04 December 2020

News Flash

सायक्रोस्कोप : तसं घडायलाच नको होतं!

आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात, ज्या जशा घडल्या त्यापेक्षा वेगळ्या प्रकारे घडल्या असत्या, तर कदाचित आपली आजची परिस्थिती वेगळी असती.

गौरव आणि राधिका यांच्याप्रमाणे तुमच्याही मनात ‘तसं घडायलाच नको होतं’चे विचार थैमान घालत असतील, तर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर त्यातून बाहेर पडण्याचा निश्चय करा.

डॉ. अंजली जोशी – anjaleejoshi@gmail.com

आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात, ज्या जशा घडल्या त्यापेक्षा वेगळ्या प्रकारे घडल्या असत्या, तर कदाचित आपली आजची परिस्थिती वेगळी असती. ‘तसं घडायलाच नको होतं,’ असं म्हणताना अगदी भूतकाळात जाऊन आपण ती घटना बदलू शकलो असतो तर किती बरं झालं असतं, असंही वाटत राहातं. ते शक्य नसल्याची सल मनाला लागून राहते. प्रत्येकाला हे असं वाटण्याची कारणं वेगळी असली, तरी या हतबलतेच्या विचारांवर नियंत्रण मिळवण्याचे काही मानसशास्त्रीय टप्पे आहेत. त्या टप्प्यांनुसार विचार करण्याचा प्रयत्न केला तर विचारांना निरोगी दिशा नक्की देता येईल.

‘‘व्हिसा वेळेवर मिळाला असता तर माझं आयुष्य संपूर्ण बदललं असतं. आज मी आंतरराष्ट्रीय कंपनीत मानाच्या हुद्दय़ावर विराजमान झालो असतो. एका जगप्रसिद्ध कंपनीच्या परदेशातील ऑफिसमध्ये मला ताबडतोब रुजू व्हायचं होतं. सगळी तयारी पूर्ण झाली होती. पण व्हिसा मिळायला इतका वेळ लागला, की रुजू व्हायची मुदत संपून गेली. अशी दुर्मीळ संधी एकदाच येत असते. ती हातातून निसटल्याचं दु:ख मला सतत डागण्या देतं. ती मिळाली असती तर मी किती यशस्वी होऊ शकलो असतो, याचं चित्र पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर येतं आणि मग सध्याची नोकरी मला फार सामान्य वाटते. नवीन काही करण्यातला रसच निघून जातो. सुवर्णसंधी समोर येऊनही हुलकावणी देऊन निघून जाण्यापेक्षा ती आलीच नसती तर बरं झालं असतं!’’ गौरव सांगतो.

‘‘स्वप्निल माझ्या आयुष्यात आला नसता तर आज मी यशस्वी नाटय़ अभिनेत्री म्हणून नावारूपाला आले असते. महाविद्यालयात पाऊल ठेवताना अभिनयाची खूप मोठी स्वप्नं मनाशी बाळगली होती. नाटकाच्या प्रत्येक स्पध्रेत उदयोन्मुख कलाकार म्हणून मी चमकत होते. पण स्वप्निलच्या प्रेमात आकंठ बुडाले आणि त्याला नाटकात काम करणं पसंत नव्हतं म्हणून बहरत आलेली कारकीर्द मी वाऱ्यावर उधळून दिली. तेव्हा वाटायचं की प्रेम हेच सर्वश्रेष्ठ आहे, बाकी सर्व ऐहिक गोष्टी निर्थक आहेत. पुढे मग आमचं ब्रेकअप झालं, तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. एकदा बिघडलेला करिअरचा तोल नंतर सावरताच आला नाही.

ना अभिनयात, ना शिक्षणात.. कशातच ठसा उमटवता आला नाही. गेलेली र्वष परत मिळवता येत नाहीत याची मला खंत वाटत राहाते. कुठलीही प्रथितयश नाटय़ अभिनेत्री दिसली की वाटतं, आज हिच्या जागी मीच असते,’’ राधिका सांगते.

गौरव आणि राधिकाप्रमाणे आपल्या सर्वाच्याच आयुष्यात असे अनेक दुखरे कोपरे असतात. काहींना त्यांचं बालपण जसं गेलं तसं जायला नको असतं, तर काहींना वाटतं, की आपण सध्याच्या क्षेत्रापेक्षा दुसरं क्षेत्र निवडायला पाहिजे होतं. काहींना आपण मुलांना जसं वाढवलं त्यापेक्षा वेगळ्या प्रकारे वाढवायला पाहिजे होतं असं वाटतं, तर काहींना आपण जो निर्णय घेतला होता त्यापेक्षा वेगळा निर्णय घ्यायला पाहिजे होता याची चुटपुट असते. अशा प्रसंगांची यादी खूप मोठी होऊ शकते. पण गौरव आणि राधिकाप्रमाणे जर आपण त्या घटनेत अडकून पडलो असू आणि ती हवी तशी घडली नाही म्हणून उसासे टाकत असू, तर मात्र त्यांच्याप्रमाणे ‘तसं घडायलाच नको होतं’ या विचारसरणीचा बळी होतो आणि पश्चात्ताप, हळहळ, हतबलता, निराशा अशा अस्वस्थकारक भावनांना आमंत्रण देतो.

‘तसं घडायलाच नको होतं’ ही विचारसरणी ‘जर-तर’च्या विचारांचा एक प्रकार आहे. आपल्या आयुष्यात काय घडावं आणि काय घडू नये, याचे आडाखे आपण सर्वचजण बांधत असतो. अमुक एक घडलं तर काय होईल, याची कल्पनाचित्रंही मनात रंगवत असतो. अशा ‘जर-तर’च्या विचारांनी अलीकडच्या काळात मानसशास्त्रज्ञांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या विचारांपकी काही विचार मानसिक आरोग्याला पोषक, तर काही मानसिक आरोग्याला मारक असतात. ‘जर-तर’चे विचार जर भविष्यकाळासंबंधी आणि आनंददायी असतील, तर ते मानसिक आरोग्याचं संवर्धन करतात. ‘असं झालं तर’ किंवा ‘मी अमुक झालो तर’ असे कल्पनाविलासाचे निबंध मुलांना कल्पनानिर्मितीला चालना मिळावी या उद्देशानं लिहावयास देतात. आपण कल्पनारम्यतेत

(फँ टसी) रमतो. अशा वेळी आपण भविष्यातील आनंददायी चित्रं रंगवत असल्यामुळे कल्पनारम्यता अनेकदा तणावाचा निचरा करते. मात्र हे विचार प्रमाणापेक्षा जास्त झाले, तर मात्र व्यक्ती आभासी दुनियेत राहून मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसंच ‘जर-तर’चे विचार भविष्यातील नकारात्मक चित्रं उभी करत असतील तरीही मानसिक आरोग्याची हानी होऊ शकते.

‘जर-तर’चे विचार भूतकाळासंबंधी असले तर त्यांचे ऊध्र्वगामी आणि अधोगामी असे दोन प्रकार पडतात. ऊध्र्वगामी विचार करणाऱ्या मनुष्याला जे घडलं त्यापेक्षा अधिक चांगलं घडावयास हवं होतं, असं वाटतं. तर अधोगामी विचार करणाऱ्या मनुष्याला वाटतं, की जे घडलं त्यापेक्षा अधिक वाईट घडू शकलं असतं. अधोगामी विचार हे मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त असतात, तर ऊध्र्वगामी विचार मानसिक आरोग्य धोक्यात आणतात. ‘तसं घडायलाच नको होतं’ ही विचारसरणी ऊध्र्वगामी विचारांत मोडते. हे विचार अस्वस्थता निर्माण करतात, कारण ते वस्तुस्थितीविरोधी (काऊंटर फॅक्च्युअल) असतात. जी घटना घडून गेली आहे, तिला न स्वीकारता ती तशी घडताच कामा नये असा दुराग्रह धरणं म्हणजे वस्तुस्थितीविरोधी विचार करणं. गौरव आणि राधिका जर इतकंच म्हणत असते, की तसं घडलं नसतं तर बरं, तर ती त्यांची अपेक्षा झाली असती. पण केवळ अपेक्षेवर न थांबता ते असा हट्ट धरतात, की तसं घडायलाच नको होतं. ते या वस्तुस्थितीचा स्वीकार करत नाहीत, की पूर्वायुष्यात घडून गेलेल्या घटना बदलणं शक्य नाही. ते अजूनही पूर्वीच्याच घटनेत जगतात. तसं घडलं नसतं तर आपल्या जीवनात काय कायापालट घडला असता, याची कल्पनाचित्रं रंगवतात. परिणामी त्यांच्या मनातील कल्पना आणि वास्तव यांच्यातली सीमारेषा धूसर होते आणि वस्तुस्थितीचा स्वीकार करणं आणखीनच जिकिरीचं होतं.

ही विचारसरणी गतजीवनातल्या विशिष्ट घटनेबाबत अतिसंवेदनशीलता निर्माण करते. त्यामुळे  गौरव व्हिसा वेळेवर न मिळण्याच्या घटनेला आणि राधिका स्वप्निल आयुष्यात येण्याच्या घटनेला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देतात. या घटनांना ते निर्णायक घटना मानतात. स्वत:चा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ केवळ त्याच घटनेवर अवलंबून आहे, असं ते समजतात. ती घटना बदलली असती, तर स्वत:मध्ये बदल झाला असता असं त्यांना वाटतं. म्हणजेच स्वत:तल्या बदलाचं संपूर्ण नियंत्रण ते त्या घटनेवर अवलंबून ठेवतात. परिणामी स्वत:त बदल घडवून आणण्याची त्यांची इच्छा मावळते आणि ते निष्क्रिय होतात. शिवाय त्या घटनेमुळे झालेले परिणाम बदलण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत, असं समजल्यामुळे ते हतबलही होतात.

‘तसं घडायलाच नको होतं’च्या विचारांतून बाहेर पडण्यासाठी गौरव आणि राधिका पुढील मार्ग जोपासू शकतील. –

वास्तवाचा स्वीकार – ‘तसं घडायलाच नको होतं’च्या विचारांचं प्रमुख कारण हे वास्तवाचा अस्वीकार हे आहे. तो जेवढा लवकर केला जाईल तेवढं या विचारांचं प्राबल्य कमी होईल. एखादी घटना घडून गेल्यावर ती तशी घडायलाच नको होती, असं म्हणणं वस्तुस्थितीचा विपर्यास आहे. व्हिसा वेळेवर मिळाला असता तर मी नोकरीत यशस्वी झालो असतो किंवा माझ्या आयुष्यात स्वप्निल आला नसता तर मी यशस्वी नाटय़ अभिनेत्री झाले असते, असं म्हणणं वस्तुस्थितीचा विपर्यास आहे, कारण वस्तुस्थिती अशी आहे की तसं घडलं नाही. ‘व्हायला हवं असणं’ आणि ‘झालं नाही’ यामधला फरक गौरव आणि राधिकानं लक्षात घेतला, तर वास्तवाचा स्वीकार करून वस्तुस्थितीविरोधी विचारांना ते पूर्णविराम देऊ शकतील.

घटना निर्णायक न करणं – व्हिसा वेळेवर न मिळण्याची घटना गौरवनं आणि स्वप्निल आयुष्यात येण्याची घटना राधिकानं निर्णायक मानली आहे. तिला ते इतकं महत्त्व देतात, की त्यांचं संपूर्ण आयुष्य ते त्या घटनेवर अवलंबून ठेवतात. तिच्याबाबत अतिसंवेदनशील होऊन तिला आहे त्यापेक्षा मोठं करतात. घटनेला निर्णायक मानल्यामुळे गौरवला वाटतंय की नोकरीत यशस्वी होणं हे फक्त व्हिसा वेळेवर मिळण्यावरच अवलंबून होतं किंवा राधिकाला वाटतंय की यशस्वी नाटय़ अभिनेत्री होणं हे फक्त स्वप्निल आयुष्यात न येण्यावर अवलंबून होतं. यशस्वी होण्यासाठी इतर अनेक घटकही कारणीभूत असतात याकडे या दोघांचं दुर्लक्ष होतं. घटना निर्णायक समजली नाही, तर या घटनेव्यतिरिक्त यशस्वी होण्याच्या इतर घटकांवरही ते लक्ष केंद्रित करू शकतील. कुठल्याही घटनेत भविष्य उभं करण्याची ताकद नसते. घटना घडण्याचं नियंत्रण अनेकदा आपल्याकडे नसतं. पण त्या घटनेला काय प्रतिसाद द्यावा याचं संपूर्ण नियंत्रण स्वत:कडे असतं. घटना निर्णायक मानली नाही तर घटनेच्या परिणामांचं नियंत्रण ते स्वत:च्या हातात घेऊ शकतील आणि सक्रिय होतील.

कल्पनाचित्रांत बदल – घटना मनाप्रमाणे घडल्या असत्या तर काय झालं असतं, अशी कल्पनाचित्रं गौरव आणि राधिका वारंवार पाहातात. पण या कल्पनाचित्रांप्रमाणे प्रत्यक्ष परिस्थिती घडली नसल्यामुळे आणि पुढेही घडण्याची शक्यता नसल्यामुळे ती त्यांना उभारी देण्याऐवजी निराश करतात. शिवाय ती त्यांना वर्तमानकाळापासून आणि भविष्यकाळापासूनही दूर नेतात. म्हणजेच ही कल्पनाचित्रं त्यांना कुठलीच मदत न करता उलट अस्वस्थतेच्या खाईत ढकलतात. याऐवजी त्यांनी भविष्यकाळासंबंधी आनंददायी कल्पनाचित्रं पाहण्याची सवय लावून घेतली तर त्यांना आशादायी वाटू शकेल. उदाहरणार्थ, ते असं कल्पनाचित्र रंगवू शकतात, की ते कालप्रवाहाच्या होडीत बसले आहेत आणि होडीची वल्ही चालवून भविष्यकाळात फेरफटका मारत आहेत. या होडीतून ते पाच वर्षांनी पुढे गेले आहेत. आत्ताची निर्णायक घटना त्यांना तेव्हा क्षुल्लक वाटतेय. त्यामुळे इतर अर्थपूर्ण गोष्टींकडे लक्ष द्यायला त्यांना सवड मिळाली आहे आणि ते त्याचा भरभरून आस्वाद घेत आहेत.

ऊध्र्वगामी विचारांचं केंद्र अधोगामी करणं – ऊध्र्वगामी विचारांमुळे गौरव आणि राधिका यांना घटनेची एकच, तीही नकारात्मक बाजूच दिसते. जर त्यांनी अधोगामी विचारांवर भर दिला, तर ‘तसं घडायलाच नको होतं’ असं म्हणण्याऐवजी ते असा विचार करू शकतील, की ‘जर यापेक्षाही वाईट घडलं असतं तर?’ गौरव असा विचार करू शकेल, की माझी आत्ता आहे ती नोकरीही गेली असती तर? किंवा राधिका असा विचार करू शकेल, की माझं शिक्षणही पूर्ण झालं नसतं तर? अशा विचारांमुळे घटनेचे झालेले परिणाम त्यांना फार भयंकर वाटणार नाहीत आणि दुसरी बाजू कळल्यानं ते समतोल विचार करू शकतील.

गौरव आणि राधिका यांच्याप्रमाणे तुमच्याही मनात ‘तसं घडायलाच नको होतं’चे विचार थैमान घालत असतील, तर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर त्यातून बाहेर पडण्याचा निश्चय करा. मग वरील मार्ग आचरणात आणण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल आणि सी. एस. लुईस या ब्रिटिश लेखकाच्या उद्गारांप्रमाणे म्हणाल, की ‘गतकाळात जाऊन मी घटनेचा आरंभ बदलू शकत नसेन, पण जिथं आहे तिथून मी सुरुवात केली तर शेवट मात्र बदलू शकेन.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2020 1:39 am

Web Title: how to stop regretting about past events psychroscope dd70
Next Stories
1 ‘डिंक’ स्वीकारताना..
2 स्त्री राजकारण्यांसाठीचा ‘जेसिंडा पॅटर्न’!
3 जीवन विज्ञान : प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साखर
Just Now!
X