राजन गवस

ट्रॅक्टर आला नि बल गोठय़ातून हद्दपार झाला, मग गल्लीतून हद्दपार होत होत गावातूनही गेला. दोन महिन्यांच्या शेतीकामासाठी बारा महिने फुकट बल पोसणे तोटय़ाचे वाटू लागले. नव्या अर्थव्यवस्थेने शेतकऱ्याला बलापासून तोडून टाकले. आणि नवंच वर्तमान समोर आलं. बहुतांशी कोरडवाहू शेतकऱ्यांना आज जगवते आहे ती त्यांच्या गोठय़ातील म्हैस. तीच घराची पोशिंदी. मुलांची शिक्षणं, लेकीचा आयारमाह्य़ार, पाहुण्यापैंचं आगतस्वागत सारंच चालत असते या म्हशीच्या जिवावर. पाऊसपाणी, शेतीभाती सगळेच बेभरवशाचे. म्हैस बनली आहे गावाचा जगण्याचा आधार.

Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
Two more days of hailstrome in Vidarbha Pune news
विदर्भात आणखी दोन दिवस गारपीट; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्याना दिला इशारा
raman bhalla
काश्मीर खोऱ्यातील लढतींची उत्सुकता
Nighoje bandhara Leakage Leads to Water Shortage in Pimpri
पिंपरी : निघोजे बंधाऱ्याला गळती…पिंपरी-चिंचवडमधील समाविष्ट गावांत पाण्याचा प्रश्न

बैलपोळा, बेंदूर हा सण संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटकात वेगवेगळ्या महिन्यांत साजरा केला जातो. ज्या भागात पाऊस जसा सरकतो तसा तो सण साजरा करण्याचा महिना बदलतो. कालपरवा ‘फेसबुक’वर मराठवाडय़ातील लोक बलपोळ्याचे ‘मेसेजेस’ भरभरून टाकत होते. मध्येच कोणी राजकीय नेत्यांना बलाची उपमा देऊन बलांचा असह्य़ अपमानही करत होते. हे सगळे वाचतावाचता घरातले, गावातले, बालपणापासून माझ्याशी जोडलेले, तुटलेले बैल डोळ्यासमोरुन हळूहळू सरकत होते.

रेखीव बांध्याचे, खिल्लारी शिंगांचे, रानभर उधळणारे, औताला जुंपलेले, करीला बांधलेले, नुसतेच उंडारणारे, चौमाळ रान शेपटीवर घेऊन उगाचच डिरक्या फोडणारे हे बैल डोळ्यासमोरून जात असतानाच मी आमच्या गावात आज उरलेल्या बलांना शोधायला लागलो. आजमितीला आमच्या अख्ख्या गावात फक्त तीनच बैलजोडय़ा उरलेल्या आहेत. शोधून शोधून फक्त तीनच बैलजोडय़ा सापडाव्यात याचा सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला असेल, पण आमच्या गावात औषधाला तरी बैलजोडी अस्तित्वात आहे, काही गावांत बैलजोडीच उरलेली नाही. ‘बैलमुक्त गाव’ हे वाक्य मनातल्या मनात घोळवताना आतून एकदम उजाड व्हायला होतं.

कधीकाळी गाव फक्त बलांनीच जगवलेलं होतं. जिवापाड प्रेम करून हे बैल सांभाळले जायचे. पोटच्या पोरापेक्षाही अधिक प्रेम बलावर. कारण तोच घराचा पोशिंदा. घराघरात बैलजोडी तर असायचीच, पण त्याबरोबरच एकाद् दुसरं उंडारणारं वासरूही शिवारात उधळत असायचं. त्या वासराला कोणत्याही पिकात जाण्याचा मुक्त प्रवेश. त्याच्या अंगाला हात लावलेलाही कुणाला नाही खपायचा. या वासराचा आणि सगळ्या घराचा ऋणानुबंध. उद्याच्या काळात ते वासरूच त्या घराचा आसरा. त्याच्या डोळ्यात घराच्या भविष्याची स्वप्नं बघितली जायची. गावात, गल्लीत अशी चिक्कार वासरं असायची. आपलं खोंड गावात, गल्लीत उजवं असलं पाहिजे यासाठी प्रत्येक जण धडपडायचा. घरातल्या कर्त्यां माणसाचा संपूर्ण दिवस त्याच्या निगराणीत. गावात पहिल्यांदा ट्रॅक्टर आला तेव्हा हा बलाच्या जिवावर उठणार आहे असं वाटलं नव्हतं. पण झालं ते आक्रीतच. ट्रॅक्टरने बैल गिळायला सुरुवात केली. हळूहळू बैल गोठय़ातून हद्दपार व्हायला सुरुवात झाली. तरीही हौस म्हणून एखादं पाडं गोठय़ात पाळलंच जायचं. पण घराचं जगणंच बदललं आणि गोठय़ात वासराला, खोंडाला, बलाला जागाच उरली नाही. पहिल्यांदा बैल गोठय़ातून हद्दपार होता होता गल्लीतून हद्दपार होत गेला. मग गावातून. कधी नव्हे ते बलाचा विचार अर्थशास्त्रीय भाषेत गाव करु लागलं. त्यात काही गैर आहे अशातला भाग नाही. दोन महिन्यांच्या शेतीकामासाठी बारा महिने फुकट बैल पोसणे तोटय़ाचे वाटू लागले. कधी काळी बलाला जीव लावणाऱ्या शेतकऱ्याची माया आपोआपच पातळ होत गेली. नव्या अर्थव्यवस्थेने शेतकऱ्याला बलापासून तोडून टाकले.

आता गावात एकाद दुसऱ्याच हौशी शेतकऱ्याकडे एकादी बैलजोडी असते. बाकी गाव बैलमुक्त. गावातून बैल हद्दपार होता होता त्याच्याविषयी असणारी निर्मळ मायाही आपोआपच हद्दपार होत गेली. याचा परिणाम घरातल्या सगळ्यांच्याच धारणा आणि विचार यांच्यावर आपोआप होत गेला. कधीकाळी घरात नवी धडुतं आली की ती पहिल्यांदा बलाच्या पाठीवर टाकली जायची, नंतर तुळशीवर आणि मग घडी मोडण्यासाठी शेजाऱ्यापाजाऱ्यांना. त्यानंतरच ती मालकाच्या अंगावर जागा करून घ्यायची. भावना अशी होती की हे धडुतं बलाच्या अखंड श्रमातून माझ्या अंगावर आलेले आहे. त्याच्यामुळेच आपण हे अंगावर घालतो आहोत याची आठवण सतत मनात जोजावणे आणि बलाचे ऋण सांकेतिक पद्धतीने व्यक्त करणे असे भावबंध जुळलेले, सांभाळलेले असायचे. बैलमुक्त गावाला आता या भावबंधाचा स्पर्शही आठवणे केवळ कठीण.

बैलापाठोपाठ गोठय़ातून गायही हळूहळू बाहेर पडली. कारण गावात दूधसंस्था स्थापन झाली. या दूधसंस्थेने ‘फॅट’ नावाचा नवीनच शब्द गावात आणून रुळवला. या ‘फॅट’ शब्दाने गाय गोठय़ातून हाकलली. गायीच्या दुधाला ‘फॅट’ कमी. म्हैस गोठय़ाचा केंद्र बनून गेली. आता गोठय़ात असतात फक्त म्हैशी. त्यांनी फक्त दूधच दूध द्यायचे. त्यांच्या रेडकाला आता जगण्याचा हक्क उरलेला नाही. म्हैस व्याली आणि तिने जर रेडक्याला जन्म दिला तर जन्म दिल्या दिवसापासूनच हे रेडकू गोठय़ाला ओझं व्हायला लागतं आणि त्याचा मरणप्रवास सुरू होतो. एक थेंबभरही दूध त्याला उरू नये याची पुरेपूर काळजी म्हैसमालक घेत असतो. त्याच्यासमोर चाऱ्याची काडीही जाणार नाही याची दक्षता घेतली जात असते. कसंबसं महिनाभर ते तग धरून जगायचं. महिन्या-पंधरा दिवसांतच म्हैशीला आपल्या पोटच्या पिलाचा मृत्यू डोळ्यादेखत बघावा लागतो. हे रेडकू मेलं की मालक सुस्कारा सोडतो आणि बिनदिक्कत निरपून दूध काढायला लागतो. मात्र म्हैशीने रेडी जन्मास घातली तर मात्र न्याय उलटा. तिच्यासाठी कासेत भरपूर दूध शिल्लक राहील याची दक्षता धार काढतानाच मालक घेत असतो. ती रेडी झटपट मोठी होऊन लवकरात लवकर दुभती म्हैस व्हावी यासाठीचे अतोनात प्रयत्न. गोठय़ात म्हैस परवडते, रेडी जगलेली चालते, पण रेडा अथवा बैल यांचे अस्तित्वच नकोसे होते तेव्हा काय बदलले हेच कळणं कठीण होऊन जातं. गोठय़ातून बैल गेला, गोठय़ातून रेडा हुसकावून लावला गेला. काळ बदलला की माणसाची विचार करायची पद्धत बदलली याचाच थांगपत्ता लागेनासा झाला. माणसं आपल्या जगण्यातून मुलीला हद्दपार करायचा आटापिटा करत आहेत. मुलगा जन्माला यावा म्हणून अतोनात यातायात. इथंही उल्टंच चाललेलं असतं त्याचं बरंच काही. काळ बदलला, माणसाचा मेंदू फिरतो हेच बरोबर.

कधी काळी शेतकऱ्याच्या घरात कोंबडय़ा, कुत्रं, मांजर, शेरडू, करडू, गाय, म्हैस, बैल असे सगळेच प्राणी असायचे. किडामुंगी, पशू-पक्षी या सगळ्यासहित जगणारा तो शेतकरी अशी धारणा असलेल्या गावगाडय़ात आज सगळं आक्रीतच घडतंय. गाय, बैल तर हद्दपार झालेच पण त्याबरोबरच शेरडाकरडालाही आता फारशी जागा उरली आहे असं वर्तमान नाही. गावात किमान दर आठवडय़ाला पन्नास-साठ रेडकांचे मृतदेह घेऊन जाणारा एखादा टेम्पोवाला सापडतोच. कधी काळी घरात मेलेलं जनावर शेतात विधीपूर्वक पुरून त्यावर तुळस लावली जायची. आता हे टेम्पोने मृतदेह गावाबाहेर पाठवण्याचं निर्दयीपण आलं कोठून?

गावगाडय़ातल्या माणसाने या मुक्या प्राण्यांशी वैर मांडलं. एकेकाला आपल्या गोठय़ातून हद्दपार केलं हे खरं असलं तरी या मुक्या प्राण्यांनी मात्र या सगळ्यांवरची माया पातळ केली आहे असं मात्र वास्तव समोर येत नाही. बेभरवशाचा निसर्ग तोटय़ात चालणारी शेती, रासायनिक खतं आणि कीटकनाशकांनी मातीचा लंपास केलेला कस यामुळे आता शेतकरीच भिकेला लागलेला आहे. अशा शेतकऱ्यासमोर कोणते पीक घ्यावे की ज्यातून आपण वर्षभर जगू शकू असा पर्यायच शिल्लक उरलेला नाही. कोणतंच पीक शेतकऱ्याला वर्षभर जगवू शकेल अशी स्थिती आता उरलेली नाही. दोन-अडीच एकरांचा अल्पभूधारक असो अथवा तीन-चार एकरांचा बरा कोरडवाहू शेतकरी. आपल्या शेतीतील उत्पन्नावर आपले कुटुंब पोसू शकतो असं वर्तमानच शिल्लक नाही. कर्जबाजारी झाल्याशिवाय लगीनवऱ्हाड, यात्राखेत्रा साजरी करण्याएवढी अशा शेतकऱ्याची ऐपतच उरलेली नाही. शेतमजुराचा तर विचारच न केलेला बरा.

अशा वेळी सहज प्रश्न पडतो की, या साऱ्या शेतकऱ्यांचे संसार चालले आहेत तरी कशावर? उत्तर शोधू जाता नवंच वर्तमान आपल्यासमोर येतं. बहुतांशी कोरडवाहू शेतकऱ्यांना आज जगवते आहे ती त्यांच्या गोठय़ातील म्हैस. आता रेडय़ांची गरज उरली नाही कृत्रिम पैदासीच्या काळात. त्यामुळे चार-पाच माणसांच्या संसाराचा गाडा ती एकटीच हाकते आहे. तिला वजा केलं तर या घरात उरतच नाही काही. म्हणून ही म्हैसच त्या घराची कर्तीसवरती. बलाची जागा तिने घेतली. तीच घराची पोशिंदी. तिच्या सेवेसाठी झटत असते घर. शेणपाणी, खाद्य, गवत याची सर्वतोपरी काळजी. त्यांचे अन्नपाणीच तिच्यावर अवलंबून. खेडय़ातले बहुतेक संसार या म्हैशीच्या जिवावर चाललेले आहेत. मुलांची शिक्षणं, लेकीचा आयारमाह्य़ार, पाहुण्यापैंचं आगतस्वागत सारंच चालत असते या म्हशीच्या जिवावर. म्हैसच रीतभात, व्रतवैकल्यं, पूजाअर्चा, सणसमारंभ साजरे करण्यास मदत करत असते. तिच्या दुधावरच घर तग धरून जगत असते. ही म्हैसच गावातले अर्धेअधिक संसार चालवते. पाऊसपाणी, शेतीभाती सगळेच बेभरवशाचे. तीच बनलेली आहे गावाचा आधार.

घरातली एक म्हैस सकाळ-संध्याकाळ चार लिटर दूध देते पण यातील एकही थेंब घरात शिल्लक न ठेवता सारं दूध डेअरीचा रस्ता धरतं. दहा दिवसांना येणारा दुधाचा हप्ता साऱ्या घराला जगवत असतो. उद्या या म्हशीला गोठा सोडून जावं लागलं तर.. हा प्रश्नच मनाला पिळवटून टाकतो. पण तसं होणार नाही असं नाही म्हणता येत. शेरडू गेलं, करडू गेलं. गाय गेली, बैल गेला. कधी काळी त्यांनीही या माणसांना जगवलंच होतं की. म्हैशीच्या ठिकाणी जगवणारा अन्य कोणी तारणहार भेटला तर म्हैसही जाईलच गोठय़ातून. प्रश्न उरतो तो माणसाच्या बुद्धीचा आणि भावनेचा!

पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून माणसाचा उल्लेख केला जातो. त्याने आपल्या मुठीच्या आणि मनगटाच्या जोरावर स्वत:ला सर्वश्रेष्ठ बनवून पृथ्वीवर आधिपत्य गाजवण्याची मुभा घेतली. पण आता त्याला पृथ्वीवर आपण सोडून दुसरं कोणीच असू नये असे तीव्रपणे वाटतं आहे. याचा भक्कम पुरावा म्हणजे त्याचा ओस पडत चाललेला गोठा. कधीकाळी भरलेला गोठा घराचं गोकूळ करायचा. दूधदुभत्याचं घर म्हणजे खातं पितं घर. त्याच घराने या मुक्या प्राण्यांना केलं हातोहात बेदखल. त्यांचे अस्तित्व पुसण्यासाठी तोच ठरला कारण. उद्या बैल नामशेष करण्यात, म्हैस नामशेष करण्यात तोच असेल आघाडीवर. मग याला भावना आहेत असे म्हणायचं तरी कसं? भावना, बुद्धी, कल्पना माणसाजवळ आहेत याचे पुरावेच तो हळूहळू नष्ट करत चालला आहे. यालाच विकास आणि आधुनिकता असं म्हणायचं असेल तर माणसाचाच विध्वंस जवळ आला आहे, असं म्हणायला कोणाही ज्योतिषाची गरज नाही. याचा धडधडीत पुरावा कालपरवाच्या महापुरानं ठेवलाच आपल्यासमोर. बघता बघता होत्याचं नव्हतं केलं. माणसं भूक विसरली, कुत्री भुंकायचं विसरून गेली, झाडं उन्मळून पडली, घरं उद्ध्वस्त झाली. गावगाडा दिकोपाल झाला, चौमाळ पसरलेलं पाणी पाहून माणसांच्याच जिवाचा थरकाप झाला. तरीही तो सुधारेल अशी किंचितही आशा धरायला मात्र जागा नाही.

बैलापाठोपाठ गाईंचे अस्तित्वही धोक्यात ?

बैलापाठोपाठ गोठय़ातून गायही हळूहळू बाहेर पडली. कारण गावात दूधसंस्था स्थापन झाली. या दूधसंस्थेने ‘फॅट’ नावाचा नवीनच शब्द गावात आणून रुळवला. या ‘फॅट’ शब्दाने गाय गोठय़ातून हाकलली. गाईच्या दुधाला ‘फॅट’ कमी. पैसा झाला मोठा आणि म्हैस गोठय़ाचा केंद्र बनून गेली. आता गोठय़ात असतात फक्त म्हैशी. त्यांनी फक्त दूधच दूध द्यायचं. म्हैस व्याली आणि तिने जर रेडक्याला जन्म दिला तर जन्म दिल्या दिवसापासूनच हे रेडकू गोठय़ाला ओझं व्हायला लागतं आणि त्याचा मरणप्रवास सुरू होतो. एक थेंबभरही दूध त्याला उरू नये याची पुरेपूर काळजी म्हैसमालक घेत असतो. त्याच्यासमोर चाऱ्याची काडीही जाणार नाही याची दक्षता घेतली जात असते. महिन्या-पंधरा दिवसांतच म्हैशीला आपल्या रेडक्याचा मृत्यू डोळ्यादेखत बघावा लागतो. हे रेडकू मेलं की मालक सुस्कारा सोडतो आणि बिनदिक्कत निरपून दूध काढायला लागतो.

chaturang@expressindia.com