाहेर येईल.
० उन्हाळ्यात फ्रिजरचे कुलिंग वाढवावे किंवा नॉर्मल ठेवावे व थंडीमध्ये कुलिंग कमी करावे. योग्य कुलिंग न मिळाल्यास अंडी फुटणे, पदार्थावर बर्फाचा थर जमणे किंवा पदार्थ खराब होण्याची शक्यता असते.
० डीप फ्रिजरमध्ये मासे, चिकन, मटन, दूध, ओले खोबरे (किसून) ठेवता येते. फ्रिजरमधील वस्तू डिफ्रॉस्ट करायची झाल्यास ती फ्रिजमध्येच काढून ठेवावी किंवा वापरण्या आधी १-२ तास आधी बाहेर काढून ठेवावी.
० विजेचा दाब कमी जास्त होऊ लागल्यास फ्रिज बंद करा. नाहीतर कॉम्प्रेसर निकामी होऊन फ्रिजचे नुकसान होण्याचा संभव असतो.
० फ्रिज बंद करून तो लागलीच सुरू करू नये. कॉम्प्रेसरमधील दाब एकसारखा होण्यास वेळ लागतो. त्यामुळे ५-१० मिनिटे जाऊ द्यावीत. बंद करून ताबडतोब सुरू केल्यास कॉम्प्रेसरवर लोड येऊन त्याचे नुकसान होऊ शकते.
० फ्रिज साफ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि पाणी यांचे मिश्रण करून फ्रिज साफ करावा.
० फ्रिजमध्ये पदार्थ ठेवताना बंद डब्यात ठेवावे त्यामुळे त्या पदार्थाचा वास इतर पदार्थाला लागणार नाही. फ्रिजमध्ये कायम कापलेले लिंबू आणि ब्रेडच्या स्लाइस ठेवाव्या त्यामुळे फ्रिजमधील वास शोषला जाईल.
० फ्रिजच्या दाराच्या रबरी गास्केटला टॅल्कम पावडर लावून गास्केट कोरडय़ा कपडय़ाने पुसून घ्यावे.

संकलन- उषा वसंत
unangare@gmail.com