प्रज्ञा शिदोरे – pradnya.shidore@gmail.com

इतिहास काय हे जाणून घेण्याबरोबरच तो कुणी लिहिला आहे हे पाहाणं जास्त महत्त्वाचं असतं. कारण इतिहासकाराचा इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यात उतरलेला असतो. रुक्ष समजल्या जाणाऱ्या या क्षेत्रात अनेक स्त्रियांनी देदीप्यमान कामगिरी के ली आहे. आपला एक वेगळा दृष्टिकोन घेऊन त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला आणि त्यातले आधी चर्चिले न गेलेले अनेक विषय अधोरेखित करून त्यावर स्वत:ची मांडणी केली. भारतीय इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या आणि इतिहास लेखनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या काही भारतीय आणि परदेशी स्त्रियांविषयी-

caste politics in uttarakhand
ब्राह्मण ते ठाकूर, दलित ते मुस्लिम; उत्तराखंडमध्ये जातीय समीकरणावरच निकालाचे गणित
anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
study of psychology, digital campaigning in elections
निवडणुकांतील डिजिटल प्रचारतंत्रामागे मानसशास्त्राचा अभ्यास

१९६१ च्या जानेवारी ते मार्च या काळात प्रख्यात ब्रिटिश इतिहासकार ई. एच. कार यांनी केंब्रिज विद्यापीठात काही व्याख्यानं दिली. ही व्याख्यानमाला नंतर ‘व्हॉट इज हिस्टरी’ या पुस्तकरूपात प्रसिद्ध झाली. आज ५९ वर्षांनंतरही कार यांनी त्या व्याख्यानमालेत मांडलेले सिद्धांत कोणत्याही सामाजिक शास्त्राच्या अभ्यासकाला सुपरिचित असतात. या व्याख्यानांमध्ये ई. एच. कार त्यांच्या विद्यार्थ्यांना, इतिहासातील घटनांपेक्षा त्या घटना कु णी आणि का सांगितल्या आहेत याकडे लक्ष द्या, असं सांगतात. कारण त्यांच्या मते, भूतकाळातल्या घटनांची उजळणी ही विशिष्ट उद्देशानेच होत असते म्हणूनच इतिहास समजून घेताना हा उद्देश लक्षात घेतला पाहिजे. आधुनिक भारताचा इतिहास समजून घ्यायचा झाला, तर अशा काही स्त्री इतिहासतज्ज्ञ आहेत, की ज्यांना समजून घेतल्याशिवाय, त्यांचं लेखन वाचल्याशिवाय, आपला इतिहास समजून घेताच येणार नाही.

अशांपैकीच, परदेशातील विद्यापीठात काम करत असूनही महाराष्ट्राची संतपरंपरा, विविध संप्रदाय, धर्म, पंथ यावर सखोल अभ्यास केलेल्या अ‍ॅन फेल्डहाऊस. महाराष्ट्रातल्या विविध पंथांच्या अभ्यासामध्ये, महानुभाव पंथाचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर फेल्डहाऊस यांचं लिखाण बघावंच लागेल. मूळच्या अमेरिकन अ‍ॅन फेल्डहाऊस या मॅनहॅटनव्हिल कॉलेजमध्ये असताना त्यांच्या एका प्राध्यापिकेच्या सांगण्यावरून भारतात आणि त्यातही महाराष्ट्रात आल्या. ‘‘मी इथे आल्या आल्या भारताच्या प्रेमात पडले आणि आता एवढय़ा वर्षांनंतर हे प्रेम आणखीनच गुंतागुंतीचं होत चाललं आहे,’’ असं त्या म्हणतात. १९७१ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण संपवून त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात पीएच.डी.चा अभ्यास सुरू केला. इथे मराठी भाषेविषयी अभ्यासक्रम असल्यानंच त्यांनी उच्च शिक्षणासाठी या विद्यापीठाची निवड केली होती. अ‍ॅन फेल्डहाऊस यांचं मुख्य काम हे १३ व्या शतकातील महानुभाव पंथीयांच्या साहित्यासंदर्भात आहे. महानुभाव पंथातील तीन साहित्यकृतींचं भाषांतर आणि विश्लेषण केल्यानंतर एक वर्ष त्यांनी महाराष्ट्रातील महानुभाव पंथाच्या विविध तीर्थक्षेत्रांना भेट दिली. या एका वर्षांच्या भटकंतीनंतर त्यांनी महाराष्ट्रातले इतर पंथ आणि संप्रदाय याविषयी अभ्यास सुरू केला. या अभ्यासावरचं, महाराष्ट्रातल्या नद्या, या नद्यांवर आधारलेली धार्मिक प्रतीकं, नद्यांची देवतांशी केलेली तुलना, याविषयीचं त्यांचं ‘वॉटर अँड वुमनहुड’ हे पुस्तक १९९५ मध्ये प्रसिद्ध झालं. महाराष्ट्रातल्या धार्मिक स्थळांवर आधारित आणखी एक ‘कनेक्टेड प्लेसेस’ हे पुस्तक २००३ मध्ये प्रसिद्ध झालं. १९९० च्या दशकात फेल्डहाऊस यांनी शं. गो. तुळपुळे यांच्याबरोबर प्राचीन मराठीच्या कोशावरही काम केलं होतं. सध्या फे ल्डहाऊस या अ‍ॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमधल्या अभ्यासक मेघा बुद्रुक यांच्याबरोबर पर्यावरणाच्या दृष्टीनं संवेदनशील, धार्मिकदृष्टय़ा महत्त्वाच्या आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या पश्चिम घाटातल्या ठिकाणांचा अभ्यास करत आहेत. त्या अमेरिकेतल्या अ‍ॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये धार्मिक अभ्यास केंद्राच्या संस्थापक आणि प्राध्यापक आहेत.

प्राचीन भारताचा इतिहास याविषयी कोणतीही चर्चा रोमिला थापर हे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आपण रोमिला थापर यांचा मूळ अभ्यास जरी वाचला नसेल, तरीही वेळोवेळी महत्त्वाच्या सामाजिक घटनांवर ठामपणे आपलं मत मांडणाऱ्या विचारवंत म्हणून त्यांची ओळख आपल्याला नक्कीच असेल. १९३१ मध्ये पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या रोमिला थापर यांचे वडील सैन्यात डॉक्टर होते. त्यांच्या बदल्यांमुळे रोमिला यांचं शालेय शिक्षण हे पेशावर, रावळपिंडी आणि पुण्यात झालं. त्यांच्या एका मुलाखतीत त्या सांगतात, की ‘‘एकदा आम्ही मद्रासला (आता चेन्नई) गेलो होतो. वडील एका संग्रहालयात घेऊन गेले. तिथे त्यांनी मला खूप शिल्पं, प्राचीन दगडांचे प्रकार, चोल वंशातील राजांचे पुतळे दाखवले. त्यासंबंधीची पुस्तकं घेऊन आम्ही घरी आलो. वडिलांमुळे मला वाचनाची आवड होतीच. ही पुस्तकं वाचताना आधी कंटाळा आला, पण नंतर गोडी वाटू लागली. ती पुस्तकं नंतर मी भराभरा वाचून संपवली. त्यानंतर ते माझ्याशी त्याबद्दल चर्चा करू लागले. तेव्हापासूनच मला प्रश्न पडू लागले, आपण कोण?, आपलं मूळ काय?, आपल्या प्राचीन इतिहासात काय घडलं?, १९४५-४६ च्या सुमाराचा तो काळ माझ्या दृष्टीनं खूपच महत्त्वाचा होता.’’ पुढे पंजाब विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदवी घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांना परदेशी जायची इच्छा होती. तेव्हा वडील म्हणाले, ‘‘माझ्याकडचे पैसे मी तुझ्या लग्नात हुंडा देण्यासाठी ठेवले आहेत. पदवी हवी की लग्न हे तूच ठरव.’’ तेव्हा क्षणभराचाही विचार न करता, ‘‘अर्थातच पदवी,’’ असं उत्तर त्यांनी दिलं आणि १९५८ मध्ये लंडन विद्यापीठातून प्रसिद्ध इतिहासकार ए. एल. बाशम यांच्या मार्गदर्शनाखाली आपली पीएच.डी. पूर्ण केली. त्यांच्या अभ्यासाचा विषय होता, ‘सम्राट अशोक आणि मौर्य साम्राज्याचं अध:पतन’. अभ्यासाच्या आधारे त्यांनी त्यांचं पहिलं पुस्तक प्रसिद्ध केलं. त्यानंतर रोमिला थापर यांनी सोमनाथ मंदिर, शकुंतला, प्राचीन भारताचा इतिहास, सांस्कृतिक व सामाजिक इतिहास यांसारख्या विषयांवर चाळीसहून अधिक पुस्तकांचं लेखन केलं आहे. थापर यांच्या मते ब्रिटिश इतिहासकारांनी त्यांच्या परंपरा, संस्कृती, इतिहासलेखनाची पद्धत डोळ्यांसमोर ठेवून भारताचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपलं इतिहासलेखन चुकीच्या पायावर उभं राहिलं, असं त्या म्हणतात. त्यांच्या प्राचीन भारताच्या इतिहासाच्या मांडणीसाठी त्यांना भारत सरकारनं पद्मभूषण ही पदवी दोन वेळा (१९९२ आणि २००५) जाहीर केली. पण दोन्ही वेळा त्यांनी ती नाकारली. त्या म्हणतात, की वैचारिक जगतातले सर्व महत्त्वाचे पुरस्कार मला मिळाले आहेत, सरकारकडून पुरस्कार स्वीकारून मी माझं स्वातंत्र्य गमावीन आणि म्हणून शासनाचा कोणताच पुरस्कार मी स्वीकारणार नाही. आज ८९ वर्षांच्या रोमिला थापर या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ‘प्रोफेसर एमिरटा’ म्हणून कार्यरत आहेत. आधुनिक जगातील समाजमाध्यमांचा वापर करून त्या त्यांच्या विद्यार्थ्यांंपुढे येत असतात. पुढच्या महिन्यात त्यांचं ‘व्हॉइसेस ऑफ डिसेंट’ हे पुस्तक प्रसिद्ध होत आहे. या पुस्तकात त्यांनी वैदिक काळापासून ते नुकत्याच ‘सीएए’ (सुधारित नागरिकत्व कायदा) विरोधात झालेल्या आंदोलनाचा मागोवा घेतला आहे.

केवळ इतिहासाचे दाखले न देता स्वत:ला सध्याच्या समाजाशी जोडून घेणाऱ्या आणखी एक महत्त्वाच्या इतिहासकार म्हणजे उमा चक्रवर्ती. त्यांनी आपल्या लेखनामधून इतिहासातला महत्त्वाचा, पण अनेक वेळा गाळला गेलेला स्त्रीवादी दृष्टिकोन सर्वापुढे उभा करण्याचं महत्त्वाचं काम केलं. त्या भारतातील स्त्रीवादी चळवळीतील काही प्रमुख व्यक्तींपैकी एक समजल्या जातात. त्यांच्या कामाचा मुख्य विषय बौद्ध धर्म तसेच प्राचीन आणि १९ व्या शतकातील भारताचा इतिहास हा आहे. १९४१ मध्ये केरळमधल्या पालघाटमध्ये सरकारी अधिकाऱ्याच्या घरी जन्माला आलेल्या

उमा चक्रवर्तीनी दिल्ली आणि बंगळुरूमध्ये आपलं शालेय शिक्षण आणि बनारस हिंदू विद्यापीठामधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. नंतर १९६६ ते १९९८ या दरम्यान त्यांनी दिल्ली विद्यापीठात अध्यापन केलं. या दरम्यान त्यांनी सात पुस्तकांचं आणि अनेक शोधनिबंधांचं लिखाण केलं. त्यांनी महाराष्ट्रातल्या १८व्या शतकातील जात, लिंग आणि शासन यांचा अभ्यास केला. या अभ्यासातून महाराष्ट्रातल्या तेव्हाच्या शासकांनी- म्हणजे पेशवे यांनी ब्राह्मणी समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न समोर आले. याबरोबरच त्यांच्या अभ्यासातून १८ व्या शतकातील स्त्रियांची सामाजिक परिस्थिती, लग्नसंस्था, विधवांना मिळणारी वागणूक यावरही भाष्य केलं आहे. उमा चक्रवर्ती या मानवाधिकारांचं उल्लंघन आणि अन्याय याविषयीच्या अनेक अभ्यासांमध्ये सहभागी झाल्या आहेत. आज त्यांना स्त्रियांचे अधिकार आणि लोकशाही अधिकारांसाठी काम करणाऱ्या अभ्यासक आणि कार्यकर्त्यां म्हणून ओळखलं जातं. नुकतंच त्यांनी

‘अ क्वाएट लिटिल एंट्री’ आणि ‘फ्रॅगमेंट्स फ्रॉम द पास्ट’ या दोन लघुपटांचं दिग्दर्शनही केलं. उमा चक्रवर्ती यांचं काम आज अनेक इतिहासतज्ज्ञ आणि स्त्रीवादी चळवळीमधल्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि भारतातील दलित चळवळीची ओळख पाश्चात्त्य जगाला करून देण्याचं श्रेय हे इतिहासकार आणि अनेक संशोधकांना प्रेरणा देणाऱ्या अभ्यासक एलिनॉर झेलियट यांना द्यायला हवं. झेलियट या भारताचा इतिहास, दक्षिण-पूर्व आशिया, व्हिएतनाम, आशियाई स्त्रिया, अस्पृश्यता आणि सामाजिक चळवळी या विषयांवरील तज्ज्ञ होत्या. अमेरिकेत १९२६ मध्ये जन्मलेल्या झेलियट या स्वत: ‘क्वेकर’ पंथीय. एका क्वे कर मिशन ट्रिपबरोबरच त्या १९५२ मध्ये प्रथम भारतात आल्या. त्यांच्याआधी भारतातील दलित चळवळ हा विषय कु णी अभ्यासाला घेतला नव्हता. त्यांनी ‘सहभागिता संशोधन’ (पार्टिसिपेटरी रीसर्च) ही पद्धत वापरून त्यांचं संशोधन सुरू केलं. या पद्धतीमध्ये संशोधकानं स्वत: संशोधनाच्या विषयाच्या कामात सामील व्हावं, अशी अपेक्षा असते. दलित चळवळीत स्वत: सहभागी होऊन त्यांनी हा अभ्यास केला. त्यांचं पहिलं पुस्तक ‘आंबेडकर्स वर्ल्ड : द मेकिंग ऑफ बाबासाहेब अँड द दलित मूव्हमेंट’ हे दलित चळवळीचा अभ्यास करणाऱ्या सर्वासाठी एक महत्त्वाचा दस्तावेज ठरलं आहे. २०१६ मध्ये वयाच्या

८९ व्या वर्षी झेलियट यांचं निधन झालं. अमेरिकेतील ज्या ‘कार्लटन कॉलेज’मध्ये एलिनॉर झेलियट अध्यापन करीत तिथेच

गेल ऑम्वेट या विद्यार्थिनी होत्या. ऑम्वेट या अमेरिकन वंशाच्या भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि इतिहासकार. १९८३ मध्ये त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारलं. ऑम्वेट यांचा मुख्य अभ्यासाचा विषय म्हणजे भारतीय समाजव्यवस्था. त्यांच्या अभ्यासातून त्यांनी महात्मा ज्योतिबा फु ले आणि सावित्रीबाई फुले यांचं काम समोर आणलं. ऑम्वेट लिखित ‘कल्चरल रिव्होल्ट इन कलोनियल सोसायटी : द नॉन ब्राम्हिन मूव्हमेंट इन वेस्टर्न इंडिया’ हे पुस्तक राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राच्या सर्व विद्यार्थ्यांंसाठी महत्त्वाचं ठरलं. गेल ऑम्वेट या महाराष्ट्रातल्या कासेगाव येथे पती डॉ. भारत पाटणकर यांच्यासमवेत राहातात.

आज तनिका सरकार, उपिंदर सिंग, नयनज्योत लाहिरी, प्राची देशपांडे यांसारख्या अनेक इतिहासतज्ज्ञ स्त्रिया भारतात आहेत. ही नावांची यादी अपूर्ण आहे. केवळ लेखाची मर्यादा म्हणून त्यांच्या कामाविषयी लिहिण्याचा मोह टाळावा लागतो. खरंतर भारतातील स्त्री इतिहासकार आणि त्यांचं योगदान याविषयी मोठं पुस्तकच निश्चित होऊ शकेल.